चीनचं हेरगिरी जहाज 'युआन वांग-5' श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात, भारताचा तीव्र आक्षेप

भारताने चिंतापूर्ण आक्षेप व्यक्त केला असतानाही चीनचं उच्च तंत्रज्ञानयुक्त संशोधन कार्याला वाहिलेलं 'युआन वांग-5' हे जहाज श्रीलंकेतल्या हंबनटोटा बंदरात दाखल झालं आहे.

भारताने यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. मात्र भारताच्या आक्षेपाला बाजूला सारत श्रीलंकेने चीनच्या या जहाजाला आपल्या देशात येण्याची परवानगी दिली आहे.

युआन वांग-5 हे जहाज 16 ते 22 ऑगस्ट या कालावधीत हंबनटोटा बंदरात नांगर टाकून डेरेदाखल असेल, असं श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेच स्पष्ट केलं आहे.

9 ऑगस्ट रोजी रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार चीनचं हेरगिरी करणारं जहाज हंबनटोटासाठी रवाना झालं होतं.

या जहाजातील उच्च तंत्रज्ञानामुळे उपग्रह, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा माग काढणे (ट्रॅकिंग) सहज शक्य आहे. त्यामुळे भारताला चीनकडून हेरगिरीचा धोका निर्माण झाला आहे.

चीनकडून हंबनटोटाचा वापर लष्करी कार्यवाहीसाठी होऊ शकतो, अशी भारताला साशंकता आहे. 1.5 अब्ज डॉलर खर्चून तयार झालेलं हंबनटोटा बंदर हे आशिया आणि युरोप समुद्री मार्गावरचं प्रमुख ठाणं आहे.

हंबनटोटा बंदराच्या उभारणीसाठी घेतलेलं कर्ज चुकवता न आल्याने श्रीलंकेनं चीनकडे हे बंदर 99 वर्षांसाठी गहाण ठेवलं आहे. भारताला तेव्हापासून या बंदरासंदर्भात भीती वाटते आहे. आता तर श्रीलंकेने या बंदरात चीनच्या हेरगिरी करणाऱ्या जहाजालाच थांबण्याची अनुमती दिल्याने भारताच्या काळजीत भर पडली आहे.

युआन वांग-5 हे आंतरराष्ट्रीय स्वरुपाचं जहाज आहे आणि हेरगिरीचंही काम या जहाजाच्या माध्यमातून चालतं.

हिंद महासागरात चीनचा वाढता संचार भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. याबरोबरीने चीन ज्या पद्धतीने श्रीलंकेवर अंकुश बनवू पाहत आहे ते भारतासाठी चिंताजनक आहे.

डिस्टन्स फ्रॉम टू या वेबसाईटनुसार कन्याकुमारी आणि हंबनटोटा बंदरादरम्यान फक्त 451 किमी अंतर आहे. हे अंतर विमानाने फक्त अर्ध्या तासात कापता येऊ शकतं.

हे टाळावं असं श्रीलंकेने चीनला सांगितलं होतं

भारताच्या आक्षेपानंतर श्रीलंकेने चीनला हेरगिरी करणारं जहाज पाठवू नये, असं सुचवलं होतं. भारताने श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांच्याशी थेट चर्चा करून यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. पण भारताने यामागचं कारण स्पष्ट केलं नाही. चीनने श्रीलंकेतल्या बंदरात जहाज का आणू नये याबाबत भारताने सबळ कारण मात्र सांगितलं नाही.

श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. 12 ऑगस्ट 2022 चीनच्या दूतावासाने श्रीलंकेला सूचित केलं होतं की युआन वांग-5 हे जहाज हंबनटोटा इथे येत आहे. हंबनटोटा बंदरात जहाजाला थांबण्यासाठी त्यांनी विनंती केली होती.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन 13 ऑगस्टला चीनच्या जहाजाला हंबनटोटा बंदरात येण्याची परवानगी देण्यात आली. 16 ते 22 ऑगस्ट या कालावधीत हंबनटोटा बंदरात चीनच्या जहाजाला परवानगी मिळाली आहे.

बंदराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की शुक्रवारी चीनचं हे जहाज श्रीलंकेच्या दक्षिणपूर्व भागात साधारण 1,000 किलोमीटर अंतरावर आहे. हळूहळू ते हंबनटोटा बंदराच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

इंडियन एक्स्प्रेसने पीटीआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार हे जहाज आठवडाभर या बंदरात थांबणार आहे.

चीनचं दडपण

गरीब आणि गरजू देशांना कर्ज देऊन त्यांच्यावर दबाव आणत असल्याप्रकरणी चीनवर टीका केली जाते. चीन या माध्यमातून विस्तारवादाचं धोरण अवलंबत आहे.

श्रीलंकेच्या दक्षिण भागातलं हंबनटोटा बंदर सामरिकदृष्ट्या मोक्याच्या जागी आहे. श्रीलंकेने या बंदराची उभारणी चीनकडून कर्ज घेऊन केली आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या कार्यकाळात चीनकडून अब्जावधी रुपयांचं कर्ज घेऊन हंबनटोटा बंदर विकसित करण्यात आलं.

चीनकडून येणारा माल या बंदरात उतरतो आणि इथून देशभर पोहोचवला जातो. 8 कोटी अमेरिकन डॉलर इतके पैसे खर्च करून उभारलेल्या या बंदरात चीनच्या एक्झिम बँकेची 85 टक्के भागीदारी आहे कारण त्यांनीच कर्ज दिलं आहे.

श्रीलंकेला कर्ज देणाऱ्या देशांमध्ये चीनचा प्रमुख वाटा आहे. चीनने श्रीलंकेत भारताचा वाटा कमी करण्यासाठी रस्ते, रेल्वे तसंच विमानतळ अशा प्रकल्पांमध्ये घाऊक गुंतवणूक केली.

भारताचं धोरण

या बंदरात राहून लष्करी आखणीसाठी चीन याचा वापर करेल अशी भारताला भीती आहे. भारताने आक्षेप घेतल्यानंतर हे जहाज केवळ इंधन भरण्यासाठी हंबनटोटा इथे थांबणार असल्याचं चीनने सांगितलंय.

जाफनात चीनची उपस्थिती ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. कारण श्रीलंकेचा हा भाग तामिळनाडूपासून केवळ 50 किलोमीटर अंतरावर आहे.

श्रीलंका आर्थिक संकटात फसलेला आहे. चीनकडून अब्जावधी डॉलर्सची मदत मिळण्याची त्यांना आशा आहे. यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू आहे.

श्रीलंकेला चीनला आणि दुसरीकडे भारतालाही नाराज करायचं नाहीये. पण या दोन बलाढ्य देशांना न दुखावता संतुलन राखणं श्रीलंकेसाठी मोठं आव्हान आहे. भारताने श्रीलंकेला 3.5 अब्ज डॉलर्सची मदत केली आहे.

2020 मध्ये नियंत्रणरेषेनजीक भारत आणि चीन यांच्या लष्करामध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. तेव्हापासून भारत-चीन संबंध दुरावलेले आहेत.

या संघर्षात 20 भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांचा मृत्यू झाला होता. चीन आणि भारताचे संबंध निवळलेले नाहीत, अशा परिस्थितीत हेरगिरी करणारं जहाज श्रीलंकेत दाखल झाल्यामुळे भारताची काळजी वाढली आहे.

हंबनटोटा बंदराचं महत्त्व

दीडशे कोटी डॉलर्स खर्चून हे बंदर उभारण्यात आलं आहे. जगातल्या व्यग्र बंदरांपैकी एक आहे.

चीनची सरकारी संस्था मर्चंट पोर्ट होल्डिंग्जने हे बंदर विकसित केलं आहे. यामध्ये चीनच्या एक्झिम बँकेची 85 टक्के भागिदारी आहे.

बंदर विकसित होत असताना वाद निर्माण झाला होता. बंदराच्या उभारणीला विरोधही झाला होता.

