शहरातील सर्वांत मोठी बिल्डिंग नाही तर शहराएवढी बिल्डिंग, हे सत्यात उतरेल का?

शहर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पीटर रे अॅलिसन,
    • Role, बीबीसी न्यूज.

सायन्स फिक्शनमध्ये अनेकदा शहरं ही सर्व प्रकारच्या सोयीसुविधा असलेली आणि स्वयंपूर्ण अशीच दाखवली किंवा वर्णन केली जातात. पण खरंच एखाद्या इमारतीमध्येच संपूर्ण शहर वसवणं कितपत व्यवहार्य आहे?

भविष्यामध्ये मानवी वसाहतींसाठीची बंदिस्त शहरांची कल्पना ही जणू सायन्स फिक्शनमधील परिकथा बनलीय. मानवी अधिवास, सर्वप्रकारच्या सोयी सुविधा, ऊर्जा निर्मिती, अन्नधान्य उत्पादन, कचरा व्यवस्थापण आणि पाणी अशा सर्व दृष्टीनं ही शहरं स्वयंपूर्ण असतात.

वास्तुविशारद पाओलो सोलेरी यांनी पर्यावरणाच्या दृष्टीनं विचार करून त्याची बांधकामाशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून त्यांनी 1969 मध्ये आर्कोलॉजी (arcology) ही संकल्पना मांडली होती.

आर्किटेक्चर (architecture) आणि इकॉलॉजी (ecology ) यातून ती तयार करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरानं सोलेरी यांनी अमेरिकेत प्रायोगिक तत्वावर आर्कोसँटी या शहराचं काम काम सुरू केलं. त्यातून त्यांनी ही संकल्पना सर्वांसमोर मांडली.

भविष्यातील शहरांविषयी सायन्स फिक्शन तयार करण्यासाठी सोलेरी यांच्या या संकल्पनेतून अनेकांना प्रेरणा मिळाली. एक असं शहर जिथं लोक इमारतीच्या बाहेर न पडतादेखील काम करू शकतील किंवा जगू शकतील.

याचं चित्रपटाशी संबंधित उदाहरण द्यायचं झाल्यास ड्रेड (Dredd-जज ड्रेड या कॉमिक बूक पात्रावर आधारित) आणि स्कायस्कॅपर (Skyscraper) हे देता येईल. याठिकाणचं जीवन कसं असतं किंवा असू शकतं याचे तपशील यात आढळतात.

सायन्स फिक्शनबरोबरच प्रत्यक्ष आपल्या भोवतालच्या जगालाही यातून प्रेरणा मिळाली असावी. कारण सौदी अरेबियामध्ये द लाईन हे भव्य स्मार्ट शहर वसवण्याचा प्रस्ताव आहे.

जवळपास 170 किलोमीटर किंवा 105 मैल लांब अशा एका सरळ रेषेत आणि 200 मीटर (660 फूट) रुंद तर 500 मीटर ऊंच (1650 फूट) एवढी भव्य ही इमारत असेल. त्यात जवळपास 90 लाख लोक राहू शकतील.

द लाईन या शहराला सौरऊर्जा आणि पवनऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा पुरवली जाईल, असा प्रस्ताव आहे. पण तसं असलं तरी हे शहर पूर्णपणे स्वयंपूर्ण नसेल. कारण अन्न आणि इतर गोष्टींसाठी येथील रहिवाशांना बाह्य स्त्रोतांवर अवलंबून राहावं लागेल.

आर्कोलॉजीसारख्या काही रचना या पूर्वीपासूनही अस्तित्वात आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, अंटार्क्टिक संशोधन तळं ही तसं पाहता स्वयंपूर्ण आहेत. पण ती कदाचित दुर्गम ठिकाणी असल्यामुळं तशी असावीत. सभोवताली असलेल्या वातावरणामुळंही त्यांनी स्वयंपूर्ण असणं हे गरजेचं ठरतं.

द मॅक्मुर्डो स्टेशन याठिकाणी अंदाजे 3000 संशोधक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. पण तसं असलं तरी याठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात अन्न आणि इंधन पुरवठा करावा लागतो.

द लाईन हे सौदी अरेबियामध्ये 105 मैल एवढ्या लांबीचे असेल.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, द लाईन हे सौदी अरेबियामध्ये 105 मैल एवढ्या लांबीचे असेल.

त्याशिवाय जास्तीत जास्त स्वयंपूर्ण अशा तयार करणाऱ्यात आलेल्या इतर रचना किंवा डिझाईनमध्ये विमानवाहू जहाजं, अण्विक पाणबुड्या आणि ऑईल रिग (तेलाचा उपसा केलं जाणारं ठिकाण) यांचा समावेश असतो.

