'दरड कोसळेल म्हणून आम्ही रात्रभर जागतो', सह्याद्रीतल्या एका दहशतीखाली जगणाऱ्या गावाची गोष्ट

- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
"रात्रीचा पाऊस आला तर भीती वाटते ना.. मग आम्ही बसूनच असतो.. झोपत नाही बिन्धास्त..." परशुराम गावच्या सुधा बडबे यांनी सहज बोलता बोलता त्यांच्या मनातील भीती सांगितली.
ही भीती पावसाची नाही तर त्यामुळं येऊ शकणाऱ्या संकटाची आहे.
मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण पासून अगदी काही किलोमीटर वर परशुराम घाटाच्या वरच्या भागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या या परशुराम मधल्या 21 लोकांची घरं दरडप्रवण घोषित केली गेली आहेत.
खाली रस्त्याच्या कामासाठी डोंगर पोखरला गेला आणि त्याचा परिणाम म्हणजे ही घरं धोकादायक ठरली असं स्थानिक सांगतात.
परिस्थिती अशी की, जोराचा पाऊस झाला आणि भूस्खलन झालं तर डोंगर कड्यासकट ही घरंही वाहून जातील. हीच भीती सुधा बडबेंना रात्रभर जागण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
मुंबईला आयुष्य घालवलेल्या सुधा बडबे आता म्हातारपण गावाकडे घालवायचं म्हणून आल्या. पै पै जोडून घर उभारलं. पण आता त्याच घराला लोखंडी पट्ट्या ठोकून मजबूत करण्याची त्यांची धडपड सुरु आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या घरांमधून निघून जा म्हणून ग्रामपंचायत त्यांना नोटीस बजावते.

बडबे सांगतात, "आता हा रस्ता बनवला त्यामुळं परिस्थिती गंभीर झाली. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. मी रात्रभर बसलेलीच असते. त्यांना म्हणते तुम्ही झोपा. पण मी झोपत नाही. पाऊस खूप असतो आणि वारा पण. दिवसाही भीती वाटते आम्हाला. पण जाणार कुठे?”
या गावातली एकूण 21 घरं धोकादायक ठरली असल्याचं सरपंच गायत्री जोगळे सांगतात. पूर्वी अशी परिस्थिती नसल्याचंही त्या नोंदवतात.
सध्या तात्पुरती उपाययोजना म्हणून ग्रामस्थांनीच डोंगरांच्या पुढे बांबू, काड्या, काठ्या गोळा करुन टेकू उभारले आहेत. शासनानं गाव आणि घरं सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करावी अशी विनंती ग्रामपंचायतीने वारंवार केल्याचं त्या सांगतात. पण आत्तापर्यंत हातात नुसतीच आश्वासनं पडली आहेत.

जोगळे या परिस्थितीसाठी हायवेच्या कामालाच जबाबदार ठरवतात.
"हायवेचं काम करत असताना आधी आम्हांला नोटीस दिल्या गेल्या नव्हत्या. कटींग झाल्यानंतर आम्हाला नोटीस दिली गेली, म्हणजे इथल्या लोकांना. परशुराम गावच्या 21 घरांना स्थलांतरीत व्हा म्हणून नोटीस काढल्या आहेत. तात्पूरत्या स्वरुपात स्थलांतरीत व्हा म्हणून नोटीस दिली जाते. पण हायवेचं काम करत असताना, अद्याप लोकांच्या सुरक्षेसाठी कोणतीच उपाययोजना केली गेली नाही,” असं ते म्हणाले.
हायवेच्या वरच्या भागात परशुराम गावात दरड कोसळण्याची भीती आहे. पण पायथ्याशी असलेल्या पेढे गावात दरड कोसळून लोकांची घरं आणि जीव गेलेत.

