ट्रॉय : राणी हेलनसाठी झालेलं हे युद्ध खरं घडलं होतं की एक आख्यायिका आहे?

    • Author, डेझी डन
    • Role, बीबीसी साठी

ग्रीक कवी होमर यांच्या ओडिसीपासून ते अलेक्झांडर द पोपपर्यंत ट्रोजन युद्ध हा अनेक शतके अत्यंत आकर्षणाचा असा विषय राहिलाय. पण हे पौराणिक युद्ध खरंच एक दुखांत सत्य होतं की, ती पूर्णपणे आख्यायिका होती? डेझी डन यांनी पुराव्यानिशी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय.

महान लेखकांनी अनुवादित केलेल्या 'गॉड्स ऑफ मेन' या प्राचीन कथांचं संकलन करताना एका तथ्यानं मला आकर्षित केलं. ट्रोजन युद्ध ही युगानूयुगे चर्चा झालेली व्यापक ऐतिहासिक घटना असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं.

जॉन ड्रायडेन, अलेक्झांडर पोप, लुईस मॅकनेस अशा वैविध्यपूर्ण कवींना या आख्यायिकेचं भाषांतर करण्यामध्ये प्रचंड रस होता.

एक अत्यंत उत्तम किंवा महान अशी कथा हेच या ट्रोजन युद्धानं सर्वांचं लक्ष वेधण्याचं किंवा मनात खोलवर स्थान निर्माण करण्याचं एकमेव कारण नव्हतं. तर त्याचं आणखी एक कारण होतं. ते म्हणजे, दीर्घकाळापर्यंत सर्वांना असा संशय किंवा समज होता की, हे युद्ध खरंच घडलेलं असावं.

प्राचीन ग्रीक लोकांसाठी ट्रोजन युद्ध ही केवळ एक आख्यायिका नव्हती. तर त्यांच्यासाठी ही भूतकाळातील एका युगाची साक्ष देणारी घटना किंवा क्षण होता.

इतिहासकार हेराडॉटसने काय म्हटलं?

ग्रीक इतिहासकार हेराडॉटस आणि ग्रीक गणितज्ञ एराटोस्थेनिस यांनी मांडलेल्या ऐतिहासिक दस्तऐवज किंवा पुराव्यांचा विचार करता, ट्रोजन युद्ध प्रत्यक्षात घडलं होतं असं ते सुचवतात.

ग्रीक कवी होमर यांच्या इलियड या महाकाव्यानुसार ग्रीक आणि ट्रोजन यांच्यातील युद्ध सुमारे 10 वर्षे चाललं होतं. याच प्राचीन ग्रीकचे नेतृत्व राजा आगमेमनन यांनी तर ट्रोजनचं नेतृत्व राजा बेरींग यांनी केलं होतं.

ब्रियांग राजाचा मुलगा पॅरिसनं तीन देवींमध्ये झालेल्या स्पर्धेत अॅफ्रोडाईट हिला सर्वांत सुंदर देवी म्हणून निवडलं होतं. त्या मोबदल्यात अॅफ्रोडाईटनं पॅरिसला राजा आगमेमननच्या भावाची पत्नी हेलन भेट म्हणून दिली होती.

त्यामुळं आगमेमनन आणि त्याच्या भावानं ट्रोजनना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या बलाढ्य सैन्यासह ट्रॉयच्या दिशेनं कूच केलं होतं. त्यांनी ही लढाई जिंकली आणि ट्रोजनना शरणागती पत्करण्यास भाग पाडलं.

प्राचीन काळातील काही मोठ्या इतिहासकारांच्या मते ही लढाई प्रत्यक्षात घडली होती. इतिहासाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेराडॉटस यांनी त्यांच्या सुमारे 800 वर्षांपूर्वी ट्रोजन युद्ध झाल्याचा उल्लेख केलाय. हा उल्लेख त्यांनी पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात उल्लेख केला.

