युरोपमध्ये 'मनोरंजना'साठी माणसांना जेव्हा 'प्राणीसंग्रहालया'त ठेवलं गेलं..

    • Author, दहलिया व्हेंचुरा,
    • Role, बीबीसी मुंडो

कष्टाची कामे करण्यासाठी युरोपातील काही सरजांमदारांनी कृष्णवर्णियांना गुलाम बनवल्याचे आपल्याला ठाऊक आहे, पण त्यांना मनोरंजनासाठी अक्षरशः प्राण्यांसारखं डांबून ठेवण्यात येत असे हे तुम्हाला माहीत आहे का?

युरोपच्या या काळ्याकुट्ट इतिहासाबद्दलचे अज्ञात पैलू या लेखातून उलगडण्यात आले आहेत.

ही एक अत्यंत वाईट अशी कथा आहे. वाईट वाटणाऱ्या कथांपैकीही सर्वाधिक वाईट. त्याचं कारण म्हणजे अनेक वर्ष पाऊलखुणा मागं राहिलेले असे गंभीर परिणाम या घटनांमुळं पाहायला मिळाले.

किंबहुना अनेक शतके त्याचा परिणाम राहिला. फक्त तुम्ही त्याला कुठून मोजायला सुरुवात करणार एवढाच काय तो विषय आहे.

पश्चिम गोलार्धातील, टेनोश्टिटलानचा नववा ट्लाटोअनी आणि अॅझटेकच्या तीन आघाड्यांचा शासक असलेल्या मोक्टेझुमा प्राणीसंग्रहालयात आपण जाऊयात.

अँटोनिओ सोलिस वाय रिव्हाडेनेयरा (1610-1686) यांसारख्या स्पॅनिश इतिहासकारांच्या मते, "या प्राणीसंग्रहालयात पक्षी, वन्य प्राणी, विषारी प्राणी यांच्याशिवाय आणखी एक खोली होती.

या खोलीत म्हशींबरोबर राजाचं मनोरंजन करण्यासाठी म्हणून कीडे असा उल्लेख असलेले इतरही काहीजण होते. ते इतर कोणी नसून धिप्पाड, बुटके, कुबड निघालेले किंवा अशाच प्रकारचे नैसर्गिकदृषट्या शारीरिक व्यंग असलेले काही मानव होते.

16 शतकामध्ये असलेल्या काही अत्यंत वाईट अशा परंपरा आणि विचित्र (फ्रिक) शो याची जाणीव या संपूर्ण वर्णनावरून होते.

या काळापर्यंत अशाप्रकारे शारीरिक कमतरता किंवा व्यंग असलेल्या लोकांना वाईट आत्मा किंवा राक्षसी समजलं जात नव्हतं. त्यामुळं अशाप्रकारचे लोक काही प्रवासी किंवा पर्यटकांसाठी मनोरंजनाचा भाग बनले.

पण, अशा प्रकारच्या पहिल्या शोधानंतरही जवळपास चार शतकं जे काही सुरू होतं. त्याची आणखी योग्य माहिती कदाचित इटालियन कार्डिनल हिप्पोलिटस डि मेडिसी यांनी त्यांच्या खासगी किंवा कुटुंबाच्या संग्रहातील प्राण्यांमध्ये समाविष्ट केलेल्या यादीवरुन मिळते.

इटलीच्या पुनरुज्जीवनाच्या मध्यापर्यंत, त्यांच्याकडं असलेल्या या संग्रहामध्ये अनेक प्रकारचे महाकाय पशू, जीव किंवा आदिम मानव असल्याची बढाई ते मारत होते किंवा तसा त्यांचा दावा होता. त्यात मूर, टार्टर्स, भारतीय, तुर्क आणि आफ्रिकन अशा 20 भाषा बोलणाऱ्या मानवांचाही समावेश होता.

अशाप्रकारे सामान्य मानवांपेक्षा वेगळे असलेल्यांच्या अमानवीकरणासाठी त्यांनी एक पाऊल पुढं टाकलं होतं. काहीतरी वेगळ्या किंवा शारीरिक व्यंगासह जन्मलेल्या लोकांच्या विचित्र प्रदर्शनाबरोबर त्यांनी यात काही अशा मानवांचा समावेश केलेला होता. युरोपपेक्षा वेगळ्या परंपरा आणि दिसायला वेगळे असलेल्या भूभांगांवरील ते लोक होते.

