रशियात किती 'डार्क मनी' आहे? इथल्या अब्जाधीशांनी त्यांचा पैसा कुठे लपवलाय?

रशियातील अतिश्रीमंतांपैकी एकाच्या मालकीची असलेली 'एक्सिओमा' ही यॉट जप्त करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, रशियातील अतिश्रीमंतांपैकी एकाच्या मालकीची असलेली 'एक्सिओमा' ही यॉट जप्त करण्यात आली होती.

गेल्या काही दशकांमध्ये रशियातील अतिश्रीमंत बडी प्रस्थं (यांच्यासाठी इंग्रजीत 'ऑलिगार्क' हा शब्द प्रचलित आहे) स्वतःचं अब्जावधी डॉलर्सचं अवैध उत्पन्न परदेशी पाठवत आली आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचा थांगपत्ता लावणं अवघड झालं आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातील अनेक देश या काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी नवीन प्रतिबंध व कायदे लागू करत आहेत. त्यामुळे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निकटवर्तीय बड्या धेंडांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

जगभरात किती रशियन 'डार्क मनी' आहे?

'अटलान्टिक कौन्सिल' या अमेरिकी विचारगटाकडील आकडेवारीनुसार रशियन लोकांनी परदेशात सुमारे एक हजार अब्ज डॉलर इतका काळा पैसा साठवलेला आहे.

या रकमेतील एक चतुर्थांश हिस्सा रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा आहे, असा अंदाज 'अटलान्टिक कौन्सिल'ने 2020 साली प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात नोंदवण्यात आला होता.

पुतिन एका रशियन उद्योगपती सोबत

फोटो स्रोत, Getty Images

या अहवालात म्हटल्यानुसार, "रशियाच्या बाजूने या पैशाचा वापर गुप्तहेरगिरी, दहशतवाद, औद्योगिक गुप्तहेरगिरी, भ्रष्टाचार, राजकीय अफरातफर, गैरप्रचार आणि इतर अनेक कामांसाठी केला जातो."

रशियात किती 'डार्क मनी' आहे?

अमेरिकेतल्याच 'नॅशनल एन्डोवमेन्ट फॉर डेमॉक्रसी' या दुसऱ्या एका विचारगटाने असा दावा केला आहे की, व्लादिमीर पुतिन यांनीच त्यांच्या निकटवर्तीयांना अशा मार्गाने पैसा कमावण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

पुतिन यांच्या पाठिंब्यामुळे या लोकांनी 'सरकारी अर्थसंकल्पातून चोरी करणं, खाजगी उद्योगातून पैसे लाटणं आणि नफादायक उद्योगांवर जप्ती आणण्याच्या योजना आखणं' अशा वाटांनी अब्जावधी डॉलर कमावल्याचं ही संस्था म्हणते.

रशिया

फोटो स्रोत, Getty Images

रशियातील बोरीस नेम्तोसव आणि व्लादिमीर मिलोव या विरोधी पक्षनेत्यांनी मध्यंतरी असा दावा केला की, 2004 ते 2007 या कालावधीत गझप्रोम या बड्या तेल कंपनीच्या तिजोरीतील 60 अब्ज डॉलर पुतिन यांच्या निकटवर्तीय उद्योजकांच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले.

'इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स' या संघटनेने काही काळापूर्वी पँडोरा पेपर्स या नावाने काही दस्तावेज उघडकीस आणले होते. त्यानुसार, व्लादिमीर पुतिन यांचे निकटवर्तीय उद्योजक खूप श्रीमंत झाले आहेत. हे उद्योजक एकमेकांची संपत्ती इतरत्र पाठवण्यासाठी एकमेकांना मदतही करतात.

हा सगळा पैसा आहे कुठे?

पूर्वी यातील बहुतांश पैसा सायप्रसला ठेवण्यात आला होता, कारण तिथली करव्यवस्था अशा साठ्यासाठी अनुकूल होती. काही जण तर या बेटरूपी देशाला 'भूमध्य समुद्रातील मॉस्को' असंही संबोधू लागले होते.

सायप्रसमध्ये 2013 साली रशियाहून 36 अब्ज डॉलर पाठवण्यात आल्याचं 'अटलान्टिक कौन्सिल'ने म्हटलं आहे. यातील बहुतांश पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हस्तांतरित झालेला होता.

सायप्रसने बनवाट कंपन्यांची हजारो खाती बंद करावीत, असा आदेश आंतरराष्ट्रीय नाणे निधीने 2013 साली सायप्रसला दिला होता.

ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि केमॅन आयलंड्स यांसारख्या ब्रिटनच्या अधिपत्याखालील बेटांवरही रशियन पैसा साठवलेला आहे. यातील काही पैसा गुंतवणुकीसाठी न्यूयॉर्क व लंडन यांसारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांकडे पाठवला जातो.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

'ग्लोबल विटनेस' या संस्थेच्या एका अहवालानुसार, 2018 साली रशियन अतिश्रीमंतांनी अशा करसुरक्षित ठिकाणी सुमारे 45 अब्ज डॉलर साठवलेले होते.

