You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्रिकेटपटू दानुष्का गुणातिलके लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने क्रिकेटर दानुष्का गुणातिलकेला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केलं आहे.
श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुणातिलकेला ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका महिलेच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
'या आरोपांनंतर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांच्या निवडीसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही,' असं समितीने स्पष्ट केलं आहे.
समितीने असंही म्हटलं आहे की, कथित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील. तसंच न्यायालयीन प्रक्रियेत दोषी आढळल्यास खेळाडूला दंड ठोठावला जाईल.
अशा प्रकारच्या वर्तनाबाबत "झीरो टॉलरंस" हे आमचं धोरण आहे असंही श्रीलंका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं.
या घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं जाईल असंही बोर्डाने म्हटलं आहे.
यापूर्वी पीटीआय या वृत्तसंस्थेने टीममधील एका सूत्राच्या हवाल्याने माहिती दिली होती की, श्रीलंकन संघ दानुष्का गुणातिलकेला सिडनीत सोडून रवाना झालाय.
त्यांनी लिहिलंय की, तीन आठवड्यांपूर्वी गुणातिलके जखमी झाला होता, त्यामुळे संघातली त्याची जागा एशेल बंडाराने घेतली. मात्र संघ व्यवस्थापनाने त्याला परत पाठवण्याऐवजी ऑस्ट्रेलियातच ठेवलं.
सिडनी पोलिसांनी या प्रकरणात एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्या निवेदनात असं म्हटलंय की, एका महिलेवर कथित लैंगिक अत्याचार केल्याबद्दल एका श्रीलंकन नागरिकाला मागच्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आणि आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे बोलत होते. त्यानंतर दोघांची भेट झाली. महिलेने आरोप केलाय की, तिच्यासोबत 2 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.
या प्रकरणात सिडनीतील ससेक्स स्ट्रीट येथील हॉटेलमधून 31 वर्षीय व्यक्तीला रविवारी (06 नोव्हेंबर) अटक करण्यात आली आहे.
कोण आहे दानुष्का गुणातिलके?
डावखुरा दानुष्का आक्रमक बॅटिंग शैलीसाठी ओळखला जातो. 2015 मध्ये श्रीलंका अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली.
2017 मध्ये गुणतिलकाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताविरुद्ध 72बॉलमध्ये 76 रन्सची वेगवान खेळी साकारत श्रीलंकेला दिमाखदार विजय मिळवून दिला होता. गुणतिलके मूळ संघात नव्हता पण चामरा कपूगेडराला झालेल्या दुखापतीमुळे त्याला संधी मिळाली. दानुष्काने त्या संधीचं सोनं केलं.
कुमार संगकाराला आदर्श मानणारा गुणतिलका ऑफस्पिन बॉलिंगही करतो. आक्रमक शैलीमुळे ट्वेन्टी20 प्रकारात श्रीलंकेच्या संघाचा तो अविभाज्य भाग आहे.
दानुष्काने आतापर्यंत 8 टेस्ट, 47 वनडे आणि 46 ट्वेन्टी-20 सामन्यात श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडे प्रकारात दानुष्काच्या नावावर दोन शतकंही आहेत.
दानुष्काने 2017 मध्ये गॉल इथे भारताविरुद्ध पदार्पण केलं होतं.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेचा संघ पात्रता फेरीपासून खेळतो आहे. दानुष्का गीलाँग इथे झालेल्या नामिबियाविरुद्धच्या लढतीत खेळला. त्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे दानुष्का स्पर्धेत पुढे खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. खेळू शकणार नसला तरी दानुष्का संघाबरोबर ऑस्ट्रेलियातच होता. तो मायदेशी परतला नव्हता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)