कोरोना व्हायरस महाराष्ट्र : मुंबईतील वाढती रुग्णसंख्या, चौथ्या लाटेची सुरूवात म्हणणं घाईचं ठरेल का?

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईत मंगळवारी (19 एप्रिलला) 85 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली. ओमिक्रॉनची लाट ओसरल्यानंतर, गेल्या 47 दिवसात नोंद करण्यात आलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे.
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, या रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. आणि रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होण्याचं प्रमाणही अत्यंत कमी आहे. राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात, "रुग्णसंख्येत होणारी वाढ फार मोठी नाही. त्यामुळे सद्यस्थितीत काळजी करण्याचं कारण नाही."
देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत.
मुंबईतील वाढती रुग्णसंख्या चौथ्या लाटेची सुरूवात असं म्हणणं घाईचं ठरेल का? आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय?
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना पहायला मिळतेय. पण, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मुंबईतील बहुतांश कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण एसिप्टोमॅटीक आहेत. ज्यांना कोणतीही लक्षणं नाहीत.
मुंबईतील कोव्हिड-19 रुग्णांची आकडेवारी
19 एप्रिल- 85
18 एप्रिल- 35
17 एप्रिल- 55
16 एप्रिल-43
15 एप्रिल- 44
मुंबईत डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची तिसरी लाट झपाट्याने पसरली. काही दिवसातच ही लाट ओसरली होती. ओमिक्रॉनच्या लाटेत 3 मार्चला सर्वात जास्त 80 रुग्ण आढळून आले होते.
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, गेल्या सहा आठवड्यात रुग्णसंख्या 30 ते 50 च्या दरम्यान पहायला मिळालीये.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येबाबत बोलताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आलेत. मास्कचं बंधन नाहीये." लोक आपापसात मिसळू लागलेत. त्यामुळे, रुग्णसंख्येत थोडी वाढ होईल हे अपेक्षित होतं.
महाराष्ट्र सरकारने राज्यात मास्क सक्ती उठवली आहे. मास्क घालणं ऐच्छिक केल्याने मुंबईत आणि राज्यात अनेक लोक मास्क न घालता फिरताना दिसून येत आहेत.
"सद्य स्थितीत काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. पण, वॉर्ड अधिकाऱ्यांना सतर्क रहाण्यास सांगण्यात आलंय," सुरेश काकाणी पुढे म्हणाले.
मुंबई महापालिकेकडून जास्तीत-जास्त मुंबईकरांनी कोरोनाविरोधी लशीचा बूस्टर शॉट घ्यावा, असं आवाहन करण्यात आलंय. तर, वॉर्ड अधिकाऱ्यांना टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यास सांगण्यात आलंय.
मुंबईत सद्य स्थितीत कोरोना रुग्णवाढीचा दर हा अत्यंत कमी आहे. तर,रिकव्हरीचा दर 98 टक्के आहे. नानावटी रुग्णालयाच्या संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. हेमलता अरोडा म्हणाल्या, " रुग्णसंख्या वाढत असली. तरी, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे."
महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात 794 कोरोनारुग्ण आढळून आले. देशातील कोव्हिड रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा वाटा 10.4 टक्के होता. तर, राज्यात गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येचा दर 0.39 टक्क्यांवरून 0.43 वर पोहोचला आहे.
वाढती रुग्णसंख्या चौथ्या लाटेची सुरूवात?
जगभरात कोरोनासंसर्ग एन्डेमिक स्वरूपाचा बनलाय. कोरोना आपल्यासोबत दीर्घकाळ रहाणार आहे. तज्ज्ञांच्या मते, व्हायरसमध्ये म्युटेशन होत असल्याने याचे नव-नवीन व्हेरियंट येत राहतील.
मुंबई, दिल्लीतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात कोरोना संसर्गाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जातेय. लोकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. ही वाढती रुग्णसंख्या चौथ्या लाटेची सुरूवात आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, "वाढणारी रुग्णसंख्या कोरोना संसर्गाची चौथी लाट असं म्हणणं, फार घाईचं ठरेल." राज्यात कोरोना निर्बंध शिथिल करूनही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही.
