इम्रान खान: सध्या पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या घडामोडींबाबत तिथले सामान्य लोक म्हणतात...

    • Author, सिकंदर किरमानी
    • Role, बीबीसी न्यूज पाकिस्तान

पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरवा फेटाळण्यात आलाय तसंच इम्रान खान यांच्या शिफारशीवरून राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी राष्ट्रीय संसद बरखास्त केली.

मागील काही दिवसांपासून इम्रान खान यांना बऱ्याच गंभीर आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. पण इम्रान खानचा यांचा हा राजकीय अस्त मानता येणार नाही.

32 वर्षीय मुजाहिद अली इस्लामाबादच्या एका भागात केशकर्तनालय चालवतात. रोजच्याप्रमाणे ते आपला पारंपारिक ड्रेस सलवार कुर्ता घालून आपल्या कामात व्यस्त आहेत. इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून तर त्यांना दु:ख नाही होणार नाही, असं ते म्हणतात. काहीशा नाराजीच्या सुरात ते म्हणतात, "त्यांच्या कारकिर्दीत म्हणावी तशी मजा नव्हती."

इम्रान खान 2018 साली याच मतदारसंघातून विजयी झाले होते. मुजाहिद यांनीही पाकिस्तानच्या राजकारणात नवा बदल घडेल या आशेने त्यांना मतदान केलं होत. पाकिस्तानमध्ये, जिथं दोन प्रतिस्पर्धी कुटुंबं दीर्घकाळ सत्तेवर आहेत, त्यांच्या जागी तिसरी शक्ती उदयास येईल.

मात्र मुजाहिद आता इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाला महागाईसाठी जबाबदार धरतात.

ते बीबीसीला सांगतात, "जर तुम्ही दिवसभर काम केल तर तुम्हाला 500 रुपये मिळतात. दुसरीकडे, पूर्वी 180 रुपयांना मिळणार एक किलो बटर आता 500 रुपयांना मिळतं. "

'आपण इम्रान खान यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे'

इम्रान खान पंतप्रधान म्हणून सत्तेवरून पायउतार झाल्यास शाहबाज शरीफ त्यांची जागा घेतील. शहबाज हे तीन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेल्या आणि आता भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलेल्या नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. मात्र नवाज या आरोपांना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हणतात.

शाहबाज शरीफ यांच्यावरही आरोप झालेत, तेही हे आरोप फेटाळताना दिसून आलेत. मुजाहिद म्हणतात, "ते (नवाज, शाहबाज) भले ही भ्रष्ट असतील, पण ते गरिबांना मदत करतात."

केस कापण्यासाठी रांगेत वाट पाहत असलेले 27 वर्षीय अली मलिक, एक ज्युनियर अकाऊंटंट आहेत. 2018 मध्येही त्यांनी ही इम्रान खान यांनाच मत दिलं होतं. आणि ते अजूनही इम्रान खान यांना पाठिंबा देतायत. आर्थिक परिस्थितीवर मलिक म्हणतात, "आम्हाला या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. इम्रान खान यांनी भूमिका घेतली आहे आणि आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे."

इम्रान खान भ्रष्टाचाराच्या विरोधात जोरदार आवाज उठवत आहेत. विरोधी पक्षांनी आपल्या विरोधात मतदान करण्यासाठी खासदारांना पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे, परंतु विरोधी पक्षांचे नेते हे आरोप फेटाळून लावतात.

मी या मतदारसंघातील अनेकांशी बोललो. दैनंदिन वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ, ज्याची तक्रार बहुतांश लोक करत होते.

त्या केशकर्तनालायातील मालकाच्या नाराजीचा सूर स्पष्टपणे दिसून येत होता, तो जवळजवळ भावनिक होऊन ओरडतो, "या देशाचे गरीब उद्ध्वस्त झालेत."

हेअरबँडच्या दुकानात सामान बघत बघत इरम आणि नोरीन सांगतात,"फक्त पाकिस्तानातच नाही तर सर्वत्र किंमती वाढत आहेत"

मात्र, या दोघींसोबत आलेल्या त्यांच्या मैत्रिणी हे मान्य करताना दिसत नाहीत.

