CIA चा माईंड कंट्रोल प्रोजेक्ट काय होता?

- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी रिल्स
गोष्ट आहे शीतयुद्धाच्या काळातली म्हणजे, 1950 ची. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने एक गुप्त कार्यक्रम राबवण्याचं ठरवलं.
याचा उद्देश होता दुसऱ्यांच्या मनावर ताबा मिळवून त्यांना आपल्या अंकित करणं. या प्रोजेक्टचं नाव होतं MK-Ultra.
त्यांनी यासाठी अमेरिका आणि कॅनडातल्या मानसोपचार केंद्रांमध्ये पाण्यासारखा पैसा ओतला. तिथल्या पेशंट्सवर मन बधीर करणारी औषधं देणं, पंचेद्रियांचा ताबा काढून घेणं, शॉक देणं असे अनेक प्रयोग केले गेले.
काय घडलं होतं तेव्हा नक्की?
1950 सुरू झालेलं साली कोरियन युद्ध (याचं युद्धाने कोरियाची उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया अशी फाळणी केली) जेव्हा तीन वर्षांनी संपलं, त्यानंतर युद्धकैदी बनवलेले गेलेले अनेक अमेरिकन सैनिक घरी परत आले.
यातले बरेच सैनिकांचं वागणं, विचारसरणी बदलली होती. ते कम्युनिस्ट विचारधारेचा प्रचार करायला लागले होते. सीआयएच्या अधिकाऱ्यांना वाटलं की त्यांच्यावर प्रयोग केले गेलेत आणि त्यांच्या बुद्धीचा ताबा दुसरंच कोणी मिळवला आहे. ते जणू काही कठपुतळ्यांसारखे नाचवले जात आहेत.

अमेरिकेला वाटलं जर कम्युनिस्ट हे करू शकत असतील तर आपल्याकडेही हे तंत्र हवं. तेव्हा सीआयएची नुकतीच स्थापना झाली होती आणि त्यांनी लगेचच माईंड कंट्रोल प्रोजेक्टसाठी 2.5 कोटी डॉलर्सचा निधी दिला. हा निधी चालत्या-बोलत्या माणसांवर प्रयोग करण्यासाठी वापरला जाणार होता.
टॉम ओनिल इतिहासकार आहेत. त्यांनी बीबीसी रिल्सशी बोलताना सांगितलं की, "हा सीआयएचा सर्वांत गुप्त ठेवलेला प्रोजेक्ट होता. त्यांनी आपल्याच भूमीतल्या, आपल्याच नागरिकांवर प्रयोग केले. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेले पेशंट, मानसोपचार केंद्रांमध्ये असलेले पेशंट, तुरुंगातले कैदी आणि सर्वसामान्य लोकांना त्यांच्या मर्जीशिवाय, आणि नकळत ड्रग्स दिले गेले."
ते पुढे म्हणतात, "सीआयएने तेव्हा काही सुरक्षित ठिकाणं तयार केली. वेश्या पुरुषांना भूलवून अशा ठिकाणी घेऊन यायच्या. एकदा ते पुरुष खोलीत घुसले की त्यांना LGD हे ड्रग दिलं जायचं आणि मग सीआयएचे वैज्ञानिक त्यांचा अभ्यास करायचे."
ही अभ्यास करण्याची पद्धतही वेगळी होती. या पुरुषांना अशा खोलीत बसवलेलं असायचं जिथे एक आरसा असायचा. ज्यांच्यावर प्रयोग होतोय त्यांच्या दृष्टीने फक्त समोर आरसा होता पण त्या आरशापलिकडे असलेल्या या लोकांचा वागणं स्वच्छ दिसायचं.
या प्रयोगासाठी माणसं मिळावेत म्हणूस सीआयए स्वतः रेव्ह पार्टीज आयोजित करायचं. तिथे सहभागी होणाऱ्यांना LSD दिलं जायचं, जोरजोरात संगीत सुरू असायचं. या पार्ट्यांना अॅसिड टेस्ट असं म्हटलं जायचं.

फोटो स्रोत, Alamy
अमेरिकन समाजात साठ आणि सत्तरच्या दशकात LSD घेण्याचं प्रमाण वाढलं आणि हिप्पी कल्चर पसरलं (तेच हरे कृष्ण, हरे राम पिक्चरमध्ये दाखवलेलं) त्याची सुरूवात इथूनच झाली असं म्हणतात.
पेशंट्सला काय काय सहन करावं लागलं?
कॅनडातल्या अॅलन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ज्या लोकांवर प्रयोग झाले, त्यापैकी काहींना धोकादायक परिणामांना सामोरं जावं लागलं. तिथले सायकॅस्ट्रिस्ट होते डॉ इवन कॅमरून. नंतर या डॉक्टरची बरीच बदनामी झाली आणि त्याला व्हीलन ठरवलं गेलं.
इथल्या साध्यासुध्या, कोणत्याही प्रकारच्या प्रयोगाची कल्पना नसणाऱ्या पेशंट्सला गंभीर परिणाम करणारं अनेक ड्रग्सचं मिश्रण पाजलं जायचं. शारीरिक इजाही केली जायची. यात अनेक महिला होत्या ज्या बाळंतपणानंतर आलेल्या नैराश्याच्या उपचारांसाठी इथे दाखल झालेल्या होत्या.
लाना सौचक सध्या अमेरिकेत राहातात. त्यांचे वडील या केंद्रात अॅडमिट होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या अनुभवाबद्दल बीबीसीला सांगितलं.

