वर्ल्ड बॉस डे: वेळ शिल्लक आहे म्हणून तुमचे बॉस तुम्हाला फुटकळ कामं सांगतात का?

    • Author, जॉएन्ना यॉर्क
    • Role, बीबीसी वर्कलाइफ

ऑफिसची वेळ संपण्यासाठी अर्धा पाऊण तास उरला आहे. तुमच्या हातातलं काम संपलंय आणि आता तुमचं लक्ष आहे घडाळ्याकडे. तुम्ही म्हणता चला आजचं काम तर झालं, मस्त कॉफी प्यावी आणि कलटी मारावी.

पण तितक्यात तुमचे बॉस तुम्हाला सांगतात की 'ही लिस्ट पाहा आणि त्यात सर्वकाही ठीक आहे की नाही बघ'. किंवा हे प्रेझेंटेशन ठीक तर आहे ना एकदा चेक कर. या लोकांना कॉल कर किंवा हे रिपोर्ट्स पुन्हा बनव. इत्यादी इत्यादी.

असे प्रसंग तुम्ही बऱ्याचवेळा अनुभवले असतील.

हे असं का होतं. म्हणजे केवळ तुम्ही शांतपणे किंवा स्वस्थपणे बसलेले आहात हे पाहून एखादं फुटकळ काम तुम्हाला दिलं जातं.

बऱ्याचदा केवळ तुम्हाला बिजी ठेवावं, तुम्ही काहीतरी काम करावं आणि कामाशी निगडित गोष्टीच करताना तुम्ही दिसावं यासाठी हे केलं जातं.

जरी तुम्ही तुमचं काम वेळेच्या आधी केलेलं आहे. तुम्ही तुमच्या शेड्युलनुसार योग्य गतीने जात आहात तरी हे केलं. जातं, यातून तुम्हाला व्यवस्थापन असं सुचित करतं की काही झालं तरी काम शोधून काढा आणि ते करा.

जर काही लोक नुसतेच स्क्रीनकडे पाहत बसलेले दिसले किंवा मोबाईलवर स्क्रोल करताना दिसले तर त्या व्यक्तीला 'बिजी वर्क' दिलं जातं. म्हणजे फक्त तुम्हाला गुंतवून ठेवण्यासाठी हे काम दिलं जातं, या कामाचा प्रत्यक्ष आउटपूट वर काहीच परिणाम होत नाही.

बिजी वर्क म्हणजे काय?

बिजी वर्कमुळे कोणताही हेतू साध्य होत नाही, असं लीडरशिप अॅंड डेव्हलपमेंट ट्रेनर रॅंडी क्लार्क सांगतात, "बिजी वर्कमुळे तुम्ही तुमचे किंवा संस्थेचं कुठलंही उद्दिष्ट पूर्ण करत नाही. ते व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या प्रगतीसाठी काहीही सहाय्य करत नाही."

बिजी वर्कची काही उदाहरणं म्हणजे कुठलीही गरज नसताना एखादा रिपोर्ट सादर करायला सांगणे, स्प्रेड शीटवर एखादी विशिष्ट कॅटेगरी कलर करण्यास सांगणे.

प्रुफरीडिंग करण्यास सांगणे किंवा तयार करण्यात आलेलं प्रेझेंटेशन पुन्हा चेक करण्यास सांगणे इत्यादी.

ही यादी तुमच्या क्षेत्रानुसार वाढू शकते.

2016 साली झालेल्या एका अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की अभ्यासात सामील झालेल्या बौद्धिक काम करणाऱ्या 600 लोकांनी सांगितले की ते कार्यालयीन वेळेत त्यांचे खरे काम फक्त 39% वेळातच ते पूर्ण करतात. इतर वेळ त्यांचा बिजी वर्कमध्ये जातो. उरलेल्या वेळेत मीटिंग करणे, इमेल करणे, आणि मॅनेजर्ससाठी स्टेटस रिपोर्ट्स लिहिणे इत्यादी गोष्टीत हा वेळ जातो.

ऑफिसमध्ये मॅनेजर्स तेव्हाची परिस्थिती पाहून हा निर्णय घेतात. की त्यांचे कर्मचारी काय काम करत आहेत, त्यानुसार ते असली फुटकळ कामं देतात. पण कोरोना काळानंतर ही परिस्थिती काही प्रमाणात बदलली. कारण ते त्यांच्या कर्मचाऱ्यांवर तितकी कठोर निगराणी ठेवू शकले नाहीत.

काही अभ्यासानुसार हे देखील सिद्ध झालं आहे की काही रिमोट वर्कर्स हे इतरांच्या तुलनेत जास्त कार्यक्षम आहेत. ते जास्त काळासाठी देखील काम करतात.

