'आई टकलू आहे म्हणून काय झालं...' गरोदरपणात ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या महिलेचा प्रवास

फोटो स्रोत, Ritu Dike
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
गरोदरपणात सातव्या महिन्यानंतर बाळाच्या आगमनाचे वेध लागलेले असतात. रितूचं पण तसंच होतं. आपल्या पहिल्या बाळाला बघायला ती सुद्धा आतुर होती.
सातव्या महिन्यात मोठ्या आनंदात तिचं डोहाळजेवण झालं. पण गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात मात्र एका अनपेक्षित घटनेनं तिचं आयुष्याचं बदलून गेलं.
अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यात राहणाऱ्या रितू पाटील आणि तिचा नवरा राधेशाम डिके यांचं वैवाहिक आयुष्य अगदी स्वप्नवत सुरू होतं. 30 वर्षांची रितू बॅंकेत नोकरीला आहे.
त्यांनी प्लॅन केल्याप्रमाणे लग्नाच्या दीड वर्षानंतर त्यांच्या संसारात नवीन जीवाची चाहूल लागली. पण बऱ्याच महिन्यांपासून रितूच्या उजव्या ब्रेस्टमध्ये असलेली गाठ गरदोरपणाच्या आठव्या महिन्यापर्यंत चांगलीच मोठी झाली आणि लालसर दिसायला लागली. एव्हाना ती कडकही झाली होती.
रितू सांगते, "आतापर्यंत मी निश्चिंत होते. आधी ती गाठ होती पण काळजीचं काही कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण आता मला ती गाठ जरा वेगळीच वाटायला लागली. ती थोडीशीही दुखत नव्हती. दिवाळीच्या माहेरपणासाठी आईकडे आले आणि ताईची भेट झाली."
"ताई डॉक्टर असल्यामुळे एकदा तिला दाखवावी म्हणून एक दिवस सहज तिला दाखवली. ती पाहून ती मला तडक स्त्री रोगतज्ज्ञांकडे घेऊन गेली. आता जेव्हा डॉक्टरांनी गाठ पाहिली तेव्हा त्यांनाही ती संशयास्पद वाटली. त्यांनी पुढच्या चाचण्या केल्या."
रितूच्या गाठीची आधी 'फाईन निडल एस्पिरेशन सायटोलॉजी' टेस्ट, ज्यामध्ये त्या गाठीतले द्रव्य पदार्थ एका रिकाम्या इंजेक्शनमध्ये घेतले जातात आणि त्याची चाचणी केली जाते, केली गेली.
या टेस्टचे रिपोर्ट समाधानकारक न आल्याने डॉक्टरांनी रितूला बायोप्सी करण्याचा सल्ला दिला.
ब्रेस्टमधली ती गाठ कॅन्सरची आहे की नाही हे बायोप्सीच्या रिपोर्टवरुन स्पष्ट होणार होतं.
"मी आणि राधेशाम बायोप्सी करण्यासाठी परत दवाखान्यात आलो. माझा नंबर येईपर्यंत डोळ्यांत येणारे पाणी एकमेकांपासून लपवत गप्पा करत होतो, हसत होतो. माझ्या पोटातल्या बाळाच्या हालचाली नेमक्या त्याचवेळी वाढल्याचं मला जाणवलं. जणू ते मला धीर देत होतं, म्हणत होतं की, 'आई काळजी नको करूस मी आहे तुझ्याबरोबर.' अखेर बायोप्सी झाली दहा दिवसांनी रिपोर्ट मिळणार होता," रितूने सांगितलं.
बायोप्सीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. म्हणजे ब्रेस्टमधली ती गाठ कॅन्सरचीच आहे हे समोर आलं. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग.
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2020 वर्षाच्या अखेरपर्यंत त्या आधीच्या पाच वर्षांत जगभरातल्या 78 लाख महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं.
