नवीन 'क्वीन कन्सॉर्ट' कॅमिला कोण आहेत?

    • Author, सारा कॅम्पबेल
    • Role, रॉयल करस्पॉंडंट

कॅमिला या राजे चार्ल्स तृतीय यांचं प्रेम आहेत. त्या चार्ल्स यांच्या तरुणपणापासून विश्वासू आहेत आणि 17 वर्षांपासून त्यांची पत्नी आहेत. आता त्या 'क्वीन कन्सोर्ट' म्हणजे महाराणी आहेत.

प्रमुख राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये कॅमिला यांना पतीच्या सोबत पाहण्याची लोकांना सवय झालीय. पण हे सोपं नाही, असं कॅमिला यांनी प्रांजळपणे सांगितलं आहे.

काही महिलांना सार्वजनिकरित्या 'कॅमिला पार्कर-बोल्स यांच्याप्रमाणे अप्रिय' म्हणून संबोधलं केलं गेलं. प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना यांच्या तुलनेत कॅमिला यांच्याकडे 'एक बाहेरची स्त्री' म्हणून पाहण्यात आलं.

चार्ल्स यांची निवड करताना कॅमिला यांनी स्वत:चं आयुष्य पणाला लावलं. माध्यमांनी त्यांना वर्षानुवर्षं वेठीस धरलं. त्यांच्या चारित्र्यावर आणि वागण्या-बोलण्यावर प्रश्नही उपस्थित केले गेले. पण त्यांनी या वादळाचा सामना केला आणि हळूहळू राजघराण्यातील सर्वांत ज्येष्ठ महिला सदस्य म्हणून स्वत:चं स्थान मजबूत केलं.

कॅमिला आणि चार्ल्स यांचा प्रेमाचा प्रवास बराच मोठा होता. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून कॅमिला यांना पूर्णपणे स्वीकारायला वेळ लागला. पण त्यांच्या शेवटच्या वर्षांत राणीने कॅमिला यांना पाठिंबा दर्शवला होता.

नवीन राणी कदाचित कधीच लोकांकडून पूर्ण स्वीकृती मिळवू शकणार नाही, पण या वर्षाच्या सुरुवातीला 'व्होग' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं, "मी या गोष्टींच्या आता पुढे गेले आहे. आयुष्यात पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं असतं."

17 जुलै 1947 रोजी जन्मलेल्या कॅमिला रोझमेरी शँड पुढे जाऊन राजगादीच्या वारसदाराशी लग्न करतील, असं कुणालाही वाटलं नसेल. कॅमिला यांचं कुटुंब उच्च-वर्गीय, श्रीमंत होतं. पण ते निश्चितपणे राजघराणं नव्हतं.

कॅमिला या ससेक्समध्ये अतिशय कौटुंबिक वातावरणात भाऊ आणि बहिणीसोबत हसत-खेळत, प्रेमळ वातावरणात वाढल्या. त्यांचे वडील ब्रूस शँड हे एक निवृत्त लष्करी अधिकारी होते.

ते मुलांना झोपताना गोष्टी सांगायचे. कॅमिला यांच्या आई रोझलिंड या मुलांना शाळेत, इतर उपक्रम आणि समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जात. चार्ल्स यांच्या बालपणपेक्षा कॅमिला यांचं बालपण खूप वेगळं होतं. चार्ल्स यांच्या पालकांना अख्ख्या जगाचा प्रवास करावा लागत असल्यानं त्यांनी बराच काळ पालकांशिवाय व्यतित केला होता.

स्वित्झर्लंडमधील एका फिनिशिंग स्कूलने कॅमिला यांना लंडनच्या समाजात वावरण्यासाठी तयार केलं. कॅमिला लोकप्रिय होत्या आणि 1960 च्या दशकाच्या मध्यापासून त्या अँड्र्यू पार्कर-बोल्स नावाच्या एका घोडदळाच्या अधिकाऱ्याशी ऑन-ऑफ रिलेशनशिपमध्ये होत्या.

1970 च्या सुरुवातीस कॅमिला यांची ओळख तरुण प्रिन्स चार्ल्स यांच्याशी झाली. प्रिन्स चार्ल्स यांचे चरित्र लिहिणाऱ्या जोनाथन डिम्बलबीच्या मते, "त्या प्रेमळ आणि नम्र होत्या. चार्ल्स पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडले होते."

