जीन्सनं जगभरातल्या लोकांना भुरळ का घातली?

जीन्स

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, स्टीफन हेगार्टी
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

जगभरात जीन्ससारखा व्यापकपणे अंगीकारण्यात आलेला कपडा शोधणं कठीण काम आहे. जीन्स आता घराघरातल्या कपाटांमध्ये पाहायला मिळत आहेत. पण का?

एकेकाळी जीन्स केवळ काऊबॉय परिधान करू शकत होते. पण आता तर सुपरमॉडेल, शेतकरी, राष्ट्राध्यक्ष आणि गृहिणी देखील जीन्स वापरत आहेत.

तुम्ही जीन्स का घालता, असा प्रश्न लोकांना विचारला तर तुम्हाला अनेक प्रकारची उत्तरं मिळतील. काहींसाठी जीन्स आरामदायक, टिकाऊ आणि घालण्यासाठी सोप्पं आहे तर इतरांसाठी ते सेक्सी आणि कूल आहे. जीन्सचा अर्थ वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा आहे. यामुळेच जीन्स इतक्या व्यापक प्रमाणात वापरली जातेय का?

हा एक असा विषय आहे ज्याचा तुलनात्मक अभ्यास झालेला नाहीये, असं ब्लू जीन्स पुस्तकाचे लेखक आणि मानववंशशास्त्रज्ञ डॅनी मिलर सांगतात.

मिलर यांनी फिलीपिन्सपासून टर्की आणि भारतापासून ब्राझीलपर्यंत अनेक देशांना भेटी दिल्या. त्यांनी रस्त्यावर चालत जाणाऱ्या पहिल्या 100 जणांची गणना केली. त्यात जवळजवळ निम्मी लोकसंख्या जीन्स घालत असल्याचं त्यांना दिसून आलं.

चीन आणि दक्षिण आशियातील ग्रामीण भाग वगळता जीन्स सर्वत्र आहेत, असं ते सांगतात. जीन्सच्या या यशाचं कारण तिच्या भौतिक बांधणीइतकंच सांस्कृतिक अर्थाशी संबंधित आहे.

19व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेच्या पाश्चात्य राज्यांमधील शेतमजूर आणि खाणींवरील मजुरांसाठीचा पोशाख म्हणून जीन्सची रचना करण्यात आली होती.

जेकब डेव्हिस नावाच्या नेवाडाच्या शिंपीला स्थानिक भागात लाकूड कापणार्‍यांसाठी एक मजबूत पायघोळ बनवायला सांगितला. तो अत्यंत टिकाऊ होता आणि मग त्याची मागणी वाढली.

डेव्हिसला त्याच्या उत्पादनाची क्षमता लक्षात आली पण, त्याचं पेटंट घेणं त्याला परवडलं नाही. त्यानं त्याचा कापड पुरवठादार सॅन फ्रान्सिस्को येथील व्यापारी लेव्ही स्ट्रॉस यांना मदतीसाठी पत्र लिहिलं.

मी पुरेशा वेगानं जीन्स तयार करू शकत नाही, असं त्यानं त्या पत्रात लिहिलं.

जीन्सची जगातील ही सर्वांत जुनी जोडी 1879 च्या आसपासची आहे.

फोटो स्रोत, levi strauss

फोटो कॅप्शन, जीन्सची जगातील ही सर्वांत जुनी जोडी 1879 च्या आसपासची आहे.

त्यानंतर लेव्हीज हे पेटंट ट्राऊझर्स म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ते कॉटन डक (कॅनव्हाससारखे) आणि डेनिम या दोन कपड्यांमध्ये बनवलं गेलं.

'डेनिम: फ्रॉम काऊबॉय टू कॅटवॉक्स'चे लेखक पॉल ट्रिंका सांगतात, "डेनिम आवृत्ती विकली जाईल हे त्यांना खूप लवकर समजलं. डेनिम अधिक आरामदायक होतं. ते मऊ होतं आणि त्याच्या इंडिगो डायने त्याला एक विशेष रुप दिलं होतं."

