देश कुठे जाणार? अफगाणिस्तानातले लोक म्हणतात- जिथे अल्लाह घेऊन जाईल

- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, काबुलहून
चौदा ऑगस्टच्या रात्री जेव्हा आम्ही काबुलमध्ये आमच्या हॉटेलच्या रुममध्ये काम करत होतो, तेव्हा बाहेरून गोळ्या चालवण्याचा आवाज आला.
बाहेर काय सुरू आहे, हे आम्ही विचारलं. तेव्हा आम्हाला लोकांनी सांगितलं की, तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेऊन एक वर्षं पूर्ण झालं आहे. त्या आनंदात हवेत गोळीबार केला जात आहे.
आम्हाला खोलीतच थांबण्याचा सल्लाही दिला गेला.
एका वर्षांपूर्वी जेव्हा तालिबान काबुलच्या अगदी उंबरठ्यावर उभं ठाकलं होतं; तेव्हा लोक इथून बाहेर पडण्याची, एअरपोर्ट गाठण्याची कशी धडपड करत होते याची दृश्यं अजूनही अनेकांना आठवत असतील. विमानतळावर झालेल्या स्फोटात अनेकांनी प्राण गमावले होते. विमानाच्या चाकांना लटकून देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न केलेले आणि त्या प्रयत्नात जीव गमवावा लागलेले लोकही आठवत असतील.
सत्तेवर आल्यानंतर तालिबानने आम्ही मुलींच्या शिक्षणाला विरोध करणार नाही, महिलांचा सन्मान करू अशी बरीच आश्वासनं दिली होती. पण सध्याची अफगाणिस्तानातली परिस्थिती पाहता ही केवळ पोकळ आश्वासनंच होती, हे दिसतं.
तालिबान सत्तेत येऊन एक वर्ष झाल्यानंतर लोक खालावलेली आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, उपासमार आणि अशा अनेक समस्यांना तोंड देत आहेत.
'आम्ही निराश आहोत'
काबुल शहरात आम्हाला 19 वर्षांचा एक मुलगा भेटला. तो नोकरीच्या शोधात होता, पण त्याला नोकरी मिळत नव्हती.
तालिबान आल्यामुळे आपल्या आयुष्यात कोणताही फरक पडला नसल्याचं दुसऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं.
एका महिलेनं मला सांगितलं की, अफगाणिस्तानात आमच्या शिक्षणावर निर्बंध आहेत. आम्ही ऑफिसमध्ये काम करू शकत नाही. अगदी अलीकडेच विमानांमध्ये महिलांच्या काम करण्यावर निर्बंध लावण्यात आले. आम्ही निराश आहोत. सुरक्षा थोडीशी बरी आहे, पण महिलांना नोकरीच्या पुरेशा संधीच नाहीयेत. आमची आर्थिक परिस्थिती शून्य आहे. अनेक घरांमध्ये कमावती व्यक्ती नाहीये. विधवा स्त्रिया काम करू शकत नाहीत."

