You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुर्की : शहरंच्या शहरं तंबूत वसलियेत, दूरवर सर्वत्र दिसते ती फक्त आणि फक्त पडझड
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी, तुर्कीहून
एका उद्ध्वस्त झालेल्या घरासमोर बसलेली एक बाई त्या नामशेष झालेल्या घराला पाहत होती. तिच्या हातात एक झोळ्यासारखी पिशवी दिसते, त्यात गरम कपडे आहेत. बचाव तुकडीने दिलेली पाण्याची अर्धी रिकामी बाटली होती.
काही दिवसांपूर्वी दक्षिण तुर्कीतल्या इस्केंद्रन शहराच्या मध्यवर्ती भागातलं हे घर पाच लोकांचं स्वप्नपूर्ती होतं. पण भूकंपाच्या दोन धक्क्यांनी घराचा ढिगारा झाला. भूकंपाने या कुटुंबाला बेघर केलं.
तीन मुलांची आई 34 वर्षीय निहाल गुलकेतिन यांनी सांगितलं की, "त्या दिवशी सकाळी आम्ही मुलांना घेऊन पळू लागलो. एका दिवसानंतर राहायला एक तंबू मिळाला, आता तिथेच आहोत. भीतीपोटी मुलं रात्री एकेक वाजेपर्यंत जागी असतात. आम्हाला घराची खूप आठवण येते. गेल्या दहा दिवसांपासून आम्ही आंघोळ करु शकलेलो नाही".
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली 14 घरंही उद्ध्वस्त झाली आहेत. या घरांचा उरलेला ढिगारा साफ करून आता त्या जागी तंबू लावण्यात आले आहेत.
रात्री इथलं तापमान उणे 7 पर्यंत जातं. तंबूत राहावं लागणाऱ्या 800 कुटुंबांकडे या थंडीपासून स्वत:चं निवारण करण्याचा कोणताही पर्याय नाही.
अनोळखी लोकांबरोबर खावंप्यावं लागत आहे आणि राहावंही लागत आहे.
6 फेब्रुवारीला तुर्की आणि शेजारच्या सीरियात आलेल्या भूकंपामध्ये जीव गमावलेल्यांची संख्या 44,000 पार झाली आहे. लाखो इमारती कोसळल्या आहेत, काहींचं घाऊक नुकसान झालं आहे.
अनेक शहर सुनसान झाली आहेत. जिकडे पाहावं तिकडे कोसळलेल्या इमारती, ढिगारे आणि अस्वस्थ करणारी शांतता.
जसे दिवस सरत आहेत तसं ढिगाऱ्याखाली अडकलेली माणसं जिवंत असण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. जीव वाचलेल्या पण शिबिरार्थी झालेल्या लोकांसाठी जगणं सोपं नाही. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, ताजं जेवणं कसं उपलब्ध करून द्यायचं हा प्रशासनपुढचा पेच आहे.
अलेप्पोत कॉलऱ्याची साथ
ऑस्ट्रेलियातून आलेल्या बचाव तुकडीचा भाग असलेल्या डॉक्टर फातिमा लोडेन मानसोपचारतज्ज्ञ आहेत आणि सार्वजनिक आरोग्य विषयाच्या जाणकारही आहेत. त्यांच्या मते खरी लढाई आता सुरु झाली आहे.
"माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की सीरियातलं अलेप्पो शहर जवळजवळ नामशेष झालं आहे. तिथे कॉलऱ्याची साथ पसरते आहे. तुर्कीतल्या नागरिकांसाठी जगभरातून मदतीचा ओघ येतो आहे. जगभरातल्या नागरिकांनी तुर्कीच्या बांधवांकरता प्रेमाने अन्नसाठा आणि वस्तू पाठवल्या आहेत. मात्र हा अन्नसाठा काही दिवसांनंतर खराब होऊ शकतो. हे अन्न खाल्याने त्रासही होऊ शकतो. हेच इन्फेक्शनचं कारण ठरू शकतं. आमच्यासाठी पुढे अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत," असं त्यांनी सांगितलं.
