रामदास आठवले रंगीबेरंगी कपडे का घालतात?

@RamdasAthawale

फोटो स्रोत, @RamdasAthawale

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

कुणी काय खावं, कुणी कसे कपडे घालावेत हा तसा प्रत्येकाचा आपापला स्वतंत्र प्रांत आहे. प्रत्येकाला त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण तरीही सेलिब्रिटींनी घातलेल्या कपड्यांवर कायम चर्चा होत असतात.

अलीकडे राजकारण्यांच्या कपडे आणि स्टाईलवरसुद्धा चर्चा होत असतात. राजकारणी लोकांच्या अशा प्रकारच्या अलीकडच्या या चर्चांच्या केंद्रस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्त असतात. त्यांची हेअरस्टाईल, दाढी आणि कपड्यांची चर्चा माध्यमांमध्ये नेहेमी होत असते. पण या सर्व चर्चा एखाद दुसरा अपवाद वगळता बऱ्यापैकी सकारात्मक असतात.

पण महाराष्ट्रातले एक राजकारणी मात्र त्यांच्या कपड्यांमुळे गेल्या 25-30 वर्षांपासून कायम सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही चर्चांमध्ये असतात. ते म्हणजे रामदास आठवले.

@RamdasAthawale

फोटो स्रोत, @RamdasAthawale

रामदास आठवले सध्या केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. पण तरीही अनेकदा त्यांना त्यांच्या पेहरावामुळे कधी टीकेचा सामना सहन करावा लागला आहेत. तर कधी सोशल मीडियावर त्यांच्या पेहरावाचा खिल्लीसुद्धा उडवली गेली आहे.

लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट देतेवेळी त्यांनी घातलेल्या सूट आणि शूज मुळे त्यांच्यावर बरीच टीकासुद्धा झाली होती.

कधी सुटाबुटात. कधी वेगवेगळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये तर कधी साधं शर्ट आणि पॅन्टमध्ये रामदास आठवले राजकीय मंचावर वावरताना दिसतात. पण बरेचदा या कपड्यांचे रंग हे भडक असतात.

अगदी अलीकडेच जेव्हा राज्य सरकारनं मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम आणला होता तेव्हा ट्वीट करून त्यांनी 'ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल,' असा सवाल उपस्थित केला होता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पण रामदास आठवले अशा प्रकारचे कपडे का घालतात? त्याची कारणं काय आहेत? त्यांचा फॅशन डिझायनर कोण आहे? असे प्रश्न अनेकदा पडतात.

रामदास आठवलेंचा कुणी असा एक ठारावीक डिझायनर किंवा टेलर नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या कपड्यांची खरेदी करतात. त्यांच्या आवडीनिवडीनुसार ते कपडे खरेदी करत असतात, असं त्यांच्या प्रसिद्धीचं काम पाहाणारे मयुर बोरकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

आठवले रंगीबेरंगी कपडे का घालतात?

रामदास आठवलेंचा फॅशन सेन्स हा लोकांशी कनेक्ट करण्याचं एक माध्यम असल्याचं निरिक्षण आठवलेंचं राजकारण जवळून अनुभवणारे ज्येष्ठ पत्रकार सुरेश ठमके नोंदवतात.

@RamdasAthawale

फोटो स्रोत, @RamdasAthawale

ते सांगतात, "रामदास आठवले हे ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात, ज्या समाजातून येतात तो समाज आणि वर्ग अजूनही तितकासा पुढारलेला नाही. या समाजात लांब केस आणि रंगिबेरंगी कपड्यांची फॅशन प्रचलित आहे. त्यांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आठवले अशा प्रकारचे कपडे घालतात."

"वरवर पाहाता त्यांचे कपडे हे रंगीबेरंगी दिसत असले तरी ते ब्रॅंडेड असतात. सामान्य लोकांना कधीकधी त्यांच्या कपड्यांची रंगसंगती विचित्र वाटू शकते. पण मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही मी तुमच्यातलाच एक आहे हे त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सातत्याने दाखवायचं असतं. म्हणून ते अशा प्रकारचे कपडे घालतात."

दलित लेखक आणि समाजसेवक चंद्रभान प्रसाद मात्र सुरेश ठमके यांच्या विश्लेषणाशी सहमत नाहीत.

असे कपडे घातले म्हणजे दलित कार्यकर्त्यांना रामदास आठवले त्यांच्यातलेच एक आहेत असं वाटत नाही असं ते सागंतात.

@RamdasAthawale

फोटो स्रोत, @RamdasAthawale

मग रामदास आठवलेच्या अशा प्रकारचे कपडे घालण्यामागे नेमकं काय कारण आहे असं विचारलं असता ते सांगतात,

"रामदास आठवले यांचा फॅशन सेन्स दलित समाजातली काळी बाजू पुढे आणतो. बऱ्याच बहुसंख्य आणि हिंदुत्ववादी राजकारण्यांना अशाच प्रकारचा दलित नेता आवडतो. त्यांच्या राजकारणासाठी त्यांना बरेचदा नॉन सिरिअस दलित नेत्याची गरज असते. त्यामुळे आठवले तसंच वागण्याचा किंवा राहण्याचा प्रयत्न करत असतात. हा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. त्यांना असाच दलित त्यांच्याबरोबर हवा असतो."

