You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीरमधल्या 'त्या' अपहरणनाट्यानंतर फुटीरतावादाला कलाटणी मिळाली तेव्हा...
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अनेक वर्षं कांग्रेसचे नेते राहिलेले मुफ्ती मोहम्मद सईद यांनी 1989च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन जनता दलात प्रवेश केला. निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान झालेल्या व्ही. पी. सिंग यांनी सईद यांना गृह मंत्रीपद दिलं.
मुफ्ती मोहम्मद सईद हे भारतातील पहिले व आत्तापर्यंतचे एकमेव मुस्लीम गृह मंत्री राहिले आहेत. त्यांना या पदावर नियुक्त करून व्ही. पी. सिंग बहुधा काश्मिरी जनतेला सकारात्मक संदेश देऊ पाहत होते. पण सईद यांचा शपथविधी झाल्यानंतर चारच दिवसांनी घडलेली एक घटना काश्मीरच्या इतिहासातील बहुधा सर्वांत भयानक कालखंडाला जन्म देणारी ठरली.
8 डिसेंबर 1989 रोजी तीन वाजून 45 मिनिटांनी मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबय्या सईद लाल देद रुग्णालयातून बाहेर पडली, तेव्हा त्यांच्या मिनीबसमध्ये पाच तरुण चढले.
हळूहळू बसमधील प्रवासी आपापल्या ठिकाणी उतरत गेले आणि बस श्रीनगरजवळच्या नौगामकडे वळली. रुबय्या सईद यांचं घर नौगाममध्ये होतं. दरम्यान, बसमधील ते पाच तरुण अचानक उठले आणि त्यांनी ड्रायव्हरला बस नातीपोराकडे न्यायला सांगितलं.
नातीपोरामध्ये निळ्या रंगाची एक मारूती कार थांबलेली होती. रुबय्याला बळजबरीने त्या कारमध्ये बसवण्यात आलं आणि राज्य सरकारी सेवेत कनिष्ठ अभियंता पदावर असणाऱ्या जावेद इक्बाल मीर यांच्या सोपोरमधील घरात नेण्यात आलं.
पाच दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी
विख्यात पत्रकार मनोज जोशी यांनी 'द लॉस्ट रिबेलियन: काश्मीर इन द नाइनटीज्' या पुस्तकात लिहिलं आहे, "रुबय्यासोबत जेकेएलएफचे नेते यासिन मलिक, अश्फाक माजित वानी आणि गुलाम हसनसुद्धा होते. कार चालवणारा अली मोहम्मद मीरसुद्धा राज्य औद्योगिक विकास महामंडळ या सरकारी कंपनीत तांत्रिक अधिकारी पदावर काम करत होता.
त्याच दिवशी संध्याकाळी जेकेएलएफच्या प्रवक्त्याने 'कश्मीर टाइम्स' या वृत्तपत्राला फोन करून सांगितलं की, त्यांच्या संघटनेच्या मुजाहिदांनी डॉक्टर रुबय्या सईदचं अपहरण केलं आहे. आपला सहकारी हामिद शेखला तुरुंगातून सोडवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं आहे. हामिद शेखसोबतच शेर खाँ, जावेद अहमद झरगर, नूर मोहम्मद कलवल व मोहम्मद अल्ताफ बट या इतर चार जणांच्याही सुटकेची मागणी त्यांनी केली."
त्या वेळी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला वैद्यकीय उपचारांसाठी इंग्लंडला गेले होते. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी अब्दुल्ला नैराश्यात गेले होते. परंतु, त्यांच्या ईसीजीमध्ये काहीतरी गफलत झाल्यामुळे ते उपचारांसाठी परदेशात गेल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं होतं.
मनोज जोशी लिहितात, "या अपहरणाचा अनेक लोकांना मोठा धक्का बसला, पण दुसऱ्या बाजूला राज्यातील मुफ्ती यांचे प्रतिस्पर्धी या पेचप्रसंगामुळे खूश झाले होते. दहशतवाद्यांना रुबय्या सईदला मारण्याचं कारण मिळेल, अशी कोणतीही कृती करू नये असा आदेश केंद्र सरकारने राज्याच्या पोलीस प्रमुखांना दिला."
