माओंचा चिमण्या मारण्याचा तो आदेश ज्यामुळे चीनची अवस्था नरकाहूनही भयावह झाली...

"1958 ते 1962 दरम्यान चीनची अवस्था नरकाहूनही भयावह बनली होती."

"द ग्रेट फेमिन्स इन माओज चायना" या पुस्तकाची सुरुवातचं या दमदार वाक्याने होते. डच इतिहासकार फ्रँक डिकोटर यांचं हे पुस्तक आहे.

'द ग्रेट लीप फॉरवर्ड' म्हणवल्या गेलेल्या चीनच्या एका कालखंडाचं वर्णन या पुस्तकात करण्यात आलंय. डाव्या विचारसरणीवर आधारित चीनचा पाया रचणाऱ्या माओ त्से तुंग यांनी चीनला एका भयानक शर्यतीत ढकललं होतं. पाश्चिमात्य देशांनी केलेल्या विकासाची बरोबरी साधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सामूहिक शेती आणि जलद औद्योगिकीकरण करण्यात आलं.

'पुढे जाण्याच्या' या शर्यतीत मोठा दुष्काळ पडला. या ऐतिहासिक दुष्काळात किती लोक मारले गेले याबद्दल इतिहासकारांमध्ये एकमत दिसत नाही. डिकोटर यांच्या आधी ज्यांनी अंदाज बांधले त्यानुसार मृतांची संख्या 1.5 कोटी ते 1.25 कोटींच्या घरात होती. पण डच इतिहासकार फ्रँक डिकोटर यांच्या मते, 1958 ते 1962 या काळात सुमारे साडेचार कोटी लोक मरण पावले.

बीबीसी मुंडोशी बोलताना किम टॉड म्हणतात की, त्या भयानक काळात सर्वात भयानक असं काय असेल तर ते 'चिमण्यांना मारण्याची मोहीम' असेल.

"माओच्या ग्रेट लीप फॉरवर्डच्या एका भागात प्राण्यांविरुद्धची मोहीम सुद्धा होती. या मोहिमेत चार प्रकारचे प्राणी हानिकारक म्हणून घोषित करण्यात आले. यात उंदीर, डास, माश्या आणि कीटक आणि चिमण्यांचा समावेश होता. हे प्राणी चीनच्या विकासात अडथळा आहेत असं ठरवलं गेलं. माओने चीनची सर्व शक्ती पणाला लावून या प्राण्यांपासून सुटका करून घ्यायचं ठरवलं."

चीनचं आरोग्य आणि स्वच्छतेच्या नावाखाली पहिल्या तीन प्राण्यांना मारण्यात आलं. पण चौथ्याने वेगळ्याच प्रकारचा गुन्हा केला होता.

निसर्ग इतिहास तज्ज्ञ आणि 'स्पॅरो' या पुस्तकाचे लेखक जिम टॉड म्हणतात, "चिमण्यांचा या यादीत समावेश करण्यात आला होता कारण त्या भरपूर धान्य खायच्या. धान्याचा प्रत्येक कण हा फक्त लोकांसाठीचं असला पाहिजे असा माओचा अट्टहास होता."

पण चिमण्यांना हद्दपार करण्याची मोठी किंमत चीनने चुकवली. चीनला या यादीतून चिमण्या काढूनच टाकाव्या लागल्या नाहीत तर हा पक्षी त्यांना इतर देशांतून मागवावा लागला.

नामशेष होण्याच्या मार्गावर

त्या वर्षांत चीनमध्ये नेमकं काय काय घडलं याचं वर्णन करताना, पर्यावरणवादी पत्रकार आणि लेखक जॉन प्लेट सांगतात, "इतिहासात निसर्गाच्या विनाशाच्या कथा सापडतील पण 1958 मध्ये चीनमध्ये जे काही घडलं त्याची तुलना खचितच कोणाला करता येईल."

