दारू पिणं थांबवलं की तुमच्या लिव्हरचं काय होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. अश्विन धांडा
- Role, यकृततज्ज्ञ, द कॉन्वर्सेशन
ग्रीक पौराणिक कथांनुसार प्रोमेथसने (अग्निदेवता) माणसाला अग्नी दिला म्हणून झेऊसने (वीज शस्त्र असलेली आकाशदेवता) त्याला शिक्षा केली.
त्याने प्रोमेथसला बांंधून घातलं आणि त्याचं यकृत (लिव्हर) गरुडांना खायला घातलं. प्रत्येक रात्री त्याचं यकृत पुन्हा पूर्ववत होई आणि दिवसा ते खायला गरुड येत असत. अशी ती कथा आहे.
यकृत खरंच पुन्हा तयार होतं का?
शरीराच्या आत असलेला यकृत हा सर्वांत मोठा अवयव आहे. शरीरातील अनेक क्रियांसाठी त्याची गरज आपल्याला असते. अल्कोहोलसारख्या विषद्रव्यांचं विघटन करण्यासाठीही तो अवयव लागतो.
दारुच्या संपर्कात येणारा तो आपला पहिला अवयव असल्यामुळे दारुचा सर्वांत जास्त परिणाम त्यावरच होतो.
अर्थात दीर्घकाळ मद्यपानामुळे मेंदू आणि हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवांवरही परिणाम होतो हे आपण विसरता कामा नये.
यकृततज्ज्ञ म्हणून मी मद्यपानामुळे यकृताच्या समस्या निर्माण झालेल्या रुग्णांवर दररोज उपचार करतो.
यामध्ये यकृतावर मेद जमा होणं म्हणजे फॅटी लिव्हरपासून लिव्हर सिऱ्होसिसपर्यंतच रुग्ण दिसतात.
मेद आणि चट्टे
सुरुवातीच्या टप्प्यात अल्कोहोलमुळे यकृतात मेद साठते त्यामुळे त्याचा आकार वाढतो.
ते ठीक करण्याचा प्रयत्न करताना यकृतावर स्कार्स म्हणजे चट्टे येतात. हे सगळं नियंत्रणाबाहेर गेलं की यकृत केवळ एक चटट्यांच्या जाळीनं वेढलं जातं त्याला सिऱ्होसिस असं म्हटलं जातं.
सिऱ्होसिसच्या नंतरच्या टप्प्यात यकृत निकामी होत जातं. लोकांना काविळ होऊ शकते. द्रवपदार्थानी भरल्यामुळे सूज येऊ शकते, लोकांना थकवा आल्यासारखं, गोंधळल्यासारखं वाटू शकतं. ही अत्यंत गंभीर स्थिती आहे त्यामुळे जीवावर बेतू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
जे लोक ठरवून दिलेल्या आठवड्याभरात 14 युनिटपेक्षा जास्त नियमित मद्यपान करतात त्यांना फॅटी लिव्हरचा त्रास होतो आणि दीर्घकाळात त्यांना लिव्हरवर चट्टे येणं आणि सिऱ्होसिसचा त्रास होतो.
चांगली बातमी
हां. पण आपल्याकडे एक चांगली बातमीही आहे. फॅटी लिव्हर असलेल्या लोकांनी मद्यपान फक्त दोन ते तीन आठवडे थांबवलं तरी यकृत पुन्हा मूळ स्थितीत यायला लागतं आणि चांगल्याप्रकारे काम करू लागतं.
ज्यांना यकृताचा दाह होतो किंवा थोड्या प्रमाणात चट्टे आहेत त्यांनी दारू सोडल्यास अगदी सात दिवसातही त्यांच्या यकृतावरचा मेद कमी होत असल्याचा, दाह कमी होत असल्याचा आणि चट्टे कमी होत असल्याचा अनुभव येतो.
शरीराच्या आत असलेला यकृत हा सर्वांत मोठा अवयव आहे. शरीरातील अनेक क्रियांसाठी त्याची गरज आपल्याला असते. अल्कोहोलसारख्या विषद्रव्यांचं विघटन करण्यासाठीही तो अवयव लागतो.
जर अनेक महिने मद्यपान थांबवलं तर लिव्हरची झिज कमी होऊन ती पुन्हा आहे त्या स्थितीत येऊ लागते.
भरपूर मद्यपान करणारे जसे की यकृतावर भरपूर चट्टे असणारे आणि यकृत निकामी होण्याच्या स्थितीत असणाऱ्यांनी काही वर्षं मद्यपान थांबवलं तर त्यांचं यकृत निकामी होण्यापासून आणि अकाली मृत्यू लांबवता येऊ शकतात.
अर्थात भरपूर दारू पिणारे आणि दारुवरच अवलंबून असणाऱ्या लोकांनी अचानक दारू थांबवली तर काही लक्षणं त्यांच्यावर दिसू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
काहीवेळेस शरीर थरथरणे, घाम येमे असे प्रकार दिसतात. परंतु जरा गंभीर स्थितीत भास होणे, आकडी येणे असे प्रकार होतात अगदी मृत्यूही संभवतो.
त्यामुळे दीर्घकाळ मद्यपान करणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्लामसलतीने, त्यांच्या निरीक्षणाखालीच दारू सोडण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
इतर फायदे
दारू पिथं थांबवल्यामुळे इतरही चांगले फायदे आहेत. झोपेवर, मेंदूच्या कार्यावर, रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो.
दीर्घकाळ दारू थांबवल्यामुळे यकृत, स्वादुपिंड, आतड्याच्या कर्करोगासह अनेक कर्करोग दूर ठेवता येतात. हृदयरोग आणि स्ट्रोकच्या त्रासाची भीतीही कमी होते.
अर्थात अल्कोहोल हे एकमेव अनारोग्याचं कारण नाही. दारू सोडण्याचे फायदे असले तरी तो रामबाण उपाय नाही. दारू सोडणं हा चांगल्या जीवनशैलीचा एक भाग म्हटला पाहिजे. त्यात चौरस आहार आणि नियमित व्यायामही आलाच.
आता आपल्या प्रोमेथसच्या कथेकडे परत जाऊ. यकृताकडे स्वतःलाच दुरुस्त करण्याची ताकद असली तरी त्याचं भरपूर नुकसान झालं असेल तर ते पुन्हा तयार होत नाही.
जर फॅटी लिव्हर असताना दारू पिणं थांबवलं तर ते पुन्हा योग्य स्थितीत येऊ शकतं.
जर यकृताला सिऱ्होसिस असेल आणि दारू थांबवली तर त्याची झीज भरुन येण्यास आणि त्याचं काम सुधारण्यात मदत होते. पण झालेलं सगळं नुकसान भरुन काढता येत नाही.
जर तुम्हाला खरंच तुमच्या यकृताची काळजी असेल तर आजिबात दारू पिऊ नका.
किंवा प्यायचीच असेल तर दारूचं प्रमाण कमी ठेवा, आठवड्यात दोन-तीन दिवस दारुमुक्त ठेवा.
त्यामुळे दारूपासून लांब राहिल्यास यकृताच्या स्वतःची झीज भरुन काढण्याच्या जादूमय गुणावर अवलंबून राहावं लागणार नाही.
(अश्विन धांडा हे इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ प्लेमाऊथ इथं हेपॅटॉलॉजीचे प्राध्यापक आहेत. त्यांचा मूळ लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)











