पाकिस्तान पूर: दगडाला कागद बांधून मदतीची मागणी करणारे संदेश पाठवले जात आहेत

पाकिस्तान पूर
    • Author, फरहात जावेद
    • Role, बीबीसी उर्दू

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील मनूर खोऱ्यात शुक्रवारी (26 ऑगस्ट) आलेल्या पुरामुळे शेकडो नागरिक नदीच्या पलीकडे अडकून पडले आहेत.

या पुरामुळे जवळपास 10 पूल आणि डझनभर इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.

"आम्हाला औषधं हवं आहेत. कृपया पूल पुन्हा बांधा, आमच्याकडे आता काहीच उरले नाही," आम्ही जेव्हा पूरग्रस्त भागाला भेट दिली तेव्हा आमच्याकडे या आशयाचा हस्तलिखित कागद फेकण्यात आला.

मनूर खोरे हे पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या काघनच्या पर्वतांमध्ये वसलं आहे. सध्या या खोऱ्याला पुराचा तडाखा बसला असून त्यात महिला आणि मुलांसह किमान 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

इथल्या निसर्गरम्य दरीला मुख्य शहराशी जोडणारा एकमेव काँक्रीट पूल अचानक आलेल्या पुरामुळे वाहून गेला आहे. तेव्हापासून नदीच्या पलीकडील सर्व गावांचा संपर्क तुटला असून रहिवासी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

पूर आणि भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यावर तासभर प्रवास केल्यानंतर बीबीसीची टीम खोऱ्यात पोहचली.

मनूरमध्ये दोन पूल पूर्णपणे कोसळले असून तात्पुरते लाकडी क्रॉसिंग उभारण्यात आले आहे. इथं सामान घेऊन बसलेली एक बाई आम्हाला भेटली. ती तिचं घर पाहू तर शकते, पण तिथपर्यंत पोहचू शकत नाही, असं तिनं बीबीसीला सांगितलं.

"माझं घर आणि माझी मुलं नदीच्या पलीकडे आहेत. दोन दिवसांपासून मी इथे वाट पाहत आहे की, सरकार येऊन पूल दुरुस्त करेल. पण घरापर्यंत पोहचण्यासाठी डोंगराच्या दुसऱ्या बाजूनं चालण्यास सुरुवात करावी, असं अधिकारी आम्हाला सांगत आहेत. पण ती आठ ते दहा तासांची पायपीट आहे. मी म्हातारी आहे. मी एवढं कसं चालणार?"

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

त्या बाईनं आणखी काही मिनिटे वाट पाहिली आणि पुन्हा पाऊस सुरू झाल्यावर ती तिथून निघून गेली. दरम्यान, तात्पुरत्या लाकडी पुलाच्या खालून वाहणारे पाणी वाढू लागल्याचं दिसून आलं.

नदीच्या पलीकडे आपल्या मातीच्या घराबाहेर पुरुष, स्त्रिया आणि मुले बसलेले आम्हाला दिसले. आम्ही सरकारी अधिकारी आहोत असे समजून त्यांनी आमच्याकडे बघत हात दाखवले.

संवाद साधण्याचे एकमेव साधन

तेव्हाच त्यांच्यापैकी काही जणांनी कागदाचा तुकडा एका दगडांनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकला आणि आम्ही चित्रीकरण करत असलेल्या ठिकाणी तो फेकला. आजकाल गावातील इतर भागांशी संवाद साधण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. कारण इथं सध्या मोबाइल नेटवर्क कार्यरत नाहीये.

या चिठ्ठीत ही माणसं कोणत्या अडचणींचा सामना करत आहेत, याचा उल्लेख तर आहेच शिवाय अडकलेल्या गावकऱ्यांसाठी ते पुरवठा आणि औषधांची विनंती देखील करत होते.

"अनेक लोक आजारी आहेत आणि ते गावातून पायी निघू शकत नाहीत. कृपया पूल बांधून द्या, शहराशी जोडण्याचा तोच एक प्रमुख मार्ग आहे," असं या पत्रात म्हटलंय.

पुरामुळे उद्ध्वस्त झालेलं रेस्टॉरंट
फोटो कॅप्शन, पुरामुळे उद्ध्वस्त झालेलं रेस्टॉरंट

"आम्हाला वस्तूंची गरज आहे. आम्हाला रस्त्याची गरज आहे," 60 वर्षांचे अब्दुल रशीद सांगत होते.

पुरात त्यांनी आपली गाडी गमावली. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं तेच एकमेव साधन होतं.

"असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांची मालमत्ता आणि उत्पन्नाचं साधन गमावलं आहे," ते सांगतात.