तत्कालीन श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या कार्यकाळात या बंदराची उभारणी झाली. चीनहून आलेला माल या बंदरात उतरवून देशाच्या अन्य भागात वितरित केला जातो.

नव्या कायद्याद्वारे श्रीलंका चीनच्या या व्यावसायिक महत्वाकांक्षेला लगाम घालण्याचा प्रयत्न करत आहे.

युआन वांग-5 आणि शंका

चीनने या जहाजाचं वर्णन संशोधनत्मक काम करणारं जहाज असं आहे. चीन अशा स्वरुपाच्या जहाजांचा वापर उपग्रह, रॉकेट आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणासाठी करतं.

चीनकडे अशा स्वरुपाची सात जहाजं आहेत. प्रशांत महासागर, अटलांटिक आणि हिंद महासागर या भागात ही जहाजं कार्यरत आहेत. सोप्या शब्दांत सांगायचं तर जमिनीवर जे उपग्रह आणि रॉकेटला संचालित करण्यासाठी स्थानक असतं ते काम हे जहाज पाण्यात राहून करतं.

अमेरिकेनेही व्यक्त केली भीती

हंबनटोटात चीनचं जहाज येताच अमेरिकेच्या सुरक्षा खात्यानेही आक्षेप घेतला आहे. हे जहाज पीएलएच्या सामरिक यंत्रणेद्वारे संचालित केलं जातं. सायबर इलेक्ट्रॉनिक, दूरसंचार आणि मनोवैज्ञानिक युद्धकलेवर काम करतं.

हे जहाज चीनच्या जियांगन शिपयार्ड या ठिकाणी तयार करण्यात आलं. 2007 पासून ते चीनच्या सेवेत आहे. 222 मीटर लांब आणि 25.2 मीटर विस्तार असणाऱ्या या जहाजात अत्याधुनिक ट्रॅकिंग तंत्रज्ञान यंत्रणा आहे. गेल्या महिन्यात चीनच्या लॉन्ग मार्च 5B रॉकेटच्या देखभालीत या जहाजाची भूमिका होती.

हंबनटोटापासून भारताचं अंतर किती?

श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरापासून भारताच्या तामिळनाडूच्या चेन्नई बंदराचं अंतर सुमारे 535 नॉटिकल मैल म्हणजेच सुमारे 990 किलोमीटर इतकं आहे.

तर हंबनटोटावरून केरळच्या कोच्ची बंदराचं अंतर सुमारे 609 नॉटिकल मैल आहे. म्हणजेच सुमारे 1128 किलोमीटर.

विशाखापट्टणमवरून हंबनटोटा बंदर 802 नॉटिकल मैल म्हणजे 1485 किलोमीटर अंतरावर आहे.

भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेलं श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र हंबनटोटावरून सुमारे 1100 किलोमीटर अंतरावर आहे.

हंबनटोटा बंदर

  • 150 कोटी डॉलर खर्चून बांधण्यात आलेलं हंबनटोटा बंदर जगातील सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक म्हणून ओळखलं जातं.
  • बांधकामापासूनच हे बंदर वादग्रस्त राहिलं आहे. या बंदराचा विरोध तेव्हापासूनच होतो.
  • माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या कार्यकाळात हे बंदर बांधण्यात आलं. त्यावेळी चिनी साहित्य या बंदरावरून देशाच्या इतर भागात पोहोचवण्याची तत्कालीन सरकारची योजना होती.
  • कोलंबोपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या या बंदराचं बांधकाम करण्यासाठी चीनकडून कर्ज घेण्यात आलेलं आहे.
  • हंबनटोटा बंदराचं बांधकाम चीनच्या चायना मर्चंट पोर्ट होल्डिंग्स या सरकारी संस्थेकडून करण्यात आलं.
  • यामध्ये 85 टक्के वाटा चीनच्या एक्झिम्स बँकेचा होता.
  • श्रीलंकेचं सरकार हे कर्ज फेडताना अडचणीत आल्यानंतर हंबनटोटा बंदर 99 वर्षांसाठी चीनला लीजवर देण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)