यामुळे ब्रेस्ट कॅन्सर हा जगात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा कॅन्सर बनला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार ब्रेस्ट कॅन्सर चा धोका स्त्रियांमध्ये जास्त असतो. पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे 0.5-1% आहे. कुटुंबात जर ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास असेल तर याचा धोका अजून वाढतो.
तज्ज्ञांनुसार ब्रेस्ट कॅन्सरचं निदान जितक्या लवकर होईल तितकं चांगलं.
रितूच्या केसमध्ये आधी ती गाठ दुधाची आहे असं गृहित धरण्यात आलं. यामुळे ती गाठ वाढत गेली. त्याचं लवकर निदान होऊ शकलं नाही.

फोटो स्रोत, Ritu Dike
रितूने नंतर ज्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला त्या डॉ. करुणा मुरके यांनी सांगतिलं की, "ब्रेस्ट कॅन्सरला वेळीच ओळखणं कठीण नाहीये. फक्त थोडं सजग राहायची गरज आहे."
"रितू माझ्याकडे आली तेव्हा तिच्या गरोदरपणाचे 7 महिने पूर्ण झाले होते. तिच्या स्तनांमध्ये खूप काळ गाठ (lump) होती. गाठ आहे याविषयी माहिती होती पण ती कशाची आहे याची कल्पना कुणाला नव्हती."
"जेव्हा त्याची बायोप्सी झाली तेव्हा चित्र पुढे आलं. स्वतःचे ब्रेस्ट स्वतः तपासून पाहता येतात. ज्या क्षणी वाटतं की काही लम्प किंवा गाठ आहे तेव्हाच डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. त्याचं निदान लवकर झालं की पुढचे उपचार व्यवस्थित होतात," स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञ डॉ. करुणा मुरकेंनी सांगितलं.
तज्ज्ञांच्या मते गरोदरपणातील ब्रेस्ट कॅन्सरच्या घटना तुरळक असल्या तरीही आता त्यात काही प्रमाणात वाढ होताना दिसतेय. मुंबई सेंट्रलमधील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या कन्सल्टंट ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ. मेघल संघवी यांनी गरोदरपणातील ब्रेस्ट कॅन्सरविषयी अधिक माहिती दिली.
"अशा केसेसमध्ये साधारणपणे गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात ब्रेस्टमध्ये एक सामान्य, न दुखणाऱ्या गाठीपासून सुरवात होते. तेव्हा ती लक्षात येणं किंवा त्याचं निदान करणं कठीण होतं कारण गरोदरपणामुळे ब्रेस्टचा आकार आणि घनता वाढते."
"यातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून परिक्षण आणि ब्रेस्टची अल्ट्रासाउंड चाचण्यांसारख्या प्रक्रियांनी अशा संशयास्पद केस लवकर समोर येऊ शकतात. त्यानंतर बायोप्सी करुन ती गाठ नेमकी कशाची आहे याचं अचुक निदान होऊ शकतं. जर ती गाठ कॅन्सरचीच आहे, असं रिपोर्टमधून पुढे आलं तर त्या रुग्णावरच्या उपचारांचं नियोजन करण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ, कॅन्सरतज्ज्ञ आणि कॅन्सरसर्जन यांची टीमवर्कची भुमिका खूप महत्त्वाची असते," डॉ. मेघल संघवी यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणतात की, अशा केसेसमध्ये बऱ्याच गोष्टींचा विचार करुन उपचारांची पद्धत ठरवली जाते आणि तसं नियोजन केलं जातं.
"गरोदर स्त्रीच्या ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंटचं प्लॅनिंग करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कॅन्सरची स्टेज कोणती आहे, गरोदरपणाचा कोणता महिना आहे आणि हार्मोन रिसेप्टरची काय परिस्थिती या सगळ्या गोष्टी लक्षात घेतली जातात," डॉ. संघवी सांगतात.
