Shanghai Covid : चीनमधील 'या' कोव्हिड सेंटरमध्ये इतकी भयंकर स्थिती का निर्माण झालीय?

फोटो स्रोत, Getty Images
चीनच्या शांघाय शहरातील हजारो वृद्धांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. आता हे लॉकडाऊन पाच आठवड्यांपर्यंत वाढवलं आहे.
मार्चच्या सुरूवातीला कोव्हिडचा उद्रेक झाल्यापासून तब्बल 5 लाखांहून अधिक लोकांची कोव्हिड टेस्ट पॉजिटीव्ह आली आहे. या पॉजिटीव्ह लोकांमध्ये जवळपास 10 हजार लोक 80 वर्षांहून जास्त वयाचे आहेत.
चीनची कोव्हिड नियमावली सांगते की, जो कोणी व्यक्ती संक्रमित आहे किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला आहे, त्याला राज्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या क्वारन्टाईन सेंटर म्हणजेच अलगिकरण केंद्रात पाठवले जाईल.
अशा सेंटर्समध्ये शेकडो लोकांना एकत्र ठेवणं ही साधारण गोष्ट नाही. सोशल मीडियावर जे फोटो शेअर केले जातायंत त्यामध्ये त्या सेंटर्समध्ये असणारी अस्वच्छता, तुंबलेली शौचालये आणि ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्याचे डब्बे दिसतात.
शांघायमधील एका महिलेने बीबीसीला सांगितले की, तिची 90 वर्षांची आजी अशाच एका सेंटर मध्ये आहे. ती तिथल्या अस्वच्छ परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते आहे. तिला तिथे नीट झोप येत नाही. स्वतःची काळजी घेण्यासाठी तिथं तिला एकटीलाच सोडण्यात आलंय.
'ती त्या परिस्थितीत जगू शकणार नाही'
नाव न छापण्याच्या अटीवर ती महिला सांगते की, तिची आजी आजारी पडणारी पहिली होती.
17 एप्रिल रोजी महिलेची टेस्ट पॉजिटीव्ह आली. कोव्हिडचा उद्रेक सुरू झाल्यापासून तिने अजून घर सोडलेलं नाही. मागचे दोन आठवडे तिच्यासाठी खऱ्या अर्थाने संघर्षाचे होते.

फोटो स्रोत, Getty Images
ती वृद्धा 90 वर्षांची असून आधीच्या एका आजारामुळे तिचा एक पाय सुन्न झालायं. अशात तिला थोडाफार चालणं ही कठीण होऊन बसलंय. टॉयलेट ब्लॉक तिच्या पलंगापासून 100 मीटर पेक्षा जास्त अंतरावर आहे. तिथवर जाणं तिच्यासाठी कष्टप्रद असल्याने ती जास्त पाणी पिणे टाळते.
अशा तणावग्रस्त, गर्दीने गच्च असलेल्या परिस्थितीत विश्रांती मिळवणं देखील क्षणभंगुर झालंय. फ्लोरोसेंट दिवे 24 तास चालू असतात आणि त्यामुळे ती नीट झोपू शकत नाही. असं त्या वृद्धेची नात सांगते.
"सुदैवाने क्वारंटाइन सेंटरमध्ये एक दयाळू मनाची स्त्री आहे. ती माझ्या आजीसोबत टॉयलेटमध्ये जाते आणि तिला जेवण चारायला मदत करते."
"जर माझी आजी तिथे एकटी असती तर ती अजिबात जगली नसती."
ती पुढे सांगते की तिच्या आजीला कोणतीही वैद्यकीय औषधे किंवा "योग्य उपचार" मिळालेले नाहीत. फक्त पारंपारिक चिनी औषध तिथं दिली जातात. यावर वैद्यकीय तज्ञ म्हणतात की कोव्हिडच्या उपचारांमध्ये या औषधांनी आराम पडलाय असं पाहण्यात नाही.
मात्र, बरं होऊन लवकरात लवकर ते सेंटर सोडता यावं यासाठी तिच्या आजीला जी काही औषध दिली गेली ती तिने निमूटपणे खाल्ली. याचा परिणाम आजीला अतिसार झाला असा दावा तिच्या नातीने केलाय.
तिच्या आजीला त्या सेंटर मधून बाहेर काढण्यासाठी आणि किमान अशा हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तिची नात जीवावर उदार झाली आहे. तिला वाटतं तिथे तिची योग्य काळजी घेतली जाऊ शकते. पण त्या सेंटर मधले अधिकारी टेस्ट निगेटिव्ह येईपर्यंत तिच्या आजीला त्या सेंटरमधून सोडायला तयार नाहीत.
"जेव्हा मी तिला कॉल केला तेव्हा ती पुनःपुन्हा हेच सांगत होती की 'मला घरी यायचं आहे. मला लवकर घरी यायचं आहे," नात म्हणाली. "घरी असलेल्या माझ्या आजोबांचीही तिला काळजी लागली आहे."
इच्छा नसतानाही केली जाणारी जबरदस्ती
आता तिला सर्वात मोठी भीती लागून राहिली आहे ती म्हणजे, तिचे 91 वर्षांचे आजोबा आता कोव्हिड पॉजिटीव्ह आले आहेत. त्यांना ही आता त्या सेंटर मध्ये जायला भाग पाडलं जाईल. बुधवारी सेंटरच्या अधिकाऱ्यांनी लवकरच त्यांना नेण्यात येईल असा इशारा दिलाय.
