महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा अंत्यविधी ऐतिहासिक, कारण...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लॉरा कुसेनबर्ग
- Role, बीबीसी न्यूज
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज (सोमवार, 19 सप्टेंबर) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सार्वजनिकरित्या अत्यंस्कार झाल्यानंतर महाराणीचे पुत्र किंग चार्ल्स तिसरे यांच्यासह राजघराण्यातील सदस्य सेंट जॉर्जेस चॅपेलमधून विंडसर कॅसलमध्ये गेले आहेत.
पण, ते आणि त्यांचे नातेवाईक संध्याकाळी साडेसात वाजता (ब्रिटनच्या वेळेनुसार) महाराणीच्या अंतिम दफनविधीसाठी पुन्हा चॅपेलमध्ये परत येतील.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर त्यांचे दिवंगत पती ड्यूक ऑफ एडिनबरा यांच्या शेजारी अंत्यसंस्कार केले जातील.या अंत्यसंस्काराचे तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. पण, बकिंगहॅम पॅलेसनं याचं वर्णन एक अतिशय वैयक्तिक असा कौटुंबिक कार्यक्रम असं केलं आहे.
8 सप्टेंबर रोजी महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झालं होतं. .
2 हजार देशांतर्गत पाहुणे, 500 परदेशी पाहुणे, 4 हजार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतल हा कार्यक्रम अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला.
दुःखद प्रसंग आणि औपचारिकता असली तरी 21 व्या शतकातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांपैकी एक अशी ही घटना मानली जाईल.
याप्रसंगी, जगभरातील अनेक दिग्गज नेत्यांची गर्दी लंडनच्या वेस्टमिन्स्टर अॅबे याठिकाणी जमले.
जगभरातील विविध राजवटींमधील, राजेरजवाडे, युवराज, राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान महाराणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लंडनमध्ये उपस्थित राहीले.
जगावर सर्वाधिक काळ राज्य करणारी एक महिला सम्राट म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं स्मरण यावेळी नक्कीच केलं जाईल. जगाने दखल घेतलेल्या जागतिक नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना मानवंदना देण्यात आली.

फोटो स्रोत, Reuters
एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, "प्रत्येकाला महाराणींच्या अंत्यविधीत सहभागी व्हायचं आहे. कारण त्यांना ते आपल्या कुटुंबील एक सदस्य मानतात. त्यामुळे हा एक कौटुंबिक अंत्यविधी कार्यक्रम आहे, अशी भावना त्यांच्या मनात आहे."
"हा एक ऐतिहासिक अंत्यविधी कार्यक्रम असेल. याठिकाणी सर्वांना कार्यक्रम पाहायचा तर आहेच, पण त्यासोबतच लोकांनी आपल्याला याठिकाणी पाहावं, असंही त्यांना वाटत असणार. एखादा नेता याठिकाणी काही कारणामुळे आला नाही, तर त्याने लोकांचं लक्ष वेधून घेण्याची संधी गमावली, असंही म्हटलं जाईल," असंही एका अधिकाऱ्याने म्हटलं.
एखाद्या शिखर परिषदेत राजघराण्यातील मान्यवर सहभागी होणार असतील, तर त्याचा होणारा परिणाम मी सातत्याने पाहत आलो आहे.

राणीसोबत फोटो काढण्यासाठी नेत्यांची गर्दी जमायची. कधी कधी तर चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण व्हायची.
महाराणीच्या निकटवर्तीयांमध्ये आपली वर्णी लागावी, यासाठी एकमेकांना अक्षरशः कोपराने ढकलून बाजूला सारणाऱ्या जगभरातील अनेक पंतप्रधानांनाही मी पाहिलं आहे.
अंत्यविधी कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याच्या निमित्ताने एकमेकांना जवळून पाहण्याची संधीही जागतिक नेत्यांना आहे.
कोणता नेता कशा प्रकारे पोशाख करतो किंवा कोणत्या नेत्याचं विमान जास्त आकर्षक आहे, याचीही चर्चा या निमित्ताने होईल.

फोटो स्रोत, PA Media
राजकारणातील नेतेमंडळी नेहमी नातेसंबंध जोडण्याच्या संधी शोधत असतात. प्रसंग कोणताही असो एकमेकांच्या जवळ येण्याच्या प्रयत्नात ते असतात. त्यांसाठी हा अंत्यविधी कार्यक्रम महत्त्वाचा ठरेल.
कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेली पाहुण्यांची यादी हासुद्धा चर्चेचा विषय आहे.
2022 या वर्षांत सत्तेत असलेल्या नेत्यांना यामध्ये बोलावण्यात आलं आहे. पण काही देशांना या यादीतून वगळण्यातही आलं आहे.
उदा. युक्रेन युद्धामुळे रशिया आणि बेलारुस या देशांना अंत्यविधी कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं नाही.
याव्यतिरिक्त सीरिया, म्यानमार, अफगाणिस्तान, व्हेनेझुएला या देशांनाही यादीतून वगळण्यात आलं.
तर काही देशांच्या प्रमुख नेत्यांना नव्हे तर केवळ राजदूतांना आमंत्रित करण्यात आलं - उदा. उत्तर कोरिया.
एका अधिकाऱ्याच्या मते, अंत्यविधी कार्यक्रमात राजनयिक चर्चा करण्यासाठी नेत्यांना संधी मिळणार नाही. कारण हा कार्यक्रम महाराणींना श्रद्धांजली वाहण्यासाठीचा आहे. त्यामुळे राजकारणाशी संबंधित गोष्टी ते इथे करू शकणार नाहीत.
महाराणी एलिझाबेथ यांचं साम्राज्य आणि त्यांच्याभोवती असलेलं वलय हे अद्वितीय होतं. त्यांच्या निधनानंतर नक्कीच एक पर्व संपलं आहे.
पण हे पर्व संपत असताना त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमातूनही त्यांचं सामर्थ्य पुन्हा एकदा जाणवेल.
महाराणी एलिझाबेथ यांचा अंत्यविधी कार्यक्रम ऐतिहासिक ठरेल, यात शंका नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