ग्रीक गणितज्ञ एराटोस्थेनिस यांनी अधिक स्पष्टपणे माहिती देत या युद्धाचा कालखंड इसवीसनपूर्व 1184 असल्याचा उल्लेख केलाय. मात्र, आधुनिक इतिहासकार अजूनही याबद्दल साशंकच आहेत.

काय आहे ट्रॉय युद्धाची गोष्ट?

ट्रोजन हॉर्स, ट्रॉय, अखिलस हिल या गोष्टी तुमच्या कानावर कधी ना कधी पडल्याच असतील. ग्रीक लोकांच्या संस्कृती आणि रोजच्या व्यवहारात या कथेचा प्रभाव तर आहेच पण संपूर्ण युरोपला या महाकाव्याची मोहिनी होती आणि आजही ती पाहायला मिळते. चित्रपट, नाटक, स्थापत्यकला, शिल्पकला या सर्व गोष्टींवर या कथांचा प्रभाव दिसतो.

इलियड आणि ओडिसी मध्ये सांगितलेल्या गोष्टी अद्भुत आहेत. आज देखील या गोष्टी तितक्याच तल्लीनतेने ऐकल्या जातात. ग्रीकच्या लोकांची मान्यता आहे की आधी या गोष्टी मौखिक पद्धतीने सांगितल्या गेल्या आणि मग त्या लिखित स्वरूपात पुढे आल्या.

या कथेची विशेषता त्यातील पात्रात समाविष्ट आहे असं म्हणतात. ग्रीक कथांमध्ये असलेल्या शेकडो पात्रांपैकी होमरने केवळ दोनच पात्रांची निवड करून आपली कथा गुंफली आहे. अखिलिस आणि ओलिसिस हेच दोन ते पात्र.

राजा आगमेमनन अखिलिसची मदत घेऊन ट्रॉय जिंकलं होतं. ट्रॉयचा युवराज पॅरिसने स्पार्टाची राणी हेलनला पळवून नेलं होतं आणि तिच्याशी लग्न केलं. हेलेनचा नवरा मेलेनॉसने आपला भाऊ राजा आगमेमनन विनंती केली की तिला सोडवून आणायचं.

हेराडॉटस यांच्या मते हेलेनचं अपहरण नव्हतं झालं तर तिने मेलेनॉसला सोडून दिलं होतं. ती आपल्या मर्जीने आपला प्रियकर पॅरिससोबत गेली होती.

आगमेमनन तयार झाला आणि त्याने या मोहीमेसाठी अखिलिस या योद्ध्याला सोबत घेतलं. पॅरिसचा भाऊ हेक्टर हा शूर होता. त्याच्यात आणि अखिलिसमध्ये युद्ध झालं अशी कथा आहे.

ट्रॉय हे एक बंदिस्त शहर होतं पूर्ण शहरच जणू एक मोठा किल्ला होतं. त्यात आतमध्ये जाणं जवळपास अशक्यच मानलं जायचं. अनेक दिवस महिने प्रयत्न करूनही अगामेमनॉनच्या सैन्याला आत जाता आलं नाही. मग अखिलिसने एक युक्ती केली. त्याने एक मोठा लाकडी घोडा तयार केला. त्या घोड्यात काही सैनिक लपून बसले.

हा घोडा रात्रीच्या वेळी गपचूप समुद्र किनाऱ्यावर ठेवण्यात आला. ट्रॉयच्या नागरिकांना वाटलं हा दैवी संकेत आहे जर आपण हा घोडा आतमध्ये घेतला नाही तर देवता नाराज होतील. त्यांनी हा घोडा आपल्या बंदिस्त शहरात नेला.

मग योग्य वेळ साधून त्यातले सैनिक बाहेर पडले आणि त्यांनी इतरांसाठी वाट मोकळी केली आणि मग युद्ध झालं. या युद्धावेळी पॅरिसने बाण मारला होता जो अखिलिसच्या टाचेत लागला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

पण प्रश्न हा आहे की हे युद्ध खरंच घडलं की ही केवळ एक दंतकथाच आहे.

