You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोहिंग्या : 'आम्हाला मारून टाका, पण म्यानमारला पाठवू नका'
- Author, रजिनी वैद्यनाथन
- Role, बीबीसी दक्षिण आशिया प्रतिनिधी
यास्मिन ही हजारो रोहिंग्या मुलांपैकी एक आहे, ज्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही. तिचे वय फक्त 4 वर्षे आहे. या चार वर्षांमध्ये तिने फक्त अनिश्चितता अनुभवली आहे, ती नक्की कुठली आहे, हेच तिला ठावूक नाही.
बांगलादेशमधील निर्वासितांच्या शिबिरात यास्मिनचा जन्म झाला. म्यानमारमधील आपल्या गावी ती जाऊ शकत नाही. राजधानी दिल्लीतील एक झोपडी हे सध्या यास्मिनचं घर आहे.
म्यानमारमधील अल्पसंख्याक असलेल्या हजारो रोहिंग्यांप्रमाणे, म्यानमारमधील लष्कराने सुरू केलेल्या रोहिंग्यांच्या नरसंहारापासून स्वतःला वाचविण्यासाठी यास्मिनचे आई-वडील 2017 मध्ये तिथून पळाले.
अनेकजण त्यांच्या शेजारी असलेल्या बांगलादेशात गेले किंवा भारतात आले. इथं ते निर्वासितांचे आयुष्य जगत आहेत.
संयुक्त राष्ट्रांनुसार कोणत्याही देशाचे नागरिकत्व नसलेल्यांपैकी रोहिंग्या मुसलमानांची संख्या सर्वाधिक आहेत. आज पाच वर्षांनंतरही ते उपेक्षितांचे आयुष्य जगत आहेत.
यास्मिनचे वडील रेहमान हे म्यानमारमध्ये व्यावसायिक होते. म्यानमारच्या लष्कराने जेव्हा रोहिंग्यांवर क्रूर हल्ला केला, तेव्हा सुमारे 7 लाख रोहिंग्यांना पलायन करावं लागलं होतं. रेहमान हे त्यांच्यापैकीच एक होते.
अनेक दिवस चालल्यानंतर रेहमान आणि त्यांची पत्नी महमुदा म्यानमारच्या सीमेजवळ असलेल्या अग्नेय बांगलादेशातील कॉक्स बाजार या निर्वासितांच्या शिबिरात पोहोचले.
या ठिकाणी हे दांपत्य अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत राहत होते. अन्नटंचाई तर कायमच असायची आणि धर्मादाय संस्थांकडून मिळालेल्या मदतीने मिळालेल्या अन्नधान्न्यावर ते जगत होते.
रेहमान यांना त्यांच्या पत्नीच्या जीवाला धोका आहे, अशी भीती वाटती होती, म्हणून त्यांनी बांगलादेशला जाण्याचा निर्णय घेतला.
बांगलादेशला पोहोचल्यानंतर वर्षभराने यास्मिनचा जन्म झाला.
रोहिंग्या मुसलमानांनी म्यानमारमध्ये परतावे, यासाठी बांगलादेश सरकार आग्रही भूमिका घेत आहे. हजारो निर्वासितांना एका दुर्गम बेटावर पाठवण्यात आले आहे. या बेटाचे नाव भसान चार असे आहे. याला निर्वासित बेट तुरुंग म्हणतात.
रेहमान यांना वाटले की त्यांना बांगलादेश सोडला तर त्यांच्या मुलीला अधिक चांगले भविष्य असू शकेल. म्हणूनच 2020 मध्ये यास्मिन लहान असतानाच त्यांनी भारत गाठला.
निर्वासितांसंदर्भात काम करणाऱ्या संस्थांनुसार भारतात 10 हजार ते 40 हजार रोहिंग्या निर्वासित राहतात. त्यांच्यापैकी अनेकजण 2012 पासून येथे वास्तव्यास आहेत.
गेली अनेक वर्षे रोहिंग्या या ठिकाणी अत्यंत संयत आयुष्य जगत आहेत. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून ते चार हात लांबच आहेत. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्र्यांनी ट्वीट केले की, निर्वासितांना घरे, सुविधा व पोलीस सुरक्षा मिळणार आहे. तेव्हापासून रोहिंग्यांच्या दिल्लीतील वास्तव्याबद्दल चर्चा होऊ लागली आहे.
भारतात सुमारे 10 हजार ते 40 हजार रोहिंग्या निर्वासित राहतात.
त्यानंतर काही तासांनीच सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सरकारने अशा प्रकारच्या सुविधा रोहिंग्या मसुलमानांना उपलब्ध करू दिल्याचे फेटाळले. उलट त्यांना अनधिकृत परदेशी असे संबोधले आणि त्यांना देशातून हद्दपार केले पाहिजे किंवा घुसखोरांच्या छावणीत (डिटेन्शन सेंटर) पाठविले पाहिजे, अशी भूमिका घेतली.
भाजपा सरकारची भूमिका बदलल्याने रेहमाच्या कुटुंबाच्या भ्रमनिरास झाला आहे आणि ते हताश झाले आहेत. "माझ्या मुलीचे भविष्य धुसर आहे.", असं ते म्हणाले.
"भारत सरकारलाही आम्ही नकोसे झालो आहोत. पण त्यांनी आम्हाला म्यानमारला पाठवण्याऐवजी येथेच मारून टाकावे."
कोणताही देश लाखो रोहिंग्यांना स्वीकारायला तयार नाही. बांगलादेशमधील निर्वासितांनी म्यानमारमध्ये परतले पाहिजे, असे संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त मायकल बॅशलेट यांना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी गेल्या आठवड्यात सांगितले.