खरी गोष्ट अशी आहे की पाकिस्तानमधील किमती पाकिस्तानच्या शेजारी देशांपेक्षा वेगाने वाढतायत. मात्र इम्रान खान यांच्या धोरणांवर जनतेचा रोष असूनही, कोणत्याही जनभावनेमुळे त्यांना हटवण्याची योजना बनवण्यात आलेली नाही. यामागे राजकीय खेळी आहे.

इम्रान खान विदेशी षडयंत्राचा आरोप करतायत

पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीने इम्रान खान सत्तेवर आल्याचे मानलं जात असलं तरी आता हे समर्थन राहिलं नसल्याचं निरीक्षकांच म्हणणं आहे. इम्रान खान यांचे राजकीय विरोधक त्यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. युतीत असलेले अनेक पक्ष ही इम्रान खान यांना सोडून विरोधी पक्षाकडे गेले आहेत.

दुसरीकडे, इम्रान खान यांनी त्यांच्या राजकीय आव्हानांचे वेगळे आणि विचित्र स्पष्टीकरण दिलं आहे. पाकिस्तानमध्ये सत्ता परिवर्तनाच्या प्रयत्नामागे परकीय षड्यंत्र असल्याचे त्यांचे म्हणणं आहे. या परकीय षड्यंत्राला आपण बळी पडल्याच त्यांचं म्हणणं आहे.

आपल्या परराष्ट्र धोरणांमुळे अमेरिका नाराज असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटण्यासाठी मॉस्कोला भेट देणे आणि अमेरिकेवर टीका करणे यासारख्या त्यांच्या परराष्ट्र धोरणांमुळे अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्याला बोलवून इम्रान खान यांना सत्तेतून काढून टाकण्याची गरज असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेत्यांकडून या आरोपांची खिल्ली उडवली जात असून या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत अमेरिकेने ही हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पाश्चात्य विरोधाचं नॅरेटिव्ह

असं दिसून येतंय की, इम्रान खान हे पाश्चात्य विरोधाचं एक नॅरेटिव्ह बिल्ड करत आहेत. आणि याला त्यांचे कट्टर समर्थकही पाठिंबा देत आहेत.

मार्केटिंगमध्ये काम करणारा 25 वर्षीय सोहेल अख्तर एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये बसून त्याच्या मित्रांशी बोलत होता.

या सर्वांनी 2018 मध्ये इम्रान खान यांनाच मतदान केलं होत आणि आजही ते इम्रान खानला समर्थन देतात. सोहेल म्हणतो, "जागतिक मंचावर पाकिस्तानचा सन्मान व्हावा अशी माझी इच्छा होती आणि आता तसं झालंय."

मोहम्मद हे सरकारी कर्मचारी आहेत. ते सांगतात, "बघा ते इस्लामोफोबियाच्या विरोधात कसे बोलले, पूर्वी आम्ही गुलामांसारखे होतो."

पण चर्चा जेव्हा इम्रान खान आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संबंधांकडे सरकली, आणि इम्रान खान यांच्यासाठी होत असलेल्या बदलाला पाकिस्तानी लष्कर जबाबदार आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मात्र या गटात थोडी अस्वस्थता दिसली.

काही काळापूर्वी इम्रान खान अभिमानाने सांगत असत की त्यांची आणि लष्कराची भूमिका एकच आहे. इम्रान खान यांचे अनेक समर्थक स्वत:कडे लष्कराचे समर्थन करणारे 'देशभक्त' म्हणून पाहतात.

25 वर्षीय शफकत कबूल करतो, "त्यांच्या (लष्कराच्या) पाठिंब्याशिवाय तुम्ही सरकार स्थापन करू शकत नाही." शफकत इम्रान खान यांच्या विदेशी षडयंत्राच्या आरोपांवर विश्वास ठेवतो.

मात्र, आजतागायत एकाही पाकिस्तानी पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही आणि इम्रान खान यांनाही तो कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.

अर्थव्यवस्थेच्या खराब स्थितीमुळे इम्रान खान यांची लोकप्रियता निःसंशयपणे कमी झाली आहे, परंतु खान देशाच्या राजकारणात एक मजबूत शक्ती म्हणून कायम राहतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)