तरुणांनो दारु प्या असं हे सरकार का म्हणतंय?

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या देशात तरुणांनी दारू पिऊ नये, व्यसनाधीन होऊ नये म्हणून दारूबंदी किंवा अनेक उपक्रम राबवले जातात. पण जपानच्या सरकारला मात्र काहीतरी वेगळचं वाटतंय.
सरकारच्या मते, तिथल्या तरुणांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण ज्येष्ठांच्या तुलनेत फारच कमी आहे, त्यामुळे तरुणांनी दारूचं सेवन वाढवावं.
पण जपान सरकारला असं का वाटतं?
तर तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण कमी असल्याने सरकारला टॅक्स मध्ये तोटा होतोय. दुसरीकडे जपानमध्ये तांदूळापासून पारंपरिक वाईन बनवली जाते त्याला साके म्हणतात. या वाईनच्या विक्रीतूनही मिळणारा टॅक्स कमी झालाय.
या टॅक्स घटीचा ट्रेण्ड थांबवण्यासाठी जपानच्या नॅशनल टॅक्स एजन्सीने देशव्यापी स्पर्धा आयोजित केली आहे. 'साके व्हिवा' असं या स्पर्धेचं नाव आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांमध्ये साकेला लोकप्रिय बनवून त्याचा खप वाढवण्याचा जपानी सरकारचा मानस आहे, जेणेकरून इंडस्ट्रीला त्याचा फायदा होईल.
टॅक्स एजन्सीने एक स्पर्धा आयोजित केलीय. या स्पर्धेत 20 ते 39 वयोगटातील लोक भाग घेऊ शकतात. या वयोगटातील लोकांनी जपानी साके, शोचू, व्हिस्की, बिअर आणि वाईन लोकप्रिय करण्यासाठी बिझनेस आयडिया द्यायची आहे.
ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या टॅक्स एजन्सीचं म्हणणं आहे की कोव्हिड काळात लोकांनी दारू पिणं फारच कमी केलंय. त्याचप्रमाणे जपानची वयोवृद्ध लोकसंख्याही दारूपासून लांब आहे, त्यामुळे दारूच्या विक्रीत घट आली आहे.
या दारूच्या विक्रीत वाढ व्हावी यासाठी प्रमोशनल कॅम्पेन, ब्रँडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा वापर करून नव्या आयडिया जनरेट व्हाव्यात, असं या एजन्सीला वाटतं.
सरकारच्या या मोहिमेवर लोकांच्या मात्र संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं वृत्त जपानी माध्यमांनी दिलंय. काही लोकांनी ही सवय आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं म्हणत या मोहिमेची हेटाळणी केली आहे.
व्हर्च्युअल क्लबमध्ये या स्पर्धेचं होस्टिंग
या स्पर्धेसाठी बरेच लोक आपल्या आयडिया ऑनलाइन शेअर करत आहेत. तिथल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने एका व्हर्च्युअल क्लबमध्ये होस्टिंग करतानाचा तिचा व्हीडिओ पोस्ट केलाय.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लोकांनी आपल्या आयडिया सप्टेंबर अखेरपर्यंत सरकारी एजन्सीला पाठवायच्या आहेत. त्यानंतर आलेल्या आयडियांचाही विचार केला जाईल. तसेच तज्ञांच्या मदतीने त्यांच्यात सुधारणा केली जाईल. नोव्हेंबर महिन्यात त्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
सरकारच्या या मोहिमेसाठी एक वेबसाईट सुद्धा तयार करण्यात आलीय. त्या वेबसाईटनुसार, जपानचं वाईन मार्केट दिवसेंदिवस घसरत चाललं आहे. यासाठी देशाचा घटता जन्मदर आणि वृद्धांच्या संख्येतील वाढ ही सुद्धा कारणं दिली आहेत.
जपानमध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या आकडेवारीनुसार, जर 1995 ची तुलना 2020 या सालाशी केली असता लोकांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण कमी झालं आहे. 1995 मध्ये एक व्यक्ती एका वर्षात सरासरी 100 लिटर दारू प्यायचा, हेच प्रमाण 2020 मध्ये 75 लिटरवर आलं आहे.
दारूच्या घटत्या प्रमाणामुळे सरकारी उत्पन्नावरही परिणाम झाल्याचं दिसून आलंय.
जपान टाईम्स या वृत्तपत्राच्या आकडेवारीनुसार, 1980 मध्ये सरकारला अल्कोहोलमधून जो महसूल मिळायचा तो 5% एवढा होता. पण 2020 मध्ये हा महसूल घटून 1.7% पर्यंत खाली आलाय. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, जपानी लोकसंख्येच्या 29% लोक हे 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे आहेत आणि जगात हे प्रमाण सर्वाधिक आहे.
महसुलात होणारी घट हाच एक मुद्दा नाहीये. ही समस्या याहीपेक्षा गंभीर आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सर्वात मोठी समस्या आहे ती वृद्धांच्या लोकसंख्येत झालेली वाढ. जपानी कंपन्यांना तरुण कर्मचारी मिळत नाहीयेत. कर्मचारी नसल्यामुळे अनेक रेस्टॉरंट आणि किराणा दुकाने वेळेआधीच बंद होतात. त्याचप्रमाणे अनेक वृद्ध रात्री उशिरा शॉपिंगसाठी येत नाहीत त्यामुळे सुद्धा दुकान लवकर बंद होतात.
त्यामुळे वृद्धांची ही लोकसंख्या भविष्यात जपानच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठं आव्हान ठरणार आहे.
ही समस्या जाणून घेण्यासाठी बीबीसीने जपानी कंपनी क्रिमसन फिनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक युचिरो नाकाजिका यांच्याशी संपर्क केला.
नाकाजिमा यांनी बीबीसीच्या रसेल पॅडमोर यांच्याशी बोलताना सांगितलं की, "बऱ्याच सेक्टर्सना त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. जसं की पूर्वी पेट्रोल पंप असेल किराणा दुकाने आणि इतर बरेच बिझनेस 24 बाय 7 सुरू असायचे. पण आता कामालाच माणसं मिळत नाहीयेत."
आज जपानमध्ये बऱ्याच व्यापारी कंपन्या वृद्धांना टार्गेट करताना दिसतात. त्यांना जपानमध्ये सिल्व्हर इंडस्ट्री म्हटलं जातंय. यात नर्सिंग केअर होम्स आणि ओल्ड एज होम्ससारख्या व्यवसायांचा समावेश आहे.
खरं तर जपानच्या अर्थव्यवस्थेला सध्या तरुण मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