वास्तविक, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) ही संघटना अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या मोठ्या अपहरणाची योजना तयार करत होती.
रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी 'कश्मीर: द वाजपेयी इयर्स' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "जेकेएलएफने पहिल्यांदा फारुख अब्दुल्ला यांची सर्वांत मोठी मुलगी सफिया अब्दुल्ला यांचं अपहरण करायची योजना आखली होती. पण तसं करणं अवघड होतं, कारण गुपकर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी कटेकोट सुरक्षाव्यवस्था असायची आणि सफिया त्या वेळी फारशा बाहेर पडत नसत.
"त्यानंतर जेकेएलएफने वरिष्ठ पोलीस अधीक्षक अल्लाहबख्श यांच्या मुलीच्या अपहरणाची योजना आखली. १९८७च्या निवडणुकांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप अल्लाहबख्श यांच्यावर होता. दरम्यान, रुबय्या सईद यांचं अपहरण करावं, असं जेकेएलफच्या एका नेत्याला सुचलं.
"रुबय्या लाल देद रुग्णालयात इन्टर्न म्हणून काम करत होत्या, त्यामुळे एक-आड-एक दिवस त्या रुग्णालयात यायच्याच. त्या किती वाजता येतात आणि किती वाजता परत जातात, याची माहिती काढण्यात आली. त्यानंतर मग अपहरणाच्या कारस्थानाला अंतिम रूप देण्यात आलं."
मुफ्ती सईद यांच्याशी संपर्क
सरकारच्या बाजूने गुजरात केडरचे आयएएस अधिकारी आणि त्या वेळी काश्मीरमध्ये मुख्य सचिव असणारे मूसा रझा यांनी दहशतवाद्यांशी चर्चा सुरू केली. श्रीनगरमध्ये तैनात असणारे गुप्तचर विभागाचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी ए. एस. दौलत पडद्यामागून त्यांना साथ देत होते. 'कश्मीर टाइम्स'चे पत्रकार जफर मेराज यांनी अपहरणाकर्त्यांपैकी अश्फाक माजित वानीच्या वडिलांशी दुलत यांची गाठ घालून दिली.
दुलत लिहितात, "आम्ही एका सरकारी फ्लॅटमध्ये भेटलो आणि जमिनीवर बसून बोललो. दिल्लीने सातत्याने काश्मिरी लोकांवर अन्याय केल्याचं, ते वारंवार ठासून सांगत होते. अपहरण करणारे मुलगे वाईट नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. यातून कोणाचं काही नुकसान होणार नाही, रुबय्या त्यांच्या बहिणीसारखी आहे, असंही आश्वासन ते देत होते. हामिद शेखची सुटका करवून घेणं, हा अपहरणामागचा मुख्य उद्देश होता, असं अश्फाकच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं."
दुलत पुढे लिहितात, "अखेरीस त्यांनी अत्यंत नाटकी पद्धतीने माझा हात धरला. ही मुलं खूप चांगली आहेत. दिल्लीहून काहीच निर्णय झाला नाही, तरीसुद्धा ते रुबय्याला काही त्रास देणार नाही आणि तिला सोडून देतील, असं ते म्हणाले. रुबय्याच्या सुटकेसाठी आम्हाला कोणाला तुरुंगातून सोडावं लागणार नाही, किंवा फारतर हामिद शेखला सोडून काम भागेल, असं आम्हाला त्या वेळी वाटलं."
दरम्यान, रुबय्या सईद यांच्या सुटकेसाठी सुरू झालेल्या मोहिमेत इतर अनेक लोक सहभागी झाले. अहालाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश मोतीलाल कौल, आमदार मीर मुस्तफा आणि एमयूएफचे संस्थापक व कालांतराने हुर्रियतचे अध्यक्ष झालेले मौलवी अब्बास अन्सारी यांचा त्यात समावेश होता.
फारुख अब्दुल्ला 11 डिसेंबर 1989 रोजी लंडनहूनही श्रीनगरला परतले. आल्या आल्या त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. अपहरणासंदर्भात पुढे काय होतंय हे आपल्याला माहीत नसल्याची तक्रार त्यांच्या मंत्र्यांनी केली. सर्व निर्णय गुप्तचर विभागाच्या कार्यालयातून घेतले जात आहेत. मुख्य सचिव आम्हाला काही सांगत नाहीत, ते कायम गुप्तचर विभागाच्या कार्यालयात बसलेले असतात.