राजकारणात फॅशन किती महत्त्वाची?

रेखा चौधरी या गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून वेलनेस इंडस्ट्रीतल्या आघाडीच्या उद्योजिका म्हणून काम करत आहेत. त्यांच्यामते राजकारणी मंडळीसुद्धा आता फॅशन आणि वेलनेसच्या बाबतीत सजग झाली आहेत.

"राजकारणी आता व्हायब्रंट कलर घालणं पसंत करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कल इंडो-वेस्टर्न फॅशनकडे असतो. त्यांना फॅशनची आवड आहे हे त्यांच्या कपड्यांतून दिसून येत असतं. पंतप्रधानांना पाहून आता अनेक राजकारणी त्यांच्या फॅशनमध्ये बदल करत आहेत," असं निरिक्षण रेखा चौधरी नोंदवतात.

@RamdasAthawale

फोटो स्रोत, @RamdasAthawale

"लोकांनी कपडे डिझायनर कडून तयार करू घेतलेले असले तरी त्यात त्या त्या व्यक्तीच्या स्वभावाची झलक आपल्याला पाहायला मिळू शकते. रामदास आठवलेंच्या कपड्यांमधूनसुद्धा आपल्याला त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची झलक दिसते," असं रेखा चौधरी सांगतात.

पण त्याचवेळी फॅशनची कुठलीही भाषा किंवा ती ठराविक लिंग आधारीत नाही. तुम्ही स्वतःला कसं जगासमोर आणता, तुम्ही किती आत्मविश्वासानं वावरता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि तेच महत्त्वाचं असल्याचं रेखा सांगतात.

मोदींसारखी आठवलेंची फॅशन फॉलो का होत नाही?

खरंतर राजकारणी म्हटलं की ते पांढरेच कपडे घालतात. नेहरू जॅकेट आणि गांधी टोपीच घालतात हा लोकांचा समज आता हळूहळू मागे पडत आहे. 2014 नंतर नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या रंगांच्या जॅकेट आणि उपरण्यांची फॅशन राजकारणात आणली. खादीच्या करड्या रंगाच्या जागी आलेले रंगीत जॅकेट्स आता नेहरू ऐवजी मोदी जॅकेट्स नावाने ओळखले जातात.

@RamdasAthawale

फोटो स्रोत, @RamdasAthawale

अधिवेशन काळात संसद भवन परिसरात गेल्यानंतर नव्या आणि तरुण खासदारांच्या कपड्यांवर नरेंद्र मोदींच्या फॅशनची छाप सहज दिसून येते.

पण त्याही कित्येक वर्षं आधी रामदास आठवले यांनी त्यांच्या फॅशनची स्टाईल राजकारणात आणली आणि ती टीकवली. पण ती त्यांच्यापुरतीच मर्यादित राहीली हेही नक्की.

हे असं का झालं किंवा असं का होतं हाच प्रश्न मी दिल्लीतल्या नॅशनल इंस्टिट्युट ऑफ फॅशन टेक्कनॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या नागपूरच्या उपम दुधेला विचारला.

त्यावर उपम सांगतो, "नरेंद्र मोदींची रंगाची निवड ही सर्वांना आकर्षित करणारी आहे. ती न्यूट्रल टाईपची आहे. ती कधीच फेल होण्यासारखी नाही. ती एका मोठ्या जनसमुदायाला अपिल करते. तरुणांना सुद्धा ती फॅशन फॉलो करायला आवडते.

@RamdasAthawale

फोटो स्रोत, @RamdasAthawale

रामदास आठवलेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची फॅशन स्टाईल काही अंशी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते रंगसंगतीमध्ये कमी पडतात. शिवाय त्यांच्या कपड्यांना फिटिंग नसते. तसंच ती तरुणांना फारशी आकर्षित करणानी नाही. आठवलेंच्या कपड्यांचे रंग त्यांचं कॉम्बिनेशन आणि फिटिंग आजच्या तरुणांना फारचं भावणारं नाही."

पत्रकार सुरेश ठमके यांनासुद्धा याबद्दल असंच वाटतं. ते सागंतात, "आठवलेंची फॅशन एका विशिष्ट वर्गाची फॅशन म्हणून त्याकडे तरुण पाहातात. बहुजन समाजातल्या शिकलेल्या तरुणांना ती विचित्र वाटणारी आहे. त्यामुळेच ती फॉलॉ करण्याकडे किंवा कॉपी करण्याकडे कुणाचा फारसा कल नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)