बॉलिवूडमध्ये गाजलेली 'ही' गाणी पाकिस्तानी गाण्यांवरुन चोरली आहेत?

"हे गाणं भाषा, धर्म, राष्ट्रीयता, असे सर्व अडथळे तोडत थेट हृदयाला स्पर्श करतं. भारताकडून खूप खूप प्रेम."

कोक स्टुडिओ पाकिस्तानच्या यू-ट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये भारतीयांकडून अशा लाखो कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

सध्या कोक स्टुडिओमधील पसुरी या पाकिस्तानी गाण्याला भारतीय प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

अर्थात, पाकिस्तानी गाण्यांना भारतीय प्रेक्षकांनी पसंती देण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. शिवाय हिंदी चित्रपटांतून आपण ऐकलेल्या अनेक गाण्यांचं मूळही पाकिस्तानी होतं. त्यातून काही वादही झाले आहेत.

बॉलिवूड आणि पाकिस्तानी गाण्यांचं हेच कनेक्शन जाणून घेऊया.

हदिका कियानी आणिं कनिका कपूरमधला वाद

बूहे बारियां... म्हणजे दरवाजे आणि खिडक्या ओलांडून येईन वारा होऊन...

पाकिस्तानी गायिका हदिका कियानीचे हे गाणे 1999 पासून अनेकांनी ऐकलं आहे. याच बूहे बारियां गाण्याच्या चालीशी मिळतीजुळती चाल असलेली काही गाणी हिंदी चित्रपटांमध्ये होती.

उदा. 2002 मध्ये प्रीती झिंटा, जिमी शेरगिल आणि अर्जुन रामपाल यांच्या भूमिका असलेल्या 'दिल है तुम्हारा' या चित्रपटातील 'दिल लगा लिया मैने तुम से प्यार कर के' किंवा 2002 याच वर्षी प्रदर्शित झालेल्या शाहरुख, सलमान आणि माधुरी दीक्षित यांच्या भूमिका असलेल्या 'हम तुम्हारे है सनम' या चित्रपटातील शीर्षक गीत.

काही महिन्यांपूर्वी हेच गाणं चाल आणि सुरुवातीच्या काही शब्दांसह नव्याने प्रदर्शित झालं. हे गाणं भारतीय गायिका कनिका कपूरच्या आवाजात 'सारेगामा म्युझिक' कंपनीने 'ओरिजिनल' म्हणून सादर केले आहे. या गाण्याचे बोल आहेत- बूहे बारिया ते नाले कंदा टप्प के...आवांगी हवा बनके बूहे बारिया.

गाण्यातील इतर शब्द वेगळे आहेत, पण चाल आणि बूहे बारियां हे शब्द असलेली ओळ वापरल्याबद्दल पाकिस्तानी गायिका हदिका कियानी हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपली बाजू मांडून आक्षेप घेतला. या आक्षेपावर कनिका कपूरने प्रतिक्रिया दिली.

हदिकाने काय लिहिले होते?

हदिकाने लिहिले की, "बूहे बारियां आणि आणि रोशनी या माझ्या अल्बममधील सगळ्या गाण्यांचे कॉपीराइट्स माझ्याकडे आहेत. बूहे बारियां ही कविता माझ्या आईने लिहिली होती. आपल्याकडे याचे अधिकार असल्याचा कुणी दावा करत असेल तर ते बेकायदेशीर आहे आणि या संदर्भात माझी टीम कारवाई करत आहे. आमच्याकडे 'रोशनी' हा अल्बम प्रकाशित होण्याआधीचे कॉपीराइट्सची कागदपत्रे आहेत. कोणत्याही कंपनीला याचे अधिकार दिलेले नाहीत. कोणत्याही कंपनीकडे माझी स्वाक्षरी असलेले किंवा गाण्याचा अधिकार देत असलेली कागदपत्रे नाहीत. मी बराच काळ या बाबत वाच्यता केली नव्हती."

हदिका ज्या रोशनी अल्बमचा संदर्भ देत आहे, तो 1999 मध्ये आला होता. या अल्बममध्ये 14 गाणी होती. अल्बम प्रदर्शित झाल्यानंतर हदिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

हदिकाने म्हटल्यानुसार, "अजून एका दिवशी आणि अजून एकदा आईने लिहिलेल्या गाण्याची निर्लज्जपणे नक्कल केली गेली. ना कुणी राइट्स मागितले, ना कुणी रॉयल्टी दिली. त्यांनी फक्त माझ्या आईने लिहिलेले गाणे पुन्हा रेकॉर्ड केले, जेणेकरून त्यांना सहज त्याचा आर्थिक लाभ लाभ घेता येईल.