दुलत लिहितात, "अब्दुल्ला यांनी तत्काळ मूसा यांना बोलावून घेतलं आणि परत दहशतवाद्यांशी चर्चा न करण्याचा आदेश दिला. मूसा यांनी यामागचं कारण विचारलं, तेव्हा अब्दुल्ला यांनी प्रतिप्रश्न केला- 'तुम्ही तुमच्या चर्चेचा तपशील मंत्रिमंडळासमोर का मांडला नाही?' मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळच अस्तित्वात नसतं, त्यामुळे कोणाला माहिती द्यावी, हे आपल्याला माहिती नव्हतं, असं मूसा म्हणाले. वास्तविक त्या वेळी मूसा दिल्लीत बसलेले कॅबिनेट सचिव टी. एन. शेषन यांना सर्व माहिती कळवत होते.
अब्दुल्ला दहशतवाद्यांना सोडायला तयार नव्हते
रुबय्या सईदच्या सुटकेबदल्यात एका दहशतवाद्याला सोडलं, तरी त्याचा परिणाम काय होईल, याचा अंदाज फारुख अब्दुल्ला यांना होता, पण दहशतवाद्यांशी समेट घडवण्यासाठी दिल्लीहून प्रचंड दबाव येत होता.
फारुख अब्दुल्ला यांनी 11 ते 13 सप्टेंबर केंद्र सरकारच्या इच्छेनुसार पावलं उचलली, पण अपहरणकर्त्यांच्या मागणीनुसार पाच दहशतवाद्यांना मात्र सोडलं नाही. न्यायाधीश मोतीलाल कौल हे मुफ्ती मोहम्मद सईद यांचा संदेश घेऊन फारुख यांच्याकडे गेले. पाचही दहशतवाद्यांना सोडून द्यावं, असं त्या संदेशात म्हटलं होतं. त्यानंतर मात्र फारुख यांच्या संयमाचा बांध फुटला.
एका दहशतवाद्याला सोडण्याची मागणी सुरुवातीला करण्यात आली होती, त्यात चार जणांची भर कशी काय पडली, त्यांनी माझ्या मुलीचं अपहरण केलं असतं, तरीसुद्धा मी त्यांच्या सहकाऱ्यांना सोडलं नसतं, असं फारुख म्हणाले.
दुलत लिहितात, "फारुख यांनी माझ्या समोरच मुफ्ती यांना फोन केला. 'हे पाहा, आम्ही आमची पूर्णत ताकद लावू. काहीही गडबड होणार नाही, असं मी तुम्हाला आश्वासन देतो. मुफ्ती साहेब, मी माझ्या स्वतःच्या मुलीसाठी जे काही केलं असतं, ते सर्व काही आपल्या मुलीसाठीसुद्धा करतो आहे,' असं अब्दुल्ला म्हणाले."
पण 13 डिसेंबरला सकाळी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी फारुख यांना फोन करून पाच दहशतवाद्यांना सोडण्याचा आदेश दिला. त्या वेळीसुद्धा फारुख यांनी या निर्णयाबाबत अस्वस्थता दर्शवली. काहीच तासांनी व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य इंद्रकुमार गुजराल आणि आरिफ मोहम्मद खान गुप्तचर विभागाचे प्रमुख एम. के. नारायणन यांच्यासह श्रीनगरला पोचले.
दुलत लिहितात, "या लोकांना घेण्यासाठी मी विमानतळावर जातो आहे, असं मी फारुख यांना सांगितलं, तेव्हा त्यांना घेऊन थेट आपल्या घरी यावं, असं फारुख मला म्हणाले. मी तसं केलं. त्यांची बैठक दोन तास सुरू होती. या दरम्यान आम्ही प्रत्येकी तीन-तीन कप चहा प्यायलो. शेवटी, या दोन मंत्र्यांनी फारुख यांना खोलीबाहेर नेऊन पुढे काय करायचंय ते सांगितलं. फारुख म्हणाले, 'तुम्हाला त्यांना सोडायचंच असेल तर सोडून द्या.