राज्यात 19 एप्रिलला 137 नवीन कोरोनारुग्णांची नोंद झालीये. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे म्हणाले, "रुग्णसंख्येत झालेली वाढ अत्यंत कमी आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. यावर तात्काळ गांभीर्याने पहाण्याची गरज नाही." आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये झालेली वाढ मुंबई, ठाणे आणि पुण्यात जास्त दिसून येतेय. राज्याच्या इतर जिल्ह्यात वाढ दिसून येत नाहीये. देशभरातील काही भागात स्थानिक पातळीवर संक्रमणामुळे कोरोना संसर्ग वाढला असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
कोरोना संसर्गाच्या चौथ्या लाटेबाबत इंडिया टुडेशी बोलताना IIT कानपूरचे प्रो. महिंद्र अग्रवाल म्हणाले, "कोरोना व्हायरसचं नवीन म्युटेशन झालेलं नाही. त्यामुळे, चौथी लाट येण्याची शक्यता नाही."
भारतात ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून येतोय. "व्हायरसमध्ये म्युटेशन झालं नाही, तर कोरोनासंसर्गाची मोठी लाट येणार नाही," डॅा आवटे पुढे म्हणतात.
महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडीत यांच्या मते, "रुग्णांच्या वाढत्या संख्येला चौथी लाट नक्कीच म्हणता येणार नाहीं" तज्ज्ञांच्या मते वाढत्या रुग्णसंख्येपेक्षा, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येकडे लक्ष ठेवलं पाहिजे.
कोरोनासंसर्ग वाढल्यामुळे, उत्तरप्रदेश आणि हरियाणातील नऊ जिल्ह्यांमध्ये पुन्हा मास्क सक्ती करण्यात आलीये. मास्कबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "राज्यात मास्क सक्ती नाहीये. पण, येणाऱ्या काळात परिस्थिती पाहून याबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ."
कोरोना संसर्गाचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. भ्रमर मुखर्जी ट्विटरवर लिहितात, "भारतात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झालीये. ही वाढ अपेक्षित होती." कोरोना प्रतिबंधासाठी स्वत:च काळजी घ्यावी लागेल. पॅनिक होण्यापेक्षा सुजाणपणा महत्त्वाचा आहे.
भारतात नैसर्गिक कोरोना संसर्ग आणि लसीकरणामुळे 90 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं तज्ज्ञ सांगतात. ज्यामुळे संसर्ग गंभीर होण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
डॉ. अरोडा पुढे म्हणाल्या, कोणत्याही साथीच्या आजारांमध्ये एकापेक्षा जास्त लाटा येत असतात. ओमिक्रॉनच्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला. पण, आजार गंभीर स्वरूपाचा नव्हता.
केंद्र सरकारची राज्यांना सतर्क रहाण्याची सूचना
मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात असली. तरी, राजधानी दिल्लीत मात्र, वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. दिल्लीत मंगळवारी (19 एप्रिलला) 632 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आलीये.

फोटो स्रोत, Getty Images
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्ली, महाराष्ट्रासह इतर राज्यांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यसचिव राजेश भूषण यांनी या संदर्भात राज्यांना पत्र लिहिलंय.
त्यानुसार, आर्थिक आणि सामाजिक कार्यक्रम सुरू करताना धोका ओळखूनच योग्य निर्णय घ्यावा, राज्यांनी कोरोना रुग्णसंख्यावर लक्ष ठेवावं, टेस्टिंग वाढवावं आणि कोरोनासदृश आजारांकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं, लसीकरणावर जोर द्यावा, ज्या परिसरात संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना गरजेच्या आहेत. त्याठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना वाढणाऱ्या कोरोना रुग्णांबाबत विचारण्यात आलं. ते म्हणाले, "दिल्लीत रुग्ण वाढत आहेत. पण, घाबरण्याचं कारण नाही. सरकारचं लक्ष आहे." रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. लोकांनी घाबरून न जाता, सावध राहीलं पाहिजे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