पण वेळ योग्य नव्हती. चार्ल्स अजूनही वयाच्या विशीत होते आणि नौदलात करिअर करत होते. 1972 च्या उत्तरार्धात त्यांना परदेशात आठ महिन्यांसाठी तैनात करण्यात आलं. चार्ल्स दूर असताना अँड्र्यू यांनी कॅमिला यांना प्रपोज केलं आणि त्यांनी ते मान्य केलं.

चार्ल्स यांनी विचारण्याची वाट का पाहिली नाही? या प्रश्नावर कॅमिला यांच्या मित्रांनी असा अंदाज लावला आहे की, त्यांनी स्वतःकडे कधीच 'राणीसाठीचं व्यक्तिमत्व' म्हणून पाहिलं नाही.

असं असलं तरी कॅमिला आणि चार्ल्स एकमेकांच्या जीवनाचा भाग बनले. ते समान सामाजिक वर्तुळात वावरात होते. चार्ल्स आणि अँड्र्यू एकत्र पोलो खेळले आणि या जोडप्यानं चार्ल्स यांना त्यांच्या पहिल्या मुलाचे, टॉमचे गॉडफादर होण्यास सांगितलं. पोलो भेटीदरम्यान चार्ल्स आणि कॅमिला यांची छायाचित्रं त्यांच्यातील आल्हाददायक जवळीक दर्शवत होते.

1981 च्या उन्हाळ्यात चार्ल्स यांनी तरुण डायना स्पेन्सरला भेटून प्रपोज केलं. तरीही कॅमिला त्यांच्या आयुष्याचा एक भाग होती. डायना यांनी लग्नाच्या दोन दिवस आधी लग्न कसं रद्द केलं याविषयी 'डायना: हर ट्रू स्टोरी'मध्ये लेखक अँड्र्यू मॉर्टननं तपशीलवार वर्णन केलं आहे.

चार्ल्स यांनी कॅमिलासाठी बनवलेलं, F आणि G अक्षरं कोरलेले ब्रेसलेट डायना यांनी शोधून काढलं. फ्रेड आणि ग्लॅडिस अशी एकमेकांची टोपण नावं होती. यावरून डायना चिडल्या होत्या.

डायना यांना चार्ल्स आणि कॅमिला यांच्या नात्याचा त्रास झाला, त्यावरून त्यांचा त्यांच्या पतीसोबत संघर्षही झाला. पण प्रिन्स चार्ल्स यांनी नेहमीच म्हटलं की, डायनसोबतचा संसार 'जवळपास संपुष्टात' आल्यावरच ते आपल्या जुन्या नात्याकडे ओढले गेले. पण, डायना यांनी 1995 च्या 'पॅनोरामा' मुलाखतीत म्हटलं होतं, "या लग्नात आम्ही तिघेजण होतो."

चार्ल्स आणि कॅमिला या दोघांच्याही वैवाहिक आयुष्यात वादळं आली होती. त्यातली काही गोष्टी तर खूपच त्रासदायकही होत्या. पण कोणतीही बातमी 1989 मध्ये गुपचूप रेकॉर्ड करण्यात आलेल्या त्या फोन कॉलसारखी नव्हती. चार वर्षानंतर हा कॉल सार्वजनिक करण्यात आला. त्यावरून प्रचंड वाद झाला. नंतर चार्ल्स यांनी कॅमिला यांच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली.

कॅमिला यांचा घटस्फोट 1995 मध्ये निश्चित झाला. चार्ल्स आणि डायना यांचं लग्न 1996 मध्ये अधिकृतपणे संपलं. त्यानंतर कॅमिला यांनी चार्ल्स यांच्यासोबत राहणं पसंत केलं. स्वत:चं कुटुंब आणि विशेषत: दोन मुले टॉम आणि लॉरा यांना सार्वजनिकरित्या त्रास सहन करावा लागूनही त्यांनी हे पाऊल उचललं. त्यांचं हे पाऊल म्हणजे त्यांच्या चार्ल्स यांच्यासाठी भावनिक पाठिंब्याचं लक्षण होती.

जेव्हा पापाराझी विल्टशायरमधील कुटुंबाच्या घराबाहेर झुडुपात लपत असत त्या दिवसांबद्दल टॉम पार्कर बाउल्सनं सांगितलं.