शाहरूख, प्रीती झिंटा यांच्यासारख्या कलाकारांच्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये हे गाणे अनेकदा वापरले गेले आहे. जवळपास प्रत्येक गायकाने हे गाणे स्टेजवर गाऊन पैसे कमवले आहेत. काही व्हिडियोंचे यू-ट्युब व्ह्यूज 20 कोटींहून अधिक असतात. मला फक्त 'ओरिजिनल साँग - बूहे बारियां- हदिका कयानी' लिहून क्रेडिट देतात.

हदिकाने लिहिले आहे, "मी अजून जिवंत आहे, आणि तुम्हाला माझी गाणी वापरायची असतील तर माझी परवानगी घ्या. कुणा दुसऱ्याने गायलेल्या गाण्यांनी पैसे कमावणे चांगले नाही. मी कोणत्याही गायिक-गायिकेच्या विरुद्ध नाही, हे मला स्पष्ट करायचे आहे. मला या पूर्ण प्रक्रियेमुळे दुःख झाले आहे. पाकिस्तानी संगीताची चोरी सुरूच आहे."

बीबीसी हिंदीने या संदर्भात हदिकाशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्याकडून उत्तर मिळालेले नाही.

हदिकाच्या या आरोपांवर कनिका कपूरनेही प्रतिक्रिया दिली होती.

कनिका कपूरने काय लिहिले?

'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत कनिका कपूरने हे आरोप फेटाळून लावले होते.

कनिकानं म्हटलं होतं, "हे गाणे ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समजेल की, हे ओरिजिनल गाणे आहे. अंतऱ्यापासून गाणे संपेपर्यंत. आम्ही फक्त हुक लाइन (बूहे बारिया) वापरली आहे. आम्ही एका जुन्या लोकगीताच्या हुक लाइनचा उपयोग केला आहे. माझ्या आणि कंपनीनुसार हे एक लोकगीत आहे.

कनिका म्हणते, "आम्ही या गाण्याचे अनेक व्हर्जन ऐकले आहेत आणि कोणीही याबद्दल कधीच काहीही म्हटलेलं नाही. आम्ही लोकगीत कॉपी-पेस्ट केलेले नाही. आम्ही फक्त दोन ओळी घेऊन त्यापासून प्रेरणा घेतली. हे गाणे लिहिणारे आणि कंपोझ करणारे अनुक्रमे कुंवर जुनेजा आणि श्रुती राणे यांच्यावर हा अन्याय आहे. मी दुसऱ्याच्या कामाची चोरी करत आहे, असे कुणी म्हणत असेल तर हे चुकीचे आहे."

कनिकाने 'हिंदुस्तान टाइम्स'ला सांगितले होते, "मी त्यांचे गाणे चोरले किंवा आम्ही त्यांना क्रेडिट देत नाही आहोत, याचे मला दुःख आहे. पण या बाबतीत नकारात्मक होण्याऐवजी परस्परांची साथ दिली पाहिजे. मला द्वेषपूर्ण मेसेज येत आहेत. लोक किती लवकर निष्कर्ष काढतात, हे पाहून मला दुःख होते."

भारत विरुद्ध पाकिस्तान : गाण्यांची नक्कल करण्याचा भूतकाळ

गाणे वा गाण्याची चाल चोरल्याच्या आरोपावरून भारत आणि पाकिस्तानातील गायक-गायिका आमने- सामने आल्याचा हा पहिलाच प्रसंग नव्हता. त्याचप्रमाणे एका देशात गायलेले गाणे दुसऱ्या देशात पुन्हा वापरले गेले आहे.

याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे मनोज मुंतशिर यांनी लिहिलेले आणि अलिकडेच प्रदर्शित झालेले 'दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल… बोल हमारा क्या होगा' हे गाणे आहे. हे गाणे जुबिन नौटियालने गायले आहे.

पण ही कव्वाली या आधी नुसरत फतेह अली खान आणि अनेक पाकिस्तानी गायकांनी गायली आहे. या कव्वालीचे शब्द होते, 'दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल… बोल कफारा क्या होगा?'