"माझे वडील अॅलन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळी त्यांचं वय 27 होतं. ते खेळाडू होते, तब्येतीने भरलेले होते, नौकायन, स्किइंग करायचे. पण त्यांना दम्याचा त्रास होता. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की ते अॅलन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गेले तर त्यांचा दम्याचा त्रास पूर्णपणे बरा होईल."
ज्युली टॅनी यांचीही अशीच कहाणी आहे. त्यांचेही वडील डॉ कॅमेरूनचे पेशंट होते.
"त्यांना एक प्रकारचा मज्जासंस्थेचा आजार होता. म्हणजे त्यांच्या कपाळात दुखायला लागायचं आणि हळूहळू त्या वेदना जबड्यापर्यंत यायच्या. त्यांना यात प्रचंड वेदना होता आणि हा कायमचा त्रास बनला होता. डॉक्टरांनी त्यांना सांगतलं की हा आजार सायकोसेमॅटिक (मानसिक आजारांमुळे शरीरात होणाऱ्या वेदना) आहे. खरंतर तसं काही नव्हतं. पण त्यांनी माझ्या वडिलांना सायकॅस्ट्रिस्टकडे पाठवलं. तो सायकॅस्ट्रिस्ट कॅमरूनसाठी काम करायचा. त्याने माझ्या वडिलांना त्याच्याकडे पाठवलं."
टॅनी पुढे सांगतात, "ज्या दिवशी माझे वडील त्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले, त्याच दिवशी त्यांनी माझ्या वडिलांना इन्सुलिनची इंजेक्शन्स दिली. ते इन्सुलिन कोमात गेले."
(वाचकांच्या माहितीसाठी - जर डायबेटिज नसणाऱ्या आणि आरोग्य चांगलं असणाऱ्या माणसाला इन्सुलिनचा जादा डोस दिला तर असा माणूस कोमात जाऊ शकतो.)
"त्यांनी त्यांच्या सायकॅस्ट्रिस्टला जे सांगितलं होतं त्याची रेकॉर्डिंग्स घेतली, ती एकत्र करून त्याची एक टेप सतत त्यांच्या उशीखाली वाजवत ठेवली. माझे वडील झोपेसदृश्य कोमात होते."
सौचक यांचे वडीलही इन्सुलिन कोमात होते. "ते 36 दिवस कोमात होते आणि त्यांच्याही उशीखाली एक टेप सतत वाजत राहायची. या टेपमध्ये म्हटलं जायचं की 'तुझ्या आईला तुझा तिरस्कार वाटतो'. सतत हेच वाजत राहायचं."
असं का करायचे डॉ कॅमरून?
या पद्धतीला ते डी-पॅटर्निंग म्हणायचे. म्हणजे काय तर वेगवेगळे प्रयोग करून एका प्रौढ माणसाला इतकं बधीर करून टाकायचं की त्याच्या मेंदूची अवस्था एखाद्या लहानशा मुलासारखी होईल. चांगल्या-वाईटाचा फरक त्या माणसाला कळणार नाही, आपल्या आसपास काय चालू आहे हे त्याला कळणार नाही.

त्याच्या या बुद्धीभ्रमाचा फायदा घेऊन डॉक्टर त्याच्या मेंदूवर ताबा मिळवून त्याच्याकडून हवं ते करून घेऊ शकतील. एकप्रकारे त्यांचा मेंदू तोडून पुन्हा बांधला जाईल, पण या नव्याने बांधलेल्या मेंदूवर त्या माणसाचा ताबा नसेल तर डॉक्टरचा असेल.
लाना पॉटिंग स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट होत्या, आणि या भयाण अनुभवातून गेल्या आहेत.
त्या म्हणतात, "मी तेव्हा फक्त 16 वर्षांची होते आणि माझं माझ्या सावत्र आईशी पटत नव्हतं. माझ्या वडिलांनी आणि सावत्र आईने मला या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. माझ्याची डोक्याशी सतत एक टेप वाजायची. ती टेप कमीत कमी 5 लाख वेळा मी ऐकली असेन."
डॉ कॅमरून यांनी आणखी एक पद्धत वापरली. ज्याला पेज रसेल शॉक थेरेपी असं म्हणतात. हे एक मशीन होतं ज्यामुळे सामान्य शॉक ट्रीटमेंटच्या तुलनेत 40 ते 70 पटीने अधिक ताकदीचे शॉक दिले जायचे. याचा उद्देश होता, पेशंटच्या सगळ्या आठवणी पुसून टाकणं.
लाना सौचक म्हणतात की त्यांच्या वडिलांना 54 हाय व्होल्टेज शॉक दिले गेले, यामुळे त्यांना 57 वेळा भयानक प्रकारच्या फिट्स आल्या.

