बांगलादेशमध्ये एका रात्रीत 12 मंदिरांची तोडफोड, नेमकं प्रकरण काय?

बांगलादेशात एकाच रात्रीत 12 हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. ठाकूरगाव जिल्ह्याच्या बालियाडंगी तालुक्यात ही घटना घडली आहे. इथं रस्त्याच्या किनारी असलेल्या 12 मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे.

मंदिरातल्या 14 मूर्तीं रात्रीच्या अंधारात तोडण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

बालियाडांगीचे पोलीस निरिक्षक खैरुल अनाम यांनी सांगितलं की, "4 फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात इसमांनी मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत"

बालियाडांगीचे उपजिल्हाधिकारी विपुल कुमार यांनी सांगितलं, "इथं सहा ते सात किमी रस्त्याच्या किनाऱ्यावर काही छोटीछोटी मंदिरं आहेत. त्या सर्व मंदिरांमधील मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मंदिरांच्या सुरक्षेची कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. तसंच ही मंदिरं फार छोटी होती."

खैरुल अनाम यांनी सांगितलं की, "ही कुठलीही मोठी किंवा प्रसिद्ध मंदिरं नव्हती. रस्त्याच्या किनाऱ्यावर झाडांखाली स्थापन करण्यात आलेली छोटी-छोटी देवांची स्थानं होती. तसंच हा भाग निर्जन भाग म्हणून ओळखला जाते."

हे कृत्य नेमकं कुणी केलंय हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण तोडणाऱ्यांनी मूर्तींचे हात आणि तोंड फोडलं आहे. या मंदिरांमध्ये कुठलीही पूजा केली जात नव्हती अशीसुद्धा माहिती देण्यात येत आहे. घनतला भागातल्या सर्वांत जास्त म्हणजे आठ मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे.

उपजिल्हाधिकारी विपुल कुमार यांच्यामते रात्रीच्यावेळी बाईकवरून आलेल्या लोकांनी ही तोडफोड केली आहे. बाईकवर आलेल्या काही लोकांनी लोखंडी रॉडनं मूर्तींची तोडफोड केली आणि ते निघून गेले.

हा एक आणखी पूर्णव केलेला हल्ला नव्हता, असंही विपुल सांगतात.

छोट्या मंदिरांना दिली जाणार सुरक्षा

विपुल कुमार यांच्यामते गेल्या 100 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इथं अशी घटना घडली आहे. स्थानिक लोकांच्यामते यामागे बाहेरील कुणीतरी व्यक्ती आहे.

अशा मंदिरांच्या सुरक्षेसाठी प्रशासन लवकरच एक पॉलिसी आणणार असल्याचं विपुल यांनी सांगितलंय.

ज्या धनतलामध्ये सर्वांत जास्त मूर्तींची तोडफोड झालीय तिथले नगराध्यक्ष समरकुमार चट्टोपाध्याय यांनी सांगितलं की, "या घटनेनंतर परिसरात शांतता आहे."

त्यांनी सांगितलं की, "आमच्या भागात सनातन धर्माचं पालन करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. घटनेनंतर इथं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे."

मंदिरांची तोडफोड नेमकी कुणी केली असा सवाल विचारल्यावर त्याचं ठोस उत्तर देता येणार नाही असं चट्टोपाध्याय यांनी सांगितलं आहे.

चारोलमध्ये एका मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. इथले नगराध्यक्ष दिलीपकुमार चटर्जी यांनी सांगितलं की, "ही घटना रात्रीच्यावेळी घडली आहे. त्यामुळे हे कृत्य नेमकं कुणी केलं याचा अंदाज लावणं कठीण आहे. पण इथले लोक मात्र घाबरलेले नाहीत."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)