IFFI च्या ज्युरींचा काश्मीर फाईल्सच्या समावेशावर आक्षेप, म्हणाले...

फोटो स्रोत, PIB
1. IFFI मध्ये ज्युरींची काश्मीर फाईल्स चित्रपटावर टीका, ते म्हणाले...
गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सोमवारी सांगता झाली. या महोत्सवातील ज्यूरी हेड आणि इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनीही महोत्सवात मनोगत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा साधला.
ते म्हणाले, “या महोत्सवतील 15वा चित्रपट ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला. आम्ही खूपच अस्वस्थ झालो. आमच्यामते हा चित्रपट एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा (प्रोपगंडा) आणि असभ्य(वल्गर) चित्रपट आहे. एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणं हे अयोग्य आहे.”
सोशल मीडियावर हा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्री यांना टॅग करून यावर व्यक्त होण्याची विनंती केली आहे.
‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला भारतात प्रदर्शित करण्याआधी इतर देशांमध्ये दाखवण्यात आलं होतं. शिवाय या चित्रपटाला भारतात मोठं यश मिळालं होतं. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
2. संजय राऊत नावाचा बोकड आणला होता, पण त्याचा बळी दिला नाही - संजय गायकवाड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सहकारी आमदारांबरोबर गुवाहाटीला जाऊन कामाख्या मंदिरात नवस फेडला. त्या कार्यक्रमाला त्यांच्या गटातले आमदार संजय गायकवाड नव्हते.
तिथे अनुपस्थित राहण्याचं कारण विचारल्यावर ते म्हणाले,
“ज्यावेळी राज्यात सरकार स्थापन करुन तेव्हा आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला पुन्हा येऊ. त्यानुसार आम्ही सगळ्या लोकांनी कामाख्या देवीला जाण्याची तयारी केली होती. माझं विमानाचं तिकीटही काढलं होतं.
मी संजय राऊत या नावाचा एक बोकड देवीला भोग देण्याकरता नऊ हजार रुपयांना विकतही घेतला होता. पण परवा देवीने मला साक्षात्कार दिला की, मी याचा भोग स्वीकारत नाही. कारण या बोकडाचा भोग स्वीकारला तर हा स्वर्गात जाईल. याची जागा नरकात आहे. त्यामुळे हा भोग मी काही स्वीकारणार नाही. परिणामी मी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेलो नाही.” महाराष्ट्र टाइम्स ने ही बातमी दिली आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
3.महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आज होणारी सुनावणी लांबणीवर

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात आज न्यायालयात सुनावणी होणार होती.
पाच न्यायमूर्तींपैकी आज न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नाहीत. त्यामुळं आजची सुनावणी लांबणीवर गेली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
दरम्यान, मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं होतं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना तीन आठवड्यांची मुदत दिली होती.
त्यानंतर आज होणारी सुनावणी राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारच्या दृष्टीनं निर्णायक ठरण्याची शक्यता होती. मात्र, ही सुनावणी लांबणीवर गेल्यानं याबाबत कधी निर्णय लागणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
4. धर्मस्वातंत्र्य म्हणजे धर्मांतर घडवणं नव्हे
इतरांचं धर्मांतर घडवण्याच्या कृतीचा धार्मिक स्वातंत्र्यात समावेश होत नाही. तसंच फसवणूक, बळजबरी किंवा आमिष दाखवून एखाद्या व्यक्तीचे धर्मांतर घडवून आणण्याचा अधिकार स्वीकारार्ह ठरत नाही अशी भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायलयात मांडली. लोकसत्ताने ने ही बातमी दिली.
बळबजबरीने धर्मांतराचा धोका असल्याने त्यावर अंकुश ठेवणारे कायदे महिला तसंच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास समाजघटकांच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याचंही केंद्राने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं आहे.
संबंधित राज्याकडून आवश्यक ती माहिती घेतल्यानंतर तपशिलवार प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्या.सी.टी. रविकुमार यांनी केंद्राला दिले.
5. श्रद्धा वालकर सारखं आणखी एक प्रकरण दिल्लीत उघड

फोटो स्रोत, ANI
दिल्लीमधील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असताना पुन्हा एकदा दिल्लीमध्ये अशीच एक घटना घडली आहे.
एका महिलेने तिच्या मुलाला सोबत घेऊन आपल्या पतीचा खून केला आहे. आरोपी आफताबने श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे ज्या पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवले होते, अगदी तशाचा प्रकारे या महिलेनेदेखील तिच्या पतीचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते.
दिल्ली पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.
या महिलेचे नाव नाव पूनम तर मुलाचे नाव दीपक असं आहे. हत्या झालेल्या पुरूषाचं नाव अंजन दास असं आहे. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे.
महिलेने आपल्या पतीचा खून करून मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवून ठेवले. तसेच हे तुकडे पांडव नगर परिसरातील मैदानावर फेकून देऊन, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