पण म्यानमारमध्ये सुरू असलेला संघर्ष पाहता असे करणे त्यांच्यासाठी असुरक्षित असेल असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. रोहिंग्यांविरुद्ध होणाऱ्या अनेक गुन्ह्यांमध्ये आरोप असलेल्या रोहिंग्या जनतेने लष्करी उठाव करून फेब्रुवारी 2021 मध्ये देशाचे नियंत्रण मिळवलं.
शेकडो रोहिंग्यांनी जनतेच्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी मलेशिया आणि फिलिपाइन्ससारख्या देशांमध्ये समुद्रमार्गे धोकादायक प्रवास केला आहे.
बांगलादेशातील निर्वासितांच्या शिबिरांची लोकसंख्या 10 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्यापैकी 5 लाख मुले आहेत.
रेहमानप्रमाणेच कोटिझा बेगम यासुद्धा ऑगस्ट 2017 मध्ये म्यानमधून बाहेर पडल्या. तीन दिवस त्या अन्नपाण्याविना चालत राहिल्या.
कॉक्स बाझारमधील शिबिरातील एका खोलीत त्या व त्यांची तीन मुले राहतात. छप्पर म्हणून प्लास्टिकची शीट आहे, त्याने पावसाळ्यात त्यांना जेमतेम संरक्षण मिळते.
कोटिझा आणि त्यांची तीन मुले या शिबिरांमध्ये अत्यंत घाणेरड्या परिस्थितीत राहतात. म्यानमारमधल्या तिच्या थरकाप उडविणाऱ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.
लष्कराचे सैनिक आमच्या घरात घुसले आणि त्यांनी आमचा छळ केला. त्यांनी गोळीबार सुरू केल्यावर आम्ही तिथून पळालो. मुलांना नदीत फेकले. त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाची त्यांनी हत्या केली.
एनजीओ आणि धर्मादाय संस्थांकडून देणगीरुपाने मिळणाऱ्या अन्नावर कोटिझा अवलंबून आहेत. त्यामुळे तांदूळ व डाळी यावरच त्यांना समाधान मानावे लागते.
"मी त्यांना चांगले अन्न देऊ शकत नाही. चांगले कपडे देऊ शकत नाही, त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधासुद्धा पुरवू शकत नाही," असे त्या म्हणतात.
कोटिझा म्हणतात की, काही वेळा पेन खरेदी करण्यासाठी त्या घरातले अन्नधान्य विकतात, जेणेकरून मुलांना काहीतरी लिहिता येईल.
संयुक्त राष्ट्रांच्या अलिकडील मूल्यमापनानुसार, जी लोकसंख्या पूर्णपणे मानवी मदतीवर अवलंबून होती त्यांच्यासमोरील आव्हानांमध्ये आंतरराष्ट्रीय मदत मिळणे बंद झाल्यापासून भर पडली आहे."
संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार निर्वासितांना पोषणयुक्त अन्न, पुरेसा निवारा, स्वच्छतेच्या सुविधा आणि काम करण्याची संधी मिळणे अजूनही दुरापास्तच आहे.
कोटिझासाठी तिच्या मुलांचे शिक्षण हे सर्वात प्राधान्य आहे. पण, ते मिळविणेही मोठे आव्हान आहे.
एक पिढीच्या पिढी बरबाद झाली आहे, त्यांना शिक्षणच मिळालेले नाही.
"मुले दररोज शाळेत जातात, पण त्यांच्यात वाढ दिसून येत नाही. त्यांच्या शिक्षणाचा दर्जा फार चांगला आहे, असे वाटत नाही," असे कोटिझा म्हणतात.
कॉक्स बाजारमध्ये राहणाऱ्या मुलांना म्यानमारमधील अभ्यासक्रम शिकवतात. बांगलादेशचा अभ्यासक्रम त्यांना शिकवला जात नाही.
या अभ्यासक्रमाच्या पुरस्कर्त्यांच्या मते, एके दिवशी ही मुले त्यांच्या मायदेशात परत जातील, तेव्हा अडचण यायला नको म्हणून त्यांना हा अभ्यासक्रम शिकवला जात नाही तर दुसऱ्यांच्या मते रोहिंग्या निर्वासित लोकसंख्या बांगलादेशींसोबत मिसळू नये म्हणून त्यांना बांगलादेशी अभ्यासक्रम शिकवला जात नाही.
"त्यांना शिक्षण मिळाले तर ते चांगले आयुष्य जगू शकतात. ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात आणि आनंदी राहू शकतात.", असे कोटिझा म्हणतात.
हजारो निर्वासित बांगलादेशमधील कॉक्स बाजार येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या अनेक मुलेही आहेत.
अशीच काहीशी भावना रेहमान यांचीसुद्धा आहे.
"माझ्या मुलीला चांगले शिक्षण व चांगले आयुष्य देण्याचे माझे स्वप्न आहे. पण मी ते साध्य करू शकत नाही."
रोहिंग्यांना आपल्या देशातून पलायन करून पाच वर्षे झाली आहेत. त्यांना अजूनही न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. म्यानमार लष्कराविरुद्ध खटला दाखल झाला असून आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणी सुनावणी अजून झालेली नाही.
पण त्यापेक्षाही त्यांना आपल्या घरी परत जायचे आहे.
जोपर्यंत परिस्थिती सुरक्षित होत नाही, तोपर्यंत रेहमानसारखे निर्वासित जगाकडे अधिक मदत आणि करुणेसाठी विनवणी करत आहेत.
"मी इकडे चोरी करायला आलेलो नाही. मी माझा जीव वाचवायला आलो आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)