You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
GAM: बीबीसीची भारतीय भाषांमधील घोडदौड कायम, आठवड्याचे 7 कोटी वाचक
ग्लोबल ऑडियन्स मेजर्स (GAM) च्या ताज्या आकडेवारीनुसार बीबीसी न्यूजमध्ये भारतीय भाषांची घोडदौड कायम आहे. या अहवालानुसार भारतीय भाषातील वाचकांची संख्या आता दर आठवड्याला 7 कोटी इतकी आहे.
कोरोना काळात माध्यम व्यवसायाला जगभरात झळा पोहोचलेल्या असताना बीबीसीच्या भारतीय भाषांची ही भरारी उल्लेखनीय समजली जात आहे. 'भारतीय भाषा' हा हिंदी, तामिळ, मराठी, तेलुगू, गुजराती आणि पंजाबी या सहा भाषांचा समूह आहे.
2022 या वर्षांत जगभरात बीबीसीच्या वाचकांची संख्या दर आठवड्याला सरासरी 49.2 कोटी इतकी आहे. त्यापैकी भारतीय भाषांतील वाचकांची संख्या सरासरी 7 कोटी आहे.
तर बीबीसी मराठीच्या वाचक-प्रेक्षकांची दर आठवड्याची संख्या 54 लाख आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बीबीसी मराठीच्या वाचक-प्रेक्षकांच्या संख्येत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सर्व भारतीय भाषांमध्ये हिंदी अग्रेसर आहे. हिंदीच्या वाचक-प्रेक्षकांची संख्या 3.23 कोटी इतकी आहे.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्ये भारतीय वाचकांची संख्या सर्वाधिक
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्ये भारतीय वाचकांची संख्या सर्वाधिक आहे.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या एकूण वाचकांपैकी 40 टक्के वाचक हे भारत, नायजेरिया, इराण, टांझानिया, केनिया या देशातून आहे तर 25 टक्के वाचक हे अमेरिकेतून आहे.
वर्ल्ड सर्व्हिसमध्ये भारतीय भाषा हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि भारतातील वाचकांची संख्या सातत्याने वाढत आहे.
सलग तीन वेळा भारतीय भाषा प्रथम क्रमांकावर आहेत, यावर भारतीय भाषांच्या प्रमुख रूपा झा यांनी आनंद व्यक्त केला आहे.
बीबीसीच्या भारतीय भाषांच्या प्रमुख रूपा झा याबद्दल बोलताना म्हणाल्या, "बीबीसीची भारतातली वाढ आणि आमच्या बातम्यांचा वाढता सकारात्मक प्रभाव पाहून मला खूप आनंद होतोय. भारतीय माध्यमक्षेत्रात सध्या खूप गोंगाट आणि गोंधळ आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसीला वाचकांनी विश्वासाचं माध्यम म्हणून आपलंसं केलंय. बीबीसीच्या भारतीय भाषांनी सलग तिसऱ्या वर्षी त्यांची आगेकूच चालू ठेवलेली आहे. सध्याच्या फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीच्या जमान्यात वाचकांनी बीबीसीला सगळ्यांत विश्वासू आणि निष्पक्ष माध्यम म्हणून प्राधान्य दिलंय हा आनंद अवर्णनीय आहे."
"समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त ठरणारी सर्वसमावेशक, निष्पक्ष, वस्तूनिष्ठ पत्रकारितेवर लोकांनी हा विश्वास दाखवला आहे," असे रूपा झा यांनी म्हटले.
"लोकांच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव पडावा यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. लोकांच्या ज्ञानात वृद्धी करणारे तसेच अभिरुची संपन्न कंटेट बीबीसीच्या माध्यमातून लोकांना मिळेल याकडे आमचे लक्ष राहील.
"महिलांचे सबळीकरण व्हावे, त्यांचा विविध क्षेत्रातील सहभाग वाढावा यासाठी भारतीय भाषांनी विशेष प्रयत्न केले आहेत. येत्या काळात जास्तीत जास्त महिलांपर्यंत बीबीसीची सेवा पोहोचावी यासाठी विशेष बातम्या, लेख, रिपोर्ताज, दृकृ-श्राव्य कार्यक्रम यांची निर्मिती करण्यात येईल," असे रूपा झा यांनी सांगितले.
"भारतीय भाषा आणखी प्रभावशाली व्हाव्या आणि जास्तीत जास्त लोक बीबीसीच्या विविध प्लॅटफॉर्म्सचा अधिक काळासाठी लाभ घेतील यासाठी प्राधान्य असेल," असं रूपा झा यांनी सांगितले.
प्रचारकी बातम्या, फेक न्यूज इंटरनेटवर पसरलेल्या असताना बीबीसीच्या निष्पक्ष पत्रकारितेची दखल जगाने घेतली आहे अशी भावना बीबीसीच्या आंतरराष्ट्रीय वृत्त सेवेच्या वरिष्ठ नियंत्रक लिलियन लॅनडोर यांनी म्हटले आहे.
लॅनडोर म्हणाल्या, "माध्यम क्षेत्रात संपूर्ण जगासाठीच बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस हा एक अमूल्य ठेवा आहे. रशिया-युक्रेनमध्ये अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांचे वार्तांकन हे त्याचे उत्तम उदाहरण ठरू शकते. बीबीसीची निष्पक्ष, वस्तूनिष्ठ पत्रकारिता ही महत्त्वाची ठरली. प्रचारकी बातम्या, फेक न्यूज यांच्याविरोधात लढा देण्यात बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे."
बीबीसीवर कोणत्या प्रकारच्या कंटेटला वाचकांची पसंती
युक्रेन-रशिया युद्ध, कोव्हिड, युद्धामुळे मानवतेचे काय नुकसान झाले या गोष्टी समजून घेण्यासाठी बीबीसीचे वाचक आणि प्रेक्षक वारंवार बीबीसीच्या विविध प्लॅटफॉर्मवर येतात असे अहवाल सांगतो.
याचे उदाहरण द्यायचे झाले तर असे देता येईल की रशियाने युक्रेनवर आक्रमण का केले हा लेख 4.3 कोटी लोकांनी वाचला आहे.
2022 मध्ये बीबीसीच्या टीव्हीच्या प्रेक्षकांची दर आठवड्याची संख्या 22 कोटी आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर 18 कोटीहून अधिक वाचक दर आठवड्याला भेट देतात तर, रेडियोच्या श्रोत्यांची संख्या दर आठवड्याला 16 कोटी आहे.
बीबीसीचे सर्वाधिक वाचक/प्रेक्षक असलेले देश
- भारत - 7 कोटी
- अमेरिका - 5 कोटी
- नायजेरिया - 3.4 कोटी
- केनिया - 1.6 कोटी
- इराण - 1.4 कोटी
- टांझानिया - 1.4 कोटी
- बांगलादेश - 1.2 कोटी
- अफगाणिस्तान - 1.2 कोटी
- ब्राझिल - 90 लाख
- डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो - 80 लाख
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)