त्यावर्षी, चीनचे संस्थापक नेते माओ यांनी ठरवलं होतं की, चीन चिमण्यांशिवाय जगू शकतो. त्यांच्या इतर अनेक धोरणांप्रमाणेच या चुकीच्या निर्णयाचा परिणाम इतका व्यापक प्रमाणावर झाला की विनाशाची साखळी सुरू झाली.

अमेरिकेतील पोर्टलँड येथून बीबीसी मुंडोशी बोलताना प्लॅट यांनी सांगितलं की, चिमण्यांना मारण्यासाठी अनेक पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

"त्यांना गोळ्या घातल्या गेल्या, त्यांची घरटी पाडण्यात आली, अंडी फोडली. हे कमी काय म्हणून त्यांचा पाठलाग करून आणि त्या बेशुद्ध होईपर्यंत गोंगाट घालण्यात आला."

चिमणीला आपल्या घरट्यात विश्रांती घ्यावी लागते. उडताना या चिमुकल्या पक्ष्याची ऊर्जा संपून जाते आणि त्या थकतात. अशात त्यांना विश्रांतीची गरज असते. सतत उडत राहणं आणि अन्न शोधण या पक्ष्यांसाठी खूपच त्रासदायक असतं.

प्लॅट यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर चिमण्या मारल्या गेल्या की, लोक मेलेल्या चिमण्या फावड्याने उचलून फेकायचे अशा गोष्टी ऐकायला मिळतात. चीनमध्ये जो पक्षी सर्वाधिक आढळायचा तोच पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर होता.

टॉड सांगतात की, चिमण्यांना मारण्यासाठी वापरलेल्या पद्धतीने फक्त चिमण्याच नव्हे तर इतर पक्षांच्या प्रजातीही बळी पडल्या.

"लोकांच्या जमावाने त्यांची घरटी तोडली. जिथं चिमण्या दिसल्या तिथं त्यांना मारून टाकलं. बीजिंगसारख्या शहरात लोक एवढा दंगा करायचे की, पक्षी उडता उडता दमून मरून जायचे. याचा परिणाम केवळ चिमण्यांवरच नाही तर पक्ष्यांच्या इतर प्रजातींवरही झाला.

चिनी पत्रकार आणि पर्यावरण कार्यकर्ते डाय किंग यांनी मागे बऱ्याच वर्षांपूर्वी लिहून ठेवलं होतं की "माओला प्राण्यांबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यांना त्यांच्या योजनेवर ना चर्चा करायची होती ना तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा होता. त्यांनी फक्त निर्णय घेतला की या चार प्रजाती नष्ट करायच्या आहेत."

पण नंतर असं काय घडलं की उंदीर, डास, माश्या मेल्या पण चिमणी वाचली.

टोळ धाड

टॉड सांगतात की, "या मोहिमेनंतर कीटकांचा हल्ला झाला होता. लोकांना समजलं की, हे चिमण्या मारल्यामुळेच घडलं आहे. अखेरीस चिमणीला या यादीतून वगळण्यात आलं आणि त्याऐवजीढेकणांना या यादीत टाकण्यात आलं."

"नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी चीनला रशियातून लाखो चिमण्या आणाव्या लागल्या."

पूर्व आशियातील तज्ञ आणि बीबीसी पत्रकार टिम लुआर्ड सांगतात की, चिमण्यांना टोळ हा कीटक खायला आवडतो.

"पण टोळ खाण्यासाठी चिमण्या उरल्याच नव्हत्या. याचा परिणाम असा झाला की, यामुळे पिकांवर टोळ धाड पडायला लागली. पीकपाणी नष्ट व्हायला लागलं आणि अखेरीस भीषण दुष्काळ पडला आणि यात लाखो लोकांचा जीव गेला."

पण टॉड सांगतात की चिमण्यांची हत्या, टोळ धाड आणि दुष्काळ यांच्यात थेट संबंध जोडता येणं थोडं अवघड आहे.

"चिमण्या मुख्यतः धान्य खातात. तर आपल्या पिल्लांना त्या कीटक खायला घालतात. हे काम त्या वर्षाच्या एका विशिष्ट वेळी करतात. आता जर चिमण्याचं नसतील तर कीटकांच्या संख्येवर त्याचा थेट परिणाम होईल."

