इम्रानखान-शाहबाज शरीफ: पाकिस्तानातले राजकीय संकट, आतापर्यंत काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आहे. सोमवारी नवीन पंतप्रधानांची निवड होणार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मंजूर मध्यरात्री मंजूर झाला. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांना आता आपली खुर्ची सोडावी लागणार हे निश्चित झाले आहे.
काल मध्यरात्री अभूतपूर्व अशा घडामोडींनंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने एकूण 174 मते मिळून हा प्रस्ताव मंजूर झाला.
काल सकाळपासून या प्रस्तावावर विविध प्रकारे राजकारण झाल्याचं दिसून आलं. संध्याकाळ होऊन गेली तरी यावर मतदान झालेलं नव्हतं. अखेर, मध्यरात्री 12 च्या सुमारास अविश्वास प्रस्तावावर मतदान पार पडलं. यामध्ये प्रस्तावाच्या बाजूने तब्बल 174 मते पडल्याने इम्रान खान सरकार आता जाणार यावर शिक्कामोर्तब झालं.
प्रस्ताव दाखल केल्यापासून अनेक नाट्यमय घडामोडी या निमित्ताने पाकिस्तानच्या राजकारणात घडल्याचं दिसून आलं. या नाट्याचा क्लायमॅक्स तर अतिशय रंजक असाच होता. दरम्यान, काल मध्यरात्री जे घडलं ते अभूतपूर्व असंच होतं.
दिवसभराची प्रतीक्षा
पाकिस्तानातील इम्रान खान सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज (9 एप्रिल) संसदेत मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र रात्री उशीरापर्यंत मतदान झाले नाही.
पाकिस्तानी संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी आपापली बाजू मांडली. मात्र, थोड्याच वेळात सभागृह दीड तासांसाठी म्हणजे दुपारी 12.30 वाजेपर्यंत (पाकिस्तानी वेळेनुसार) तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर नंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं.
याआधी इम्रान खान यांनी संसद बरखास्त करून नव्यानं निवडणुका घेण्याची शिफारस केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं संसद बरखास्त करण्यास नकार दिला. त्यामुळे अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे.
इम्रान खान यांच्यावर भडकलेल्या मरियम नवाझ म्हणतात, 'एक व्यक्ती संपूर्ण देशाला अडवून धरतेय'

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानातल्या विरोधी पक्ष नेत्या मरियम नवाझ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोणत्याही स्थितीत मतदान घेण्याची सुप्रीम कोर्टाची सूचना
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज मध्यरात्रीपर्यंत अविश्वास दर्शक ठरावावर मतदान होणं बंधनकारक होतं.
पण इम्रान खान सरकार आणि संसदेचे स्पीकर मतदान घेण्याचं टाळत आहेत, असं चित्र दिसून आलं. त्यातच पाकिस्तानचं सुप्रीम कोर्ट मध्यरात्री उघडण्यात आलं आणि पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर बंदियाल सुप्रीम कोर्टात पोहोचले. मध्यरात्रीपर्यंत मतदान न झाल्यास ते कोर्टाच्या अवामानाची दखल घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली.

सुप्रीम कोर्टात रात्री होणाऱ्या सुनावणीदरम्यान माध्यमांना मात्र प्रवेशाची परवानगी नाकारण्यात आली.
या याचिकेत लष्करप्रमुखांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली. तर इम्रान खान हे संसदेच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती बीबीसीचे प्रतिनिधी सिकंदर किरमाणी यांनी दिली.
इस्लामाबाद हायकोर्टसुद्धा रात्रीच्या वेळी उघडण्यात आलं. हायकोर्टातील न्यायमूर्ती अतहर मिनाअल्लाह यांनी एका नागरिकाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू केली.
दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख कमर बाजवा यांचं निलंबन केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये दिसून आली. पण, पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद हुसैन यांनी हे वृत्त फेटाळून लावलं.
त्यांनी म्हटलंय, "पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि लष्कराचं संस्थात्मक महत्त्व सरकारला अगदी योग्य प्रकारे माहीत आहे. लष्कराचे प्रमुख बदलण्यात येणार असल्याच्या सर्व चर्चा बिनबुडाच्या आहेत. या चर्चांना काहीच अर्थ नाही. या सर्व बातम्या आम्ही फेटाळून लावत आहोत. या अफवा पसरवण्यामागे मोठं षड्यंत्र आहे."