"रुग्ण तिचे, नातेवाईक आणि डॉक्टरांच्या टीममध्ये सखोल समुपदेशन आणि उपचारांचे नियोजन यात एकत्र चर्चा व्हायला पाहिजे. जर गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात निदान झालं तर उपचारांचा पहिलं प्राधान्य हे शस्त्रक्रियेला दिलं जातं. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात केमोथेरपीने गर्भपात होण्याचा धोका असतो. गरोदरपणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत अत्यंत काळजी घेऊन आणि पूर्णवेळ निगराणी खाली केमोथेरपी दिली जाऊ शकते," डॉ. संघवी सांगतात.
आठव्या महिन्यात सुरू झाले उपचार
गरोदरपणातला आठवा महिना सुरू असला तरीही कॅन्सरसाठीचे उपचार रितूवर सुरू झाले. नागपूरच्या एका मोठ्या दवाखान्यात रितूवर कॅन्सरचे उपचार सुरू झाले.
आठव्या महिन्यात तिची पहिली किमोथेरपी झाली. बाळावर किमोथेरपीचा कुठलाही विपरित परिणाम होणार नाही हे सांगून डॉक्टरांनी तिला आश्वस्त केलं. पण तिला आणखी एक धक्का सहन करावा लागला.
रितू सांगते, "डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की किमोथेरपीचा बाळावर काही वाईट परिणाम होणार नाही तेव्हा मी निश्चिंत होते. पण त्यानंतर त्यांनी सांगितलं की, बाळ झाल्यावर तुला स्तनपान करता येणार नाही. मला सातव्या महिन्यापासूनच दुधाचा स्त्राव होता पण आता माझं बाळ त्या दुधापासून वंचित राहणार होतं."
किमोथेरपीचे साईड इफेक्ट होतात. ते रितूवर पण झाले. अशक्तपणा, तोंडाला फोडं येणे, भयंकर अंगदुखी, त्वचा आणि नखं काळवंडणे, केस गळणे असे दुष्परिणाम जाणवायला लागले.

फोटो स्रोत, Ritu Dike
तिला टक्कलही करावं लागलं. कॅन्सर उपचारांचा शारीरिक त्रास आणि अनपेक्षितपणे ओढवलेल्या विचित्र परिस्थितीमुळे होणारी मनाची घालमेल अशा अवस्थेत तिचे गरोदरपणाचे शेवटचे दोन महिने सरत आले.
नववा महिना संपता संपता डॉक्टरांनी प्रसूती कधीही होऊ शकते हे सांगतिलं. यामुळे त्या आठवड्यातली केमोथेरपीचं सेशन डॉक्टरांनी रद्द केलं.
अखेर तो दिवस आला. सकाळपासून रितूच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. नऊ तास प्रसववेदना सहन केल्यावर ती प्रसूत झाली. तिला मुलगी झाली. रितू म्हणते जेव्हा तिच्या हातात बाळ दिलं तो तिच्यासाठी सुवर्णक्षण होता.
प्रसुतीनंतर काही महिन्यांनी रितूची कॅन्सरची सर्जरी झाली. रितूची मॅसेक्टोमी झाली. म्हणजे ज्या ब्रेस्टमध्ये गाठ होती तो पूर्णपणे काढण्यात आला. यामध्ये लम्पेक्टोमी हा पण प्रकार असतो.
ज्यामध्ये फक्त ती गाठ काढली जाते. मॅसेक्टोमी झाल्या झाल्याच तिची ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरीपण झाली. या पूर्ण प्रक्रियेला 6 तास लागले.
"कॅन्सर आहे हे कळल्यापासून एकही दिवस सोपा नव्हता. हा आजार फक्त शरीरावरच नाही तर मनावरही आघात करतो. मनात वेगवेगळे विचार येतात. माझ्याच बाबतीत असं का? लग्नाला दोनच वर्षे झालेली, नवऱ्याचं काय? तरुणपणात हे असं दुखणं, पोटातल्या बाळाचं काय? आपलं वैवाहिक जीवन या आजारापायी उद्धवस्त होईल काय? आपल्या नवऱ्याला आपल्यात रस वाटणार नाही काय?"