नुर्दगी शहर
भूकंप येण्याआधी या छोट्याशा शहराची लोकसंख्या 40,957 एवढी होती. स्थानिकांशी बोलल्यानंतर हे लक्षात आलं की भूकंपामुळे दर तिसऱ्या घरात कोणाचा ना कोणाचा मृत्यू भूकंपामुळे झाला आहे.
आपली मुलं आणि नवऱ्याला गमावलेल्या दोना अदीज यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी सांगितलं की, "मृतदेह अनेक दिवसांनंतर बाहेर काढता आला. आमच्या परिसरातले लोक मदतीला धावले नसते तर कदाचित आणखी उशीर झाला असता. आता बाथरुम नाही, स्वयंपाकघर नाही. काहीच नाही. तंबूत काय करणार? थंडी वाजणारच ना."
तुर्की आणि सीरियात आलेल्या शक्तिशाली भूकंपानंतर हजारो नागरिक तात्पुरती सोय केलेल्या तंबूंमध्ये राहत आहेत. दररोज तंबूंची संख्या आणि त्यात राहणाऱ्यांची संख्या वाढते आहे. हे तंबू राहण्यालायक ठेवणं हेही एक मोठं आव्हान आहे.
तुर्कीतल्या भूकंपग्रस्त भागांमध्ये कम्युनिटी किचन सुरु करण्यात आलं आहे. तिथे लोक येऊन खाऊ शकतात. अनेक ठिकाणी रेशन वाटप होताना आम्ही पाहिलं.
सरकारच्या बरोबरीने विदेशातील संस्था, संघटना त्वरेने मदत करत आहेत. पण इतक्या प्रचंड भूकंपाचे परिमाण अनेकविध आहेत.
43 वर्षांचे सहीन दक्षिण तुर्कीतलं लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं. त्यांनी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांच्याबरोबरचा फोटो टाकला होता. पण भूकंपानंतर काही मिनिटात त्यांचं आयुष्य बदलून गेलं.
आपल्या काकांच्या कुटुंबीयांना ढिगाऱ्याखालून त्यांनी बाहेर काढलं. ज्या ठिकाणी ते आमच्याशी बोलत होते तिथे त्यांचं घर होतं, आता तिथे काहीच शिल्लक राहिलेलं नाही.
सहीन सांगतात, "त्यावेळी कोणीच मदतीसाठी आलं नाही. मी अनेकांना कोसळणाऱ्या इमारतींमधून बाहेर काढलं. खायला काही नव्हतं, थंडीपासून बचाव करण्यासाठी काही नव्हतं, प्रचंड थंडी होती. काही दिवसांनंतर खायला मिळालं, आता तंबू हेच आमचं जीवन झालं आहे".
मराश शहराचा भीषण चेहरा
मराश शहरात जवळपास 450 निवासी इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. ज्या उरल्या आहेत त्या एका दिशेने कलल्या आहेत किंवा दुसऱ्या इमारतीच्या टेकूने उभ्या आहेत.
शहरातल्या अतातुर्क पार्कमध्ये कॅम्प लावण्यात आला आहे. तिथे लोक थंडीने बेजार होत आहेत, पण दुसरा काही पर्याय नाही. ही सगळी माणसं बाजूच्या पार्कमध्ये कोळशासाठी रांग लावतात. थंडीपासून वाचण्यासाठी हिटर नाहीत आणि वीजेअभावी आता त्यांच्याकडे कोळसाशिवाय पर्याय नाही.
कॅम्पच्या आजूबाजूला स्वच्छतेचं पालन करणं एक मोठी समस्या होऊन बसलं आहे. शहरंच्या शहरं तंबूत आहेत.
हताया-इस्केंद्रन इथे भारतीय लष्कराच्या वैद्यकीय शिबिराचे इन्चार्ज डॉक्टर यदुवीर सिंह यांनी सांगितलं की, "सुरुवातीला भूकंपात अडकून जखमी झालेली माणसं यायची. पण आता इन्फेक्शन्स झालेले नागरिक येत आहेत. कोणत्याही मोठ्या संकटानंतर हेच पाहायला मिळतं.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा भूकंपामुळे ठप्प झाला आहे यामुळे पोट आणि त्वचेचं इन्फेक्शन होणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)