Shinzo Abe: शिंजो आबे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असण्याची शक्यता,जपान पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माजी पंतप्रधान आबे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी असण्याची शक्यता आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे.

शिंजो आबे यांच्यावर 8 जुलै रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. नारा पोलिसांचे प्रमुख तुमोआकी ओनिजुका यांनी सांगितलं, "त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत काही समस्या होत्या याची शक्यता नाकारता येणार नाही."

शिंजो आबे यांच्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण जपानाला धक्का बसला आहे. पोलिसांनी सांगितलं की, 41 वर्षीय संशयित तेत्सुया यामागामी यांचा 'विशेष संस्थेवर' रोष होता.

जपानी माध्यमांनी सुत्रांच्या हवाल्याने देलेल्या बातम्यांमध्ये म्हटलंय, यामागामी यांचं म्हणणं आहे की एका धार्मिक गटाने त्यांच्या आईचं आर्थिकदृष्ट्या खूप नुकसान केलं आहे. शिंजो आबे या धार्मिक गटाशी संबंधित आहेत असा या संशयिताचा दावा आहे.

जपानमध्ये रविवारी (10 जुलै) संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी मतदान होणार आहे. शिंजो आबे यांच्या हत्येनंतरही निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिंजो आबे यांचा सत्ताधारी पक्ष लिबरल डेमोक्रेटिक पार्टीला समर्थन वाढेल असं जाणकारांना वाटतं.

निवडणुकांसाठी शनिवारीही (9 जुलै) प्रचार सुरू होता. यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

आबे यांच्या हत्येनंतर जपानमधील नागरिकांना धक्का बसल्याचं मीडियानं म्हटलं आहे.

अशातच रविवारी होणाऱ्या जपानच्या संसदीय निवडणुकीसाठी प्रचार सुरू ठेवण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. शुक्रवारी जेव्हा आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला, तेव्हा ते याच निवडणुकीचा प्रचार करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 41 वर्षीय व्यक्तीनं घरात तयार केलेल्या बंदुकीचा वापर करत आबे यांची हत्या केल्याची जबाबदारी घेतली आहे.

नेमकं काय घडलं?

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर 8 जुलै रोजी जीवघेणा गोळीबार करून हत्या करण्यात आली.

जपानची सरकारी वृत्तवाहिनी एनएचकेच्या वृत्तानुसार, जपानमधील नारा शहरातील एका कार्यक्रमात भाषण करत असताना शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाला.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकाराच्या माहितीनुसार, गोळीबारानंतर शिंजो आबे यांचं शरीर रक्तानं माखलं होतं.

जपानमध्ये गोळीबाराची घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते. जपानमध्ये हँडगनवर बंदी आहे.

आबे यांच्या निधनाने धक्का बसला - नरेंद्र मोदी

शिंजो आबे, हे माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने मला अतीव दुःख झालं, असून प्रचंड मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. आबे हे एक जागतिक नेते होते आणि उत्तम प्रशासक होते. त्यांनी त्यांचं आयुष्य जपान आणि जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी समर्पित केलं होतं, असं मोदी म्हणाले.

शिंजो आबे यांचा अल्पपरिचय

शिंजो आबे यांचं टोपणनाव 'द प्रिंस' आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून शिंजो आबे यांचा जन्म झाला. माजी परराष्ट्र मंत्री शिंतारो आबे यांचे ते पुत्र आणि माजी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे ते नातू होय.

1993 ला ते पहिल्यांदा जपानच्या संसदेचे सदस्य म्हणून विजयी झाले. 2005 साली त्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश झाला. त्यावेळी जुनिचिरो कोइझुमी हे पंतप्रधान होते.

2006 साली शिंजो आबे पहिल्यांदा जपानचे पंतप्रधान झाले. महायुद्धानंतर जपानमध्ये झालेल्या पंतप्रधानांमध्ये सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद झाली. 2006 ते 2007 असा एक वर्ष, नंतर 2012 ते 2020 पर्यंत ते पंतप्रधान झाले.

शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते आहेत. 2020 मध्ये आरोग्याच्या कारणावरून त्यांनी पंतप्रधानपद सोडलं. त्यांच्यानंतर योशिहिदे सुगा यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली.

2012 सालापासून ते आतापर्यंत शिंजो आबे यांनी 6 निवडणुकांमध्ये विजय मिळवला. यात 3 कनिष्ठ तर 3 वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होत्या. मात्र, त्यांच्या यशाचं एक मोठं कारण जपानमधील दुबळा आणि कमकुवत विरोधी पक्ष असल्याचं मानलं जातं.

आबे यांनी टप्प्याटप्प्याने आणि वाढत जाणाऱ्या सुधारणांच्या माध्यमातून यश संपादन केलं. संरक्षण धोरणाबाबत आबे यांच्या टप्प्याटप्प्याने काम करण्याच्या दृष्टिकोनाचे परिणाम अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये दिसून आले.

यात 2013 साली स्थापना करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचाही समावेश आहे. 2014 साली नवा गोपनीयता कायदा मंजूर करणं आणि जपानच्या सुरक्षा दलांना सामूहिक सुरक्षा मोहिमांमध्ये भाग घेण्याची परवानगी देणे, यासारख्या तरतुदी त्यात आहे.

आबे यांच्या कार्यकाळात संरक्षण क्षेत्रावरच्या खर्चात जवळपास 13 टकक्क्यांची वाढ झाली. त्यांनी संरक्षणविषयक अधिक लवचिक धोरणं तयार केली. सैन्यासाठी अत्याधुनिक आणि महागडे सैन्य हार्डवेअरसह F-35 लढाऊ विमानं खरेदी केली. जपानच्या प्रादेशिक क्षेपणास्त्र क्षमता वाढवण्यास सक्षम तंत्रज्ञानाचीही भर टाकली.

याच महिन्यात जपानचे संरक्षण मंत्री तारो कोनो यांनी जपान युके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडासोबत 'फाईव्ह आईज इंटेलिजन्स'मध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. यातून जपानने हे संकेत दिले की, शिंजो आबे यांचं हे 'शांतता धोरण' आता जपानसाठी 'न्यू नॉर्मल' बनलं आहे.

'अॅबेनॉमिक्स'

आबे यांनी आपल्या कार्यकाळात ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशीप (TPP-11) मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांनी 2019 साली युरोपीय महासंघासोबत एक यशस्वी व्यापारी करार केला, तर 2018 साली चीनसोबत अनेक आर्थिक आणि विकास करारांवर चर्चा केली.

दोन बेटांच्या मालकीवरून चीन आणि जपान यांच्यात वाद आहे. शिवाय, चीनकडून असणाऱ्या धोक्याचीही जपानला पूरेपूर कल्पना आहे. असं असूनही शिंजो आबे यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत जपानचे व्यापारी सहयोगाचे मार्ग बंद होऊ दिले नाही.

आबे यांच्या विकासवादानेच देशांतर्गत आर्थिक व्यवस्थापनासाठी वित्तीय, मौद्रिक आणि रचनात्मक धोरणांमध्ये नवबदलाची परवानगी देणाऱ्या 'अॅबेनॉमिक्स' दृष्टिकोन अधोरेखित केला.

(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)