ट्रोजन युद्ध खरंच घडलं होतं?

लंडनच्या ब्रिटीश म्युझियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'ट्रॉय:मिथ अँड रियालिटी' प्रदर्शनाचा केंद्रबिंदूदेखील याच प्रश्नाभोवती फिरणारा होता.

प्रदर्शनामध्ये या यद्धाची प्रेरणा घेऊन तयार केलेल्या फुलदाणी, रोमन पेंटिंग आणि इतर अनेक समकालीन कलाकृती होत्या. तसंच कांस्ययुगाच्या उत्तरार्धातील काही पुरातत्वीय कलाकृतीदेखील याठिकाणी होत्या.

इतिहासाच्या माध्यमातून ट्रोजन युद्धाचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा ओढा या प्रदर्शनाकडं असल्याचं तेव्हा स्पष्टपणे पाहायला मिळालं होतं.

या युद्धात ट्रोजनचे वारसदार असल्याचा दावा सादर करण्यासाठी रोमन लांबचा पल्ला गाठून आले होते.

ग्रीकांनी लाकडी घोड्यावर बसून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर इलियडचा नायक म्हणजे एनिअस हा जळत्या किल्ल्यातून त्याच्या सैन्यासह कशाप्रकारे निसटला होता, याचं वर्णन एलिइड या कवितेत करण्यात आलेलं आहे.

इंग्लंडच्या दरबारातील पहिले अधिकृत दरबारी कवी जॉन ड्रायडेन यांनी घोडा कसा तयार करण्यात आला होता, याचं वर्णन करणारा उतारा अनुवादित केला आहे.

त्यांच्या मते, "ग्रीक कठोर अशा लढाईला कंटाळले होते" आणि "ते एखाद्या भव्य घोड्यासारखे भासत होते". एनिअस आणि त्यांचे सैनिक युद्धातून निसटले आणि त्यांनी इटलीमध्ये आश्रय घेतला.

युद्धाच्या क्रूर वास्तवाचं वर्णन

ट्रोजन युद्ध वास्तव आहे यावर लोकांचा विश्वास असणं यात काहीही आश्चर्यं नाही. इलियड या महाकाव्यामध्ये कोणताही संकोच न बाळगता या युद्धाच्या क्रूर वास्तवाचं वर्णन करण्यात आलं आहे.

हे वर्णन निरीक्षणावर आधारित नाही यावर विश्वास ठेवणंदेखील कठीण आहे. त्याचं कारण म्हणजे, एक सैनिक पाण्यात मृतावस्थेत पडला आहे याचं वर्णन करताना, "प्राणी आणि मासे त्यांच्या मृतदेहाभोवती जमले असून, त्यांच्या मुत्रपिंडाच्या भोवती असलेली चरबी खात आहेत," असा उल्लेख त्यात करण्यात आलाय.

ट्रोजन युद्धाचा सेनापती अखिलिस जेव्हा भाल्याने हेक्टरच्या गळ्यावर वार करतो, तेव्हा त्याचं वर्णन मार्टीन हॅम्मोंड यांनी, "मानवाचं जीवन एवढ्या लवकर नष्ट होतं," असं केलं आहे.

ट्रॉय शहराचं वर्णन

या महाकाव्यांमध्ये ट्रॉय शहराचं वर्णनदेखील विविध पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळं या शहराच्या आकर्षकतेकडं वाचक आकर्षित होणं हे अटळ ठरतं.

धनाढ्य प्रशियन व्यावसायिक हेनरिक श्लिमन यांनी 19 व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये होमरच्या ट्रॉय शहराचा शोध घेण्याच्या उद्देशानं सध्याच्या तुर्कीमध्ये प्रवास केला होता.