त्याठिकाणी अल्पकाळासाठी का असेना, पण राहण्यासाठी आणि कामासाठी गरजेचं असं सर्वकाही असतं. विमानवाहू जहाजांवर ठरावीक आठवड्यांनंतर पुन्हा रसद पुरवावी लागते, तर अण्विक पाणबुडी ही चार महिन्यांपर्यंत पाण्याखाली राहू शकत असते.

पण यापैकी कोणतीही जागा ही आनंदाने राहण्याची अशी ठिकाणं नाहीत. विशेषतः पाणबुडी या आकाराने अरुंद, दुर्गंधी असलेल्या असतात. त्याठिकाणी झोपण्याची जागाही सामायिक असते. तसंच पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्यानं क्रू मेंबर्सना व्हिटामीन 'डी'चा डोस दिला जातो.

पण आपण खरंच आर्कोलॉजी उभारू शकतो का? अशा प्रकारच्या मोठ्या रचना किंवा वास्तुंचा विचार करता त्यांचे वजन पेलण्यासाठी तेवढा मोठा पाया असणं गरजेचं असेल. पण, "करायचेच असेल तर तुम्ही काहीही उभारू शकता," असं बीएसपी कन्सल्टींगच्या स्ट्रक्चरल इंजिनीअर मोनिका अॅन्सपर्जर म्हणाल्या.

"लोडींग खूप मोठ्या प्रमाणावर असेल, पण अशक्य काही नाही. त्याच्या पायासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येईल एवढंच," असंही त्या म्हणाल्या.

इमारतींच्या उंचीमुळं निर्माण होणारं मोठं आव्हान म्हणजे, वाऱ्याचा परिणाम हे असतं. सामान्य घरासाठी हवेचा दाब ही फारशी चिंतेची बाब नसते. पण बुर्ज खलिफासारख्या प्रचंड उंच टॉवरचा विचार करता, वाऱ्याचा प्रवाह आणि त्यामुळं तयार होणारे भोवरे (हवेचे गोल आकारातील वावटळ) याचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं.

हवा जेव्हा इमारतीच्या एका पृष्ठभागावर धडकत असते, तेव्हा त्याच्या विरुद्ध बाजुला कमी दाबाचा भाग तयार होतो, ती पोकळी भरून काढण्यासाठी हवा गोल फिरू लागते आणि त्यामुळं भोवरा तयार होतो. वेगाने वारे सुरू झाल्यास निर्माण होणाऱ्या या भोवऱ्यांमुळं उंच इमारतींमध्ये हालचाल होऊ शकते.

या भोवऱ्यांचा परिणाम कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे इमारत जस-जशी उंच होत जाते, तसा त्या इमारतीचा आकार बदलायला हवा. - अॅड्रियन स्मिथ

या हालचालींच्या लहान परिणामांपासून ते इमारत कोसळण्यापर्यंतचा धोका असतो. 1940 मध्ये वॉशिंग्टनमधील टाकोमा नॅरोज ब्रिज हा त्यावरील वाऱ्याच्या दबावामुळं कोसळला होता. एका भागावर प्रचंड दबाव निर्माण झाल्यानं हालचाल झाली आणि त्यामुळं आपोआप त्याठिकाणचे तुकडे होत पूल कोसळला होता.

अशाप्रकारच्या हवेच्या भोवऱ्यांचा परिणाम कमी करण्यासाठी ट्युन्ड मास डंपर (व्हायब्रेशन कमी करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण) चा वापर करता येऊ शकतो. तसंच हवेच्या प्रवाहाचा विचार करून तशा प्रकारचे डिझाईन तयार करायला हवे.

"भोवऱ्यांचा परिणाम कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे इमारत जस-जशी उंच होत जाते, तसा त्या इमारतीचा आकार बदलणे हा आहे," असं बुर्ज खलिफासह अनेक भव्य वास्तुंचे वास्तुविशारद अॅड्रियन स्मिथ म्हणाले.

"जर तुम्ही इमारतीचा आकार बदलला नाही तर, हवेला भोवरा निर्माण करण्याची इमारतीभोवती फिरण्याची संधी मिळते. इमारतीच्या सारख्या आकाराबरोबर त्याचा वेग वाढतो आणि परिणामी इमारत कोसळू शकते," असं ते सांगतात.

त्यामुळं आर्कोलॉजी तयार करताना ड्रेडमध्ये दाखवल्याप्रमाणे भिंतींच्या आत बंदिस्त रचना उभारण्याऐवजी, प्राचीन मेसोअमेरिकन वास्तुंसारख्या पायऱ्यांचे बांधकाम असलेल्या रचना उभारायला हव्यात. म्हणजे वाऱ्याच्या प्रवाहात त्यामुळं व्यत्यत येऊ शकतो.

