पाकिस्तानी फॅन्सचा संताप- 'विराट कोहलीला बेस्ट अॅक्टर पुरस्कार द्या'

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी (30 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट टीमचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला. या वर्ल्ड कपमधील भारताचा हा पहिला पराभव आहे.

भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आणि दुसरा नेदरलँडविरुद्ध जिंकला आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतरही भारताचा सेमी फायनल खेळण्याचा मार्ग मोकळा आहे. भारताला आता बांगलादेश आणि झिम्बाब्वेसोबत सामना खेळायचा आहे.

पाकिस्तानचा सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाला. मात्र, तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा पराभव केला.

परंतु भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा मानला जात होता. आकडेवारीचा विचार करता भारताचा दक्षिण अफ्रिकेवरचा विजय पाकिस्तान टीमला सेमी फायनलमध्ये पोहचवण्यासाठी सकारात्मक ठरला असता.

भारताच्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटचे चाहते नाराज आहेत. यावरून सोशल मीडियावर मीम्स पोस्ट केले जात आहेत. एकाबाजूला काही लोक भारताच्या पराभवाचा आनंद घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना वाटत आहे की, भारत ही मॅच जाणीवपूर्वक हारला.

पाकिस्तानी चाहत्यांची नाराजी

पाकिस्तानमध्ये यावरून ट्वीटरवर #fixed ट्रेंड चालवला जात आहे. पाकिस्तानचा मार्ग कठीण करण्यासाठी भारताने ही मॅच जाणीवपूर्वक गमावली असं पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे.

विराट कोहलीने सोडलेला कॅच आणि कर्णधार रोहित शर्माच्या 'सहज' रन आऊट करण्याची संधी गमावलेल्या घटनांना याच्याशी जोडत आहेत.

विराट कोहली पाकिस्तानात लोकप्रिय आहे. कोहली निराशाजनक फॉर्ममधून जात असतानाही पाकिस्तानच्या चाहत्यांनी त्यांच समर्थन केलं होतं. एवढच नाही तर पाकिस्तानी क्रिकेटर्सनेही जाहीरपणे विराटच्या बाजूने वक्तव्यं केली होती.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीने कॅच सोडला यावरून एका पाकिस्तान क्रिकेट चाहत्याने लिहिलं की, 'विराटकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती.'

इरफान अली यांनी विराट कोहलीला टॅग करत ट्वीट केलं की, 'सर खरंच जेवढं प्रेम तुम्हाला पाकिस्तानकडून मिळत होतं तेवढं भारताकडूनही मिळालं नसेल. आम्ही बाबर आणि रिझवानला सोडून तुम्हाला सपोर्ट करत होतो. तुम्हाला किंग मानत होतो आणि तुम्ही आज आम्हाला निराश केलं. अभिनय कमालीचा केला तुम्ही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.'

काही पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी रोहित शर्मानं रन आऊटची संधी गमावल्याबाबतही लिहिलं आहे.

काही क्रिकेट चात्यांनी सामन्याचा फोटो शेअर करत भारतीय टीमच्या खेळाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान काही लोकांनी पाकिस्तान क्रिकेट टीमलाही सल्ले दिले आहेत. तुम्हाला भारताच्या टीमवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही, असंही काही जण म्हणाले आहेत.

अदनान अख्तर यांनी म्हटलं आहे की, दक्षिण आफ्रिका फायनल आणि सेमी फायनल खेळण्यासाठी पात्र आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान क्रिकेट टीमला झिम्बाब्वे विरुद्धचा सामना हारल्यानंतर कराची विमानतळावर यायला हवं होतं.

भारताला जबाबदार ठरवू नका की मॅच फिक्स होती. तुम्ही तुमचं भाग्य भारताच्या हातात का देत आहात?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात काय घडलं?

रविवारी (30 ऑक्टोबर) भारताचा तिसरा ग्रुप सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला.

परंतु त्याचा हा निर्णय चुकीचा सिद्ध झाला आणि सुरुवातीपासूनच भारतीय बॅट्समन आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त एकही भारतीय बॅट्समन चांगली कामगिरी करू शकला नाही.

विराट कोहली चांगल्या फॉर्मात असूनही अपयशी ठरले आणि केएल राहुलने पुन्हा एकदा निराश केलं.

एका घडीला तर 43 धावांवर भारताच्या पाच विकेट्स होत्या. अखेरीस भारत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्ससह केवळ 133 धावा करू शकला.

भारताने दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगवेळी त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेच्या 24 धावांवर तीन विकेट्स गेल्या होत्या. परंतु डेव्हिड मिरल आणि मार्करम यांच्या भागीदारीने आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

भारत आता ग्रुपमध्ये चार अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि भारताला आणखी दोन सामने खेळायचे आहेत. एका मॅचमधला विजय भारताचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा करू शकेल. परंतु आगामी काळात इतर टीम्सचे निकाल परिणामकारक ठरू शकतात.

पाकिस्तानचं काय होईल?

पाकिस्तानने भारताविरुद्धचा आपला पहिला सामना गमावला होता. हा सामना रंगतदार होता आणि अगदी शेवटचा बॉल निर्णायक ठरला.

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातही पाकिस्तानने शेवटच्या बॉलमध्ये सामना गमावला. या सामन्यात पाकिस्तानचा केवळ एका धावाने पराभव झाला.

पाकिस्तानला हे दोन्ही पराभव जड जाऊ शकतात.

नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात मात्र पाकिस्तानने चांगली कामगिरी केली आणि अजूनही ते सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर नाहीत.

परंतु यासाठी पाकिस्तानला केवळ उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार नाहीत तर इतरांच्या खेळीवरही नजर ठेवावी लागेल.

या घडीला पाकिस्तान आपल्या ग्रूपमध्ये टीमच्या दोन पॉईंटसह पाचव्या स्थानावर आहे.

या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम अव्वल स्थानावर आहे. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेश चार पॉईंटसह तिसऱ्या स्थानावर आहे तर तीन पॉईंटसह झिम्बाब्वे चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानला अजूनही दोन सामने खेळायचे आहेत. यापैकी एक सामना आफ्रिकेविरुद्ध आहे. आफ्रिका या घडीला जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शिवाय, ऑस्ट्रेलियाची पीच त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे. म्हणूनच आफ्रिकेचा विजय आणि भारताचा पराभव पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी नाराजीचं कारण ठरला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)