युरोपात उष्णतेची लाट, विदर्भात पूर : हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींची तीव्रता कशी वाढते?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मॅट टेलर, बीबीसी वेदर
- Role, जान्हवी मुळे, बीबीसी मराठी
मुसळधार पाऊस, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि पुरानं वेढलेली गावं... विदर्भात अनेक ठिकाणी हेच दृश्य गेले काही दिवस दिसतंय. इकडे महापूर आलेले असताना तिकडे युरोपात उष्णतेची लाट आली आहे आणि अनेक ठिकाणी मोठमोठे वणवे पेटले आहेत. विश्वास बसणार नाही, पण या दोन्ही घटनांचा एकमेकींशी संबंध आहे. कारण त्यांच्या मुळाशी आहे, हवामान बदल अर्थात क्लायमेट चेंज.
मानवी हस्तक्षेपामुळे जगाचं तापमान वाढतंय, हे तुम्हाला ठावूक असेलच. औद्योगिक प्रगतीसोबत पेट्रोल, डिझेल, कोळसा अशा जीवाश्म इंधनांचा वापर वाढला, तसं वातावरणातलं कार्बनजन्य वायूंचं प्रमाण वाढलं आणि परिणामी जगाच्या तापमानात वाढ होऊ लागली.
एरवी कधीतरी येणाऱ्या या नैसर्गिक आपत्ती आता नित्याच्या होऊ लागल्या आहेत. अशा अतीतीव्र आपत्तींना इंग्रजीत Extreme Weather Events (एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स) म्हणतात. चार पद्धतीनं याचे परिणाम जाणवतात.
नैसर्गिक आपत्तींची तीव्रता आणि वारंवारता कशी वाढली आहे आणि त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे आपण जाणून घेऊयात.
1. उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ
तापमानातल्या सूक्ष्म बदलांचाही किती मोठा परिणाम होतो, हे समजून घ्यायचं असेल, तर हा आलेख पाहा.

यात दोन टोकांना अतीथंड आणि अतीउष्ण तापमान असलेले दिवस तर मध्ये सरासरी तापमान असलेले दिवस अशी विभागणी केली आहे. तापमानात थोडासा फरक पडला, तर हा अख्खा आलेखच पुढे सरकतो आणि परिणामी उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटांची दाहकता आणखी वाढते.
उन्हाळ्याची सुट्टी आहे, मग युरोपात फिरायला चला, अशा जाहिराती एका जमान्यात दिसायच्या. आता युरोपातच भारतासारखा कडक उन्हाळा जाणवतोय.
उष्णतेच्या लाटेनं तिथे सगळे हैराण झाले असून स्पेन, फ्रान्स अशा देशांमध्ये तापमानानं अनेक उच्चांक नोंदवले आहेत. युकेमध्ये ज्ञात इतिहासात पहिल्यांदाच तापमानानं 40 अंश सेल्सियसचा आकडा ओलांडला आहे. कुठे पाण्याची कमतरता जाणवते आहे, वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि वणवे भडकले आहेत.
आत्ता जसं युरोप उष्णतेत होरपळून निघतो आहे, तसंच चित्र महाराष्ट्रातही दिसून आलं होतं. जगभरातच उष्णतेच्या लाटांचं प्रमाण दसपटीनं वाढत असल्याचं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलं आहे आणि परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ शकते अशा इशाराही दिला आहे.
"यावेळेचा उन्हाळा बरा होता, असं म्हणण्याची परिस्थिती काही दशकांनंतर येईल," अशी भीती इंपिरियल कॉलेज लंडनचे हवामान शास्त्रज्ञ प्रा. फ्रेडरिक ओट्टो व्यक्त करतात.
उष्णतेच्या लाटा केवळ जास्त उष्ण झालेल्या नाहीत, तर त्यांचा कालावधीही वाढला आहे. गेल्या पन्नास वर्षांत उष्णतेच्या लाटांचा कालावधी दुपटीनं वाढला आहे.
यामुळे आणखी एक वातावरणीय घटना घडताना दिसते. ती म्हणजे हीट डोम किंवा एकाच जागी उष्णता साठून राहणं. एखाद्या ठिकाणी उष्णता वाढली, की तिथली हवा गरम होऊन वर उठते. पण हवेच्या वरच्या भागात दबाव जास्त असेल तर ती गरम हवा खाली दाबली जाते आणि त्या प्रदेशातल्या तापमानात आणखी भर पडते.