या गाण्यांची यादी खूप मोठी आहे. त्यापैकी 5 गाणी येथे देत आहोत.

1.तुम्हें अपना बनाने की कसम खाई है

1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सडक' या चित्रपटातील 'तुम्हें अपना बनाने की कसम खाई है' हे गाणं. या गाण्याची चाल मुस्तफा झैदी यांनी लिहिलेल्या आणि गायक मुसर्रत नझीर यांनी गायलेल्या 'चले तो कट ही जाएगा सफ़र आहिस्ता..' या गाण्यावरून उचलली असल्याचे दिसून येते

2.हवा हवा ये हवा

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या - 'इन्साफ अपने लहू से' या चित्रपटातील 'हवा हवा ये हवा' आणि 2017 मधील 'मुबारका' या चित्रपटातील हवा हवा या दोन्ही गाण्यांची चाल आणि शब्द 80च्या दशकात पाकिस्तानी गायक हसन जहांगीरने गायलेल्या गाण्याशी मिळतेजुळते आहेत.

3.मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए

2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दबंग' चित्रपटातील 'मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए' सारखंच एक गाणं 1993 मध्ये उमर शरीफ यांच्या 'मिस्टर चार्ली'मध्ये होते. गाण्याचे शब्द होते - लडका बदनाम हुआ… हसीना तेरे लिये. याच शैलीतील आणि शब्द असलेले गाणे बप्पी लहरी यांनीही गायले होते.

4. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बेवफा सनम'मधील 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का…'

हे विरहाचे आणि भारतातल्या गल्ल्यांमध्ये चालणाऱ्या रिक्षांमध्ये वाजणारे हे गाणे. 1970 मध्ये पाकिस्तानमधील 'विछोरा' चित्रपटात नूरजहाँ ने गायलेले 'कोई नवा लारा लाके मैनू बोल जा, झूठयां वे एक और झूठ बोल जा…' या गाण्याची चाल ऐकल्यावर या गाण्याचं मूळ कळतं.

5. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातील 'कितना प्यारा तुझे रब ने बनाया…'

1997 मध्ये निधन झालेल्या नुसरत फतेह अली खान यांनी मृत्यूच्या अनेक वर्षांपूर्वी गायलेल्या 'किन्ना सोहणा तेनू रब ने बनाया, दिल करे देखता रहूं' या गाण्याची चाल आणि शब्द सारखे आहेत.

नुसरत फतेह अली खान यांची गाणी आणि बॉलिवूड

सोशल मीडियावर असाही एक व्हीडिओ पाहायला मिळतो, ज्यात एक अँकर नुसरत फतेह अली खान यांना विचारते की, तुमची सर्वोत्तम नक्कल कोणी केली? त्यावर ते म्हणतात - विजू शाह आणि अन्नु मलिक यांनी उत्तम नक्कल केली आहे.

संगीत दिग्दर्शक विजू शहा यांनी 'मोहरा' चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणे लोकप्रिय झाले होते.

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या काही वर्षे आधी नुसरत फतेह अली खान यांनी एक कव्वाली गायली होती - दम मस्त कलंदर मस्त, मस्त....सखी लाल कलंदर मस्त मस्त.

असंच एक गाणं 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'याराना' चित्रपटातील होते. गाणे होते - मेरा पिया घर आया…

हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी नुसरत फतेह अली खान यांनी गायलेली 'मेरा पिया घर आया' ही कव्वाली आजही यूट्युबर ऐकता येऊ शकते.

भारतीय गाण्यांची नक्कल

भारतीय चित्रपटांमधीलसुद्धा काही गाण्यांची नक्कल झालेली आहे

गाणी चोरण्यात किंवा प्रेरित होण्यात भारतीयच आहेत असं नव्हे. भारतीय चित्रपटांमधील गाण्यांची नक्कल परदेशांत झालेली आढळते.

  • 2012 मध्ये 'एक था टायगर' या चित्रपटातील सैंयाराच्या चालीची नक्कल 2013 मध्ये माइल किटिक या गायकाने रकीजा गाण्यात केली होती.
  • 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या रा वन चित्रपटातील 'छम्मकछल्लो' या गाण्याची नक्कल 2013 मध्ये दारा बुबामाराने केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)