यातली महत्वाची गोष्ट म्हणजे या मोहिमेअंतर्गत फक्त चिमण्याचं मारल्या गेल्या नाहीत तर चिमण्यांच्या इतर प्रजातींनाही लक्ष्य करण्यात आलं आणि या प्रजाती चिमण्यांपेक्षा जास्त कीटक खायचे.

तेच प्लॅट सांगतात, "दुष्काळाला चिमण्यांविरुद्धची मोहीम कारणीभूत होती असं म्हणणं वावगं ठरू नये. पण दुष्काळामागे इतरही कारण होती."

प्लॅट यांना वाटतं की, दुष्काळाचं मुख्य कारण 1960 मध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं. शिवाय चीनच्या हुकूमशाहा सरकारने निसर्ग बदलण्याच्या प्रयत्नात ज्या चुका केल्या होत्या त्यांकडे ही कानाडोळा करण्यात आला होता.

या चुकांमध्ये कृषी उत्पादनाच्या पद्धतीसुद्धा बदलल्या गेल्या. ज्यामुळे पिकांची नासाडी झाली.

बरेच लेखक म्हणतात की, सरकारने उद्योगांना चालना देण्यासाठी स्टीलचे उत्पादन वाढवलं. यात अनेकांना आपली गावं सोडून कारखान्यात काम करायला जावं लागलं. त्यामुळे शेतीचे उत्पादन घटलं आणि दुष्काळात गरजा भागवता आल्या नाहीत.

युद्धाचा परिणाम

प्लॅट सांगतात की, "मला आजही यात समानता आढळते आहे. आज जगभरात पुन्हा हुकूमशाहीने डोकं वर काढलंय. आपण आज असे लोक बघतोय की जे विज्ञानावर आधारित नसलेले निर्णय घेत आहेत. आपण दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा पाहतोय." अशी अनेक कारण आहेत ज्यात निसर्गाचा समतोल ढासळलेला दिसतोय.

त्याचवेळी टॉड म्हणतात की, फक्त चीननेचं नाही तर इतिहासात याआधी सुद्धा चिमण्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं.

"अमेरिकेतही चिमण्याविरुद्ध रान पेटलं होतं पण ते चीनसारखे नव्हतं."

19 व्या शतकाच्या मध्यातली ही गोष्ट असेल. त्यावेळी अमेरिकन लोकांना असं वाटलं की, कीटक खाण्यासाठी चिमण्या आणायला हव्यात.

चिमण्यांची आयात

टॉड सांगतात, "बर्‍याच लोकांनी चिमण्या आयात केल्या. ब्रुकलिन, ओरेगॉन, सिनसिनाटी आणि संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये चिमण्या आणल्या. पण पुढे काही दशकांत चिमण्यांची संख्या प्रचंड वाढली. त्याच दरम्यान अनेक भागांतून देशी पक्षी नाहीसे होत असल्याचं पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्यांसह अनेक लोकांच्या लक्षात आलं. चिमण्या इतर अनेक प्रजातींवर देखील आक्रमक होऊ शकतात याचंच जे उदाहरण होतं.

अशा परिस्थितीत चिमण्यांची संख्या नियंत्रित करायची आहे असं म्हणणारे आणि चिमण्या टिकवायच्या आहेत असं म्हणणारे आमने सामने आले.

पण या संघर्षाचा परिणाम चीनसारखा झाला नाही.

टॉड सांगतात, "आपला युक्तिवाद बरोबर आहे हे सिद्ध करणं दोन्ही पक्षांना जमलं नाही. पण या संघर्षात चिमणी जिंकली असं आपण म्हणू शकतो. कारण मी अमेरिकेच्या मध्यभागी असलेल्या मिनियापोलिसमध्ये बीबीसीला आपली मुलाखत देत बसलोय आणि माझ्या खिडकीच्या बाहेर चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येतोय. अर्थात, चिमण्यांनी अमेरिकेत आपलं स्थान पक्कं केलंय."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)