मेलिटा बेंट्झ : त्यांनी कॉफी फिल्टरचा शोध लावला, हिटलरने बंदी घातली, तरीही 2 अब्ज डॉलर्सची उलाढाल

फिल्टरचा शोध लागण्याआधी कॉफी चवीला खूप कडू होती आणि तोंडात कॉफी बियांचे तुकडे राहायचे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीची ही घटना आहे. जर्मनीच्या मेलिटा बेंट्झ (1873-1950) रोज सकाळी एक कप कॉफी पित असत. पण कॉफीच्या प्रत्येक घोटामागे त्यांना काहीतरी खटकायचं.

कडू चव आणि कॉफीच्या बियांचे तुकडे तोंडात राहायचे. त्यामुळे कॉफी पिण्याची मजा येत नव्हती.

शेवटी गृहिणी असलेल्या बेंट्झ यांनी यावर काहीतरी उपाय काढण्याचा प्रण घेतला.

जर्मनीतील त्यांच्या स्वयंपाकघरात कॉफी बनवताना त्यांनी काही प्रयोग सुरू केले.

जे पुढे युरोपमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत गेले.

अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर बेंट्झ यांना एक आयडिया सुचली. एके दिवशी त्यांनी त्यांच्या मुलांच्या शाळेतील एका नोटबुकमधून कागदाचा तुकडा फाडला. तो जुन्या टिनच्या डब्यात काही छिद्रे करून ठेवला.

त्या ग्राउंड कॉफी टाकली आणि त्यावर गरम पाणी ओतलं. त्यांना तो चमत्कार घडल्यासारखं वाटलं.

कॉफी पेपरमधून थेट कपमध्ये पडली. तेव्हा ते एकजीनसी मिश्रण बनलं होतं. ती कमी कडू होती आणि त्यात बियांचे तुकडे पण नव्हते.

हाच तो क्षण होता जेव्हा मेलिटा बेंट्झ यांनी जगातील पहिला कॉफी फिल्टर तयार केला होता.

सुरुवातीची वर्षं

बेंट्झ महत्त्वकांक्षी आणि दूरदर्शी होत्या. त्यांनी त्यांच्या काही जवळच्या मित्रांना दुपारी कॉफी पिण्यासाठी बोलवायच्या. तिथे त्या आपल्या कॉफी फिल्टरची चाचणी घ्यायच्या.

हे कॉफी फिल्टर पुढे इतकं लोकप्रीय झालं की बेंट्झ यांनी 1908 मध्ये त्याचं पेटंट घेतलं. त्यानंतर त्यांनी पती हुगो बेंट्झ यांच्यासोबत पार्टनरशीमध्ये फिल्टर बनवणारी कंपनी सुरू केली.

बेंट्झ यांना त्यांच्या कॉफी फिल्टरवर ठाम विश्वास होता. त्यामुळे त्या प्रत्येक स्टोअर, वेअरहाऊस आणि ट्रेड शोला भेट द्यायच्या. तिथे कॉफी फिल्टरचा डेमो दाखवायच्या. अनेक लोक तो फिल्टर घ्यायचे.

त्यांनी घरातच कॉफी फिल्टरचं उत्पादन करायला सुरुवात केली. घरातल्या तब्बल पाच खोल्यांमध्ये त्याचं उत्पादन चालायाचं. तर त्यांची दोन मुलं विली आणि हॉर्स्ट चारचाकी गाडीत डिलिव्हरी करायचे.

कॉफी फिल्टर शोधाच्या एक वर्षानंतर 1909 मध्ये जर्मनीतील ‘लीपझिग ट्रेड फेअर’मध्ये त्यांनी 1 हजाराहून अधिक फिल्टर्स विकले.

5 वर्षांतच मेलिटा बेंट्झ एक यशस्वी उद्योजिका बनल्या. त्यांच्या कॉफी फिल्टरची मागणी आणखी वाढतच गेली.