डेनिम का विकलं गेलं?, यावर ट्रिंका सांगतात, "डेनिम वयानुसार बदललं आणि ते परिधान करण्याच्या पद्धतीमुळे लोकांचं जीवन त्यात प्रतिबिंबित झालं."

डेनिमचे पायघोळ अधिक आरामदायक ठरू शकतात असं 20 व्या शतकाच्या सुरूवातीस कामगारांना समजू लागलं. ते केवळ अधिक टिकाऊच नव्हते तर जीन्सची प्रत्येक जोडी कामगार आणि त्याच्या कामाची गोष्ट सांगू लागली.

"जीन्स ही सर्वांत वैयक्तिक गोष्ट आहे जी तुम्ही परिधान करू शकता," असं मिलर सांगतात.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी जीन्स फक्त अमेरिकेच्या पाश्चात्य राज्यांमध्ये परिधान केली जात होती. पूर्वेकडे ते काऊबॉयच्या रोमँटिक कल्पनांचं समानार्थी रुप तिला मिळालं होतं, खडबडीत, स्वतंत्र असं रूप. पण त्याच वेळी ग्रामीण आणि कामगार वर्गातही ती लोकप्रिय होत होती.

श्रीमंत पूर्वेकडील लोक सुट्टीच्या काळात विश्रांतीसाठी dude ranches वर पर्यटनासाठी येत. तेव्हा ते तिथं मजूर म्हणून शेतात काम करताना जीन्स परिधान करण्याचा अनुभव घेत.

जीन्स

लेव्ही स्ट्रॉस अँड कंपनीचे पुरालेखशास्त्रज्ञ आणि इतिहासकार लिन डाउनी म्हणतात, "अमेरिकन वेस्टचं प्रतिनिधित्व करणारे हे कपडे होते आणि ती एकप्रकारची जादुई गोष्ट होती."

जेव्हा जीन्स हे कॅज्युअल पोशाख म्हणून परिधान केले जाऊ लागले, तेव्हा ते क्रांतीचं एक प्रतीक बनलं. मार्लन ब्रँडोने त्याच्या 1953 च्या 'द वाइल्ड वन' चित्रपटात आणि दोन वर्षांनंतर जेम्स डीननं 'रिबेल विदाउट अ कॉज'मध्ये जीन्स परिधान केली.

"तुम्ही 1953 मध्ये 15 वर्षांचा मुलगा असता, तर भविष्यात मार्लन ब्रँडोच व्हायचं तुमचं स्वप्न होतं," त्याकाळाविषयी डाउनी सांगतात.

"हॉलीवुड कॉस्च्युम डिझायनर्सने सर्व बॅड बॉईजना डेनिममध्येचं दाखवलं आहे," असंही ते सांगतात.

डीन आणि ब्रँडो यांनी चित्रपटाबरोबरच एरव्हीही डेनिम वापरायला सुरुवात केली. ते दोघे प्रस्थापितांविरोधात उभ्या ठाकलेल्या एका सांस्कृतिक गटाचे प्रतिनिधीच होते. युद्धातून घरी परतलेल्यांचा हा गट बाकी लोकांप्रमाणे उपनगरांत शांत जीवन सुरू करून, घर-संसार करण्याऐवजी पूर्ण अमेरिकाभर मोटरसायकलवरुन फिरत होता.

या गटामुळे प्रस्थापित चांगलेच धास्तावले होते कारण त्यांचे विचार प्रस्थापितांच्या अनुरुप नव्हते आणि या गटातले लोक जीन्स वापरत. त्यामुळे लवकरच त्यावर बंदी आली पण त्याचा उलटाच परिणाम दिसून आला.

अमेरिकेबाहेरही हेच दिसून आलं. सैनिकी कर्तव्यावर नसताना ही मुलं जीन्स वापरू लागली होती.

ट्राउझर्सने एक सोपा, आनंदी अमेरिकन जीवनशैली दर्शविली. पुढे ती युरोपियन लोकांना आत्मसात करायची होती.