"आमच्या कुटुंबाबद्द्दल आता कोणीही काहीही सांगू शकत नाही ज्यामुळे आम्हाला अधिक त्रास होईल," असं त्याने 2017 मध्ये 'टाइम्स' वृत्तपत्रात लिहिलं. "

माझी आई बुलेट-प्रूफ आहे," असंही त्यानं लिहिलं.

त्या दिवसांविषयी कॅमिला म्हणाल्या होत्या, "कोणालाही नेहमी एकसारख्यापद्धतीनं पाहणं आवडत नाही. तुम्हाला फक्त त्याच्यासोबत जगण्याचा मार्ग शोधावा लागेल."

आपल्यावरील टीकेला सामोरं जाण्याचा मार्ग कॅमिला यांच्यासाठी डायना यांच्या मृत्यूनंतर (1997) अधिक खडतर झाला. सार्वजनिकपणे चार्ल्स यांनी आपली मुलं विल्यम आणि हॅरी यांच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि कॅमिला नजरेतून मागे पडल्या. पण त्यांचं नातं कायम राहिलं.

चार्ल्स यांची स्थिती अशी होती की, कॅमिला यांच्याविषयी ते तडजोड करू शकत नव्हते आणि म्हणूनच लोकांच्या नजरेत त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी काळजीपूर्वक मोहीम सुरू करण्यात आली. याची सुरुवात 1999 मध्ये रिट्झ हॉटेलमधून रात्री उशिरा झाली जिथं ते कॅमिला यांच्या बहिणीचा 50 वा वाढदिवस साजरा करत होते. त्यानंतर सहा वर्षांनी ते विंडसर गिल्डहॉल येथे एका छोट्या, नागरी समारंभात ते विवाहबद्ध झाले.

नवविवाहित जोडप्याला लोकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया येईल अशी चिंता निराधार ठरली. कारण शुभचिंतकांकडून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा जयजयकार झाला.

पण कॅमिला यांना राणी म्हणून ओळखलं जाईल की नाही यावर बरीच वर्षं चर्चा सुरू होती. क्वीन कन्सोर्ट ही उपाधी वापरण्याचा कायदेशीर अधिकार असताना, त्याऐवजी त्यांना प्रिन्सेस कन्सोर्ट म्हणून ओळखलं जाईल अशी अधिकृत ओळ होती. कॅमिला यांच्यामुळे डायना आणि चार्ल्स यांच्यात विघ्न आलं, असं वाटणाऱ्यांना शांत करण्यासाठी असं करण्यात आलं होतं.

सरतेशेवटी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी हे प्रकरण मिटवलं. 2022 मध्ये त्यांनी सांगितलं की, "माझी प्रामाणिक इच्छा आहे की जेव्हा वेळ येईल तेव्हा कॅमिला 'क्वीन कन्सोर्ट' म्हणून ओळखली जाईल."

कॅमिला यांनी चार्ल्स यांच्या बाजूची जागा मिळवली होती हे यातून सिद्ध झालं. यानंतर याविषयीची सार्वजनिक चर्चा संपुष्टात आली.

महाराणी आणि कॅमिला यांचं फारसं जमायचं नाही. तोच प्रकार प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांच्याबाबतीत झाला. दोघांनाही त्यांच्या पालकांचं लग्न तुटताना पहावं लागलं, तसंच त्यांच्या आईचा मृत्यू पहावा लागला होता.

2005 मध्ये त्यांच्या लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यावेळी 21 वर्षांचा असलेल्या प्रिन्स हॅरीनं सांगितलं की, "कॅमिला या एक अद्भुत स्त्री आहेत. त्यांनी आमच्या वडिलांना आनंदी ठेवलं आहे."

"विल्यम आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि आम्ही त्यांच्याशी खरोखर चांगले वागलो आहे."

त्यानंतरच्या वर्षांत कॅमिला यांच्याबद्दलच्या त्यांच्या भावनांबद्दल या दोन्ही भावंडांनी फारसं काही सांगितलं नाही. पण, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विल्यम, त्याची पत्नी कॅथरीन आणि कॅमिला यांच्यातील परस्परसंवाद आणि देहबोली पाहिल्यास त्यांच्यात चांगले संबंध असल्याचं जाणवतं.