आधुनिक तुर्कीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या हिसारलिकमध्ये ट्रॉय शहराचे अवशेष असण्याची शक्यता आहे, ही माहिती असल्यानं त्यांनी त्याठिकाणी पुरावे मिळवण्यासाठी उत्खनन सुरू केलं.

त्याठिकाणी त्यांना प्राचीन खजिन्यातील अनेक गोष्टी सापडल्या. त्यापैकी अनेक सध्या ब्रिटीश म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.

यापैकी बहुतांश वस्तू कांस्ययुगातील असल्याचं त्यांनी सुरुवातीलाच नमूद केलं होतं. होमरच्या उल्लेखानुसार हाच ट्रोजन युद्धाचा कालावधी होती.

पण हे अनेक शतकं जुनं असू शकतं हे लक्षात आल्यानंतर त्यांनी अचूक जागी उत्खनन केलं. ट्रॉय शहर हे हिसारलिकमध्ये वसलेलं आहे यावर बहुतांश इतिहासकारांचं एकमत आहे. त्यामुळंच ट्रॉय शहर हे एक वास्तव आहे.

हिसारलिकच्या पुरातत्वीय उत्खननामध्ये अत्यंत मोजके असे बाण आणि आगीचे पुरावे आढळले. त्याचा कालखंड होमरच्या ट्रोजन युद्धाच्या कालखंडाच्या दरम्यानचाच होता.

पण हे पुरावे युद्धाला खतपाणी घालणारेही असू शकतात. याठिकाणी मध्य तुर्कीमध्ये राहणारे प्राचीन लोक म्हणजे हित्तीती यांनी तयार केलेले काही शिलालेखही आहेत.

काही पुरावे विसंगत देखील आहेत

त्यात ट्रॉयबाबत काही वादांचं वर्णन करण्यात आलंय. त्यांच्यासाठी ट्रॉय शहराची ओळख ही 'विलुसा' अशी होती. पण त्यात ट्रोजन युद्धाचा काहीही पुरावा नाही. यासंदर्भात वाद होता असं मानणाऱ्यांसाठी मात्र हे काही संकेत आश्वासक आहेत.

होमरच्या महाकाव्यात ज्याप्रकारे वर्णन करण्यात आलंय, ते ट्रोजन युद्ध काहीसं वेगळं असावं. होमरनं ज्यापद्धतीनं वर्णन केलंय, तेवढ्या मोठ्या पातळीवरील युद्धाची कल्पना करणं अत्यंत कठीण आहे.

होमरच्या युद्धातील सैनकांचं वर्तन आणि पुरुषांची कृती ही खरी भासते.

पण, युद्धाची वास्तविकता आणि सुरू असलेला वैश्विक वाद याचं अत्यंतिक वास्तविक वर्णन करणं ही होमरची प्रतिभाच होती. अगदी कवितेच्या नाट्यमय क्षणांमध्ये देखील होमरनं भूतकाळातील वास्तव पेरलेलं पाहायला मिळतं.

ग्रीक लोकांना ट्रोजन युद्धाच्या परंपरेमध्ये रक्तपात आणि एक वेगळं विश्व या दोन्हींचं देखील स्पष्टीकरण आढळलं.

ते रक्तरंजित युग आता संपलं आहे. पण ट्रोजन युद्धात भरभरून असलेलं शौर्य आणि स्वसंरक्षणाचा अभिमान अद्यापही कायम आहे. युद्धानंतरचे परिणामदेखील हिंसाचारानं भरलेले होते.

वास्तवाशी किती संबंध आहे याचा विचार न करतादेखील ट्रोजन युद्धाचा ग्रीक लोकांवर आणि आपल्यावरही कायमचा प्रभाव आहे, हेदेखील सत्य आहे.

प्राचीन काळातील युद्धाने प्रभावित असो किंवा एक कथा असो, पण संपूर्ण जगावर ट्रोजन युद्धाची छाप आहे आणि ऐतिहासिक महत्त्वदेखील आहेच.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)