ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी लुला यांची निवड भारतासाठी महत्त्वाची, कारण...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
लख्ख समुद्र किनारे, अमेझॉनचं घनदाट जंगल, फुटबॉल, सांबा आणि कार्निव्हल... ब्राझील हा देश या सगळ्या गोष्टींसाठी ओळखला जातो. पण दक्षिण अमेरिकेतल्या या देशाचं जगाच्या राजकारणातही छोटं पण अतिशय महत्त्वाचं स्थान आहे.
सोमवारीच ब्राझीलमध्ये सत्तापालट झाला आहे. अतीउजव्या विचारसरणीचे आणि काहीसे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना हरवून डाव्या विचारसरणीचे माजी राष्ट्राध्यक्ष लुला द सिल्वा पुन्हा सत्तेत आले आहेत.
अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीच्या निकालाकडे पर्यावरणाचा विजय म्हणूनही पाहिलं जातंय. त्यामागचं कारण काय आहे? तसंच लुला पुन्हा सत्तेत येण्याचा भारत-ब्राझील संबंधांवर काय परिणाम होईल, जाणून घेऊयात.
'ॲमेझॅान'साठी महत्त्वाची निवडणूक
लुईझ इनासियो लुला द सिल्व्हा पुन्हा एकदा ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी सेलिब्रेशन केलं.
जगभरातल्या आणि विशेषतः ब्राझिलमधल्या पर्यावरणप्रेमींनी तर सुटकेचा निश्वास टाकला. याचं कारण म्हणजे बोल्सोनारो यांनी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जंगलाविषयी घेतलेले अनेक निर्णय.

फोटो स्रोत, Getty Images
ॲमेझॉनचं जंगल हे जगातलं सर्वांत मोठं वर्षावन असून पृथ्वीचं एक फुप्फुस म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं.
अशी घनदाट जंगलं मोठ्या प्रमाणात कार्बन डायॲाक्साईड शोषून घेतात आणि जागतिक तापमानवाढीला आळा घालण्यात मदत करतात. अनेक प्रजातींच्या पशुपालक आणि वनस्पतींना आश्रय देत असल्यानं ही जंगलं जैवविविधतेच्या दृष्टीनंही महत्त्वाची आहेत.
पण बोल्सोनारो 2018 साली निवडणूक जिंकून सत्तेत आले, तेव्हापासून त्यांनी ॲमेझॉनमध्ये जंगलतोड करण्याचा, शेती आणि वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी तिथली जागा देण्याचा निर्णय घेतला.
बोल्सोनारोंना हवामान बदलाविषयी वैज्ञानिक निष्कर्ष आणि इशारे मान्यच नाहीत. यासंदर्भातल्याच पॅरीस करारातून माघार घेण्याची धमकी त्यांनी अनेकदा दिली.
ब्राझीलच्या INPE या राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या पाहणीनुसार बोल्सोनारो यांच्या कार्यकाळातल्या पहिल्या तीनच वर्षांत ॲमेझॉन खोऱ्यातली जंगलतोड 73 टक्क्यांनी वाढली. या जंगलात आगी आणि वणव्यांचं प्रमाणही वाढलं.
पर्यावरणाविषयीच्या बोल्सोनारो यांच्या भूमिकेवर जगभरातून टीका झाली. महिला, समलिंगी व्यक्ती, स्थलांतरीत व्यक्तींविषयीची त्यांची मतंही अनेकांना पटत नव्हती.

फोटो स्रोत, Reuters
त्याउलट लुला यांनी अमेझॉनचं जंगल वाचवण्याला प्राधान्य देणार असल्याचं वचन दिलं आहे. ब्राझील आणि जगाला ॲमेझॉनची गरज आहे, असं त्यांनी विजयानंतरच्या भाषणात पुन्हा स्पष्ट केलं.
याआधी 2003 ते 2010 या कालावधीत दोनदा लुला यांनी ब्राझीलचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलं आहे. त्यांच्या कार्यकाळात अमेझॉनमधला जंगलतोडीचा दर 67 टक्क्यांनी घटला होता.
पण मोठ्या विकासकामांमुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती आणि त्या काळात अमेझॉनमधल्या मूळनिवासी जमातींचं मत विचारात घेतलं जात नसे.
आपली प्रतिमा खरंच बदलायची असेल तर लुला यांना या गोष्टी बदलाव्या लागतील. त्यांच्यासमोरचं आव्हान आणखी बिकट आहेत. कारण या निवडणुकीत ब्राझीलच्या नागरिकांमध्ये उभी फूट पडली आहे. एकीकडे डाव्या विचारसरणीच्या लुला यांना जवळपास 51 टक्के मतं मिळाली, तर बोल्सोनारो यांना 49 टक्के मतं मिळाली आहेत.
ब्राझीलच्या संसदेत म्हणजे नॅशनल काँग्रेसमध्ये बोल्सोनारो यांच्या पक्षाकडे बहुमत आहे. त्यामुळे कुठलेही निर्णय बदलायचे असतील, तर लुला यांना संसदेत ते पास करणं सोपं जाणार नाही.
लुला यांचा विजय आणि भारत ब्राझील संबंध
2020 साली भारताच्या प्रजासत्ताक दिनी जैर बोल्सोनारो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांच्या मैत्रीपूर्ण नात्याची चर्चा झाली.
आता लुला राष्ट्राध्यक्षपदी आल्यावर मोदींनी त्यांचंही अभिनंदन केलं आहे. लुला यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लुला यांच्या पहिल्या दोन टर्म्समध्ये भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांतले संबंध बळकट होत गेले होते. 2004 साली लुला भारताच्या प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते.
आधी IBSA म्हणजे भारत ब्राझिल दक्षिण आफ्रिका आणि मग ब्रिक्स अर्थात ब्राझील, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रगटांच्या वाटचालीतही लुला यांनी महत्त्वाचं योगदान दिलं.
अर्थात त्यावेळेची भारतातली राजकीय परिस्थिती वेगळी होती, तेव्हा यूपीएचं सरकार होतं, तर आता मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजप सत्तेत आहे. तरीही दोन्ही देशांचा इतिहास पाहता, लुला यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत आणि ब्राझीलचे संबंध आणखी घनिष्ट होतील अशीच अपेक्षा आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीननं गेल्या काही वर्षांत ब्राझीलमध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे. त्यामुळे आता लुला यांच्या काळात ब्राझिल आणि चीनमधले संबंध कसे असतील, यावर भारताची आणि अमेरिकेचीही बारीक नजर राहील.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








