You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया युक्रेन युद्धाचा शेवट असा होऊ शकतो...
- Author, जॉन सिम्पसन
- Role, वर्ल्ड अफेअर्स एडिटर
सर्वांत भयंकर युद्धदेखील एक ना एक दिवस संपतं. बर्याचदा, जसं की 1945 साली झालं होतं. युद्धाचा अंतिम परिणाम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागत असतं.
बहुतेक वेळा युद्धं काही करारानं संपतात, ज्यामुळे सर्वांचं सारखं समाधान तर होत नाही, परंतु किमान रक्तपात तरी थांबवला जातो.
आणि बर्याचदा, भयंकर आणि कटु युद्धानंतरही, दोन्ही बाजूंनी, कधी ना कधी, परिस्थिती पुर्वपदावर येऊन हळूहळू प्रतीकूल संबंध सुधारले जातात.
आपण जर भाग्यवान असलो तर असं म्हणू शकतो की, या क्षणी आपल्यासमोर रशिया-युक्रेन युद्धादरम्यान तीच प्रक्रिया सुरू होताना पाहणार आहोत.
जो आक्रोश आहे, विशेषत: युक्रेनच्या बाजूनं तो पुढील अनेक दशकं राहीलसुध्दा. पण दोन्ही बाजूंना सध्या शांतता हवी आहे आणि त्यांना शांततेची गरज आहे.
युक्रेनला शांततेची गरज आहे, कारण रशियाकडून जोरदार होणार्या बॉम्बहल्ल्यामुळे त्यांची शहरं उद्ध्वस्त होत आहेत.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दावा केलाय की, आतापर्यंतच्या युद्धात मारले गेलेले सैनिक आणि नष्ट झाल्याच्या शस्त्रांच्या बाबतीत रशियाचं दोन वेळेला झालेल्या चेचन्या युद्धांपेक्षा जास्त नुकसान झालंय.
परंतु, युक्रेनच्या या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करणं सध्यातरी अशक्य आहे.
शांतता कराराबद्दल बोलायचं झालं तर, कोणताही देश आनंदानं अशा करारावर स्वाक्षरी करण्यास धजावणार नाही जो त्यांच्या पतनाचं कारण होणार असेल.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपली विश्वासार्हता वाचवत युद्ध थांबवण्याचे वेगवगळे मार्ग शोधत आहेत.
दुसरीकडं, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आधीच राजकिय मुत्सद्दीगिरी करत आपलं कौशल्य जगाला दाखवलं आहे.
युक्रेनमधून रशियाला बाहेर काढण्यासाठी झेलेन्स्की यांना युक्रेनच्या लोकांना मान्य असलेलं सर्व काही सांगायचं आणि करायचं आहे.
झेलेन्स्की यांचं सध्या एकच उद्दिष्ट आहे - युक्रेनला या भयंकर परिस्थितीतून एक स्वतंत्र आणि एकसंध देश म्हणून बाहेर काढणं आणि देशाला कोणत्याही परिस्थीतीत रशियाचा प्रांत बनू द्यायचं नाही, कारण पुतिन यांना सुरुवातीला वाटत होतं की, युक्रेन हा रशियाचा भाग आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी या क्षणी सध्या एकच गोष्ट महत्त्वाची आहे की ते कधी युक्रेनवर विजय घोषित करतील. या अनावश्यक आक्रमणात रशियाचं कंबरड मोडलं आहे, हे त्यांच्या प्रशासनातील प्रत्येकजण आता मानायला लागला आहे.
वीस टक्क्यांहून अधिक रशियन नागरिकांना माहीत आहे की पुतिन यांनी त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत आपल्या घरावर म्हणजेच देशावर पैज लावली आहे आणि ते या जुगारात हरले आहेत.
देशाच्या उर्वरित लोकसंख्येचा पाठिंबा टिकवून ठेवण्यासाठी हा संघर्ष आहे, जे लोक टीव्हीवर पाहतात आणि त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात, जरी असे काही क्षण आले की पडद्यावर धाडसी संपादक मरिना ओव्हसियानिकोवा यांनी पोस्टर दाखवून लोकांना जे सांगितलं जातंय खोटं आहे आणि हा प्रचार आहे असं सांगीतलं होत.
प्रश्न असा आहे की, असं काय आहे जे पुतिन यांना या भयंकर युद्धातून बहुसंख्य रशियन लोकसंख्येला विजयी म्हणून बाहेर पडताना बघायचं आहे.
सर्वप्रथम, युक्रेनच्या राज्यघटनेत कदाचित समाविष्ट केलेलं लेखी आश्वासन, की युक्रेन नजीकच्या भविष्यात कधीही नाटोचा सदस्य होणार नाही. परंतु राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी यासाठी आधीच मार्ग तयार केला आहे.