इम्रान खान यांची पंतप्रधान निवास सोडलं
दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे आपल्या पदाचा राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम होते.
या संपूर्ण राजकीय नाट्यादरम्यान, माझ्याविरोधात अमेरिका इत्यादी परकीय शक्ती षड्यंत्र रचत आहेत, असं इम्रान खान वारंवार सांगत आहेत. पण त्याविषयीचे पुरावे ते दाखवू शकले नाहीयेत.
याच गोष्टीवरून विरोधकांनी पंतप्रधान आणि संसदेच्या अध्यक्ष यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप केला. या घडामोडी घडत असताना इम्रान खान यांनी पंतप्रधान निवासस्थान सोडल्याची माहिती पुढे आली.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्या मरियम नवाझ शरीफ यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली.
त्यांनी पंतप्रधान इम्रान खान, संसदेचे सभापती आणि उप-सभापती यांना अटक करण्याची मागणी केली.
दुसरे विरोधी पक्षनेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी आरोप केला की, इम्रान खान अविश्वास प्रस्तावावर मतदानास उशीर करून घटनात्मक संकट निर्माण करण्याचा आणि देशाच्या राजकीय कारभारात लष्करी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अविश्वास प्रस्ताव मंजूर
इम्रान खान सरकारविरोधातल्या अविश्वास ठरावावर (पाकिस्तानी वेळेनुसार) मध्यरात्रीच्या 5 मिनिटं आधी मतदानाला सुरुवात झाली. त्यापूर्वी स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर दोघांनी राजीनामा दिला. यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी संसदेतून वॉकआऊट केला.
मतदानाला सुरुवात होताच मध्यरात्र झाल्यामुळे कामकाज 2 मिनिटांसाठी बरखास्त करण्यात आलं. नंतर पाकिस्तानी वेळेनुसार रात्री 12 वाजून 2 मिनिटांनी मतदान पुढे सुरू राहिलं.

फोटो स्रोत, Twitter
सत्ताधारी पक्षाचे सदस्य प्रत्यक्ष अविश्वास प्रस्तावाच्या वेळी संसदेच्या सभागृहात उपस्थित नव्हते. मतदानाच्या प्रक्रियेची सुरुवात होण्यापूर्वीच त्यांनी सभागृहातून वॉक आऊट केला.
इम्रान खान सरकारमधील मंत्री फवाद हुसैन यांनी ट्विट करून या संपूर्ण प्रकरणाबाबत दुःख व्यक्त केलं.
"आजचा दिवस पाकिस्तानसाठी अतिशय दुःखद आहे. एका चांगल्या व्यक्तीला घरी पाठवून लुटारुंनी सत्ता हस्तगत केली," असं म्हणत हुसैन यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव संसदेत मंजूर करण्यात आला. प्रस्तावाच्या बाजूने 174 मते पडली. त्यामुळे इम्रान खान यांचं सरकार कोसळल्याचं निश्चित झालं. आहे.
पाकिस्तानचं दुःस्वप्न संपलं - मरियम नवाज
विरोधी पक्षनेत्या मरियम नवाझ शरिफ यांनी ट्विट करत म्हटलं की, "माझ्या लाडक्या पाकिस्तानचे दुःस्वप्न संपले आहे. आता ही दुरुस्तीसाठीची वेळ आहे."

फोटो स्रोत, Twitter
तर PML-N पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी सभागृहाला संबोधित करताना म्हटलं, " आम्ही आता पाकिस्तानात पुन्हा एकदा संविधान आणि कायद्याचं राज्य स्थापित करू इच्छितो. आम्ही कुणाची इर्षा वा द्वेष करणार नाही. पण कायदा आपलं काम करत राहील."
पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनीही याप्रसंगी भाषण केलं. ते म्हणाले, 10 एप्रिल या तारखेला ऐतिहासिक महत्व आहे. याच दिवशी 1973 साली पाकिस्तानचं संविधान पारित करण्यात आलं होतं. जुन्या पाकिस्तानात तुमचं स्वागत आहे."
अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर काही वेळाने पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल खालिद जावेद यांनीही राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








