You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुर्की-सीरिया भूकंप : ढिगाऱ्यात जन्मलेल्या बाळाला दत्तक घेण्यासाठी सरसावले हात
- Author, मेरिल थॉमस आणि नवल-अल-मगाफी
- Role, बीबीसी न्यूज, तुर्की
तुर्कीत सोमवारी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 21 हजार जणांचा मृत्यू झाला. मदतकार्य अतिशय वेगाने सुरू आहे. मृतांचा आकडा वाढतोच आहे. भूकंपामुळे तुर्की आणि सीरियात शोककळेचं वातावरण आहे.
भूकंपग्रस्त भागात बचावाचं कार्य सुरु असताना अनेक विलक्षण गोष्टी समोर येत आहेत. काहींवर विश्वास ठेवणंही अवघड जात आहे. सीरियाच्या पश्चिमेला भूकंपात एक इमारती ध्वस्त झाली. इमारतीच्या ढिगाऱ्यातच एका बाळाचा जन्म झाला. या मुलाला दत्तक घेण्यासाठी हजारो लोक पुढे आले आहेत.
ढिगाऱ्यात जन्मलेल्या या बाळाचं नाव 'अया' असं ठेवण्यात आलं आहे. अरबी भाषेत अया शब्दाचा अर्थ होतो करिश्मा.
जेव्हा या बाळाला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याची नाळ आईशी जोडलेलीच होती. भूकंपात अयाची आई, वडील आणि चार भावाबहिणींचा मृत्यू झाला आहे. अया सध्या रुग्णालयात आहे.
अयाची देखभाल करणाऱ्या डॉ. हनी मारुफ यांनी सांगितलं की, "सोमवारी अयाला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा तिची स्थिती चिंताजनक होती. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या आणि सूजही आली होती. तिच्या शरीराचं तापमान कमी होतं आणि तिला श्वास घेतानाही खूप त्रास होत होता."
आता अयाची तब्येत स्थिर आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हीडिओ
बचावाचं काम करणाऱ्या चमूने अयाला वाचवलं तो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या व्हीडिओत एक माणूस धावत-पळत धुळीतून एका नवजात अर्भकाला बाहेर काढतो. अयाचे नातेवाईक खलील अल सुवादी यांनी तिला अफरिन शहरातल्या रुग्णालयात दाखल केलं.
हजारो लोकांनी अयाला दत्तक घेण्यात स्वारस्य दाखवलं आहे.
एका माणसाने लिहिलं, "अयाला दत्तक घेऊन तिला नवं आयुष्य देऊ इच्छितो."
कुवेत टीव्हीच्या अँकरने लिहिलं, "कायद्याने परवानगी दिली तर या मुलीला दत्तक घेऊन तिची काळजी घेईन."
रुग्णालयाने केला इन्कार
रुग्णालयाचे प्रबंधक खालिद अतीया यांनी सांगितलं की त्यांना जगभरातून अयाला दत्तक घेण्यासंदर्भात हजारो कॉल आले आहेत. डॉ. अतिया यांची मुलगी अयापेक्षा चारच महिने मोठी आहे.
ते म्हणाले, "मी तूर्तास तरी तिला कोणाला दत्तक घेण्याची परवानगी देणार नाही. जोपर्यंत तिचे नातेवाईक येत नाहीत तोवर मी तिची माझ्या मुलीसारखी काळजी घेईन".
डॉ. अतिया यांची पत्नी स्वत:च्या मुलीच्या बरोबरीने अयालाही दूध पाजत आहेत. अयाचं शहर जिंदयारिस इथे बचावकार्य अजूनही सुरुच आहे.
तिथले स्थानिक पत्रकार मोहम्मद अल अदनान यांनी बीबीसीला सांगितलं की, "इथे सगळं उध्वस्त झालं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले आहेत. अनेकांना अजूनही ढिगाऱ्याखालून बाहेर काढता आलेलं नाही".
अल अदनान यांच्या मते 90 टक्के शहर उद्धव्स्त झालं आहे. बचावकार्य स्थानिकांकडूनच सुरु आहे. बचावकार्यात पारंगत असे अनुभवी व्हाईट हेल्मटेची माणसं इथे कार्यरत आहेत.
मोहम्मद अल कमाल लिहितात, "इमारती अस्थिर झाल्या असल्याने बचावाचं काम करणाऱ्या माणसांनाही धोका आहे. त्यांनाही ढिगाऱ्यात दबलं जाण्याचा धोका आहे. आम्ही ढिगाऱ्यातून तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही एक कुटुंब जिवंत आहे, असं आम्हाला वाटतं. आम्ही आमचे प्रयत्न सुरुच ठेवू."
सीरियात भूकंपानंतर तीन हजारहून लोकांचा मृत्यू झाला आहे.
विद्रोही बंडखोरांच्या ताब्यातील भागात भूकंपामुळे किती लोकांनी जीव गमावला आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)