अशा प्रकारच्या अमानवी कृत्याचा कळस त्यानंतर शेकडो वर्षांनी पहायला मिळाला. काही पाश्चात्य समुदायांनी (व्यापारी) अशा प्रकारच्या विचित्र किंवा विलक्षण वेगळ्या लोकांचं प्रदर्शन करण्याचं ठरवलं. लोकांच्या किंवा गर्दीच्या मनोरंजन आणि उत्सुकतेची भूक भागवण्यासाठी अशा प्रकारच्या विविध व्यंग असलेल्या लोकांना पॅरिस, न्यूयॉर्क, लंडन किंवा बर्लिन अशा ठिकाणी पाठवण्यात आलं.

उत्सुकतेपोटी सुरू झालेलं हे सर्वकाही 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत छद्मविज्ञानात (pseudoscience) बदललं. कारण संशोधक वांशिक सिद्धांताच्या संशोधनासाठी भौतिक पुराव्याच्या शोधात होते.

प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यापारी शो बनलेल्या या "मानवी" प्राणीसंग्रहलायांना कोट्यवधी लोकांनी भेट दिली.

यामध्ये वेगवेगळ्या भागातून, दूरवरून आणलेल्या मानवी जमातींची गावंच्या गावं तयार केली होती. त्यांना वसाहतवादी लोकांसमोर त्यांची पारंपरिक नृत्यं, धार्मिक विधी करून दाखवण्यासाठी मोबदला दिला जात होता.

या सर्व माध्यमातून जगाच्या इतर भागांतील लोकांबाबत त्यांच्यामध्ये "इतर" अशी भावना निर्माण झाली. त्यातूनच त्यांचं वर्चस्व हळू हळू सिद्ध होण्यास मदत मिळू लागली.

विदेशी किंवा वेगळे

सुरुवातीच्या काळात हे अगदी सहज किंवा त्यामागं कोणताही वाईट हेतू नसलेलं सर्वसाधारण वर्तन असू शकतं. अचानक नवीन काहीतरी दिसणं, उत्सुकता यातून कदाचित परस्पर सहमतीनंही ते झालेलं असू शकतं.

1774 मध्ये माई किंवा ओमाई नावाचे पॉलिनेशियन हे कॅप्टन जेम्स कूक यांच्याबरोबर इंग्लंडला आले. निसर्गवादी जोसेफ बँक्स यांनी राजा तिसरे जॉर्ज यांच्यासमोर त्यांना सादर केलं. ओमाई हे त्यावेळी त्यांच्यासमोर झुकले होते.

रिचर्ड होम्स यांनी त्यांच्या एज ऑफ वंडर्समध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, ते विनोदी, मोहक आणि धूर्त होते.

"त्यांच्या विलक्षण सौंदर्याचं त्याठिकाणच्या समाजामध्ये प्रचंड कौतुक आणि त्याबाबत चर्चा झाली. विशेषतः त्याठिकाणच्या धाडसी आणि श्रीमंत वर्गातील महिलांमध्ये."

पाहुणे होते की मनोरंजनाचं साधन?

सुरुवातीच्या काळात संदिग्धतेला काहीशी जागा असली तरी वसाहतवादाच्या काळात नव्या शक्यतांमुळं ही संदिग्धता नाहीशी झाली.

अशा लोकांचा विचार करता त्या काळातील सर्वात दुःखद प्रतिक ठरल्या त्या दक्षिण आफ्रिकेच्या सार्जी बार्टमन. त्यांना "हॉटनटॉट व्हिनस" असंही म्हटलं जात होतं.

अंदाजे 1780 मध्ये जन्मलेल्या सार्जी यांना युरोपातील जत्रांमध्ये प्रदर्शनासाठी 1810 मध्ये लंडनला आणण्यात आलं होतं. त्यांना पाहण्यासाठी येणाऱ्यांना यातून खूप आनंद मिळत होता.