ज्युली टॅनी म्हणतात, "27 दिवस ते डॉक्टर्स माझ्या वडिलांवर असे प्रयोग करत राहिले आणि त्यानंतरही ते रिझल्ट्सवर खूश नव्हते कारण त्यांचं म्हणणं होतं माझ्या वडिलांना अजूनही त्यांचं पूर्वीचं आयुष्य आठवतंय आणि ते सारखे सारखे माझी बायको कुठेय असं विचारत आहेत. डॉक्टरांनी त्यांना अजून 30 दिवस कोमात पाठवायचं ठरवलं आणि आणखी पेज रसेल शॉक देण्याचं ठरवलं."
या पेशंट्सचं पुढे काय झालं?
जेव्हा अॅलन मेमोरियल हॉस्पिटलमधल्या पेशंटला घरी सोडण्यात आलं, तेव्हा ते पूर्वीसारखे राहिले नव्हते. त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं.
लाना पॉटिंग, ज्या स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये होत्या, म्हणतात, "हॉस्पिटलमध्ये काय झालं यातलं मला नीटसं आठवत नाही. माझ्या कुटुंबासाठी मी एक झोंबी बनले होते. चालता बोलता मृतदेह. मी घरच्यांना ओळखत नव्हते."
लाना सौचक यांच्या वडिलांची अशीच अवस्था होती. "ते दवाखान्यातून घरी आले त्यानंतर ते कधीच संपूर्ण शहाण्या माणसासारखे वागले नाहीत. ते आम्हाला ओळखत नव्हते, आम्ही त्यांच्या मुली आहोत हे त्यांना माहिती नव्हतं. त्यांची नोकरी गेली. ते हॉस्पिटलमधून परत आल्यावर आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलो."

ज्युली टॅनींना आपल्या वडिलांची अवस्था आठवून भरून येतं. त्या म्हणतात, "माझ्या वडिलांची त्यांच्या मानसोपचार तज्ज्ञाला सांगितलं होतं की मी त्यांच्या काळजाचा तुकडा आहे. पण ते दवाखान्यातून परत आल्यानंतर काही दिवसांनी मला मारहाण करायला लागले."
सीआयएचा हा लोकांच्या मेंदूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रोजेक्ट 1973 साली बंद करण्यात आला. सरकारी दप्तरात असणारे याचे पुरावे पद्धतशीरपणे नष्ट करण्यात आले.
टॉम ओनिल सांगतात की याची माहिती पहिल्यांदा जगासमोर आली ते जॉन मार्क नावाच्या एका कार्यकर्त्यामुळे. त्यांनी पहिल्यांदा या विषयावर पुस्तक लिहिलं. यानंतर अमेरिकेच्या संसदीय समित्यांच्या सुनावण्या झाल्या.
सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात या प्रकरणाची बरीच चौकशी झाली आणि सीआयएने मान्य केलं की त्यांनी अशा चाचण्या केलेलया होत्या. त्यांनी हेही मान्य केलं की बुवा आमचं चुकलंच. पण त्यांनी स्वतःच्या बचावासाठी साळसूदपणाचा आव आणला.
इतकं मोठ सत्य समोर येऊनही या प्रकरणी काही कारवाई झाली नाही. ज्या पेशंटवर प्रयोग झाले होते, त्यांच्या आयुष्यावर याचा गंभीर परिणाम झाला होता आणि या परिणामांसोबतच ते जगले आणि मेले.
कोणीही त्यांची साधी माफीही मागितली नाही.
आज इतक्या वर्षांनी या पेशंट्सपैकी काहींच्या मुलांनी सरकारवर या प्रकरणी खटला भरण्याचं ठरवलं आहे.
लाना पॉटिंग म्हणतात, "मला आजही औषधं घ्यावी लागतात कारण मी 16 वर्षांची असताना माझ्यावर प्रयोग केले गेले. मला ना कोणत्या प्रकारची नुकसानभरपाई मिळाली ना माझी कोणी माफी मागितली. माझी इच्छा आहे की कॅनडातल्या प्रत्येकाला कळावं की माझ्या बाबतीत काय झालं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








