दक्षिण कोरिया : 'हॅलोव्हिनच्या त्या रात्री चेंगराचेंगरीत माणसं उभ्या उभ्या मेली'

    • Author, सोनाली मदने,
    • Role, बीबीसी मराठीसाठी, सोलहून.

हॅलोविन फेस्टिव्हल कोरियाचा सर्वात महत्वाचा आणि मोठ्या उत्साहात साजरा होणारा फेस्टिव्हल आहे. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात सोल मधल्या 'ईटेवोन' शहरात हा फेस्टिव्हल साजरा केला जातो.

या फेस्टिव्हलची ख्याती इतकी आहे की दरवर्षी जगभरातून लोकं फक्त डेकोरेशन आणि वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी येत असतात. या फेस्टिवलच्या थीम वर 'इटेवोन क्लास' नावाचा के-ड्रामा देखील प्रचलित आहे. पण कालची रात्र सर्वांसाठी 'काळरात्र' ठरली.

काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे डेकोरेशन आणि पार्टी करण्यासाठी लोकं ईटेवोन मध्ये आले होते. मी आणि माझे काही मित्र-मैत्रिणी देखील डेकोरेशन पाहण्याच्या उत्सुकतेमध्ये तिकडे गेलो होतो.

माझ्या मित्रमैत्रिणींनी मेकअप आणि वेगवेगळे पोशाख घालून तिथे हजेरी लावली होती. हॅलोवीन संस्कृती कशी असते हे मला जाणून घ्यायचं होतं तसेच भारतात अशा प्रकारचा फेस्टिव्हल साजरा होत नसल्या कारणाने मला या फेस्टिव्हलची विशेष उत्सुकता होती. आम्ही सर्वानी तिकडे जेवण करून डेकोरेशन पाहायला जायचं असं ठरवलं.

आम्ही येऊन फक्त 20 चं मिनिटं झाली आणि त्या ठिकाणी एकचं गोंधळ उडाला. लोकांना चालायला जागा नव्हती, सगळे जण एकमेकांना धक्के देत पुढे जात होते. जी लोकं उंचीने लहान होते त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला.

आम्हीदेखील त्या गर्दीत अडकलो होतो पण आम्ही गर्दीच्या कोपऱ्यात असल्यामुळे आम्हाला जास्त त्रास झाला नाही, पण आम्ही लोकांना चेंगरताना पाहिलं. अगदी 15 मिनिटात कोरियन आपत्कालीन कक्षाचे जवान येऊन गर्दी कंट्रोल करायला लागली.

जेव्हा त्यांनी लोकांना बाजूला सारलं तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या मागे जे लोकं उभे होते ते उभ्यानेचं मरण पावलेले. जे जिवंत होते ते बाजूला सरकले आणि जे मेलेले ते एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळले!

जेव्हा हे कळलं की आपल्या मागे उभी राहिलेली माणसं मेली आहेत ते पाहूनच आमचा थरकाप उडाला. आम्हाला काही सुचण्याआधीच पोलिसांनी मानवी साखळी तयार केली आणि लोकांना ब्लॉक केलं. तसेच मधली जागा रिकामी केली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पळत येऊन खाली कोसळलेल्या लोकांना सीपीआर द्यायला सुरुवात केली. अग्निशामक दलाच्या लोकांसोबत ज्यांना सीपीआर द्यायला येत होतं ते स्थानिक कोरियन मुलं-मुली जवानांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनीदेखील सीपीआर द्यायला सुरुवात केली.

तेव्हा माझ्या लक्षात आलं की काही वेळापूर्वी एक मुलगा मला 'हॅपी हॅलोविन' असं म्हणून शुभेच्छा दिल्या होत्या आणि आता त्याला लोक सीपीआर देत होते. त्याला या परिस्थितीत पाहताना मला रडू आवरलं नाही पण तेव्हा रडण्यापेक्षा तिथून निघणं जास्त महत्वाचं होत. गर्दीतून मार्ग काढत आम्ही एका दुकानात गेलो.

दुकानदारानेसुद्धा काहीही न बोलता त्याच्या दुकानात त्याने आम्हाला आसरा दिला. त्या दुकानात आम्ही तब्ब्ल 3 तास घालवले. पोलिसांनी ३ तासांनी दुकानात येत परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे तुम्ही बाहेर जाऊ शकता असं म्हणत आम्हाला दिलासा दिला.

स्थानिक लोक आणि पोलीस जे मृत झाले त्यांना उचलून अँब्युलन्स मध्ये ठेऊन घेऊन जात होते. या अपघातात एकूण 156 जण मरण पावले आणि 100 हून जास्त लोक अजूनही गंभीर अवस्थेत होते. हे सगळं आमच्या डोळ्यासमोर घडत होतं.

आमच्या ग्रुप मध्ये एक वयाने लहान मुलगा सोबत होता. एक पोलीस अधिकारी आमच्या जवळ येऊन त्याला "घाबरू नको सगळं ठीक होईल" असं म्हणून त्याला मिठी मारून गेली.

त्या रात्री टास्क फोर्स मध्ये काम करणाऱ्या बहुतांश महिला होत्या. त्या अॅम्ब्युलन्स चालवत होत्या, गर्दी सावरत होत्या, सीपीआर देत होत्या आणि लोकांना मानसिकरीत्या सावरतदेखील होत्या. अशा प्रकारचा अनुभव माझ्यासाठी नवीन होत्या की इतक्या मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी अशा प्रकारच्या प्रसंगाचं व्यवस्थापन करत होत्या.