त्यांचं सर्वांत मोठं आकर्षण होतं, ते म्हणजे त्यांचं नितंब. त्या काळामध्ये मोठ्या नितंबांची फॅशन होती. पण तसं असलं तरी युरोपमधील नागरिकांच्या दृष्टीकोनातून त्या तुलनेत त्यांचे नितंब फारच जास्त मोठे होते.

आफ्रिकेच्या व्हिनस यांच्याबाबत असलेलं आकर्षण लंडनमधील लोकांसाठी संपुष्टात आलं तेव्हा त्यांना पॅरिसला पाठवण्यात आलं. त्याठिकाणी नवोदीत आणि वर्णद्वेषी मानववंशशास्त्रज्ञांनी त्यांचं विश्लेषण केलं. एका प्रदर्शनाच्या पुस्तकात त्यांच्यापैकी एका शास्त्रज्ञानं त्यांचं वर्णन "बबून बटॉक्स" (baboon buttocks)असलेली महिला असं केलं होतं.

याच काळामध्ये अभ्यासातून समोर आलेल्या या गोष्टीची म्हणजे "वंशवादाची" सुरुवात झाली.

1815 मध्ये त्यांचं निधन झालं पण तरीही त्यांचं प्रदर्शन सुरुच होतं.

त्यांचा मेंदू, सांगाडा आणि लैंगिक अवयव पॅरिसच्या मानवी संग्रहालयात 1974 पर्यंत प्रदर्शनात ठेवण्यात आलं होतं. 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेला आणून त्यांना दफन करण्यात आलं.

सार्जी बार्टमन या लोकांचं वर्णन, मोजमाप आणि वर्गीकरण होत असलेल्या काळात होत्या. पण या सर्वानं लवकरच वेगळा स्तर गाठला होता. त्यामागची कल्पना होती उच्च आणि नीच किंवा वरच्या-खालच्या जातींसंदर्भातील.

प्रदर्शनांनी गाठली पातळी

या सर्वाचा कळस ठरल्या एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस साम्राज्यवाद्यांच्या काळातील घटना.

अटलांटिकच्या दोन्ही किनाऱ्यांवर ख्रिश्चन धर्मप्रसार आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्वाच्या भावनांनी ओतप्रोत झालेले लोक या वसाहतींच्या जीवनांची ओळख झाल्यानं त्याबाबत भरभरून बोलत होते. या वसाहतींचं प्रदर्शन हा आंतरराष्ट्रीय व्यापारी शोंचा महत्त्वाचा भाग होता.

याठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांना अशाप्रकारच्या "आदिम" जीवनाची झलक पाहायला मिळत होती. त्यातून त्यांना जणू जगाच्या त्या अज्ञात कोपऱ्यात आपण प्रवास करून आल्याचा अनुभव मिळायाचा.

वन्य प्राण्यांचे व्यापारी आणि युरोपातील अनेक प्राणी संग्रहालयांचा व्यवसाय करणारे जर्मन कार्ल हॅगेनबेक हे असे वेगळे शो सुरू करणाऱ्यांपैकी एक होते. त्यांचे शो इतरांपेक्षा वेगळे असायचे. शोमध्ये ते विदेशी लोकांनात्यांच्या भागातील नैसर्गिक वातावरणात म्हणजे प्राणी, झाडे यांच्याबरोबर दाखवत होते किंवा प्रदर्शित करत होते.

त्यांनी 1874 मध्ये सामोअन्स आणि सामी(लॅप्स) तर 1876 मध्ये न्युबियन्स या इजिप्शियन सुडानमधील जमातींचं प्रदर्शन केलं होतं. तो युरोपमधील अत्यंत यशस्वी शो ठरला होता.

आदिम किंवा जंगलात राहणाऱ्या या मानवांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात दाखवण्याची ही त्यांची कल्पना कदाचित पॅरिसमधील जॉर्डिन डिअॅक्लिमेटेशनचे संचालक जॉफ्रॉय दि सेंट-हिलारे यांच्यासाठी प्रेरणा ठरली. त्यांनी 1877 मध्ये न्युबियन्स आणि इनुइट यांचा समावेश असलेले दोन वांशिक शो (ethnological shows) आयोजित केले होते.