या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर काय निष्कर्ष निघतो. की मॅनेजर्स जास्तीत जास्त लोकांना फक्त गुंतवणूक ठेवण्याच्या दृष्टीने फुटकळ कामेच देतात का? आणि जर हातात काही काम नसेल तर ब्रेक घेणं खूप वाईट आहे का?

दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

बिजी वर्कची ही समस्या आहे की काही मॅनेजर्सची ही अशी समजूत असते की काम करण्यात गुंतलेलं दिसणं आणि कार्यक्षमता या दोन्ही गोष्टी समानच आहेत असं त्यांना वाटतं.

फक्त समज असा नाही की बिजी वर्किंग करणारे कर्मचारी हे आपलं काम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, इतकाच त्याचा अर्थ नाही. तर उलट त्यांचा असाही ग्रह होऊ शकतो की जे लोक काम करताना दिसत नाहीयेत त्यांच्यापेक्षा आपलं नैतिक बळ अधिक आहे.

म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर दोन कर्मचाऱ्यांना समान काम दिलं. पण जास्त कार्यक्षम कर्मचाऱ्याने ते दुसऱ्या व्यक्तीच्या आधी पूर्ण केलं आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याने ते अद्याप पूर्ण केलेलं नाही. पण जी व्यक्ती कार्यक्षम आहे ती रिकामी बसलेली दिसते आणि दुसरी व्यक्ती काम करत आहे असे दिसतं. म्हणजे निकालापेक्षा कोण जास्त व्यग्र दिसतो त्या गोष्टीला जास्त महत्त्व प्राप्त होतं.

कोणतं दृश्य पाहण्यासाठी अधिक चांगलं आहे, अशी व्यक्तीला पाहणं की जिने आपलं काम अपूर्ण आहे म्हणून लंच सोडून दिले आणि आता काम करत आहे की अशी व्यक्ती की आपलं काम वेळेत पूर्ण करून ऑनलाइन शॉपिंग करत आहे.

पण जर बॉसच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर व्यग्र असलेला कर्मचारी हे डोळ्यांना सुखावणारं दृश्य आहे.

"आपण बिजी राहतो हे दाखवण्यासाठी आपल्याला पगार मिळतो असं काहींना वाटतं," असं सुझान व्रोमन यांना वाटतं. सुझान व्रोमन या मॅसेच्युसेट्स येथील बेंटली विद्यापीठात व्यवस्थापन शिकवतात.

बिजी वर्कची संस्कृती प्रामुख्याने अशा संस्थांमध्ये आढळते ज्या ठिकाणचं स्वरूप काहीसं पारंपरिक, एकाधिकारशाहीचं आहे आणि स्वायत्ततेला प्रोत्साहन देणारं नाहीये.

अशा प्रकारच्या संस्थांमध्ये मॅनेजर्सवर देखील असा दबाव असतो की त्यांच्या टीममधील लोक हे बिजी दिसावेत. त्यांच्या वरिष्ठांना हे दिसणं आवश्यक असतं की टीममधील कर्मचारी हे व्यग्र आणि कार्यक्षम आहेत.

"मॅनेजर्स सांगतात की माझ्या टीममधील कर्मचाऱ्यांनी सतत काम करताना दिसणं आवश्यक आहे, कारण तरच त्यांचा जो पगार निघतो त्याचं समर्थन होऊ शकेल. कारण माझ्यावर देखील कुणी निगराणी ठेवत आहे. त्यांना देखील हे वाटणं आवश्यक आहे की मी माझ्या टीमचं योग्य व्यवस्थापन करत आहे," व्रोमन सांगतात.

रिमोट वर्कमुळे हे तणावाचं स्वरूप आणखी तीव्र झालं आहे. जेव्हा रिमोट वर्क सुरू झालं तेव्हा हे मॅनेजर्ससाठी आपल्या कर्मचाऱ्यांवर प्रत्यक्ष निगराणी ठेवणं हे कठीण काम होऊन गेलं होतं.

"कोव्हिड काळात बॉस लोकांना असं वाटत होतं की आपले कर्मचारी हे काम करत आहेत की नाही यावर ते निगराणी ठेवू शकत नव्हते त्यामुळे त्यांना असं देखील वाटत होतं की ते कामच करत नाहीयेत," व्रोमन सांगतात.

आपले कर्मचारी अपेक्षित निकाल देत असले तरी ते कार्यक्षम नाहीत असंच त्यांना वाटत होतं. त्याच वेळी आपल्या कर्मचाऱ्यांवरील विश्वास कमी झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

जुलै 2020 मध्ये हार्वर्ड बिजनेस रिव्ह्यूमध्ये आलेल्या एका संशोधनानुसार 41 टक्के मॅनेजर्सला हे वाटत होतं की त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये पूर्वीसारखा उत्साह आणि काम करण्याची ऊर्मी नाहीये.

