You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेम्स वेब दुर्बिणीने टिपले दूरवरचे तारे, नवीन दीर्घिका आणि बरंच काही – पाहा फोटो
नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीतून अवकाशाचे एकापेक्षा एक रंगीत फोटो पहिल्यांदाच जगासमोर येत आहेत. यापूर्वीच्या हबल दुर्बिणीने जी चित्र जगाला अनेक वर्षांपूर्वी दाखविली होती, त्यापेक्षा कित्येक पट अधिक स्पष्ट चित्र आता जेम्स वेब नावाच्या या महाकाय दुर्बिणीतून जगाला पाहायला मिळत आहेत.
कोणकोणती चित्र आहेत यात?
सदर्न रिंग (Southern Ring) हा वायू आणि धुळीचा एक महाकाय गोळा आहे, जो सतत मोठा होतोय. सदर्न रिंग या गोळ्याचा व्यास साधारण अर्धा प्रकाशवर्ष आहे आणि तो पृथ्वीपासून सुमारे 2000 प्रकाशवर्ष दूर आहे.
त्याच्या मध्यभागी एक खचत चाललेला तारा आहे, ज्यामुळे हा गोळा प्रकाशमान झालेला आहे. याला "Eight burst" नेब्युला सुद्धा म्हटलं जातं.
या चित्रात आपण एक बुडबुड्यासारखा आकार पाहतोय, ज्याला पद्धतशीरपणे काही पदर दिसतात. यातला नारंगी फेससारखा पदर हायड्रोजन आणि नेब्युलाच्या धुळीचा भाग प्रज्वलित झाल्याने तयार झालाय. मध्यभागी असलेला निळसर भाग ताऱ्याचं तापमान वाढल्यामुळे त्याभोवतीचा वायू आयोनाईझ झाल्यामुळे तयार झालाय.
जेव्हा एखादा तारा म्हातारा होत जातो, तेव्हा तो त्याची ऊर्जा निर्मितीची पद्धत बदलत जातो आणि त्यासोबतच त्याचा बाहेरचा पदर एक-एक करून उलगडत जातो. आणि जेव्हा त्याचं तापमान प्रचंड वाढतं, तेव्हा त्याने बाहेर फेकलेले पदर प्रज्वलित होत जातात, ज्यामुळे अशी एक प्रतिमा दिसून येते, जशी आता जेम्स वेबने टिपली आहे.
जेम्स वेब दुर्बिण हेच शोधायला निघाली आहे की ताऱ्यांचा जन्म कसा होतो, पण त्यासोबतच हेही शोधतेय की ते मरतात कसे.
स्टिफन्स क्विंटेट
स्टिफन्स क्विंटेट हा मानवाला सापडलेला सर्वांत पहिला लहान दीर्घिकांचा समूह होता. पृथ्वीपासून जवळजवळ 29 कोटी प्रकाशवर्षं दूर असलेली ही दीर्घिका पेगासस या नक्षत्रात येते.
जेम्स वेब दुर्बिणीने टिपलेलं हे चित्र प्रथमदर्शनी हबल दुर्बिणीने टिपलेल्या चित्रांपेक्षा जास्त वेगळी दिसत नाही. पण या नवीन दुर्बिणीच्या अद्ययावत इन्फ्रारेड सेन्सरने या दीर्घिकेची नक्कीच नवीन आणि तितकीच भन्नाट वैशिष्ट्य टिपली असेल, हे नक्की.
खरंतर जेम्स वेबकडून हीच आशा होती - की तिने हबलच्या बरोबरीने आणखी बारकाईने अंतराळ संशोधनासाठी मदत करावी. कारण आपल्याला माहिती नाही की हबल आणखी किती दिवस आपल्याला साथ देईल - ती दुर्बिण आधीच 32 वर्षं जुनी आहे. तिच्या काही तांत्रिक बिघाड होऊ शकतात, पण नासाची जी टीम त्यावर काम करतेय, त्यांनी आत्ताच हबलच्या पुढच्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी बजेटचा प्रस्ताव मांडला आहे.
करिना नेब्युला
करिना नेब्युला (तेजोमेघ) हा मुळात हबल दुर्बिणीच्या सर्वांत पहिल्या लक्ष्यांपैकी एक होता. एक नेब्युला म्हणजे तारे आणि धुळीच्या मिश्रणातून बनलेलं एक ढगाळ भाग, ज्यामुळे काळ्याकुट्ट आकाशात एक मोठा प्रकाशमान झालेला भाग दिसतो.
आता जेम्स वेबने त्याच भागाचा अत्यंत स्पष्ट फोटो टिपलाय. हा नेब्युला पृथ्वीपासून साधारण 7,600 प्रकाशवर्ष दूर आहे. पण या फोटोत आपल्याला काही विशेष तारे नाही दिसत - दिसतात ते नुसते ढग आणि त्यांच्या भवतालचा वायू.
खगोलशास्त्रज्ञ याला "कॉस्मिक रीफ (Cosmic Reef)" म्हणतात, ज्यात खालच्या भागात धूळ आणि वरच्या भागात वायू स्पष्टपणे वेगवेगळा पाहायला मिळतो. जेम्स वेब दुर्बिणीच्या मूळ उद्देशांपैकी एक आहे ताऱ्यांचा जन्म कसा होतो, याचा शोध घेणे. आणि करिना नेब्युला त्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे.