तुटलेली घरं आणि वाहून आलेली माती या खाणाखुणांसह इथली माणसं भीतीच्या छायेखाली जगत आहेत. जिथून दरड कोसळली तिथं आता दगडांनी संरक्षक भिंत बांधली गेली आहे.
त्याच्या वर लोकांना बसायला व्ह्यू पॅाईंट सारखी जागाही तयार झाली आहे. पण त्याच्या समोरच्या बाजूला रस्त्यासाठी उभारलेल्या भिंतीना गेलेले तडे स्पष्ट दिसतात.
याच भिंतीच्या पायथ्याशी एकनाथ मांडवकरांचं घर आहे. दरड कोसळली तेव्हा त्यांचं घर चिखल दगड धोंड्यांनी भरलं. पण वेळीच बाहेर पडल्याने ते आणि त्यांचे कुटुंबीय वाचले.

समोरची घरं आणि त्यातली माणसं बघता बघता नाहीशी झाली. पण दरडीच्या या खुणांसह ते त्याच घरात राहतायत.
दरवर्षी सरकारकडून त्यांनाही पावसाळ्यात दुसरीकडे जाण्याची नोटीस दिली जाते. मांडवकर सांगतात, “भीती म्हणजे काय.. दगडांची जी पांद बांधलीये ती भरपूर मोठी बांधली आहे. त्याची भीती वाटते. ती टिकली तर काही अडचण नाही. दरवर्षी कुठेतरी शेजारी स्थलांतरीत व्हा असं सांगतात. आम्ही शेजारी कुठे रहायचं?”
कोकणात सुरू असलेल्या कामामुळं ही परिस्थिती. तर कोयनेच्या काठावरच्या मिरगाव मध्ये नैसर्गिक कारणांनीच भूस्खलन झालं.
आता गावात शिरताना दिसतात ती कुलुपबंद घरं. जुलै 2021 मध्ये या गावावर दरड कोसळली आणि गावातले एकूण 6 जण त्या रात्री मृत्युमुखी पडले. गावातल्या प्रत्येकाच्याच डोळ्यांसमोर ती रात्र जीवंत आहे.

तानाबाई सपकाळ सांगतात, "पाणी वरून येत होतं. घराला इथं पाणी लागलं. आम्ही म्हणलं इतकं पाणी कसं येतंय. कोणी कुदळी वगैरे घेऊन धरणं काढायला लागलं. पण पाणी जास्तच येत होतं. मग झाडं वाहून यायला लागली. 11 वाजेपर्यंत हे सुरु होतं आणि 11ला तर वरुन सगळंच आलं खाली.”
हाताशी असलेला संसार घेऊन इथली लोकं कोयनेतल्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये स्थलांतरित झाली आहेत. कामासाठी गावात यायचं, पाहुणे आले की इथल्या घरांमध्ये रहायचं आणि पुन्हा पत्र्याच्या दोन खोल्यांच्या संसारात आसरा घ्यायचा असा त्यांचा संसार विभागला गेला आहे.
प्रवीण सपकाळ सांगतात, शेतीची कामं असतील ना तेव्हा इथं यावं लागतं. ती कामं आटपून संध्याकाळी परत जावं लागतं. त्रास होतो. पण उदरनिर्वाह असाच चालतो ना. घर उघडतात आणि संध्याकाळी लॅाक करुन परत जातात.
पण जेवढा वेळ येतात तेवढा वेळ सुद्धा भितीच्या छायेतच वावरतात. मुळात हे मिरगाव कोयनेचं धरण झालं तेव्हा स्थलांतरीत होऊन इथं वसलं.
पण इथं दरड कोसळल्याने पुन्हा बिऱ्हाड हलवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. धरणग्रस्त, दरडग्रस्त आणि भूकंपग्रस्त असे तीन शिक्के कागदांवर वागवत आम्ही फिरत असल्याचं स्थानिक सांगतात.
पण 3 वर्ष झाली तरी त्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव मात्र अजून कागदावरही उतरलेला नाहीये.

पावसाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा :

भूस्खलन म्हणजे काय?
भूस्खलन म्हणजे डोंगर कड्यावरुन दरड किंवा खडक कोसळणं किंवा जमीन खचणं. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये माळीण, इर्शाळवाडी, तळीये, मिरगाव, पेढे, आंबेघर अशा अनेक ठिकाणी भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यातल्या माळीण, तळीये सारख्या घटनांमध्ये गावच्या गावं नाहीशी झाली.
इस्त्रोच्या लॅण्डस्लाईड अँटलास नुसार युनायटेड नेशन्स स्ट्रॅटर्जी फॅार डिझास्टर रिडक्शन्सने नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दरड कोसळण्याने होणाऱ्या मृत्यूंना तिसऱ्या क्रमांकाची आपत्ती म्हणलं आहे.
जगभरात सर्वाधिक भूस्खलनाच्या घटना घडणाऱ्या भागांमध्ये कोलंबीया, ताजिकिस्तान, नेपाळ आणि भारताचा समावेश आहे. या देशांमध्ये प्रत्येक 100 चौरस मीटर मध्ये भुस्खलनाने एकाचा मृत्यू होतो.
भारतात हिमालयात दरड कोसळणे नवीन नाही. पण आता त्याखालोखाल त्यात पश्चिम घाटाचा समावेश झाला आहे. आकडेवारीनुसार 2000-2017 या वर्षांमध्ये देशभरात भूस्खलनाच्या 80933 घटना घडल्या (स्रोत- इस्त्रो). यापैकी पश्चिम घाटात

महाराष्ट्रात पालघर, ठाणे,पुणे, मुंबई, रायगड, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी,नाशिक आणि नगर अशा 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 483गावं दरड प्रवण म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ज्यांचं पुनर्वसन प्रस्तावित आहे.
कारणे काय?
स्थानिकांच्या मते, कुठे मानवी हस्तक्षेप तर कुठे नैसर्गिक कारणांनी डोंगर खचत गेला.
चिपळूणचे मल्हार इंदूलकर सांगतात, हायवेचं बांधकाम सुरु झालं तेव्हा गावातल्या लोकांचं निरिक्षण आहे की, ज्या मोऱ्यांमधून पाणी वाहतं त्या अडवल्या गेल्या. त्यातून पाणी वाहिलं नाही. आणि मग ते सगळंच वाहून खाली आलं. भूस्खलनासाठी हे पाणी हे महत्वाचं कारण मानलं गेलंय.
पुण्यातील सतर्क ही संस्था डिझास्टर अलर्टसाठी देण्याचं काम करते. नागरी सहभागातून सुरु झालेल्या या संस्थेचे संस्थापक आणि विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांच्या मते कमी वेळात जास्त पडणारा पाऊस आणि दरड कोसळणे यांचा संबंध दिसून आला आहे.
या संस्थेने इर्शाळवाडी पासून अलिकडे झालेल्या लवासातल्या दरड कोसळण्याच्या अनेक घटनांचे अलर्ट आधीच दिले होते.

बीबीसी मराठीशी बोलताना प्रभुणे म्हणाले, जसं आपण महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे जायला लागू तसं दरडी कोसळण्याच्या घटना वाढत जातात.
महाराष्ट्रात दोन प्रकारच्या दरडी कोसळतात ज्यात मानवी हस्तक्षेप आहे किंवा पूर्णपणे नैसर्गिक. मानवी हस्तक्षेप काय तर जिथं घाट रस्ते बांधले आहेत, किंवा घरं बांधली आहेत अशी ठिकाणं.
पण महाराष्ट्रात खूप मोठा भाग असा आहे जिथे नैसर्गिक कारणांनी दरडी कोसळतात. मानवी हस्तक्षेपांमुळे कोसळलेल्या दरडींचं प्रमाण हे संख्येने जास्त आहे. पण त्यामुळे होणारं नुकसान कमी आहे. नैसर्गिक दरडींची संख्या कमी असली तरी त्याचं नुकसान जास्त आहे.