तर 33 टक्के मॅनेजर्स असे म्हणाले की त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या कामात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य आणि ज्ञान नाहीये.

जेव्हा वरिष्ठांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक निष्ठेवर शंका येते तेव्हा त्यांच्यासमोर एक पर्याय असतो तो म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कामांची यादी लांबलचक ठेवणे आणि अगदी बारिक-सारिक हालचालींवर लक्ष ठेवणे. याचा अर्थ हा आहे की जरी ती कामे कितीही क्षुल्लक आणि अर्थहीन वाटली तरी.

"कधी कधी काही मॅनेजर्स असे असतात की त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं मुख्य काम आवरलं आहे की नाही हे देखील त्यांना माहीत नाही. पण ते इतकं काम देऊन ठेवतात की जेणेकरुन ते त्या दिवसासाठी पूर्ण देखील होणार नाही," असं बार्बरा लार्सन म्हणतात.

बार्बरा या मॅसेच्युसेट्स येथील नॉर्थ इस्टर्न युनिव्हर्सिटीच्या डी अॅमोर मॅककिम स्कूल ऑफ बिजनेसमध्ये कार्यकारी प्राध्यापिका आहेत.

त्या पुढे सांगतात, की "फक्त अशा प्रकारचं काम दिलं जातं ज्यामुळे कर्मचारी गुंतून राहतील. जेणेकरुन बॉसला असं वाटतं की सर्वकाही अद्याप त्यांच्याच नियंत्रणात आहे."

'काही कर्मचारी आपण निश्चितच बिजी आहोत असं दाखवतात'

एखाद्या कामात स्वतःला गुंतवून ठेवणं म्हणजेच चांगली कामगिरी करणं असं समीकरण असल्याची गल्लत फक्त मॅनेजर्स करतात असं नाही.

एका अभ्यासानुसार बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या 41 टक्क्यांनी कर्मचाऱ्यांनी आपण बिजी आहोत असं दाखवण्यासाठी अशी कामं केली जी इतर लोकांकडे सोपवून कामं करून घेणे सहज शक्य होते. "काही लोक स्वतःला गंतुवून ठेवतात कारण कुणीतरी आपल्याला पाहत आहे ही जाणीव त्यामागे असते," असं व्रोमन सांगतो.

ऑनलाइन काम करत असताना आपण बिजी आहोत हे दाखवण्याचा तणाव तर आणखी वाढतो. त्यामुळे अनेक कामं वाढतात देखील. जसं की लॉग इन केलं आहे हे दाखवण्यासाठी मेसेज करावे लागतात.

"रिमोट वर्क करताना काही जण आपलं वेळेआधीच करू शकतात पण ते सांगत नाहीत की आम्ही हे काम पूर्ण केलं कारण त्यामुळे असं वाटेल की आपण रिकामे बसलो आहोत. जर हातात काम नसेल तर खराब वाटतं कारण आम्हाला पगार पूर्ण दिवस काम करण्याचा दिला जातो," असं व्रोमन सांगतात.

काम करताना ब्रेक घेतला की काही लोकांच्या मनात अपराधीपणाची भावना बळावते. 2021 साली करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की अमेरिकेत वर्क फ्रॉम होम करताना 60 टक्के कर्मचारी हे ब्रेकच घेत नाहीत.

"ते स्वतःलाच काहीतरी जास्तीचं काम लावून घेतात जेणेकरुन बॉसने त्यांना बिजीवर्क देण्याची गरज पडणार नाही," असं अनेक जण करतात असं व्रोमन सांगतो.

रिमोट वर्कच्या काळात कार्यक्षमता मंदावल्याचे काही व्यवस्थापकांनी रिपोर्ट केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत.

"आपण रिकामे बसलेलो आहोत अशी अपराधीपणाची भावना बळावू नये म्हणून आपण आपल्या कर्मचाऱ्यांना बिजी वर्क असाइन केले आहे," असं नियाल जॉन लिंचेहॉन सांगतात.

ते आयर्लंडस्थित मिडलॅंड स्टोन या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. ही कंपनी बिल्डिंग मटेरियल सप्लायचे काम करते. आपल्या कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि आपण कामाचे आहोत हे सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळावी यासाठी हा अत्यंत सोपा मार्ग आहे.

पण दरवेळी हे कामाचं ठरेल असं नाही. कारण एक अपराधीपणाची भावना वाढू नये म्हणून भरपूर बिजी वर्क देऊन ठेवणं हे दुसऱ्या नकारात्मक भावनेला खतपाणी घालण्यासारखं आहे असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

2018 च्या एका अभ्यासानुसार खूप जास्त बिजी वर्क करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अशी तक्रार केली आहे की यामुळे आमचं आयुष्य फुकट वाया जात आहे अशी भावना बळावली आहे.

