'भारत' आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून खेळणारा क्रिकेटपटू

    • Author, कनिष्क थरुर आणि मरियम मारुफ
    • Role, म्युझियम ऑफ लॉस्ट ऑब्जेक्ट्स, बीबीसी

भारतात क्रिकेट धर्म आहे. सख्खे शेजारी पाकिस्तानातही क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. दोन्ही देशांचे संघ क्रिकेटच्या मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा वातावरण रोमांचित होतं.

राष्ट्रवादाचा ज्वर वाढीस लागतो. सामन्यातील हारजीत जणू प्रत्यक्षातल्या हारजीतइतकीच महत्त्वाची ठरते.

विचार करा, 75 वर्षांपूर्वी वातावरण कसं असेल?

75 वर्षांपूर्वी पाकिस्तानचा जन्मही झाला नव्हता. आता जे पाकिस्तान आहे तो भारताचाच भाग होता. एकच संघ असायचा, तो म्हणजे भारताचा.

भारताने 1932 मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 1930च्या दशकात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध भारतीय खेळपट्ट्यांवर अनेक मालिका खेळल्या. पण भारतीय संघाला जिंकता आलं नव्हतं.

फाळणी झाली आणि परिस्थिती बदलू लागली. एका संघाचे दोन झाले. भारतातले काही खेळाडू पाकिस्तानाने गेले. जे खेळाडू पूर्वी एकत्र एका संघासाठी खेळायचे ते आता प्रतिस्पर्धी झाले.

असेच एक खेळाडू होते आमिर इलाही. ते बडोदा संघाकडून खेळायचे. त्यावेळच्या बडोद्याचा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळायचा तेव्हा अनौपचारिकरीत्या हा संघ भारतीय संघच म्हटला जायचा. अमीर इलाही यांनी 1947 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात सिडनी येथे झालेल्या सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

फाळणीनंतर इलाही पाकिस्तानला रवाना

फाळणीनंतर इलाही यांनी पाकिस्तानला रवाना होण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या कुटुंबीयांबरोबर तिकडे गेले. ते नव्या देशात गेले पण त्यांच्या जुन्या संघाशी दुरावले. काही काळानंतर भारत आणि पाकिस्तानचे स्वतंत्र संघ निर्माण झाले.

अमीर इलाही यांचे नातू मन अहमद कोलंबिया विद्यापीठात शिकत आहेत. त्यांच्याशी बीबीसीच्या कनिष्क थरुर यांनी बातचीत केली.

मनन यांनी सांगितलं की अमिर मोठे क्रिकेटपटू नव्हते. क्रिकेटच्या मैदानावर त्यांनी मोठा पराक्रम गाजवला नव्हता. ते एक सर्वसाधारण खेळाडू होते. ते थोडी गोलंदाजी करायचे आणि संधी मिळाल्यास फलंदाजीही करायचे. अमीर संघासाठी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ते कार्यरत असत.

मनन यांच्या मते आमिर इलाही पाकिस्तानचे कडवे समर्थक होते म्हणूनच फाळणीनंतर ते पाकिस्तानला गेले. त्यांची पाकिस्तान संघात निवडही झाली.

अमीर इलाही यांची कामगिरी

1953 मध्ये पाकिस्तानचा संघ पहिल्यांदा भारताच्या दौऱ्यावर आला होता. अमीर इलाही तत्कालीन पाकिस्तान संघाचा भाग होते. ते त्यांच्या जुन्या संघातील दोस्तांना भेटले. अनेक आठवणी जाग्या झाल्या. पाकिस्तान संघाच्या या पहिल्यावहिल्या भारत दौऱ्यात जिंकण्याची महत्त्वाकांक्षा अतिशय कट्टर अशी होती.

मनन यांनी सांगितलं की "अमीर यांना भारतात जाऊन संघाला जिंकून द्यायचं होतं. मात्र तसं झालं नाही. भारतीय संघाने ती मालिका जिंकली. अमीर यांची कामगिरी सर्वसामान्यच झाली."

नंतरही अमीर इलाही यांनी पाकिस्तानतर्फे खेळताना चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मनन यांनी लहानपणी क्रिकेट खेळतानाच्या आठवणी सांगितल्या. त्यांच्या आजीने आजोबांचं क्रिकेटचं साहित्य दिलं होतं. मनन यांनी ते वापरलं नाही.

मनन यांनी आजोबांचा स्वेटर मात्र आवर्जून वापरला. आजोबांचा स्वेटर घालून खेळताना त्यांना खूप छान वाटलं होतं. त्यांना असं वाटलं की संघातले सगळ्यांत भारी खेळाडू तेच आहेत.

ना संग्रहालय, ना साहित्य

अमीर यांनी खेळतानाचं साहित्य अगदी जपून ठेवलं होतं. मनन सांगतात एक माणूस त्यांच्याकडे आला. लाहोरमध्ये क्रिकेटचं संग्रहालय सुरू होणार आहे असं त्याने सांगितलं.

हे ऐकून अमीर यांनी खेळाचं सगळं साहित्य संग्रहालयाला देऊन टाकलं. पण तो माणूस सगळं साहित्य घेऊन फरार झाला. संग्रहालय झालंच नाही आणि अमीर यांचं खेळाचं किट घेऊन जाणारा तो माणूसही फिरकला नाही.

त्या माणसाने ते सगळं साहित्य बहुधा ब्लॅक मार्केटमध्ये विकलं असावं.

मनन अमेरिकेत असतात आणि आजोबांच्या आठवणीत ते आजही दंग होतात. भारत आणि पाकिस्तान संघांनी फाळणीनंतर मोठी वाटचाल केली आहे. दोन्ही देशांनी विश्वचषक जिंकला आहे. या दोन देशांदरम्यान झालेल्या लढतीत कधी भारत वरचढ ठरतो तर कधी पाकिस्तानची सरशी होते.

आता एकमेकांचे प्रतिस्पर्धी झालेले खेळाडू कधी काळी एका संघात एकत्र खेळत असतील याची कल्पनाच करवत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)