You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चांगला पगार आणि आशावादी राहण्याचा असा संबंध आहे...
आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपलं आयुष्य वाढवतो. बोस्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार, किमान आशावादी लोक 11% ते 15% हुन जास्त आहेत. चांगले विचार ठेवणारे लोक आजारी पडण्याची शक्यता ही कमी असते. ते चांगले नातेसंबंध ठेवतात आणि चांगला पगार देखील मिळवतात.
पण ज्यांना अर्धा पेला रिता पाहायचीच सवय असेल ते त्यांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी काही करू शकतात का?
तर अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी (2016) मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाचे सह-संचालक एरिक किम यांच्या मते,"तुमच्यातील 25% पर्यंत आशावाद हा अनुवांशिक असू शकतो. याचा अर्थ 75% पर्यंत दृष्टिकोन बदलता येण्याजोगा आहे."
दुसऱ्या शब्दांत सांगायचंच झालं तर, तुमच्या मनात दाटून आलेलं मळभ दूर करायचं असेल तर तुम्हाला खालील गोष्टी मदत करू शकतात.
1. तुमच्या अडचणी ओळखा
असं म्हणतात की कोणत्याही समस्येची पहिली पायरी म्हणजे त्याची जाणीव होणे.
अॅलिसन फंक या अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॉग्निटिव्ह थेरपी येथील एक मनोविकार तज्ज्ञ आहेत. त्यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना स्पष्ट केलं की, "अनेक निराशावादी लोकांना असं वाटत की, आपल्यासोबत सगळ्या गोष्टी चुकीच्याच होणार आहेत. आणि त्यांच्या या समजुती बरोबर आहेत असा त्यांचा समज असतो. हे वाईट विचार कायमस्वरूपी, सामान्यीकृत आणि वैयक्तिक आहेत."
"म्हणूनच मी म्हणेन की पहिली पायरी म्हणजे तुमच्या विचारांच्या पॅटर्नकडे थोडसं कुतूहलाने बघा. हे नेहमीच माझ्या बाबतीत घडतं, ही माझी चूक आहे, किंवा मला नेहमीच असं वाटतं अशी वाक्य वारंवार वापरात असल्यास त्याचं विश्लेषण करा. तुम्हाला समजेल की प्रत्येक वेळी काहीतरी वाईट घडलेलं नसतं."
फंक सांगतात, की जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा आपण आपल्या या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. आणि आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींमुळे आपल्यासोबत काहीतरी वाईट घडलं असेल का हे स्वतःला विचारलं पाहिजे.
2. कृतज्ञता व्यक्त करा
आपल्याजवळ असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची शिफारस अनेक मानसशास्त्रज्ञ करतात.
फंक म्हणतात, "तुमच्या जीवनात अस्तित्वात असलेल्या सकारात्मक गोष्टींबद्दल जागरूक रहा. तुमच्या भविष्यात सकारात्मक गोष्टी घडतील अशी आशा निर्माण करा."
त्या नियमितपणे लिहिण्याचा सल्ला देतात. "तुम्ही आयुष्यात कृतज्ञ आहात अशा पाच गोष्टींबद्दल लिहा किंवा याबाबत एखाद्या मित्राला मॅसेज पाठवा."
हा साधा सराव तुम्हाला अधिक सकारात्मक अशी मानसिक वृत्ती विकसित करण्यास मदत करू शकतो.
स्पॅनिश मानसशास्त्रज्ञ आणि वैयक्तिक विकासावरील पुस्तकांच्या लेखिका लॉरा रोजास-मार्को सांगतात की, कोव्हिड साथीच्या काळात त्यांच्या रूग्णांसह त्यांनी ही दररोज रात्री असं लिखाण केलं.
त्यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं की, "स्वत:च्या मानसिक आणि भावनिक आरोग्यामुळे त्रासलेल्या लोकांसोबत 15 तास काम केल्यानंतर दिवसाच्या शेवटी मी माझ्या वहीत त्या दिवशी घडलेल्या सकारात्मक गोष्टी लिहून ठेवल्या. सकारात्मक गोष्टींनी दिवसाचा शेवट केला."