बिनकामाचं काम देण्याचे नकारात्मक परिणाम

असं काम सातत्याने देण्यामुळे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांच्या नातेसबंधात बिघाड निर्माण होऊ शकतो.

"या मुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह देखील कमी होऊ शकतो. हे विश्वास नसल्याचं आणि समोरच्या व्यक्तीची काळजी नसल्याचं द्योतक आहे," असं लार्सन यांना वाटतं.

"बिजी वर्क ही हुकलेली संधी आहे असं वाटतं या काळात असं खूप काही करता येऊ शकतं ज्यामुळे संस्था आणि कर्मचारी दोघांचाही फायदा होईल," असा विचार लार्सन मांडतात.

या काळात त्यांना ट्रेनिंग दिलं जाऊ शकतं किंवा थोडा वेळ आराम करा असं सांगता येऊ शकतं. असे अनेक अभ्यास आहेत ज्यातून असं समजतं की ब्रेक घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकाग्रता, सृजनशीलता आणि कार्यक्षमता वाढते.

पण जर बिजी वर्क जास्त देण्यात आलं तर बर्नआउट होऊ शकतं, म्हणजेच संपूर्ण शक्तीचा व्यय होईपर्यंत काम करावे लागेल.

"असं काम अनेक दिवस केलं तर त्यामुळे कर्मचाऱ्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो," असं व्रोमन सांगतात.

कोव्हिडच्या काळात राजीनामे देण्याची लाट आली होती ती याच कारणामुळे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण एकाच ठिकाणी बांधून ठेवले गेलो आहोत असं वाटू लागलं त्यांचं योग्य व्यवस्थापन करण्यात संस्था असमर्थ ठरल्या होत्या.

अर्थात सर्वच व्यवस्थापक हे बिजी वर्कचे समर्थक नसतात. लार्सन सांगतात की काहींचे लक्ष केवळ कार्यक्षमतेवर आणि निकालवरच असते. "जर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काम लवकर आटोपले तर त्यांना सांगतिलं जातं की तुम्ही आता सुट्टी घ्या. लवकर काम आटोपल्याचं ते बक्षीस त्यांना दिलं जातं."

यामुळे कर्मचाऱ्यांना देखील स्वायत्तता मिळते. ही गोष्ट खरोखरच कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवणारी आहे. यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आणि वातावरण निर्माण होतं आणि कर्मचाऱ्यांना चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.

रॅंडी क्लार्क सांगतात की "मॅनेजर्सनी देखील हा विचार केला पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचे काम देत आहोत."

क्लार्क सांगतात "जेव्हाही आम्ही मॅनेजर्स आणि टीम लीडर्सला ट्रेनिंग देतो तेव्हा त्यांना सल्ला देतो की तुमच्या सहकाऱ्यांना गुंतवून ठेवा पण त्यांना उगाच फुटकळ कामं देत नका जाऊ. त्या ऐवजी ते त्यांना सांगू शकतात की हे काम केवळ भरभर उरकू नका तर ते आणखी अधिक चांगली कसं करता येईल त्यातील गुणवत्ता कशी वाढवता येईल याचा विचार करा."

खरंतर मॅनेजर्सने देखील हा विचार करण्याची गरज आहे की आपल्या वरिष्ठांना आपल्याकडून नेमकं काय हवं आहे. जर ते त्यांच्या बॉसला दाखवण्यासाठी त्यांच्या टीममधील सहकाऱ्यांना कामं देऊन ठेवत असतील तर याचा विचार करण्याची त्यांनाच गरज आहे.

"कदाचित मॅनेजर्सचे जे वरिष्ठ आहेत त्यांना त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा असेल आणि लोकांनी राजीनामे न भिरकवता कामातील सातत्य टिकवून नोकरीवर राहावे अशीच त्यांची अपेक्षा असेल," असं व्रोमन यांना वाटतं.

असं काही आवश्यक नाही त्या दिवशी हजर असलेल्या लोकांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काम करायला पाहिजे. पण व्यवस्थापनाने जर या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर आशादायक वातावरण निर्माण होऊ शकतं.

जर लवचिक वेळापत्रक देऊन कामांच्या तासात बदल केले आणि त्यामुळे जर चांगला निकाल मिळत असेल तर बिजी वर्कला रामराम ठोकणे काही वाईट नाही आणि त्याऐवजी कर्मचाऱ्यांना एक आरोग्यदायी, निकोप आणि आनंदी वातावरण देणेच अधिक लाभकारक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)