You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सर गंगाराम कोण होते, त्यांचं नाव आजही भारत-पाकिस्तानात का घेतलं जातं?
- Author, साजिद इक्बाल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
काही व्यक्तिमत्वांनी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये आपली छाप सोडली. त्यातलेच एक आहेत सर गंगाराम.
ते एक कुशल इंजिनिअर होते आणि दानशूरही होते.
दिल्ली आणि लाहोरमध्ये त्यांचा ट्रस्ट आणि कुटुंबाने त्यांच्या नावाने बांधलेली हॉस्पिटल्स आजही हजारो पेशंटवर उपचार करतात.
फाळणीच्या आधी ते आणि त्यांचं कुटुंब पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये स्थायिक होतं. पण 1947 साली फाळणी झाल्यानंतर त्यांचं कुटुंब दिल्लीला आलं. गंगाराम यांचा 1927 सालीच मृत्यू झाला होता.
लेखक सदत हसन मंटो यांच्या एका लघुकथेत सर गंगाराम आणि त्याचा वारसा लाहोर शहरात किती एकरूप झालाय याचं वर्णन होतं.
या कथेचं नाव आहे पुष्पहार. ही कथा फाळणीच्या वेळी घडलेल्या सत्यघटनांवर आधारित आहे असं म्हणतात. या मंटोंनी लिहिलं आहे की, लाहोरमधल्या गंगाराम हॉस्पिटलच्या समोर असलेल्या त्यांच्या पुतळ्याची काही लोकांनी मोडतोड केली. पण जेव्हा ते करताना एक माणूस जखमी झाला, तेव्हा तोडफोड करणारेच लोक ओरडायला लागले, "अरे त्याला सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये न्या."
गंगाराम कडक शिस्तीचे होते, पण तेवढेच दयाळूही होते. त्यांनी शेती, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर आणि महिला हक्क या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली.
त्यांनी विधवांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न केलेत.
त्यांच्याविषयी आपल्याला जे जे काही माहितेय त्यातलं बरचंस 1940 साली प्रसिद्ध झालेल्या 'हार्वेस्ट फ्रॉम डेझर्ट - लाईफ अँड वर्क्स ऑफ सर गंगाराम' या पुस्तकातून कळलं आहे. हे पुस्तक बाबा प्यारेलाल बेदी यांनी लिहिलं आहे.
गंगाराम यांचा जन्म 1851 साली लाहोरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांगतनवाला गावात झाला.
त्यांचे वडील दौलतराम उत्तर प्रदेशातून स्थलांतरित होऊन या ठिकाणी आले होते आणि तिथे कनिष्ठ पोलीस सब-इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते.
यानंतर त्यांचं कुटुंब पंजाबमधल्या अमृतसरमध्ये येऊन स्थायिक झालं. इथेच गंगाराम यांचं एका सरकारी शाळेत शिक्षण झालं.
त्यांनी आपलं उच्च शिक्षण पाकिस्तानातल्या लाहोरमधून आणि भारतातल्या रूरकी इथल्या थॉमसन इंजिनिअरिंग कॉलेजमधून पूर्ण केलं.
त्यांना रूरकी इथे शिकण्यासाठी महिना पन्नास रूपयांची स्कॉलरशिप मिळाली होती. त्यातले अर्धे पैसे ते आपल्या कुटुंबाला पाठवायचे.
गंगाराम इंजिनिअरिंगची डिग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि लाहोरमधल्या राय बहादूर कन्हैय्या लाल या मुख्य इंजिनिअरकडे शिकाऊ उमेदवार म्हणून लागले. इथूनच लाहोरमधल्या 'गंगाराम कालखंडाची' सुरुवात झाली. ते लाहोरच्या प्रमुख इंजिनिअर्सपैकी एक बनले आणि लाहोर शहराच्या वास्तुकलेवर आपली मोठी छाप सोडली.
लाहोरमधल्या काही महत्त्वाच्या आणि विशाल इमारती डिझाईन करण्याचं आणि बांधण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं. यात लाहोर म्युझियम, एटशिन कॉलेज, मायो स्कूल ऑफ आर्ट्स (ज्याला आता नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्स असंही म्हटलं जातं), जनरल पोस्ट ऑफिस, मेयो हॉस्पिटलची अल्बर्ट व्हिक्टर विंग आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ केमिकल लॅबोरटरी अशा इमारतींचा समावेश होतो.
गंगाराम यांनी कमानींसारख्या भारतीय स्थापत्यशैलीतल्या गोष्टींचा वापर करत, त्याला पाश्चात्य वास्तुकलेची जोड देत इमारती डिझाईन केल्या असं बाबा प्यारेलाल बेदी यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.
यामुळे (फाळणीपूर्व) पंजाब प्रांततली टोकाची थंडी आणि टोकाचा उन्हाळा यापासून बचाव होण्यास मदत झाली.
प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार खालीद अहमद गंगाराम यांचं वर्णन करताना म्हणतात की ते 'आधुनिक लाहोरचे शिल्पकार' होते. त्यांनी या शहरावर न पुसता येण्यासारखी छाप सोडली.
गंगापूरचं स्वप्न
गंगाराम एका बाजूला त्यांच्या सरकारी कामाअंतर्गत लाहोर शहरातल्या इमारती डिझाईन करत होते तर दुसरीकडे त्यांच्या मनात मात्र पंजाबच्या ग्रामीण भागाने घर केलं होतं. अशी जागा जिथे ते लहानाचे मोठे झाले होते.
