जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो-रामदास आठवले #5मोठ्या बातम्या

विविध वर्तमानपत्रं, वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो-रामदास आठवले
"मागास घटकांवर अन्याय करणारी जात व्यवस्था संपवा. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत", असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, "आजही मागास जातींवर अन्याय होत आहेत. त्यामुळे जातींवरील अत्याचार बंद होण्याबरोबरच जात व्यवस्था बंद करावी. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत". 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
आगामी जनगणना होत असताना त्यामध्ये जातनिहाय उल्लेख व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत. मराठा समाजाला इतर मागास वर्गीय प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. त्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग करावं. सर्वच मराठा समाज श्रीमंत नाही. त्यातील उपेक्षित घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे असं आठवले यांनी स्पष्ट केलं.
2. मी स्वच्छ, कशाचीही भीती नाही- प्रताप सरनाईक
"माझ्यावर कोणताही डाग नाही, मी स्वच्छ आहे, ज्यांच्याकडे माझ्याविरोधात पुरावे असतील त्यांनी ते पुरावे सक्तवसुली संचनलनालयाकडे खुशाल द्यावेत, मला कोणाचीही भीती नाही", असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.
"मी महाराष्ट्रातील एक जबाबदार आमदार आणि जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीला सामोरा जाईन. माझे विजय माल्ल्या किंवा नीरव मोदीसारखे नाही, मी स्वतःहून ईडीकडे जाईन. तसेच माझा मुलगा विहंग याचा कुठेही उल्लेख नाही. रिमांडमध्ये केवळ प्रताप सरनाईक या एकाच नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे मीडियाने विहंग यांचे नाव घेणे योग्य नाही. मी बाहेरगावी होतो त्यामुळे विहंग याला ईडीने नेले.

फोटो स्रोत, Getty Images
"महाराष्ट्र आणि दिल्लीच्या लढाईत प्रताप सरनाईक यांचा तानाजी मालुसरे झाला आहे. पण मी 21 व्या शतकातला तानाजी मालुसरे आहे, त्यामुळे मी प्रत्येक संकटातून बाहेर येईन, असे सांगताना हे कॉर्पोरेट वॉर असून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला", असं सरनाईक म्हणाले.
प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव विहंग सरनाईक व पूर्वेश सरनाईक यांनी मंगळवारी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.
3. शिक्षण सेवक भरतीला राज्य सरकारचा हिरवा कंदील
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सेवक भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुमारे सहा हजार पदांसाठी शिक्षणसेवक भरती प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना काळात अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामामुळे शासकीय पदभरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र शिक्षकसेवक भरतीला यातून वगळण्यात आलं आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी, अनुदानित, अंशत अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील 12 हजार 140 शिक्षणसेवक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. शिक्षक अभियोग्यता आणि आणि बुद्धिमता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने ही पदभरती होत आहे.
अंतर्गत बाबींची पूर्तता करण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याने प्रक्रिया नवीन वर्षातच सुरू होण्याची चिन्हं आहेत. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
4. कराड जनता बँकेचा परवाना रद्द
कराड जनता सहकारी बॅंकेचा बॅंकिंग परवाना रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी रद्द केला. या आदेशामुळे ठेवीदार, सभासदामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
अनधिकृत कर्ज वाटप, थकीत कर्ज आणि भ्रष्टाचार या सारख्या आरोपांबाबत बँकेतील एका सभासदाने न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाकडून चौकशी लावण्यात आली होती.
या चौकशी दरम्यान बँकेत जवळपास 300 कोटी रुपयांपेक्षा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झाल्यानंतर बँकेचे त्यावेळचे संचालक राजेश पाटील वाठारकर यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
रिझर्व्ह बॅंकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बॅंकेची दिवाळखोरी जाहीर केली. त्या बॅंकेवर उपनिबंधक मनोहर माळी यांची अवसायानिक म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे.
5. पवारांच्या नावे ग्रामसमृद्धी योजना
शरद पवारांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने ग्रामसमृद्धी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात येईल.
केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ही नवी योजना राज्य योजना म्हणून राबविण्यात येणार आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