पुढे त्यांनी घरात सुरू केललं उत्पादन एका मोठ्या वेअरहाऊसमध्ये करायला सुरुवात केली.

15 लोकांना कामावर घेतले. मोठ्या मशीन्समध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे त्यांच्या उत्पादनाला गती आली.

पण पहिल्या महायुद्धाच्या उद्रेकाने या जर्मन उद्योजिकेच्या महत्त्वकांक्षेवर काळे ढग पसरले.

पहिल्या महायुद्धाचं कॉफी फिल्टरवर सावट

जुलै 1914मध्ये पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. तेव्हा बेंट्झ यांचे पती आणि मोठा मुलगा विली जर्मन सैन्यात भरती झाले. संघर्षाने कुटुंबात फूट पाडली.

कंपनी चालवण्याची संपूर्ण जबाबदारी बेट्झ यांच्यावर पडली.

कॉफी बियांची आयात घटली. कागदासारख्या उत्पादनांचं रेशनिंग सुरू झालं. त्यामुळे व्यवसाय करणं जास्त कठीण झालं.

काही काळानंतर बेंट्झ कॉफी फिल्टर तयार करू शकल्या नाहीत. मग त्यांनी पुठ्ठ्यांच्या बॉक्सचं उत्पादन करायला सुरुवात केली.

पहिलं महायुद्ध संपलं. फिल्टरची मागणी पुन्हा वाढली. व्यवसाय पुन्हा वाढला.

बेंट्झ यांना बिझनेसची नस सापडली होती. कामगारांची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांनी अधिक बोनस द्यायला सुरुवात केली.वाढीव सुट्ट्या दिल्या. कामाचा आठवडा पाच दिवसांपर्यंत कमी केला.

साहजिक त्यामुळे कंपनीचं उत्पादन पुन्हा वाढलं.

दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि…

उद्योग भरभराटीला आला होता तोवर दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं. त्याचा थेट परिणाम बेंट्झ यांच्या उत्पादनावर झाला.

तसंच 1942 मध्ये हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने कॉफी फिल्टरच्या निर्मितीवर बंदी घातली.

त्याऐवजी नाझी राजवटीने मेलिटा बेंट्झ यांना लष्करासाठी लागणारी उत्पादनं घ्यायला भाग पाडलं.

बेंट्झ यांच्या कंपनीला थेट नाझी सरकारच्या ‘राष्ट्रीय समाजवादी उद्योग’ धोरणासोबत कार्य करावं लागलं.

दुसरं महायुद्ध संपलं. पण नाझी सरकारने कामगारांकडून जबरदस्तीने काम करून घेतलं होतं. त्यासाठी बेंट्झ यांच्या कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागली.

जर्मनीतील परिस्थिती पुन्हा रुळावर येत होती. पण मेलिटा बेंट्झ यांना पुन्हा कॉफी फिल्टरचं उत्पादन घेण्यासाठी 1947 उजाडलं.

पण तीन वर्षांनंतर 29 जून 1950 रोजी या उद्योजक महिलेचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं.

बेंट्झ यांचा वारसा 2 अब्ज डॉलर्सचा झालाय

मेलिटा बेंट्झच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी कंपनी चालू ठेवली.

1959 मध्ये बेंट्झ यांच्या मुलांनी जर्मनीतील मिंडेन शहरात एक नवीन कारखाना बांधला. तिथे त्यांनी युरोपमधील सर्वात आधुनिक पेपर मशीन उभारली होती. हा कारखाना आजतागायत तिथेच सुरू आहे.

पुढच्या काळात त्यांनी व्हॅक्यूम क्लीनर आणि इतर घरगुती उपकरणांचं उत्पादन सुरू केलं.

सध्या मेलिटा समूह जगभरात 5,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देतो.

कंपनीच्या 2021 अहवालानुसार त्यांचा वार्षिक नफा 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)