1903 साली जेव्हा ते आपल्या नोकरीतून निवृत्त झाले तेव्हा त्यांना सरकारने त्यांच्या कामाचं बक्षीस म्हणून चिनाब कॉलनीत (आताचं पाकिस्तानातलं ल्यालपूर-फैजाबाद) जमीन दिली. त्यांनी तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
तिथे त्यांनी गंगापूर हे नवं खेडं बसवण्याचा निर्णय घेतला. एक असं गाव जिथे आधुनिक पद्धतीच्या सिंचन आणि शेतीच्या पद्धती वापरल्या जातील.
गंगापूरपासून साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर बुचिआना रेल्वेस्टेशन होतं. तिथे उतरलेल्या प्रवाशांना गावापर्यंत आणण्यासाठी त्यांनी एक नवीन यंत्रणा विकसित केली.
गावापासून स्टेशनपर्यंत त्यांनी त्यांनी रेल्वेच्या रुळांपेक्षा लहान असे रूळ टाकले. त्यावर दोन ट्रॉली एकमेकांना जोडल्या. या ट्रॉली एक घोडा ओढत घेऊन येत असे. या ट्रॉलीत बसून प्रवासी गावापर्यंत येत.
गंगाराम यांनी त्यांच्या गंगापूर गावात ज्या पद्धतीची सिंचन प्रणाली विकसित केली ती मोठ्या प्रमाणावर वापरली जावी यासाठी ते आग्रही होते. रेनाला खुर्द (फाळणीपूर्व पंजाब प्रांतातलं गाव) इथे असणारा जलसिंचन प्रकल्प त्यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक होता.
या प्रकल्पाचं उद्घाटन 1925 साली झालं. यात पाच टर्बाईन वापरले गेले होते ज्यामुळे 360 चौरस किमी पडीक जमीन ओलिताखाली आली होती.
विधवांचे हक्क
गंगाराम यांची विधवांच्या हक्कासाठीही काम केलं. बेदी त्यांच्या पुस्तकात लिहितात की ते सकाळी उठून जेव्हा कामाची तयारी करायचे, तेव्हा फाईली पाहाताना कधी कधी 'मुंजत-ए-बेगवान' या उर्दू कवितेतली काही कडवी म्हणायचे. या कवितेचा अर्थ होतो 'विधवेची प्रार्थना'.
या कवितेची कडवी म्हणताना त्यांच्या डोळ्यात अनेकदा पाणी तरळायचं. त्यांनी रूढीवादी हिंदू समाजात विधवांच्या हक्कांसाठी जे काम केलं त्यामागे हीच प्रेरणा होती.
1917 साली त्यांनी अंबालातल्या एका धर्मपरिषदेत विधवा पुनर्विवाहाचा ठरावही संमत करून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही.
यानंतर त्यांनी विधवा पुनर्विवाह संस्था सुरू केली आणि त्याला स्वतःच्या खिशातून 2000 रूपये दान केले. ही रक्कम त्याकाळी बरीच मोठी होती.
ही संस्था विधवांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे त्रास याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम करायची. गंगाराम यांच्या लक्षात आलं की काही विधवा पुनर्विवाहासाठी वयाने खूपच मोठ्या आहेत, तर अनेकींना दुसरं लग्न करायचं नाहीये.
मग त्यांनी सरकारच्या मदतीने 1921 साली हिंदू विधवांसाठी आश्रम सुरू केला. याला त्यावेळी अडीच लाख इतका खर्च आला. या आश्रमात त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जायचं ज्यायोगे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. या महिलांना हस्तकलेचं शिक्षणही दिलं जायचं आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना प्रमाणपत्र दिलं जायचं.
गंगाराम यांनी गरीब घरांमधून येणाऱ्या हिंदू आणि शीख मुलींसाठी लेडी मेनार्ड औद्योगिक शाळेची स्थापना केली.
सर गंगाराम ट्रस्ट
1923 साली त्यांच्या नावाने हा ट्रस्ट स्थापन झाला. त्याच वर्षी पाकिस्तानमधल्या लाहोर शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी सर गंगाराम हॉस्पिटल आणि क्लीनिकची स्थापना झाली. काही वर्षांनी त्यांचं मोठ्या, सोयीसुविधांनी युक्त अशा हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आलं.
बेदी यांच्या पुस्तकानुसार तत्कलीन पंजाब प्रांतात मेयो हॉस्पिटलनंतर ते दुसरं सर्वात मोठं हॉस्पिटल होतं. आजही पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातलं ते दुसरं सगळ्यांत जुनं हॉस्पिटल आहे.
1924 साली सर गंगाराम ट्र्स्टने हिंदू विद्यार्थी करियर सोसायटीची स्थापना केली. ही संस्था हिंदू विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करायची. या ट्रस्टने सर गंगाराम बिझनेस ब्युरो आणि वाचनालयाचीही स्थापना केली.
गंगाराम यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये हिंदू अपाहिज आश्रमाची स्थापना केली. हा आश्रम वृद्ध, अपंग आणि निराधार लोकांसाठी होता.
त्यांचा मृत्यू 1927 साली त्यांच्या लंडनमधल्या राहात्या घरी झाला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी परत आणल्या गेल्या आणि हिंदू अपाहिज आश्रम शेजारी दफन करण्यात आल्या. आज पाकिस्तानात हा आश्रम नाहीये, पण त्यांची समाधी अजूनही आहे.
बेदी आपल्या पुस्तकात उर्दू लेखक ख्वाजा हसन निझामी यांनी गंगाराम यांच्याबद्दल जे लिहिलं आहे त्याचा उल्लेख करतात. निझामी लिहितात, "जर कोणाला स्वतःचं आयुष्य दान करता आलं असतं, तर मी माझ्या आयुष्यातली राहिलेली वर्षं सर गंगाराम यांना देऊन मृत्यू पत्कारला असता. म्हणजे त्यांनी उरलेलं आयुष्याही (फाळणीपूर्व) भारतातल्या अबला महिलांची सेवा करण्यात घालवलं असतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, आणि वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)