द लाईन सारखे प्रकल्प हे एकाच छताखाली राहून आणि काम करून आनंदी राहणाऱ्यांची कल्पना करून तयार करण्यात येतायत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, द लाईन सारखे प्रकल्प हे एकाच छताखाली राहून आणि काम करून आनंदी राहणाऱ्यांची कल्पना करून तयार करण्यात येतायत.

अशा शहरांमध्ये असलेलं आणखी एक मोठं आव्हान म्हणजे ऊर्जानिर्मिती. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा अशा अक्षय्य ऊर्जा साधनांचा वापर होऊ शकतो. इमारतीच्या बाहेरच्या भागावर त्यासाठी सौर पॅनल किंवा पवन ऊर्जा निर्मितीचे टर्बाईन सहज लावता येऊ शकतात.

मात्र, यावर अवलंबून राहून अशी शहरं ऊर्जेच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण बनू शकत नाहीत. कारण काही ठरावीक काळातच यापासून पुरेशी ऊर्जानिर्मिती होऊ शकते. त्यामुळं जेव्हा ऊर्जेचा तुटवडा निर्माण होईल तेव्हासाठी पर्यायी ऊर्जानिर्मिती आणि साठवण यंत्रणा यांची आवश्यकता असेल.

अशाठिकाणी अण्विक ऊर्जा हा ऊर्जानिर्मितीसाठी पर्याय ठरू शकतो. स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर्स (SMRs) म्हणजेच अणुभट्ट्यांची लहान आकारातील आणि अधिक कार्यक्षम आवृत्ती असते. त्यांचा वापर करता येऊ शकतो. या SMR चे मोठ्या अणुभट्ट्यांच्या तुलनेत काही फायदे असल्याचा दावा केला जातो.

अधिक सुरक्षित आणि अण्विक सामग्री (अण्विक कचरा) पसरण्याचा कमी धोका असे हे फायदे असू शकतात. तसं पाहता कोणत्याही प्रकारच्या अणुभट्टयांतून ऊर्जा निर्मितेच्या प्रक्रियेनंतर अण्विक कचऱ्याची साठवण आणि प्रक्रिया हे मोठं आव्हानच असतं. पण तरीही पर्याय म्हणून या फ्युजन अणुभट्ट्यांच्या माध्यमातून अधिक सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जा निर्मिती होऊ शकते.

असं असलं तरी याचे सध्याचे डिझाईन हे लहान किंवा कॉम्पॅक्ट (एका इटरचे वजन 23000 टन असू शकते) असं नाही. शिवाय आर्थिकदृष्ट्यादेखी ते परवडणारे नाही. कारण अद्याप कोणालाही आवश्यकतेपेक्षा अधिक ऊर्जा निर्मिती करता आलेली नाही.

अन्नधान्य उत्पादन याचाही विचार करायला हवा. अशा इमारतींमध्ये पारंपरिक शेती ही अव्यवहार्य ठरेल. त्यामुळं उभ्या हायड्रोपोनिक फार्मचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळं नैसर्गिकरित्या हवेच्या पुनर्वापरातही मदत होईल.

पण यातही आवश्यक असलेल्या प्रकाशाची गरज भागवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता वाढेल आणि कमी जागेमुळं पुरेसं अन्नधान्य उत्पादन करणं कठिण ठरेल.

उंचच-उंच इमारतींमध्ये सर्वांना भविष्य दिसत नाही

पाओलो बासिगालुपी यांच्या वॉटर नाईफ या कादंबरीमध्ये वर्णन केलेल्या आर्कोलॉजीमध्ये पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी गाळण तलावांचा वापर करण्यात आलाय. ते कौतुकास्पद आहे. पण तरीही कोणत्याही पुनर्वापर प्रणालीत नुकसान किंवा घट अटळ असते.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS)दररोज अंदाजे 3.6 गॅलन (17.3 लिटर) पाणी रिसायकल करतं. यात मूत्र आणि घामाचाही समावेश असतो. पण तरीही काही ठरावीक महिन्यांनी त्यांना पाण्याचा पुरवठा करावा लागतो.

मात्र, उंचच-उंच इमारतींमध्ये सर्वांनाच भविष्य दिसतं असंही नाही. 2021 मध्ये चीननं 500 मीटर (1650 फूट) पेक्षा अधिक उंचीच्या नव्या इमारतींच्या बांधकामांवर बंदी घातली. तसंच इमारतींच्या उंचीची मर्यादा 250 मीटर (825 फूट) एवढी ठेवण्याचं बंधनही घातले.