"पण मी माझा विरोध नोंदवू इच्छितो.' सरकारने धीर धरला तर रुबय्या यांना कोणतीही इजा न होता सोडवणं शक्य आहे आणि त्यासाठी कोणाही दहशतवाद्याला सोडावं लागणार नाही, असं फारुख यांनी सांगितलं. पण सरकारने आपलं म्हणणं ऐकलं नाही, तर काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद उसळी घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं."
दहशतवाद्यांकडून स्वागत
त्याच दिवशी दुपारी तीन वाजता पाच दहशतवाद्यांना अवामी अॅक्शन कमिटीचं मुख्यालय असणाऱ्या मीरवाइझ मंजिलजवळच्या राजौरी कदल भागात सोडून देण्यात आलं. तिथे त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी गोळा झआली होती आणि या पाच जणांची श्रीनगरच्या रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली.
काही तासांनी, संध्याकाळी सात वाजता रुबय्या सईद यांना सोडून देण्यात आलं. तोवर सरकारने सोडलेले दहशतवादी भूमिगत झाले होते. मनोज जोशी लिहितात, "दहशतवाद्यांच्या सुटकेसंदर्भात महत्त्वाची भूमिका निभावणारे केंद्रीय मंत्री दिल्लीला परतण्यासाठी विमानतळाकडे निघाले, तेव्हा वाटेत त्यांना या सुटकेसंदर्भात जल्लोश करणारा जमाव दिसला. या मंत्र्यांना विमानतळावर सोडायला गेलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या परत आल्या तेव्हा या जमावातील उत्साही लोकांनी गाड्या थांबवून त्यांच्याकडून आंदोलनासाठी देणगी मागितली."
या घडनेनंतर दहशतवादी हिंसाचाराचं लोण पसरलं आणि अपहरणांची मालिकाच सुरू झाली. जम्मू-काश्मीरची राजधानी असणाऱ्या श्रीनगरमध्ये खूपच थोडे सरकारी कर्मचारी थांबले. बाकी सर्वांनी जम्मूमध्ये बाडबिस्तरा हलवला. आता आपण स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलो आहोत, असं अनेक काश्मिरी लोकांना वाटू लागलं. अनेकांनी त्यांच्या घड्याळाचे काटे मागे फिरवून पाकिस्तानी प्रमाणित वेळेशी घड्याळं जुळवली.
6 एप्रिल 1990 रोजी काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरू मुशीरूल हक, त्यांचे स्वीय सचिव अब्दुल घनी आणि हिंदुस्तान मशीन टूल्स या कंपनीचे महाव्यवस्थापक एच. एल. खेडा यांचं अपहरण करण्यात आलं. या बदल्यात इतर काही दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी सरकारने फेटाळून लावली, तेव्हा या तिघांचीही हत्या करण्यात आली.
ऑगस्ट 1991मध्ये श्रीनगरच्या दौऱ्यावर आलेले भारतीय तेल महामंडळाचे कार्यकारी संचालक के. दुराईस्वामी यांचं अपहरण झालं, तेव्हा सरकारने पाच दहशतवादी सोडून त्यांची सुटका करवली.
पीएलडी पारिमू यांनी 'कश्मीर अँड शेर ए कश्मीर: अ रिव्होल्यूशन डिरेल्ड' या पुस्तकात लिहिलं आहे की, "हिंदू, मुस्लीम आणि शीख समुदायांमधील धुरीणांची एक-एक करून हत्या केली जात होती. भयाचं वातावरण निर्माण व्हावं आणि वैचारिक मतभिन्नता उरू नये, यासाठी हे केलं जात होतं. दहशतवाद्यांच्या उद्दिष्टांशी सहमत नसलेल्या आणि या प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी लोकांचा विचार बदलू शकतील अशा लोकांना लक्ष्य करण्यात आलं."
दोन दशकं लहानमोठ्या हिंसक कारवाया करणाऱ्या जेकेएलएफला पहिल्यांदाच लक्षात आलं की आपण सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू शकतो. अशा रितीने रुबय्या सईद यांचं अपहरण आणि त्या वेळी झालेली पाच दहशतवाद्यांची सुटका, यांमुळे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांच्या इतिहासाला वेगळं वळण मिळालं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)