काही हेल्थकेयर वर्करने आम्हाला श्वसन संदर्भात काही त्रास होतो आहे का हे वारंवार विचारत होते. इतकं सगळं चालू असताना एक गोष्ट प्रभावीपणे लक्षात आली की ज्याप्रकारे कोरियन सुरक्षा व्यवस्था शांतपणे परिस्थिती हाताळत होती

कोणत्याही पोलिसाने लोकांवर आवाज चढवला नाही, उलट त्यांना समजावत त्यांना आपुलकीने मिठी मारत लोकांशी संवाद साधत होते. त्या दिवशीची परिस्थिती खूपच भयानक होती. पण कोरियन सुरक्षा दलाने ही परिस्थिती चोखपणे सांभाळली.

दुकानातून बाहेर पडल्यावर आम्ही "हान रिव्हर" च्या दिशेने चालत निघालो कारण मध्यरात्री कोणतीही पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू नव्हतं. किमान 2 किलोमीटरचा रस्ता आम्ही चालत पार केला. रात्रीचे 3 वाजले असताना आम्हा सर्वांना भूक लागली, पण सगळं काही सामसुम होतं. त्यात एका आजीचे रेस्टॉरंट दिसलं.

ते हॉटेल खूप लहान होतं पण तरीही त्या आजी सर्वांना आतमध्ये बोलवत होत्या. त्यांनी आम्हालादेखील लांबून आवाज दिला आणि बोलवलं. मी आणि माझ्या मैत्रिणी त्यांच्या रेस्टारंट मध्ये गेलो असता आम्ही पाहिलं तिकडे लोकांची गर्दी होती. माझ्या मैत्रिणीने आजीला विचारलं की, "तुम्ही इतक्या रात्री रेस्टारंट का चालू ठेवलं?"

तेव्हा त्या आजी म्हणाल्या, "11 वाजता मी टीव्हीवर बातमी पहिली तेव्हा मला अंदाज आला की लोक या दिशेने चालत येणार आणि त्यांना भूक लागणार म्हणून मी रेस्टॉरंट चालू ठेवलं." त्यांनी आम्हाला 'किमची पॅनकेक' खायला दिलं. झालेल्या अपघातामुळे कोणाला काहीच खाण्याची इच्छा नव्हती पण ऊर्जा मिळवण्यासाठी खाणं गरजेचं होत.

ट्रेन चालू होण्यासाठी अजून 2 तास बाकी होते आणि त्या रेस्टारंटमध्ये गर्दी वाढतच चालली होती. इतर लोकांनादेखील हॉटेलमध्ये बसायची संधी मिळावी या भावनेने आम्ही तिकडून निघालो. थंडी वाढत चालली होती.

आम्ही कोणीही थंडीचे जॅकेट्स घेऊन आलो नव्हतो त्यामुळे आम्हाला खूप जास्त थंडी वाजत होती. एका मित्राने थंडीपासून वाचण्यासाठी नोरेबांग रूम मध्ये जाण्याचा सल्ला दिला. (नोरेबांग म्हणजे कराओके). जेव्हा आम्ही नोरेबांग रूमचे लोकेशन पहिले तेव्हा कळलं की ते हॉस्पिटलच्या वरचं आहे जिथे पार्टीमध्ये मरण पावलेल्या लोकांना घेऊन येत होते.

आम्हाला तिथे जास्त भीती वाटली. नोरेबांग रूममध्ये गेलो असता तिकडच्या मॅनेजरने आम्हाला सांगितलं की, सगळे रूम फुल आहेत. रूम जरी भरलेल्या असल्या तरी तिकडे कोणीही गाणी गात नव्हतं. सगळे एकदम शांत होते. ती शांतता जास्त त्रास देणारी होती. कसेबसे करत आम्ही मेट्रो स्टेशनला गेलो आणि पहिली ट्रेन येण्याची वाट पहिली. 6 वाजता ट्रेन आली आणि आम्ही त्या ट्रेनने घरी गेलो.

कोरियामध्ये येऊन आज 2 महिने झाले आणि असा काहीसा अनुभव मला अनुभवायला मिळेल याची मला कल्पना देखील नव्हती. सर्व काही शांत झाल्यावर आमच्या सोबत असलेले आमच्या कोरियन मित्रांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला सीपीआर ट्रेनिंग शाळेत असताना वयाच्या दहाव्या वर्षी दिलं जात आणि सोबतच इकडे आलेला प्रत्येक पुरुषाचं आर्मी ट्रेनिंग झालेलं आहे त्यामुळे सर्वांना क्रायसिस मॅनेजमेंट करता येतं.

म्हणून काहीही गोंधळ न होता सर्व शांततेत पार पडत होते. सुरक्षा संघटनेप्रमाणेच इकडचे स्थानिक लोकदेखील तितकेच भावनिक आहेत याचादेखील अंदाज आला. इकडच्या सुरक्षा व्यवस्थेकडे पाहता आणि खासकरून कोरियन लोकांची मदतीची भावना लक्षात घेता आपण एका सुरक्षित देशात आहोत याची खात्री पटली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)