1970 च्या दशकाच्या मध्यात कॅमिला यांचं आयुष्य पतीला आणि कुटुंबाला आधार देण्याभोवती फिरत राहिलं. त्यांचे विंडसर येथील संबंध मथळे निर्माण करू शकतात, पण स्पॉटलाइटपासून दूर असलेल्या कॅमिला या 5 नातवांची एक उत्साही आजीदेखील आहेत.

कॅमिला यांनी त्यांचं विल्टशायर घर तसंच ठेवलं आहे. जिथे त्या निवांत वेळ घालवण्यासाठी जातात.

कॅमिला यांचा पुतण्या बेन इलियटनं व्हॅनिटी फेअर मासिकाला सांगितलं की, "त्यांचं कुटुंब त्यांना पाठिंबा देणारं आहेत आणि ते एकमेकांशी जोडलेले आहेत. त्या आपला पती, मुलं आणि नातवंडांवर खूप प्रेम करतात.

ज्या क्षेत्रांमध्ये आवड आहे, त्यात कॅमिला यांनी स्वतःची छाप पाडली आहे:

  • कॅमिला यांची आई आणि आजीला ऑस्टियोपोरोसिस आजारामुळे त्रास होतो. त्यामुळे या आजाराविषयी जागरुकता वाढवण्याचं काम त्यांनी केलं.
  • कौटुंबिक अत्याचार, बलात्कार आणि लैंगिक हिंसाचारायासारख्या कठीण विषयांवर प्रकाश टाकणे.
  • इंस्टाग्रामवर बुक क्लबद्वारे वडिलांकडून पुस्तक प्रेमाचा मिळालेला वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे.

मी एकदा क्लॅरंस हाऊस येथे एका धर्मादाय कार्यक्रमात त्यांना पाहिलं. त्या एका कोपऱ्यातून जिन्याच्या वरून बघत होत्या. सगळे लोक तयार आहेत की नाही हे त्या बघत होत्या. आम्ही तयार आहोत हे त्यांना दिसलं. त्या खाली आल्या आणि आम्हाला त्यांनी आनंदाने मिठी मारली.

लॉकडाऊन दरम्यान नातवंडांना 'गोड मिठी' न मारू शकल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं होतं. निर्बंध कमी झाल्यानंतर नातवंडांना भेटता येईल या गोष्टीचा त्यांना आनंद झाला होता.

कॅमिला यांना विचारप्रवृत्त करणारी भाषणं करावी लागतात हे त्यांनी लपवून ठेवलेलं नाही. पण, गेल्या काही वर्षांत त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

चार्ल्स आणि कॅमिला यांच्या लग्नाला आता 17 वर्षं झाली आहेत. सार्वजनिकपणे त्यांचे संबंध स्पष्ट आहेत. ते सोबत दिसतात, विनोद करतात. क्वचितच असा एखादा कार्यक्रम असतो जिथं ते एखाद्या वेळी खाजगी विनोद शेअर करताना दिसत नाहीत.

"ते एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांचा आदर करतात," एलियट यांनी व्हॅनिटी फेअरला सांगितलं.

ते चैनीचं जीवन जगतात पण अत्यंत कठोर समीक्षेखालीही असतात आणि हा दबाव असह्य असू शकतो.

प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांच्या लग्नाच्या 10 व्या वाढदिवसानिमित्त सीएनएनला सांगितलं होतं की, "तुमच्या सोबत कोणीतरी असणं नेहमीच छान असतं. कॅमिला एक मोठा आधार आहे आणि ती जीवनाची मजेदार बाजू पाहत असते. मी देवाचे आभार मानतो."

"कधीकधी हे रात्री जहाजात जाण्यासारखे असते," कॅमिला त्यांच्या सहजीवनाबद्दल बोलताना म्हणाल्या.

"आम्ही नेहमी एकत्र बसतो आणि एक कप चहा घेतो आणि दिवसाची चर्चा करतो. आमच्याकडे एकमेकांसाठी, एकमेकांसोबत घालवायला क्षण आहेत."

राजाची अशी स्वत:ची भूमिका असते आणि कॅमिला यांना सोडण्यास चार्ल्स नाखूश होते. याचं कारण कदाचित त्यांना माहित होतं की, कॅमिला या एकमात्र व्यक्ती आहेत ज्या ते घेत असलेल्या भूमिकेसाठी त्यांना आवश्यक ती साथ देऊ शकतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)