एका विद्यापीठातील विद्यार्थ्यानं आमच्याशी बोलताना म्हटलं की, "तरुणांसाठी परिस्थिती फारच खडतर आहे. कारण तालिबानचं विद्यापीठामधलं वर्तन फारसं चांगलं नाहीये. एक मुलगा कानात इयरफोन घालून युनिव्हर्सिटीत चालला होता. तालिबान्यांनी त्याला 'असं का करतोयस' म्हणत थप्पड लगावली. हे योग्य नाहीये."
दुसऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की, आमच्यावर अगदी भीक मागण्याची वेळ आली आहे.
काबुलमध्ये अनेक लोक तालिबानच्या भीतीने कॅमेऱ्यावर बोलायला कचरत होते आणि कॅमेरा बंद झाल्यानंतर मोकळेपणानं बोलत होते.
अफगाणिस्तानमध्ये युद्ध संपल्यानंतरही शांतता का नाहीये असा प्रश्न लोक विचारताहेत.
पंधरा ऑगस्टच्या दिवशी इथे रस्त्यांवर तालिबानचे पांढरे झेंडे दिसत होते. इथल्या मसूद स्क्वेअर इथं तालिबान किंवा तालिबान समर्थक एकत्र जमले आहेत आणि आनंदोत्सव साजरा करत आहेत. आपल्या विजयाचा आनंद साजरा करताना ते गाणी गात होते आणि झेंडेही फडकवत होते.
सोशल मीडियावर ट्रेंड
ज्यापद्धतीनं गेल्या वर्षभरात तालिबानला विरोध करणाऱ्या इस्लामिक स्टेटच्या गटानं तालिबानवर हल्ले केले होते, ते पाहता 15 ऑगस्टच्या दिवशी काबूल शहरात किंवा बाहेर एखादा मोठा हल्ला होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती.
रस्त्यावर पहारा देत थांबलेल्या तालिबानच्या हत्यारबंद शिपायांच्या चेहऱ्यावरही हा तणाव दिसत होता.
सकाळी समजलं होतं की, तालिबानी मोटर सायकलवरून फिरत आहेत. इथल्या चिकन बाजारातील दुकानं बंद करायला लावली होती आणि स्थानिक लोकांसोबत तालिबानी आक्रमक पद्धतीने वागत होते. त्यांना तिथून जायला सांगत होते.

सोशल मीडियावर एकीकडे #EndTalibanOccupation ट्रेंड करत होता, तर दुसरीकडे काबुलच्या रस्त्यावर आम्हाला गाड्या, मोटरसायकल दिसत होत्या. तालिबान समर्थक नारेबाजी करत होते.
त्यांच्या हातात हत्यारं होती, गॉगल्स लावले होते...अमेरिकन सैनिक देशातून बाहेर पडताना या सगळ्या वस्तू सोडून जात होते.
मी एका व्यक्तीला विचारलं की, देश नेमका कोणत्या दिशेनं चालला आहे? अत्यंत थेट उत्तर मिळालं, "जिथे अल्लाह घेऊन जाईल."
अफगाणिस्तानमध्ये कदाचित युद्ध थांबलं असेल, पण शांतता अजूनही नाहीये.
इथे तुम्हाला परदेशी सैनिक दिसणार नाहीत. पण त्यांच्या गाड्या, त्यांनी सोडलेलं सामानही आहे. ती आता तालिबानची संपत्ती आहे.
अर्थव्यवस्थेची अवस्था अतिशय वाईट आहे. आंतरराष्ट्री फंडिंग बंद आहे. गेल्या काही महिन्यांत दुष्काळ आणि भूकंपामुळे उपासमारीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
लोक आपल्या घरातलं सामान विकत आहेत. गालिचे, फ्रीज...जे विकता येईल ते विकत आहेत. जेणेकरून रोटी विकत घेता येईल.
परिस्थिती अजून बिघडायला लागेल...
शिक्षण आणि काम करण्याचा अधिकार मागण्यासाठी आंदोलन करत असलेल्या महिलांना घाबरवण्यासाठी तालिबानने हवेत कसा गोळीबार केला होता, हे आम्ही पाहिलं होतं.

इथे महिला काहीच क्षेत्रांत काम करू शकतात आणि मुलींचं माध्यमिक शाळेमधलं शिक्षणही बंद झालं आहे. याच कारणामुळे महिला आणि अनेक सामान्य लोक भीक मागण्यासाठी हतबल झाले आहेत. कारण घरात कमावणारा कोणीच नाहीये.
काहीच आठवड्यांत इथे थंडी वाढायला सुरूवात झाली. त्यामुळे परिस्थिती अजून चिघळेल असं वाटतं.
अफगाणिस्तानात प्रचंड थंडी पडते. रशिया-युक्रेन युद्धामुळे आधीच तेल आणि गॅसच्या किमती वाढल्या आहेत. त्यात हाडं गोठविणाऱ्या थंडीत लोकांना स्वतःला उबदार ठेवणं अजूनच कठीण होऊ शकतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