आर्थिक गुन्हेगारीचा आरोप असणारे रशियन उद्योजक किंवा तिथल्या सत्ताधाऱ्यांशी संबंध असणाऱ्या व्यक्ती यांची किमान दोन अरब डॉलरांपर्यंतची मालमत्ता ब्रिटनमध्ये आहे, असा दावा भ्रष्टाचार थोपवण्यासाठी कार्यरत असलेल्या 'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' या संस्थेने केला आहे.

'ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट'ने 2014 साली 'रशियन लॉन्ड्रोमॅट' नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला होता. रशियाकडून केल्या जाणाऱ्या आर्थिक अपरातफरीची व्याप्ती या अहवालातून समोर आली.

2011 ते 2014 या दरम्यान रशियातील 19 बँकांनी 96 देशांमधील 5140 कंपन्यांचा 21 अब्ज डॉलर इतका काळा पैसा पांढरा केला, असा दावा या अहवालात करण्यात आला होता.

हा पैसा कसा लपवला जातो?

बनावट कंपन्या काढणं हा पैसे लपवण्यासाठी सर्रास वापरला जाणारा मार्ग आहे. रशियातले बडे लोकही परदेशांमध्ये पैसा लपवताना हाच मार्ग अवलंबतात.

'अटलान्टिक कौन्सिल'ने म्हटल्यानुसार, "रशियातील गडगंज संपत्ती असणारे लोक पैसा लपवण्यासाठी किंवा लाटण्यासाठी जगभरातील उत्तमोत्तम वकील, लेखापरीक्षक, बँकर व दबावगटांची नियुक्ती करतात आणि त्याद्वारे कायद्यांमधील पळवाटा शोधतात."

"एका रशियन बड्या धेंडाकडे परदेशी न्यायक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक बनावट कंपन्या असतात. या कंपन्यांच्या खात्यांमध्ये त्यांचा पैसा विजेच्या गतीने फिरता ठेवला जातो."

'इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स' या संघटनेने 2016 साली 'पनामा पेपर्स' या नावाने आणखी काही दस्तावेज प्रकाशित आणले. त्यानुसार, निव्वळ एका कंपनीने रशियातील बड्या धेंडांसाठी २,०७१ बनावट कंपन्या तयार केल्या होत्या.

रशियन बड्या धेंडांचा काळा पैसा शोधण्यासाठी कोणते उपाय केले जात आहेत?

युक्रेनवरील हल्ल्यानंतर पाश्चात्त्य राष्ट्रांनी रशियाकडचा पैसा शोधण्यासाठी अनेक उपाय हाती घेतले आहेत. रशियन बड्या धेंडांचा काळा पैसा जप्त करण्यासाठी अमेरिकेने 'क्लेप्टोकॅप्चर' या नावाचं कृतिपथकच स्थापन केलं आहे.

या कृतिपथकाची जबाबदारी तिथल्या न्याय मंत्रालयाकडे असणार आहे. बेकायदेशीर मार्गाने गोळा केलेली मालमत्ता जप्त करणं, हे या पथकाचं काम असेल.

ब्रिटन सरकारने 'अनएक्सप्लेन्ड वेल्थ ऑर्डर'चा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपण ब्रिटनमध्ये मालमत्ता खरेदी करताना पैसे कुठून जमा केले, हे सिद्ध करणं संबंधितांसाठी अनिवार्य करणारा हा नियम आहे. खरेदीदाराला आपल्या पैशाचा स्त्रोत दाखवून देता आला नाही, तर अशी संपत्ती जप्त केली जाऊ शकते.

रोमन अब्रामोविच

फोटो स्रोत, Getty Images

'अकाउन्ट फ्रिजिंग ऑर्डर'द्वारे न्यायालयांना यासंबंधी काही विशेषाधिकार मिळाले आहेत. कोणाची संपत्ती गुन्हेगारी कृत्यांद्वारे कमावल्याचं निदर्शनास आलं, तर असा पैसा जप्त करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकतं.

शिवाय, परदेशी संस्थांच्या नियंत्रणाखाली मालमत्ता व आर्थिक गुन्हेगारी याबाबत नोंदपट ठेवायलाही ब्रिटनच्या सरकारने मंजुरी दिली आहे.

ब्रिटनने 'गोल्डन व्हिसा योजना'ही रद्द करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या परदेशी श्रीमंतांना तिथे राहण्याचा अधिकार देणारी ही योजना होती.

रशियातील काळा पैसा साठवण्यासाठी प्राधान्य मिळालेल्या माल्टा या देशानेही 'गोल्डन पासपोर्ट'ची योजना रद्द केली आहे. सायप्रस आणि बल्गेरिया यांनीसुद्धा 2020 साली आपापल्या देशांमधील अशा योजना थांबवल्या.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)