त्यावर्षी याची प्रेक्षकसंख्या दुप्पट म्हणजे 10 लाख एवढी वाढली होती.

1877 ते 1912 दरम्यान जॉर्डिन झूऑलॉजिक डिअॅक्लिमेटेशनमध्ये अशाप्रकारचे अंदाजे 30 वांशिक शो दाखवण्यात आले.

त्याचबरोबर पॅरिसमध्ये 1878 च्या जागतिक प्रदर्शनात "कृष्णवर्णीय गावे" (black villages) दाखवण्यात आली होती. त्यात सेनेगल, टोन्किन आणि ताहिती येथील स्थानिक वसाहतींमधील लोकांना प्रदर्शनात ठेवण्यात आलं होतं.

या प्रदर्शानत डच पॅव्हेलियनमध्ये जवानीज व्हिलेज (कॅम्पाँग) चा समावेश होता. त्यात येथील मूळ मानवांचा समावेश होता. ते पारंपरिक नृत्य आणि परंपरा सादर करत होते.

1889 मध्ये अशा जागतिक प्रदर्शनाला 2 कोटी 80 लाख लोकांनी भेट दिली. या प्रदर्शनात असलेल्या 400 विविध स्थानिक जमातींच्या लोकांचा समावेश होता. त्यात जवानीज जमातीच्या लोकांनी संगीताचं सादरीकरण अशा प्रकारे केलं होतं की, त्याचं वर्णन किंवा कौतुक करायला तरुण संगीतकार क्लाउडी डेबसी यांना शब्दही सापडत नव्हते.

त्याचवर्षी चिली सरकारच्या परवानगीनं सेल्कनाम किंवा ओमा जमातीच्या 11 स्थानिकांना युरोपात मानवी प्राणी संग्रहालयात प्रदर्शित करण्यासाठी पाठवण्यात आलं. त्यात एका 8 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश होता.

या प्रदर्शनात तेहुएल्चे, सेल्कनाम आणि पॅटागोनियाचे कावेस्कर इंडियन या दुर्मिळ मानवी जमाती होत्या. त्यामुळं त्यांचे फोटो काढण्यात आले. त्यांचे वजन, मोजमापे यांची नोंद करण्यात आली आणि त्यांना 1878 ते 1900 दरम्यान रोज सादरीकरण करण्यास भाग पाडण्यात येत होतं.

तेही सर्व हे सगळे प्रवासातून बचावून संबंधित ठिकाणी पोहोचले तर. कारण यापैकी बहुतांश दक्षिण अमेरिकन जमातींचे लोक हे त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मृत पावत होते.

सेल्नाम जमातीच्या लोकांना मॉरीस मैत्रे या दलालानं पकडलं होतं. अशाप्रकारच्या जमातींच्या लोकांची मानवी तस्करी करून तो प्रचंड श्रीमंत झाला होता.

त्यांच्यापैकी "बफेलो बिल" सारखे काही जे प्रभावी असतील त्यांना प्रवासी शोसाठी पाठवलं जायचं. हेदेखील यात असलेल्या वर्णव्यवस्थेचं एक उदाहरण होतं.

तसंच याठिकाणी काही असेही होते जे इंडियन्सना मिळणाऱ्या वागणुकीपासून स्वतःला वेगळं ठेवत होते. त्यात ट्रुमन हंट या व्हिलेज ऑफ इगोरोट्स सारख्या प्रसिद्ध गावाच्या प्रशासकांचा समावेश होता.

त्यामध्ये अमेरिकेच्या सरकारनं आणलेल्या विविध जमातींमधील 1300 फिलिपियन्सचा समावेश होता. 1904 मधील सेंट लुईस येथील जागतिक प्रदर्शनात त्यांना आणण्यात आलं होतं.

"द लॉस्ट ट्राईब आणि कोनी आयलंड" च्या लेखिका क्लेर प्रेंटिस यांच्या मते या सर्वामागे राजकीय प्रेरणा होती.

