सौदी अरेबियात एकाच दिवसात 81 जणांना फाशी

सौदी अरेबियाने शनिवारी (12 मार्च) 81 जणांना फाशीची शिक्षा दिल्याचं जाहीर केलंय. गेल्या वर्षभरात सौदी अरेबियात जितक्या लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली त्यापेक्षा हा आकडा अधिक आहे.

सौदी अरेबियाची वृत्तसंस्था एसपीएने दिलेल्या वृत्तानुसार, "फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये सात येमेनी आणि एका सीरियन नागरिकाचा देखील समावेश आहे. या लोकांना एकाहून अधिक अशा गंभीर गुन्ह्यांसाठी ही शिक्षा देण्यात आली."

यापैकी काहींना इस्लामी अतिरेकी गटांशी संबंध ठेवल्याच्या आरोपात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या संघटनांमध्ये इस्लामिक स्टेट, अल-कायदा आणि येमेनच्या हूती बंडखोर गटांचा उल्लेख करण्यात आला होता.

मानवाधिकार संघटनांचा आरोप आहे की, "कायदेशीर बाजू मांडण्याची संधी न देताच बऱ्याच आरोपींना शिक्षा देण्यात आली."

सौदी अरेबियाच्या सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

एसपीएच्या वृत्तानुसार, फाशी दिलेल्या दोषींवर 13 न्यायाधीशांच्या अखत्यारीत खटला चालवण्यात आला होता. हा खटला न्यायिक प्रक्रियेच्या तीनही टप्प्यातून गेला होता.

देशाच्या महत्त्वाच्या आर्थिक ठिकाणांवर हल्ला करण्याचा कट रचणे, सुरक्षा दलांना लक्ष्य करणे, अपहरण, छळ, बलात्कार आणि देशात शस्त्रास्त्रांची तस्करी करणे असे आरोप फाशी देण्यात आलेल्यांवर ठेवण्यात आले होते.

गेल्या वर्षभरात सौदी अरेबियात 69 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

फाशीची शिक्षा देणाऱ्या देशांच्या यादीत सौदी अरेबियाचे स्थान पाचव्या क्रमांकावर आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने तयार केलेल्या यादीनुसार फाशीच्या शिक्षा सुनावणाऱ्या देशांमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर इराण, इजिप्त, इराक आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)