"त्यांना मदतीची गरज आहे. त्यांना अन्नाची गरज आहे. येथे एक छोटासा बाजार होता जो वाहून गेला. तिथल्या दुकानांमध्ये अन्न आणि साहित्य होतं. माझं घर पलीकडच्या बाजूला आहे आणि आता मला माझ्या घरी पोहचण्यासाठी आठ तास चालावं लागेल. एवढ्या म्हातारपणी मी हे कसे करू?" ते विचारतात.

येथील अनेक दुकाने, हॉटेल्स उद्ध्वस्त झाली आहेत. सोहेल आणि त्याच्या भावाचं मोबाईल फोन दुरुस्तीचं दुकान पुरात वाहून गेलं आहे.

'अधिकारी, राजकारणी फक्त फोटो काढण्यासाठी येतात'

सोहेल बीबीसीला सांगतात, "आमची तीन कुटुंबे आहेत आणि आता त्यांच्या भविष्याबद्दल मला चिंता आहे. मला काय करावं हे समजत नाही. आम्हाला जितकी गरज आहे, तितकी मदत करायला कुणीही आलेलं नाही. इथला प्रत्येक दुकानदार चिंतेत आहे. हे सर्व गरीब लोक आहेत ज्यांना त्यांच्या मोठ्या कुटुंबाचं पोट भरायचं आहे."

"इथं अधिकारी आणि राजकारणी केवळ फोटोसेशन आणि मौजमजेसाठी येतात. ते येतात, फोटो काढतात आणि निघून जातात. आम्हाला कोणीही मदत करत नाही."

पण जिल्ह्याचे उपायुक्त बीबीसीला सांगतात की, या भागात तातडीने बचाव आणि मदत कार्य हाती घेण्यात आलं असून सर्व हॉटेल्स रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तसंच मालमत्तेच्या नुकसानीचं मूल्यांकन आधीच करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

"आम्ही मूल्यांकन पूर्ण केलं आहे आणि पूरग्रस्तांना लवकरच भरपाई दिली जाईल," असं ते म्हणाले. "पुलाच्या पुनर्बांधणीचे काम आधीच सुरू झालं आहे, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल," असंही त्यांनी सांगितलं.

या पुरासाठी सरकार हवामान बदलाला जबाबदार धरत असताना स्थानिक नागरिक मात्र प्रशासनावर टीका करत आहे. बांधकाम व्यावसायिकांना नदीच्या काठावर हॉटेल्स बांधण्याची परवानगी दिल्याबद्दल स्थानिक लोक सरकार आणि स्थानिक प्राधिकरणावर टीका करत आहेत.

"या हॉटेल्स आणि मार्केट्सनी नैसर्गिक जलमार्गाला अटकाव केला आहे आणि त्यामुळे आम्ही इथं पुरामुळे एवढं नुकसान पाहत आहोत. हे सहज टाळता आलं असतं," काघनच्या मुख्य बाजारपेठेतील आणखी एक रहिवासी सांगतात.

पुरात घराशेजारी थांबलेली एक महिला

काघनमधील कुन्हार नदीच्या काठावर आणि त्यालगतच्या खोऱ्यात अनेक हॉटेल्स बांधण्यात आली आहेत. पुरामुळे त्यांच्यापैकी काही हॉटेल्स तसंच पोलीस स्टेशन आणि धार्मिक शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

पोलिस ठाण्यापासून काहीशे मीटर अंतरावरील नदीच्या काठावर तात्पुरत्या तंबूत एक कुटुंब बसलं आहे. या पुरात त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्य वाहून गेल्याचे ते सांगतात.

1000 हून अधिक लोकांचा मृत्यू

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे संपूर्ण पाकिस्तानात हाहाकार उडाला आहे.

1,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत तर लाखो लोक विस्थापित झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, जवळपास 7 लाख घरं नष्ट झाली आहेत.

लाखो लोक अन्न, पिण्याचे पाणी आणि निवारा यांच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे बचाव पथकं पूरग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत सुविधा पोहचण्यासाठी धडपडत आहेत. सिंध आणि बलुचिस्तान सारखे प्रांताचं पुरामुळे सर्वांत जास्त नुकसान झालं आहे. तसंच खैबर पख्तुनखामधील पर्वतीय प्रदेशांनाही पुराचा मोठा फटका बसला आहे.

पूरग्रस्त भागात पोहचण्यासाठी पाकिस्तानी लष्करालाही पाचारण करण्यात आलं आहे. कारण बहुतेक रस्ते खराब झाले आहेत आणि बहुसंख्य समुदायांपर्यंत पोहचण्याचा हेलिकॉप्टर हाच एकमेव मार्ग आहे.

पाकिस्तान सरकार सध्या मित्र देश, देणगीदार आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना या आपत्तीचा सामना करण्यासाठी मदत करण्याचं आवाहन करत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)