3. निराशेला जागा द्या
"वास्तवात आशावादी" असण्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आयुष्यात तुमच्यासोबत काही वाईट गोष्टी घडतील हे मान्य करणे.
फंक सांगतात, मग प्रत्येक दिवस हा परिपूर्णच असेल याचा विचार करणं म्हणजेच आशावादी असणं असं नाही. तर आपल्या आयुष्यात वाईट गोष्टीही घडतील हे समजून घेणं म्हणजे आशावादी असणं.
आता याची काळजी करण्याऐवजी आपल्यासोबत घडणाऱ्या वाईट गोष्टी आपण हाताळू शकू हे स्वतःला सांगणं चांगलं असतं.
4. तुम्हाला उत्साह मिळेल अशा गोष्टी करा आणि स्वतःची काळजी घ्या
फंक सांगतात, "सुट्ट्यांच नियोजन करून एखादी सहल काढू शकता. पण काही लहानसहान गोष्टींमुळे देखील तुम्हाला आनंदी वाटेल."
मनोविकार तज्ज्ञ काही उदाहरण देतात त्याप्रमाणे, "बर्याच दिवसांपासून न भेटलेल्या मित्रांसोबत तुम्ही कॉफीसाठी जाऊ शकता. घराबाहेर पडण्याच्या योजना आखू शकता"
या गोष्टींमुळे मूड बदलण्यासाठी मदत होऊ शकते. फंक म्हणतात, "पॉजिटीव्ह मूड आणि पुरेशी झोप, चांगल खाणं, हानिकारक पदार्थ टाळणं आणि शारीरिक आजारांवर उपचार करणं, या गोष्टींमध्ये जवळचा सहसंबंध आढळतो."
"बॉडी केमिस्ट्रीकडे लक्ष दिल्यास तुम्हाला तुमच्या जीवनाकडे अधिक आशावादी दृष्टिकोन ठेवण्यास मदत होते."
5. गोष्टी पूर्णत्वास जात असल्याची कल्पना करा
रोजस-मार्को सांगतात, व्हिज्युअलायझेशन अर्थात कल्पना करणं हा एक चांगला उपाय आहे. पण हे व्हिज्युअलायझेशन वास्तवाला धरून पाहिजे.
मानसोपचार तज्ज्ञ सांगतात, "तुम्हाला हवी असणारी गोष्ट भविष्यात घडावी याची तुम्ही कल्पना करत असल्यास, तुमच्या मेंदूमध्ये त्याविषयीची वृत्ती सक्रिय होते. आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते. कारण जे नाही त्याकडे जाण्यापेक्षा तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीच्या दिशेने वाटचाल करणं जास्त सोपं असतं. मानसिक भीती असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे तंत्र बऱ्याच क्लिनिकलमध्ये वापरलं जातं.
स्वतःच्या मूल्यांनुसार जगण्याची कल्पना करणं हा उद्देश असणाऱ्या व्हिज्युअलायझेशनच्या उपयुक्ततेवर फंक सहमत आहेत. त्या सांगतात की, जेव्हा लोक स्वतःला स्वतःचे आदर्श मानतात, तेव्हा या आदर्शांची पूर्तता न केल्याबद्दल ते स्वतःला शिक्षा देण्यासाठी याचा वापर करतात."
व्हिज्युअलायझेशन आपल्याला लक्ष्य निश्चितीसाठी मदत करू शकतात.
आणि "हव्या असलेल्या उद्दिष्टांच्या दिशेने काम केल्यावर आपल्याला पूर्णत्वाची जाणीव होऊ शकते. यामुळेचं आपल्याला अधिक आशावादी वाटतं."
6. स्वतःशी संवाद साधा
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि सकारात्मक मानसशास्त्राच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या मार्टिन सेलिगमन सांगतात, जेव्हा तुम्ही एका अंधाऱ्या ठिकाणी असता, तिथं तुम्हाला सर्वकाही चुकीचं दिसतं.
तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे नकारात्मक प्रतिक्रिया देणारा आवाज ओळखण, त्याच्याशी चर्चा करणे. एक बाह्य व्यक्ती असते जी फक्त आपल्याला वाईट वाटावं असं इच्छिते.
रोजास-मार्को म्हणतात, "तो आंतरिक आवाज बहुतेकदा मी घाबरलेला आहे, मी असुरक्षित आहे, किंवा मी आळशी आहे असा असतो. आणि कधी कधी आळशीपणा देखील आपल्याला ट्रॅप करतो."
म्हणूनच त्या गंभीर आवाजासह अंतर्गत संवाद करणं आणि आपण स्वतःशी बोलणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणतात. यासाठी युक्तिवाद करत आतल्या आवाजाशी वाद घालता आला पाहिजे.
या संवादामुळे तुमच्या कृतीवर प्रभाव पडेल, त्यामुळे सकारात्मक चर्चा करणे महत्त्वाचे आहे.
7. जगात घडणाऱ्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकत नाही हे ओळखा
आपण स्वतःसाठी काय करू शकतो याबद्दलचं जागा शिल्लक असताना, हे खरंय की जगात जे काही घडतंय त्यातही आशावादी राहणं कधीकधी कठीण असतं. पण या गोष्टी पूर्णपणे आपल्या नियंत्रणाबाहेर असतात.
पर्यावरणीय संकट, सशस्त्र संघर्ष, स्त्रीहत्या आणि इतर अनेक समस्या अनेकांसाठी दुःख आणि निराशेचे स्रोत आहेत.
फंक म्हणतात की जगात काय चाललंय हे ओळखणं महत्त्वाचं आहे. "नकारात्मक भावना असणं हा मानवी स्वभाव आहे आणि ते योग्य आहे."
पण ते स्पष्ट करतात की, हे सुद्धा लक्षात ठेवणे तितकंच महत्त्वाचं आहे की या जगात जे काही चाललयं त्याबद्दल त्रस्त होऊन दुसऱ्यांसमोर वागताना त्याचा परिणाम दिसणं योग्य नाही.
"कधीकधी आपल्याला जागतिक परिस्थितीचे काय होईल याबद्दल अनिश्चितता वाटते. पण आपण केवळ आपलं स्वतःचं वर्तन नियंत्रित करू शकतो."
फंक यांच्या मते "आपण आपल्या स्वतःच्या भावनिक अभिव्यक्तींवर नियंत्रण ठेवल्यास, इतरांशी कसं वागायचं हे ठरवल्यास आणि आपल्या मूल्यांनुसार आपण स्वतःला जगासमोर सादर केल्यास हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो."
रोजस - मार्को मान्य करतात की हे एक आव्हान आहे. पण अशा मोठ्या संकटाच्या क्षणी आपल्याला आशावाद टिकवून ठेवण्यासाठी अल्पकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावं लागेल.
"हजारो किलोमीटर लांबचा विचार करण्यापेक्षा एक पाऊल पुढं टाकणं सोपं असल्याचं ते म्हणतात."
रोजस-मार्को सांगतात, वाईटातून आपल्याला सकारात्मक गोष्टी घेता आल्या पाहिजेत. जसं की, युक्रेनमधील युद्धाच्या वेळी सीमेवर हजारो किलोमीटर प्रवास करून आलेल्या लोकांना, स्पेनमधून आलेल्या लोकांना, निर्वासितांना तिथल्या लोकांनी स्वतःच घर देऊ केलं.
"यामुळे तुम्हाला आशा मिळते. आणि जेव्हा केव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या उदारतेची साक्षीदार असते तेव्हा त्या व्यक्तीकडून त्याची पुनरावृत्ती होते. यामुळे उदारतेची, सहानुभूतीची मानवी साखळी तयार होते, जी आपण आता पाहत आहोत."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)