वातावरणातल्या हवेच्या प्रवाहासोबत हा हीट डोम पुढे-मागेही सरकू शकतो. हे म्हणजे एखाद्या दोरीचं एक टोक धरून वर खाली केलं की जशा लहरी निर्माण होतात, तसंच काहीसं आहे.
अशा लहरींमुळे हवामानाच्या स्थितीवर परिणाम होतो आणि उष्णतेची लाट आणखी लांबू शकते. त्याचा हवेतल्या प्रवाहांवर, मान्सूनच्या वाऱ्यांवर आणि पावसाच्या प्रमाणावरही होतो.
भारत आणि पाकिस्तानमध्ये यंदा हीट डोमचा प्रभाव दिसून आला आणि सलग पाच उष्णतेच्या लाटा आल्या. पाकिस्तानच्या जाकोबाबादमध्ये तर मे महिन्यात तापमान 49 अंश सेल्सियसपर्यंत गेलं होतं.
दक्षिण गोलार्धात अर्जेंटिना, उरुग्वे, पॅराग्वे, ब्राझिल, ऑस्ट्रेलियामध्येही जानेवारीत उष्णतेच्या लाटा आल्या होत्या आणि तापमानानं उच्चांक मोडले. गेल्या वर्षी उत्तर अमेरिकेत अशीच परिस्थिती दिसून आली. कॅनडासारख्या एरवी थंड असलेल्या देशातही लिटन या गावात तापमान 49.6 अंश सेल्सियस एवढं चढलं.
आर्क्टिक प्रदेशातल्या वाढत्या तापमानामुळे हवेचे प्रवाह मंदावतात आणि हीट डोम तयार होण्याची शक्यताही वाढते.
2. तीव्र दुष्काळ
उष्णतेची लाट लांबली, की परिणामी दुष्काळाची परिस्थिती आणखी गंभीर होत जाते. उष्णतेच्या लाटांदरम्यान पावसाचं प्रमाण कमी होतं. पाण्याचे साठे आटतात. जमिनीतील जमिनीतला ओलावा कमी होतो आणि जमीन आणखी वेगानं तापते. त्यामुळे जमिनीलगतच्या हवेतील उष्णतेत आणखी भर पडते. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढते आणि पाणीटंचाईत भर पडते.
हे दुष्टचक्र आहे आणि महाराष्ट्रातले काही प्रदेश दरवर्षी त्यातून जाताना दिसतात.
3. भीषण वणवे
उष्णतेच्या लाटेमुळे वणवे पेटण्याचं प्रमाण वाढतं आणि कुठे आग लागली, तर ती आणखी भीषण रूप धारण करते.
आग किंवा वणवा लागण्यामागचं कारण मानवी किंवा नैसर्गिक, काहीही असू शकतं, पण शुष्क वातावरण, कोरडं गवत, अशी परिस्थिती आगीला पसरण्यासाठी आमंत्रण देते. उष्णतेच्या लाटेमुळे जमिनीतला आणि जंगलातला ओलावा कमी होतो आणि आग वेगानं पसरत जाते.
भारतातही यंदा उष्णतेच्या लाटेदरम्यान मोठे वणवे पेटले होते, आणि आता युरोपात तेच दिसून येत आहे. फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस, क्रोएशियात हजारो लोकांना वणव्यामुळे स्थलांतर करावं लागलं. वणव्यांमध्ये शेकडोंचा मृत्यू झाल्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे.
गेल्या वर्षी कॅनडामध्ये लागलेले वणवे इतके स्फोटक होते, की त्या धुरातून ढग आणि वादळ तयार झालं. पायरो-क्युमुलोनिंबस प्रकारच्या त्या ढगात वीजा चमकून आणखी आग पसरली.
पश्चिम अमेरिकेत 10 हजार एकरवर पसरणाऱ्या वणव्यांचं प्रमाण 1970च्या तुलनेत सातपटीनं वाढलं असल्याचं क्लायमेट सेंट्रल या संस्थेचा एक अहवाल सांगतो.
4. तीव्र महापूर
सामान्य परिस्थितीत जलचक्र कसं असतं, हे तुम्ही शाळेत शिकल्याचं आठवत असेल. उन्हाळ्यात समुद्रातल्या पाण्याची वाफ म्हणजे बाष्प तयार होते, या बाष्पापासून ढग तयार होतात आणि ते वर जाऊन थंड झाले की पाऊस पडतो. समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत हे ढग पुढे सरकतात आणि भारतात त्यामुळे मोसमी पाऊस पडतो.
पण तापमान वाढलं की हवेत बाष्पाचं प्रमाण वाढतं. आणखी दाट ढग तयार होतात आणि अतीवृष्टी होते. अशा वेळी एखाद्या लहान भूप्रदेशात कमी कालावधीत जास्त पाऊस पडतो. आसाममध्ये यंदा काहीशी तशीच परिस्थिती दिसून आली.

जगभरात हवामानाची स्थिती वेगवेगळी आहे आणि ती सतत बदलतच असते. पण जागतिक तापमानवाढीमुळे हे बदल अतितीव्र झाले आहेत.
नैसर्गिक आपत्ती टाळता येणं पूर्णपणे आपल्या हातात नाही. पण अशा आपत्तींची तीव्रता आणि त्यानं होणारं नुकसान कमी करायचं असेल, तर हवामान बदलाचा वेग कमी करण्यावर भर देणं गरजेचं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