शहर

फोटो स्रोत, Getty Images

दुसरीकडे, पृथ्वीवरील वाढत्या लोकसंख्येला सामावून घेणंही गरजेचं आहे. सातत्यानं नवीन जमिनीवर आडव्या इमारती उभ्या करून शहरं वाढवणं हे अनिश्चित काळासाठी फायदेशीर नाही.

त्यामुळंच उभी शहरं वाढवण्याच्या युक्तिवादाला बळ मिळतं. इलिनॉईस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील टॉल बिल्डींग्स अँड व्हर्टीकल अर्बनिझन (उंच इमारती आणि उभे शहरीकर) चे संचालक आणि टॉल बिल्डींग अँड अर्बन हॅबिबटॅट काऊन्सिलचे अध्यक्ष अँटनी वूड यांनी याबाबत मत मांडलंय.

"शहरांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे. अगदी एक ते दहा लाख अशा पटीत हा विस्तार आहे. पण आता त्यांचा असा आडवा विस्तार शक्य नाही. कारण त्यासाठी लागणारी जमीन, बांधकामासाठी आणि शहरासाठी लागणारी ऊर्जा या दृष्टीनं ते शाश्वत नाही. त्यामुळं ही शहरं उभी वाढणार आहेत," असं ते म्हणाले.

स्वतंत्र टॉवर्स बांधण्याऐवजी दोन इमारती पुलांच्या माध्यमातून एकमेकांना जोडता येऊ शकतील. या दरम्यान हरित पट्टे निर्माण करता येऊ शकतात. अशा प्रकारच्या उंच आणि पुलांनी जोडलेल्या इमारतींमध्ये खालच्या मजल्यांवर सावली राहण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं वरच्या मजल्यांची मागणी आणि महत्त्वं वाढते आणि त्यातून श्रेणीनुसार वर्ग तयार होण्याची शक्यता असते.

"स्थलांतर होत असलेल्या भागांजवळ उभी शहरं वाढत असल्याचं मला पाहायला मिळत आहे. तसंच ती भविष्यात आडव्या पद्धतीनंही विस्तारतील अशीही मला आशा आहे," असं स्मिथ म्हणाले.

नजीकच्या भविष्यकाळात आर्थिकदृष्ट्या परवडणारी आर्कोलॉजी कशाप्रकारे तयार केली जाऊ शकते हे पाहणं आव्हानात्मक असेल.

हवामान बदलाचे परिणाम जसजसे अधिक ठळकपणे दिसू लागले आहेत, त्यानुसार इमारतीच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यात बदल होऊ शकतो. सिमेंट उद्योगांमधून होणारं कार्बन उत्सर्जन हे विमान वाहतूक क्षेत्रातील उत्सर्जनापेक्षा अधिक आहे. त्यामुळं एक पर्यायी साहित्य हे मोठ्या प्रमाणावर लाकूड असू शकतं.

तसंच लाकडांच्या विविध थरांपासून तयार केलेलं एखादं इंजिनीअरिंग उत्पादनही याला पर्याय ठरू शकतं. "लाकूड निर्मितीसाठी लागणारी ऊर्जादेखील स्टील किंवा काँक्रिटच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या ऊर्जेच्या काही अंश एवढीच असते," असं वूड म्हणतात. त्यांच्या मते, लाकडाची निर्मिती स्वतःहून होत असते आणि ते वातावरणातून कार्बनचं प्रमाणही कमी करत असते.

संरचनात्मक आणि सैंद्धांतिकदृष्ट्या आर्कोलॉजीची निर्मिती ही शक्य असली तरी आवश्यक असलेली ऊर्जा निर्मिती, अन्नधान्य उत्पादन आणि कचरा व्यवस्थापन यावर शाश्वत पर्याय शोधण्यासाठी अत्यंत कल्पक अशा अभियांत्रिकीची आवश्यकता असेल.

नजीकच्या भविष्यात आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या आर्कोलॉजी कशा तयार करता येतील हे आव्हान असेल असं समीक्षकांचं म्हणणंय. अशा प्रकारच्या बंदिस्त वातावरणात राहणं हे आनंददायी नसेल असाही एक युक्तिवाद आहे. पण त्याचवेळी एखाद्या अप्रिय घटनेनं बाह्यजग राहण्यास अयोग्य ठरलं असेल तर हे ठिकाण अधिक चांगलं आहे, हा विचारही मनाला समाधान देणारा ठरतो.

"काहीही उभारणं किंवा निर्मिती करणं अशक्य आहे असं मी म्हणार नाही. अशी निर्मिती करता येऊ शकते. पण तशी गरज आणि त्यासाठीची दूरदृष्टी असणं गरजेचं आहे," असं अन्सपर्जर यांनी शेवटी अगदी ठामपणे सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)