अशाप्रकारे स्थानिक किंवा आदिम लोकांचं प्रदर्शन करून सरकारला फिलिपाईन्समधील त्यांच्या धोरणांसाठी पाठिंबा मिळवायचा होता. सरकारने नव्याने ताबा मिळवलेल्या या भागातील स्थानिक लोक स्वतः सरकार बनवण्यासाठी किंवा चालवण्यासाठी सज्ज नसल्याचं त्यांना दाखवायचं होतं.

याठिकाणच्या प्रत्येक स्थानिक किंवा मूळ नागरिकाला त्यांची संस्कृती आणि परंपरा यांचं प्रदर्शन करण्यासाठी महिन्याला 15 अमेरिकन डॉलर देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.

हंट यांनी इगोरोट्सना एवढी हीन वागणूक दिली की त्यांना 1906 मध्ये अटक करण्यात आली. या लोकांच्या वेतनाच्या रकमेतून 9600 अमेरिकन डॉलर एवढी रक्कम चोरी करून तसेच आदिवासींच्या हस्तकलांच्या वस्तूंची विक्री करून शेकडो डॉलर्सची कमाई करणे आणि बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

शास्त्रीय वंशवाद

हॅम्बर्ग, कोपेनहेगन, बार्सिलोना, मिलान, वारसॉ आणि इतर ठिकाणी सुसंस्कृत आणि अशाप्रकारे जंगलात राहणारे किंवा आदिम, दुर्गम भागातील स्थानिक यांच्यात असलेले फरक हे अशा प्रकारे मानवी प्रदर्शन सुरू ठेवण्यासाठीची प्रेरणा ठरले होते.

अभ्यासकांच्या मते हे लोक तीन परस्परसंबंधित गोष्टींनी जोडले गेलेले होते. आपण आणि इतर ही कल्पना, वंश किंवा वर्णाशी संबंधित सिद्धांत आणि वसाहती साम्राज्यांची उभारणी.

हे सर्व शास्त्रीय प्रजातीवाद आणि सामाजिक डार्विनवादाच्या एका आवृत्तीवर आधारित होतं.

उदाहरण द्यायचं झाल्यास 1906 मध्ये, न्यूयॉर्क झूऑलॉजिकल सोसायटीचे संचालक आणि मानववंशशास्त्रज्ञ मॅडिसन ग्रँट यांनी कांगोलीज या बुटक्या जमातीतील ओटा बेंगा याला न्यू यॉर्कच्या ब्राँक्स प्राणी संग्रहालयात वानर आणि इतर प्राण्यांसह प्रदर्शनात ठेवलं होतं.

तत्कालीन प्रसिद्ध युजिनिस्ट ग्रँट यांच्या आग्रहामुळं झूच्या संचालकांनी ओटा बेंगा यांना एक माकडाबरोबर पिंजऱ्यात ठेवलं होतं आणि त्यासमोर "द मिसिंग लिंक" असं लेबल लावलं होतं. ओटा बेंगासारखे आफ्रिकन हे युरोपियन लोकांसारखे नव्हे तर वानरांसारखे आहेत, हे त्यांना दर्शवायचं होतं.

आफ्रिकन-अमेरिकन बाप्टिस्ट चर्चच्या आंदोलनानंतर त्यांना प्राणीसंग्रहालयात फिरण्याची परवानगी देण्यात आली होती. पण गर्दीतील लोकांकडून शारीरिक आणि शाब्दीक त्रासामुळं त्यांचं वर्तन काहीसं हिंसक बनल्यानंतर त्यांना तिथून काढून टाकण्यात आलं.

ग्रँट यांनी 1916 मध्ये एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यात त्यांनी श्वेतवर्णियांच्या श्रेष्ठतेचा सिद्धांत मांडला आणि बळकट अशा युजेनिक्स कार्यक्रमाची (वांशिक सुधारणा आणि प्रजनानाशी संबंधित एक अनैतिक सिद्धांत) शिफारस केली.

त्याचवर्षी ओटा बेंगा यांनी स्वतःच्या हृदयात गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

मानवी प्रदर्शनांची बदलती स्थिती

दरम्यानच्या काळात, मार्सेलिस(1906 आणि 1922) आणि पॅरिस (1907 आणि 1931) मधील प्रदर्शनांमध्ये मानवांना पिंजऱ्यांमध्ये कैद करून त्यांचं प्रदर्शन करण्यात आलं. ते शक्यतो नग्न किंवा अर्धनग्न अवस्थेत असायचे.