तिचे आजोबा स्ट्रोकमुळे अंथरुणाला खिळून आहेत आणि त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. ते विनामदत शौचालयात जाऊ शकत नाही. ते काळजीवाहू व्यक्तीवर अवलंबून आहेत.
ती म्हणाली, "ते क्वारंटाइन सेंटरमध्ये किंवा हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही." तिथली स्वच्छता चिंताजनक आहे. वृद्ध लोक अशा वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाहीत. ते तिथे कसे राहतील?"
त्याची नात म्हणते की त्यांच्यामध्ये कोव्हिडची लक्षणे कमी आहेत. त्यांना आतापर्यंत फक्त कोरडा खोकलाचं आहे. त्यांना खरी गरज घरी मिळणाऱ्या विश्रांतीची आहे.
ती पुढे सांगते, "आम्ही सेंटर मध्ये असणाऱ्या एका अधिकाऱ्याशी वाद घातला. जर तुम्ही त्यांना सेंटरमध्ये पाठवताय तर तुम्ही त्यांना मरायला भाग पडताय." असं ती म्हणाली.
पण अधिकारी म्हणतात की त्यांना सरकारी आदेशांच पालन करावं लागतं. जर आजोबांना जबरदस्तीने नेलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे तिचे कुटुंबीय सांगतात.
बीबीसीने संपर्क साधलेल्या एका सेंटरमधल्या अधिकाऱ्याने सांगितलं की त्यांनी त्या कुटुंबाला आजोबांसाठी होम क्वारंटाईनचा पर्याय ऑफर केलाय. त्या नातीने मात्र बीबीसीला सांगितले की, अधिकाऱ्यांनी तिला एका तासानंतर कॉल केला आणि त्यांना या ऑफरची माहिती दिली.
एक 94 वर्षीय स्त्री पॉजिटीव्ह आली होती, तिला तिच्या इच्छेविरुद्ध सेंटर मध्ये नेण्यात आल्याचं या नातीच्या ऐकिवात आहे असं ती सांगते. ती वृद्धा त्यांची शेजारी राहत होती.
मध्यरात्री पोलिस तिला नेण्यासाठी आले होते, असं तिने सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"हे खूप भयानक आहे," असं ती सांगते. "सध्याच्या घडीला सरकारने आम्हाला एक पर्याय द्यावा. ते 'झिरो कोव्हिड' हे ध्येय साध्य करण्यासाठी फक्त वृद्ध लोकांच्या जीवनाशी खेळू शकत नाहीत."
ती म्हणते की सरकारने वृद्ध लोकांना अशा सेंटर्समध्ये जबरदस्तीने ठेवण्याऐवजी त्यांना घरीचं अलग ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे.
अशा सेंटर्समध्ये असणाऱ्या इतर रुग्णांनीही बीबीसीला सांगितलं की वृद्धांसाठी ही कठीण परिस्थिती आहे.
"आता पुरेशी वैद्यकीय संसाधने नाहीत. वृद्ध लोकांवर सामान्य रुग्णालयात उपचार करता येणं शक्य नाही" असं शांघायचे एक रहिवासी म्हणाले, त्यांना त्यांची ओळख फक्त वू म्हणून करून द्यावी अशी इच्छा आहे.
ते पुढे सांगतात की, शारीरिकदृष्ट्या अशक्त असणाऱ्या वृद्ध लोकांची कर्मचारी आणि डॉक्टर त्यांच्या क्षमतेनुसार काळजी घेत आहेत. सेंटर्समध्ये त्यांच्यासाठी विशेष जेवण देखील तयार करण्यात येत आहे.
"क्वारंटाइन सेंटर्स रुग्णालयांइतकी चांगली नाहीत. पण मला वाटतं की देशाने त्यांची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलाय." असं वू सांगतात.
लसीकरणाची अडचण
कोव्हिडचा नवा उद्रेक शांघायमध्ये मार्चच्या सुरुवातीला झाला. आतापर्यंत सुमारे 5 लाख नवी प्रकरण नोंदवली गेली आहेत आणि 337 मृत्यू झाले आहेत.
चिनी अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, मृतांमध्ये वृद्ध, लसीकरण न केलेले, आरोग्य समस्या असलेले लोक आहेत.
या घटनेत, महिलेची आजी आणि आजोबा या दोघांचही लसीकरण झालेलं नाही.
त्यांची नात म्हणते की त्यांना लस घ्यायची होती पण त्यांना दुष्परिणामांची भीती वाटतं होती.
चीनने कोविड लसीचे 3.3 अब्जाहून अधिक डोस दिले आहेत. हे लसीकरण एकूण लोकसंख्येच्या 88% पेक्षा जास्त आहे.
पण 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये लस घेण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. विशेष म्हणजे हे लोक सर्वात असुरक्षित टप्प्यात आहेत.
शांघायमधील केवळ 62% वृद्धांनी लसीचा डबल डोस घेतला आहे. 38% लोकांना त्यांचे बूस्टर डोस ही मिळाले आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