1960 च्या दशकात जीन्स अमेरिकन मध्यमवर्गातही पसरली. निषेध करणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांना कामगार वर्गाशी एकजुटीचे प्रतीक म्हणून परिधान करण्यास सुरुवात केली.

पण जीन्स हे केवळ लोकशाहीचे प्रतीक नव्हतं, तर तिनं वेगवेगळ्या वर्गांतील लोकांना समान पातळीवर आणलं.

ते परवडणारं तसंच चांगलं दिसणारं आणि वारंवार धुवायची किंवा इस्त्री करण्याची गरज नसणारं वस्त्रं होतं. तसंच ते शरीराशी लगेच जुळतही होतं. शरीरावर फीट होत असल्यामुळे हे स्त्रियांसाठी विशेष महत्वाचं बनलं.

सर्व लोकांसाठी सर्वप्रकारे योग्य ठरण्याची क्षमता हेच कपड्यांच्या जगात आजही टिकून राहण्यामागचं जीन्सचं गुपित आहे.

"जीन्स हे एक व्यक्तिवादी गणवेश आहे जे आजही लोकांना भुरळ घालत आहे," पॉल ट्रिंका सांगतात.

मिलर यांनी पुस्तकात असा युक्तिवाद केलाय की, जीन्स आता इतके मुख्य प्रवाहात आले आहेत की ते सामान्य लोकांचे प्रतीक बनले आहे. लोक आता जीन्स आरामदायक आणि तंदुरुस्त वाटण्यासाठी परिधान करतात."

"जीन्स हा तटस्थ पायाभूत पोशाख बनला आहे. तुम्ही आरामशीर आहात किंवा तुम्हाला आरामशीर राहायचे असेल तर तुम्ही जीन्स घालता," मिलर सांगतात.

जीन्स

असं असलं तरी जीन्स हे तरुणपणाचं प्रतीक आहे आणि आजही ते अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे, असं ट्रिंका यांचं मत आहे.

"जॉर्ज डब्ल्यू बुश आणि टोनी ब्लेअर त्यांच्या पहिल्या शिखर बैठकीदरम्यान डेनिम घालून बाहेर पडले होते. आम्ही सामान्य लोकांसारखे आहोत, असं त्यांचं वक्तव्य होतं."

काही जण जीन्स अनेक दिवस धुवत नाहीत. गेल्या वर्षी अल्बर्टा विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजीच्या जोश ले नावाच्या विद्यार्थ्यानं कच्च्या डेनिम जीन्सची एक जोडी 15 महिने न धुता घातली आणि नंतर त्यांच्या बॅक्टेरियाची चाचणी केली.

जीन्स धुतल्यानंतर त्यानं दोन आठवड्यांनी त्यांची पुन्हा चाचणी केली आणि त्यात बॅक्टेरियाचे प्रमाण सारखेच असल्याचे आढळले.

"जीन्स नियमितपणे धुतल्या गेल्या नाहीत तर बॅक्टेरियाची वाढ जास्त होत नाही, असं यावरून दिसून येतं," असं टेक्सटाईल सायन्सच्या प्रोफेसर रेचेल मॅकक्वीन सांगतात.

त्यांनी ले याच्याबरोबर वैज्ञानिक प्रयोगावर काम केलं होतं. भिन्न लोक वेगवेगळ्या प्रकारे जीन्स घालतात, पण जीन्स परिधान करण्याची पारंपरिक शैली सर्वाधिक लोकप्रिय आहे.

"जीन्स परिधान करण्यास सोपं आहे, क्लिष्ट नाही," मूळ लेव्हीजविषयी डाउनी सांगतात. पण सुशोभित न केलेलं डेनिम अजूनही खास आहे, असं ट्रिंका म्हणतात.

"जीन्स हे केवळ थ्री डायमेन्शियल नव्हे तर फोर डायमेन्शियल मटेरियल आहे, कारण ते काळानुसार बदलत असते. जीन्सचं शाश्वत आकर्षण इतकंच आहे की, ते आपल्याला आणि आपण त्यांच्यात व्यतीत केलेल्या जीवनाला प्रतिबिंबित करतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)