श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

फोटो स्रोत, Getty Images
आर्थिक संकटाच्या वावटळीत सापडलेल्या श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे. राजपक्षे यांनी आपला राजीनामा राष्ट्राध्यक्ष गोटाबया यांच्याकडे पाठवला आहे.
आर्थिक संकटामुळे प्रदीर्घ काळ श्रीलंकेत निदर्शनं होत आहेत. निदर्शनांची तीव्रता वाढल्याने राजपक्षे सरकारवरील दबाव वाढला. श्रीलंकेत सध्या आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित बैठकीत गोटाबया यांनी राजपक्षे यांना राजीनामा देण्याचं सूचित केलं. राजपक्षे यांनी परिस्थिती लक्षात घेऊन राजीनामा दिला.
राजीनाम्याने देशातलं आर्थिक संकट संपुष्टात येणार असेल तर मी राजीनामा देतो असं राजपक्षे यांनी म्हटलं आहे.
2.2 कोटी लोकसंख्येचा श्रीलंका सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पेट्रोल-डिझेलसह दैनंदिन उपयोगी वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
वीजपुरवठा खंडित होणं, रिकामे एटीएम आणि पेट्रोल पंपावरील लांबच लांब रांगा.. हे श्रीलंकेत नेहमीचं दृश्य झालं आहे. श्रीलंका पेट्रोलियम गॅसपासून साखरेपर्यंत जवळजवळ सर्वच वस्तू आयात करतो. आता ही सगळी प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. त्यामुळे देशात प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
श्रीलंकेची लोकशाही व्यवस्था थोडी गुंतागुंतीची आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर इथे अध्यक्षीय अंतर्गत संसदीय लोकशाही पद्धत अस्तित्वात आहे. राष्ट्राध्यक्ष हा जनतेच्या मतांमार्फत निवडून येतो. तोच राष्ट्राचा प्रमुख मानला जातो. सरकारचे सर्व अधिकार राष्ट्राध्यक्षाच्याच हातात असतात.

फोटो स्रोत, ISHARA S. KODIKARA
त्याचवेळी इथे समांतर पद्धतीने संसदीय निवडणूकही होते. यामध्ये एकूण 225 सदस्यांची लोकांमार्फत निवड होते. बहुमत प्राप्त करणारा पक्ष अथवा आघाडी आपला नेता निवडते. याच नेत्याला पंतप्रधानपद देण्यात येतं. पण पंतप्रधानाला सरकारमध्ये राष्ट्राध्यक्षांनंतरचं दुय्यम स्थान असतं.
पंतप्रधान हा राष्ट्राध्यक्षांचा सहायक म्हणून त्यांच्या सूचनेप्रमाणे राज्यकारभार पाहतो. राष्ट्राध्यक्ष कोणत्याही वेळी संसदेला नोटीस बजावू शकतात, स्थगित किंवा बरखास्त करू शकतात.
अन्नधान्याचा तुटवडा आणि परिणामी त्यांच्या वाढत्या किमतींमुळे श्रीलंकेतील नागरिक त्रस्त आहेत. वस्तूंचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने त्याचा विरोध म्हणून जनता रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात आर्थिक आणीबाणीही लावण्यात आली होती.
संतप्त नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षेंच्या घराच्या दिशेनं मोर्चा काढला होता. आंदोलकांनी कोलंबोचे मुख्य रस्ते टायरची जाळपोळ करून रोखले होते. यादरम्यान आंदोलकांनी लष्कराच्या दोन बस आणि एका जीपलाही आग लावली होती तसंच, पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक केली होती. निदर्शनात सहभागी 45 जणांना अटक करण्यात आली होती तर या दरम्यान एकाचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, NurPhoto
महागाईच्या मुद्द्यावरून देशभरात निदर्शनास सुरुवात झाल्यानंतर रविवारी (3 एप्रिल) रात्री श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला होता.
श्रीलंकेच्या सर्वच्या सर्व 26 कॅबिनेट मंत्र्यांनी आपला राजीनामा आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर दिला. पण त्यांनी राजीनाम्याचं स्पष्ट कारण सांगितलं नाही, सभागृह नेते व शिक्षण मंत्री दिनेश गुणावर्धने यांनी सांगितलं.
कोव्हिड साथीच्या आधीपासूनच श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात सापडलेली होती. त्यातच कोव्हिड साथीने श्रीलंकेवर आणखी बिकट परिस्थिती ओढवली.
भारताच्या दक्षिण बाजूस निवांत पहुडलेलं एक मध्यम आकाराचं बेट म्हणजे श्रीलंका. श्रीलंकेला पाचूचं बेट म्हणूनही ओळखलं जातं. हा देश पर्यटनाच्या बाबतीत जगभरात प्रसिद्ध आहे.
इथले समुद्रकिनारे, डोंगरदऱ्या आणि निसर्गसमृद्ध जंगलं पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक श्रीलंकेला भेट देत असतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