यामागची कारणे सांगताना प्रभुणे म्हणतात, दरडप्रवण क्षेत्रात जर खूप कमी वेळात जास्त पाऊस झाला आणि त्याच्या जोडीला संततधार पाऊस सुरू असेल तर तिथे जमिनीत आधीच खालपर्यंत पाणी मुरलेलं असतं .
याच्या वर जर 200-300 मिलीमिटर पाऊस झाला तर त्या मातीची पाणी धारण करण्याची क्षमता संपते. आणि हेच जर डोंगर उतारावर घडलं तर त्या भागामध्ये चिखल तयार होतो आणि तो गुरुत्वाकर्षणाने खाली घसरून येतो. अशा प्रकारच्या दरडींना भूस्खलन म्हणतात. सतर्क च्या अभ्यासात असा दिसलं की, अशा ठिकाणी बेसॉल्ट खडक एक्सपोज झाला आहे.
म्हणजे त्याच्या वर जो मातीचा थर होता त्यात पाणी मुरुन तो घसरुन आला आहे. ज्याठिकाणी झाडी आहे तिथं अशा घटना होत नाहीत, असं म्हणतात त्यातही तथ्य नाही. कारण यात जर पाणी साठलं तर ती झाडं ट्रिगरींगचं काम करतात आणि सगळं घेऊन खाली येतात.
अशा घटना वाढतील?
यापुढच्या काळात अशा घटना वाढू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे हवामान बदल.
हवामान बदलामुळं कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होणार असल्याचं हवामान शास्त्रज्ञ सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर म्हणाले की, "भूस्खलनाची अनेक कारणं आहेत. याचं एक महत्वाचं कारण घाटभागात मुसळधार पाऊस सतत होत असेल तर तिथे असं भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. "

हवामान विभागाकडून अशा संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना दिली जाते. हवामानाबाबत काम करणाऱ्या सर्वांचंच असं ठाम मत आहे कीस तीव्र पावसाची वारंवारता सध्या वाढत आहे.
छोट्या भागामध्ये कमी वेळात तीव्र पाऊस पडतो आणि त्याचं प्रमुख कारण हवामान बदल आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगमध्ये हवा गरम होते त्यावेळी त्याची आर्द्रता धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे हवा सॅच्युरेट होत नाही.
त्यामुळे तयार होणारे जे ढग असतात ते 12-15 किलोमिटरचे तयार होऊ शकतात. हे ढग तयार होतात तेव्हा त्यात वीजा चमकणे, मेघगर्जनेसह तयार होणारा पाऊस, खूप वेगाने वाहणारे वादळी वारे असे प्रभाव आपल्याला दिसतात आणि कमी वेळात खूप जास्त पाऊस दिसतो. बऱ्याच ठिकाणी त्याचे धोके निर्माण होतात.”
पुनर्वसन का रखडलं?
माळीण, इर्शाळवाडी सारख्या घटनांनंतर या गावांचं पुनर्वसन झालं असलं तरी राज्यातल्या इतर ठिकाणी मात्र लोक अजूनही भीतीच्या छायेत राहत आहेत.
कोयनेच्या मिरगावच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव अजून जागा निश्चित होत नसल्याने रखडला आहे. तर पेढे आणि परशुराम गावचं पुनर्वसन अद्याप प्रस्तावीतच नाही असं स्थानिक सांगतात.
यातल्या अनेक जणांना तात्पूरते निवारे उभे करुन देण्यात येतात. तर काहींना फक्त इथं राहणं धोकादायक आहे असं सांगणारी नोटीस दिली जातेय.
राज्यातील एकूण 483 दरडप्रवण गावांचं पुनर्वसन होणार असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जातंय. पण सध्या मात्र इथले नागरिक सुरक्षित निवाऱ्याची वाट पाहत भीतीच्या छायेखाली रात्र रात्र जागरणं करतायत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन.











