चीनमधील निदर्शनं शी जिनपिंग सरकारसाठी मोठं आव्हान ठरतंय, कारण...

- Author, स्टीफन मॅकडोनेल
- Role, बीबीसी प्रतिनिधी, बीजिंग
चीनमध्ये यापूर्वीही अनेक आंदोलनं झाली आहेत.
मागच्या काही वर्षांत वायू प्रदूषण असो किंवा जमिनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेणं असो नाहीतर मग पोलिसांच्या हातून लोकांचा छळ असो, यासारख्या विविध मुद्द्यांवर स्थानिक लोकांनी चिनी सरकारचा निषेध केलाय.
पण यावेळी हा निषेध थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे.
चिनी लोकांच्या डोक्यात एकाच वेळी फक्त एकच मुद्दा आहे, आणि या मुद्द्याने लोकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. हा मुद्दा म्हणजे चीन सरकारची 'झिरो कोविड पॉलिसी'. लोक या पॉलिसीविरोधात तीव्र निषेध नोंदवत आहेत.
लोक सोशल डिस्टंसिंगचे नियम पायदळी तुडवत रस्त्यावर उतरले आहेत. हे लोक मोठ्या संख्येने शहरांकडे आणि विद्यापीठ कॅम्पसकडे निघाले आहेत.
ही इतकी धक्कादायक परिस्थिती आहे की याची व्याख्या करणं कठीण आहे.
शांघायमधील रस्त्यांवर उतरलेल्या या लोकांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. सोबतच त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणीही केली.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसांच्या विरोधात असं उघडपणे बोलणं अत्यंत धोकादायक मानलं जातं. अशा घोषणाबाजीमुळे लोकांना तुरुंगातही डांबलं जातं.
एवढं सगळं असूनही लोक शांघायच्या रस्त्यांवर (वूल्मुकी लू) उतरलेत. या रस्त्याला शिनजियांगमधील एका शहराचं नाव देण्यात आलंय.
एका आंदोलकाने घोषणा दिली, "शी जिनपिंग"
आणि मागच्या शेकडो जणांनी "गादी सोडा" असं उत्तरात म्हटलं.

फोटो स्रोत, SUPPLIED
'शी जिनपिंग गादी सोडा, शी जिनपिंग गादी सोडा' अशा घोषणा रस्त्यांवर दिल्या जात होत्या.
'कम्युनिस्ट पार्टी सत्ता सोडा, कम्युनिस्ट पार्टी सत्ता सोडा' या घोषणाही मधून मधून दिल्या जात होत्या.
कम्युनिस्ट पक्ष ही चीनमधील सर्वांत मोठी राजकीय संघटना आहे. या पक्षाची प्राथमिकता सत्तेत राहणं आहे.
त्यामुळे अशा पद्धतीचं आंदोलन कम्युनिस्ट पक्षासमोरचं मोठं आव्हान बनलंय.
झिरो कोव्हिड धोरणाला जो विरोध होतोय त्याविषयी सरकार अनभिज्ञ असल्याचं दिसतंय.
हे धोरण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी थेट जोडलं जातंय.
चीन हे धोरण माघारी घेणार नसल्याचं हल्लीच जिनपिंग यांनी म्हटलंय.
त्यामुळे असं वाटतंय की, कम्युनिस्ट पक्ष आत्ता ज्या परिस्थितीत अडकलाय ते पाहता त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा असा सोपा पर्याय उपलब्ध नाहीये.
चीन सरकारकडे देश सुरू करण्यासाठी तीन वर्ष होते. या काळात नवीन हॉस्पिटल, नवे आयसीयू युनिट, लसीकरण अशा गोष्टींवर भर देण्याऐवजी त्यांनी टेस्ट करण्यावर, लॉकडाऊन लावण्यावर, कर्फ्यु लावण्यावर भर दिला आणि यात बरीच संसाधने गुंतवली.
चीनला अशा विषाणूविरुद्धचं युद्ध जिंकायचं आहे, जो कधीच संपणार नाहीये.