1931 मध्ये सहा महिन्यांत 3 कोटी 40 लाख लोकांनी प्रदर्शनांना भेटी दिल्या.

कम्युनिस्ट अँटि-इम्पेरियलिस्ट लीगनं "द ट्रुथ अबाऊट कॉलनिस" (वसाहतींबाबतचे सत्य) हे विरोधी प्रदर्शन आयोजित केलं. त्याला मात्र त्या तुलनेत अत्यंत कमी लोकांनी भेट दिली.

त्यानंतर मात्र या मानवी प्राणी संग्रहालयांप्रती लोकांचा दृष्टीकोन हा हळू-हळू बदलत असल्याची चिन्हं दिसू लागली होती.

35 हजार लोकांनी याला भेट दिली असावी, असा अंदाज लावण्यात आला.

याठिकाणी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी काही शो होते. त्यात गावकरी विविध भूमिका करायचे. त्यापैकी बहुतांश जणांना पैसे देण्यात आले.

पण विभक्ततेच्या कल्पना आणि असमानता यावर आवाज उठवणारे हे कलाकार आणि लोकांमध्ये काही अडथळेदेखील होते.

अशाप्रकारची वांशिक प्रदर्शनं दुसऱ्या महायुद्धानंतर बंद झाली होती. त्यातही रंजक बाब म्हणजे अॅडॉल्फ हिटलर यानंच सर्वप्रथम त्यावर बंदी घातली होती.

दुर्दैव म्हणजे इतर बाबींचा विचार करता त्यांच्यावर बंदी घालणंही गरजेचं राहिलं नव्हतं. कारण लोकांनी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं होतं. त्याचं कारण नैतिकता किंवा मूल्य हे नव्हतं, तर मनोरंजनाची इतर साधनं आल्यानं लोक त्यांच्याबद्दल विचार करणंही योग्य समजत नव्हते.

यापैकी बेल्जियममधील प्रदर्शन सर्वात शेवटी बंद झालं.

1897 च्या उन्हाळ्यामध्ये लिओपोल्ड द्वितीय राजानं 267 कोंगोली नागरिकांना ब्रसेल्सला आयात करून आणलं होतं. ब्रसेलच्या पूर्वेला असलेल्या टेर्व्हुरेनमधील राजवाड्यात प्रदर्शनासाठी त्यांना आणलं होतं.

त्यापैकी बरेच हिवाळ्यात मरण पावले. पण हे प्रदर्शन एवढं लोकप्रिय ठरलं की, त्याठिकाणी नंतर कायमस्वरुपी प्रदर्शन सुरू करण्यात आलं.

1958 च्या 'ब्रसेल्स इंटरनॅशनल आणि युनिव्हर्सल एक्झिबिशन' या 200 दिवसांच्या युद्धानंतरच्या सामाजिक, सांस्कृतिक उत्सवासाठी कोंगोली लोकांचं एक गावंच तयार करण्यात आलं होतं. त्याठिकाणी प्रेक्षक कोंगोली लोकांना पाहत आणि त्यांची थट्टा मस्करी करत.

"जर या कोंगोली लोकांनी प्रतिक्रिया दिली नाही तर, बांबूच्या कुंपणामधून त्यांच्यावर नाणी किंवा केळी फेकली जात होती," असं तत्कालीन पत्रकारांनी लिहिलं होतं.

कोंगोली लोक त्यांना ज्या परिस्थितीत ठेवलं होतं त्याला आणि लोकांच्या त्रासाला कंटाळले होते, त्यामुळं हे मानवी प्राणीसंग्रहालय बंद करण्यात आलं.

अशा प्रकारच्या इतिहासातील ते अखेरचं मानवी प्राणी संग्रहालय होतं.

मानवी संग्रहालयं किंवा प्रदर्शनं सुमारे 1.4 अब्ज लोकांनी पाहिली असा अंदाज लावण्यात आलाय.

आधुनिक वंशवादाच्या किंवा वर्णद्वेषाच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली हेदेखील सर्वज्ञात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)