"स्टेज कुठली असेल? बाळ जगात आल्यावर मी नसली तर त्याचं काय होईल? अन् माझ्या बाळालाच काही झालं तर? नाही, नाही मग तर मीच जगू शकणार नाही. आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा नवरा तो कसा जगेल? आई-बाबा, सासू-सासरे हे सारं कसं सोसतील या वयात? रात्रंदिवस विचारांचं थैमान असायचं. डोळ्यांना सतत धारा लागायच्या. कधी कधी एक एक दिवस ढकलणं कठीण व्हायचं," रितू सांगते.
या सगळ्या गोष्टींना तोंड देण्याचं धैर्य तिला कुठून मिळालं? हे विचारल्यावर रितू सांगते की, "या सगळ्या अडचणींना मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमाच्या आणि माझ्या बाळाच्या हसूच्या भरोशावर तोंड दिलं. आपली आई टकलू आहे याचं माझ्या बाळाला दुःख नाही. तसं असूनही ती माझ्या कुशीत शांत निजते. माझ्या डोक्याबरोबरच पापण्या, भुवयांनाही केस शिल्लक नाहीत, तरीही माझा नवरा मला म्हणतो 'तू अशीही छान दिसतेस'. त्याचा या शब्दांवर विश्वास ठेऊन मी पण सुखावते."
रितूचं बाळ आता आठ महिन्यांचं झालंय. तिच्या केमोथेरपीच्या 19 सायकल पूर्ण झाल्या आहेत. सर्जरी झाली. सर्जरी नंतर 25 रेडीएशन्स सेशन झालेत. ज्याचे साईड इफेक्ट आहेत.
आता टार्गेटेड थेरपी सुरू आहे. कामातून तिची सुटी सुरू आहे. ब्रेस्ट सर्जरीमुळे उजवा हात तिला आधीसारखा वापरता येत नाही. त्याच्या हालचाली पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तिच्या बाळाला एकदाही ती स्तनपान करु शकली नाही.
आजारपणाने बदललाल जगण्याचा दृष्टिकोन
पण आता या आजारपणातला एक मोठा टप्पा पार केलाय, असं रितूला वाटतं. यामुळे जगण्याकडे बघण्याचा तिचा दृष्टीकोन बदललाय.
"या प्रवासात अनेक चढउतार होते. पण मला प्रेमही खूप मिळालं. घरच्यांनी तर काळजी घेतलीच. पण दवाखान्यातही खूप शिकता आलं. तिथे गेल्यावर माझ्यासारखीच कॅन्सरशी झगडणारी खूप वेगवेगळी लोकं भेटली. त्यात प्रत्येकाची स्टोरी वेगळीच होती. ते ऐकल्यावर आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळाला," रितूने सांगितलं.
या प्रवासातून जे शिकता येईल, जे टिपून घेता येईलच त्याची नोंद घेण्याचा ती प्रयत्न करतेय. तिला वाचनाची आणि लिखाणाची आधीपासून आवड होती.
तो छंद तिने या काळात जोपासला. ज्या भावना बोलून व्यक्त करता येत नव्हत्या ते लिहून तिने मन मोकळं केलं. तसंच यादरम्यान तिने एक कादंबरीसुद्धा लिहायला सुरुवात केलीये. रितू म्हणते की मला त्यासाठी प्रकाशक वाचक मिळेल की नाही माहीती नाही. पण कादंबरी मी लिहून पूर्ण करणार आहे.
रितू म्हणते "या आजाराने मला एक शिकवलं की, आयुष्य बघता बघता संपून जाईल आणि जगायचं राहून जाईल. तेव्हा कोण काय म्हणेल याची फकीर न करता आपला आनंद शोधायचा आणि तसं जगायचं. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेत संकटांची पर्वा न करता जगायचं. जीना इसी का नाम है!"
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








