सेक्ससाठी झोप टाळून, लांबवर प्रवास केल्यामुळे 'हा' प्राणी होतोय नामशेष

फोटो स्रोत, Getty Images
- Author, केली एनजी
- Role, बीबीसी न्यूज
एका नव्या संशोधनानुसार, ऑस्ट्रेलियातील नॉर्दन क्वॉल प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. सेक्स करण्यासाठी हे प्राणी मादीच्या शोधात लांबचा प्रवास करतात.
या प्रक्रियेत त्यांची झोप उडते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका प्रजनन हंगामात हे प्राणी विश्रांतीच्या अभावामुळे कसे मरतात हे या अभ्यासातून स्पष्ट होतं.
पण मादी मात्र चार वर्षं जगते आणि याकाळात प्रजनन करण्यास ही सक्षम असते.
युनिव्हर्सिटी ऑफ द सनशाइन कोस्टचे सिनियर लेक्चरर क्रिस्टोफर क्लेमेंटे सांगतात, "हे प्राणी सेक्स करण्यासाठी शक्य तितक्या वेळा मादीच्या शोधात लांबलांब पर्यंतचा प्रवास करत असतात. या काळात ते बऱ्याचदा झोप सोडून प्रवास करत असतात."
युनिव्हर्सिटी ऑफ द सनशाइन कोस्ट आणि क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे हा रिसर्च केला असून बुधवारी तो प्रकाशित करण्यात आला.
या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या संशोधकांनी सलग 42 दिवस यावर रिसर्च केला. या संशोधकांनी नॉर्दर्न क्वॉल्सच्या नर आणि मादीवर ट्रॅकर्स लावले. हे प्राणी ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनार्यावरील ग्रूट आयलॅंड या बेटावर आढळतात. सलग 42 दिवस या प्राण्यांच्या हालचाली ट्रॅक करून संशोधकांनी डेटा गोळा केला.
अभ्यासात असं म्हटलंय की, यातले काही नर क्वॉल्स एका रात्रीत 10 किमी पेक्षा जास्त चालले. जर माणसांच्या चालण्याशी याची तुलना करायला गेल्यास हे अंतर जवळपास 40 किमी इतकं भरेल.
या प्रजातींचे नर इतर परजीवींचा बळी ठरतात. यामागचं कारण म्हणजे, विणीच्या हंगामाचा जास्तीत जास्त फायदा घेता यावा यासाठी हे नर स्वतःकडे लक्ष देत नाहीत. तसेच अन्न शोधताना इतर भक्षकांपासून स्वतःचं संरक्षण करण्याच्या बाबतीत ते मादींइतके सतर्क नसतात.

फोटो स्रोत, Getty Images
या रिसर्चचे प्रमुख जोशुआ गॅशक सांगतात की, "विणीच्या हंगामानंतर नर क्वॉल्स नक्की का मरतात याची कारणं स्पष्ट झालीयेत. कारण एकतर झोपेची कमतरता, इतर भक्षकांच्या सहज टप्प्यात येणं, वाहनाखाली येणं, अति थकवा यामुळे हे प्राणी मरतात."
गॅशक पुढे सांगतात की, ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीमध्ये आढळणाऱ्या या सस्तन प्राण्यांमधील झोपेच्या कमतरतेमुळे त्यांच्या प्रजातींवर कसा परिणाम होतो हे समजण्यासाठी पुढील अभ्यासाची गरज आहे.
ते म्हणाले, "हे नर क्वॉल्स त्यांच्या उत्तरजीवित्वासाठी झोपेचा त्याग करतात. त्यामुळे झोपेच्या कमतरतेमुळे शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात हे अभ्यासण्यासाठी नॉर्दर्न क्वॉल्स मॉडेल म्हणून उपयोगी ठरू शकतात."
ऑस्ट्रेलियन वाइल्डलाइफ कंझर्व्हन्सीच्या मते, उत्तरेत आता 1,00,000 नॉर्दर्न क्वॉल्स शिल्लक आहेत. पण त्यांचीही संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. शहरांच्या विकासामुळे या प्राण्यांचे अधिवास धोक्यात येऊ लागलेत. शिवाय भटक्या मांजरींच्या हल्ल्यांमुळे आणि उसात आढळणाऱ्या टोळ या किटकांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