हे सगळे फोटो का महत्त्वाचे आहेत?
बीबीसी न्यूजच्या विज्ञान संपादक रिबेक्का मोरेल यांचं विश्लेषण:
जेम्स वेब स्पेस टेलेस्कोपने टिपलेले हे फोटो थक्क करून टाकणारे आहेत. जरा एक क्षण या फोटोंकडे निरखून पाहा आणि तुम्हाला कळेल - यापैकी प्रत्येक मोठ्या ठिपक्यात शेकडो दीर्घिका दडल्यात, ज्यामुळे अब्जावधी तारे आहेत.
पण आत्तापर्यंत आपल्याकडे आलेली ही चित्रं आणि ही माहिती फक्त काही आठवड्यांच्याच निरीक्षणांचा परिणाम आहे. आणि जेम्स वेबने आतापर्यंत अंतराळाच्या एका लहानशा भागाचाच वेध घेतलाय - ती दुर्बिण पुढची किमान 20 वर्षं हेच काम करणारे.
शास्त्रज्ञांना आशा आहे की यातून आणखी बऱ्याच गोष्टी दिसतील - पहिल्या ताऱ्यांचा जन्म होताना आणि आपल्या आवाक्याबाहेरील इतर ग्रह ज्यावर जीवन शक्य आहे.
पण याहून भारी म्हणजे त्या गोष्टी ज्यांची आतापर्यंत या शास्त्रज्ञांनी कल्पनासुद्धा केलेली नाही.
जेम्स वेबने पाठवलेल्या 'या' फोटोची सर्वत्र चर्चा होतेय, कारण...
नासाच्या महाकाय जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनं अंतराळातून पहिलं रंगीत छायाचित्र पाठवलं आहे. फोटोतून का होईना पण असं दृश्य पाहणं हे खरंच खूप अद्भुत आहे.
जेम्स वेबनं पाठवलेला फोटो हा अवकाशाचा बारकाईनं वेध घेणारा आहे. ज्या आकाशगंगांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अब्जावधी वर्षं लागतात, त्या आकाशगंगेचं दर्शन या फोटोत होत आहे.
या फोटोमध्ये प्रकाशाचे अनेक ठिपके दिसतात. यातील प्रत्येक ठिपका ही एक स्वतंत्र दीर्घिका आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना व्हाइट हाऊस ब्रीफिंगच्या वेळेस हे छायाचित्र दाखवण्यात आलं.
मंगळवारी (12 जुलै) नासाकडून जेम्स वेबनं पाठविलेली इतर छायाचित्रंही प्रसिद्ध केली जातील.
"या फोटोंमुळे अमेरिका भव्य गोष्टी करू शकते ही गोष्ट जगापुढे पुन्हा एकदा अधोरेखित होईल आणि अमेरिकन लोकांना, विशेषतः आपल्या मुलांना या गोष्टीची नव्याने जाणीव होईल की, आपल्याला अशक्य काही नाही," असं जो बायडन यांनी म्हटलं.
10 अब्ज डॉलर्स खर्चून बनवलेली जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचं प्रक्षेपण गेल्या वर्षी 25 डिसेंबरला करण्यात आलं होतं. या दुर्बिणीनं अंतराळात हबल टेलिस्कोपची जागा घेतली.
हबल दुर्बिणीपेक्षा जास्त क्षमतेची ही दुर्बीण तारका समुहांचे वेगळे, जास्त स्पष्ट फोटो संशोधकांना पाठवेल आणि त्यांच्या मदतीने विश्वाची रहस्य आपल्यासमोर उलगडतील अशी संशोधकांची अपेक्षा होती.
हा टेलिस्कोप अवकाशात सर्व प्रकारची निरीक्षणं करणार आहे, पण त्याची दोन विशेष उद्दिष्टं आहेत. 13.5 अब्ज वर्षांपूर्वी विश्वात चमकलेल्या पहिल्यावहिल्या ताऱ्यांची छायाचित्रं घेणं आणि त्याचबरोबर अशा इतर
आकाशगंगांमधील ग्रहांचा शोध घेऊन ते वसतीयोग्य आहेत की नाही याबद्दल संशोधन करणं.
राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यासमोर जे छायाचित्र सादर करण्यात आलं, त्यातून वेब टेलिस्कोपची त्याचं पहिलं उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता दिसून येते.
बायडन यांना दाखविलेल्या फोटोत अनेक आकाशगंगांचा पुंजका दिसत आहे. या आकाशगंगा आपल्यापासून फार दूर नाहीये...'केवळ' 4.6 अब्ज प्रकाशवर्षं दूर आहे.
जेम्स वेब टेलिस्कोपची रुंदी 6.5 मीटर आहे, ज्यामध्ये सोनेरी आरसा आहे आणि अतिशय संवेदनशील असं इन्फ्रारेड इन्स्ट्रुमेंट आहे.
या टेलिस्कोपची क्षमता पाहता ती आपली उद्दिष्टं निश्चित साध्य करेल असा विश्वास नासाच्या शास्त्रज्ञांना आहे.
"मी पहिली छायाचित्रं पाहिली आहेत आणि ती अत्यंत अद्भुत आहेत," या प्रकल्पाच्या डेप्युटी प्रोजेक्ट सायंटिस्ट डॉ. अँबर स्ट्रॉ यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)