झेलेन्स्की यांनी प्रथम नाटोला युक्रेनमध्ये नो-फ्लाय झोन घोषीत करण्यास सांगितलं आणि नंतर तसं न केल्याबद्दल लष्करी आघाडीवर तीव्र टीका सुध्दा केली. नाटो असं वागेल हे मला माहीत नव्हतं आणि नाटो संघटनेचा सदस्य होणं योग्य आहे की नाही अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर युक्रेनसाठी यापेक्षा चांगली परिस्थिती नसेल. युक्रेन याचं खापर नाटोवर फोडेल आणि युक्रेनला त्यांच्या मार्गावर चालण्याचं स्वातंत्र्य मिळेल.
पण हा एकच विषय नाही. समस्या अशी आहे की युक्रेन आणि युक्रेनच्या लोकांनाही युरोपियन युनियनचा भाग व्हायचं आहे आणि रशियाचा युक्रेनच्या नाटोमध्ये सामील होण्याइतकाच या गोष्टीलासुद्धा विरोध आहे. परंतु या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग देखील आहेत.
रशियानं युक्रेनच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी केलेल्या आंतरराष्ट्रीय करारांचं उल्लंघन करून ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या जमिनीवर रशियाचा ताबा स्वीकारणं युक्रेनसाठी सर्वांत कठीण असेल.
युक्रेननं 2014 मध्ये क्रायमिया गमावला आणि आता युक्रेनला त्यावर रशियाचा अधिकार स्वीकारण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. रशियाला सध्या स्पष्टपणे पूर्व युक्रेनच्या भागांवर नियंत्रण राखायचं आहे जे सध्या त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. किंवा कदाचित रशियाला त्याहून अधिक काही हवं असेल.
1939 मध्ये जोसेफ स्टॅलिननं एकेकाळी रशियन साम्राज्याचा भाग असलेल्या फिनलँडवर आक्रमण केलं. फिनलँडचा ताबा घेण्यास त्यांच्या सैन्याला वेळ लागणार नाही असा विश्वास स्टॅलिनला होता. असाच विचार 2022 मध्ये पुतिन यांनी केलेला दिसतोय, स्टॅलिनच्या सेनापतींनी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं की ते बरोबर आहेत. कारण त्यांना त्यांच्या जीवाचीसुध्दा भीती होती आणि सत्य हे होतं की स्टॅलिन त्यावेळेस चुकले होते.
हिवाळ्यात सुरू झालेलं हे युद्ध 1940 पर्यंत खेचलं गेलं आणि सोव्हिएत सैन्याच्या अपमानास्पद पराभवानं फिनलँडला महासत्तेचा सामना करण्याचा राष्ट्रीय अभिमान मिळवून दिला. स्टॅलिन आणि पुतिन यांसारख्या निरंकुश शासकांना अशा परिस्थितीतून विजयी होऊनच बाहेर पडायचं असतं. त्यामुळे तेव्हा फिनलँडला त्यांची काही जमीन गमवावी लागली होती.
पण फिनलँडने सगळ्यांत महत्त्वाची आणि अजिंक्य गोष्ट स्वतःजवळ ठेवली ते म्हणजे फिनलँडचं स्वातंत्र्य. नंतरच्या काळात फिनलँड हे एक स्वावलंबी आणि स्वतंत्र राष्ट्र राहिलं.
आजच्या घडीला युक्रेननं अनेक रशियन आक्रमणं उधळून लावली आहेत आणि पुतिन यांचं सैन्य कमकुवत आणि अव्यवस्थित दिसत आहे. अशा स्थितीत फिनलँडने जे केलं ते युक्रेनही करू शकेल, असं दिसतय.
जोपर्यंत पुतिन यांचं सैन्य युक्रेनची राजधानी कीव्ह आणि इतर मोठ्या क्षेत्रांवर कब्जा करत नाही तोपर्यंत युक्रेन एक राष्ट्र म्हणून स्वतंत्र राहील, जसं फिनलँडने 1940 मध्ये निर्माण केलं होतं.
क्रायमिया आणि पूर्व युक्रेनचे काही भाग गमावणं हे एक कटू, मोठं आणि पूर्णपणे अन्यायकारक नुकसान असेल. मात्र पुतिन यांना हे युद्ध जिंकायचं असेल, तर त्यांना आतापर्यंत वापरण्यात आलेल्या सर्व शस्त्रास्त्रांपैकी धोकादायक असलेली शस्त्रं वापरावी लागतील.
युद्धाच्या तिसऱ्या आठवड्यातील परिस्थिती अशी आहे की हे युद्ध कोण जिंकणार आहे याबद्दल कोणीच शंका घेऊ शकत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)