ओलेना झेलेन्स्का : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कीच्या पत्नी कोण आहेत?

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जेव्हा राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना देश सोडण्याचा प्रस्ताव आला असता तेव्हा त्यांनी एका व्हीडिओद्वारे उत्तर दिलं की, "मला देश सोडण्याची नाही, शस्त्रांची आवश्यकता आहे."

त्यांची पत्नी ओलेना झेलेन्स्का आणि दोन मुलॆ साशा आणि सिरिल यांनीही देशात राहण्याचा निर्णय घेतलाय.

आणि आता राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे की, यानंतर त्यांचे कुटुंब हे रशियाचॆ पुढील लक्ष्य असेल. त्यांच्या या वक्तव्याने संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्याकडे वळल्याय. त्यांचा ठावठिकाणा सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञात ठेवण्यात आलाय.

झेलेन्स्का जिथं राहतात तिथून त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देशहितासाठी आपल्या प्रभावाचा वापर करत आहे.

गेल्या आठवड्यात त्यांनी लिहिलं होतं, "आज मी रडणार नाही आणि घाबरणार नाही. मी संयमी आणि आत्मविश्वासानं राहीन. माझी मुलं माझ्याकडं पाहत आहेत. मी त्यांच्यासोबत असेन. आणि मी माझ्या पतीसोबत असेन, तुमच्यासोबत असेन."

यादरम्यान, त्यांनी जगातील इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीसाठी एक नवीन संदेश शेअर केलाय. त्या काय करू शकतात हे त्यांनी स्पष्ट केलंय. "आजकालच्या प्रथम महिला मला विचारत आहेत की, त्या युक्रेनला कोणत्या प्रकारे मदत करू शकतात. माझं उत्तर हेच आहे: जगाला सत्य सांगा."

त्यांनी त्यांच्यासाठीही काही सूचना केल्या आहेत ज्या मानवी दृष्टिकोनातून त्यांना मदत करु शकतात.

युक्रेनच्या 44 वर्षीय फर्स्ट लेडीचे इंस्टाग्रामवर 2 दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पण त्यांच्या देशात याचा किती लक्षणीय प्रभाव असेल?

शिक्षण सोडून कॉमेडीच्या क्षेत्रात

ओलेना झेलेन्स्का क्रिविह रिहमध्ये लहानच्या मोठया झाल्या आहेत. हे मध्य युक्रेनमधील एक शहर आहे जिथे त्यांचा नवरा म्हणजेच वोलोदिमीर झेलेन्स्की यांचंदेखील बालपण गेलंय.

हे दोघे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते, जिथे त्या आर्किटेक्चर शिकत होत्या तर त्यांचे पती कायद्याचं शिक्षण घेत होते.

नंतर दोघांनीही अभ्यासक्रम बदलला आणि विनोदी अभिनयाचा अभ्यास सुरू केला.

त्या त्यांच्या पतीच्या कंपनी स्टुडिओ क्वार्टल-95 मध्ये पटकथा लिहायच्या. 8 वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2003 मध्ये लग्न केलं. एका वर्षानंतर त्या दोघांना पहिली मुलगी झाली. त्यांनतर, 2013 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला.

झेलेन्स्कांचा राजकारणात येण्याचा कुठलाही विचार नव्हता. पण एप्रिल 2019 मध्ये त्यांच्या पतीने 73% मतांसह ऐतिहासिक विजय मिळवला आणि ते युक्रेनच्या राष्ट्रपती भवनात पोहोचले.

झेलेन्स्का म्हणतात की, "निवडणुकीच्या वेळी त्यांनी त्यांच्या पतीसाठी तयार केलेल्या सोशल नेटवर्कमुळेच हे सारं शक्य झालंय."

अध्यक्ष झेलेन्स्की म्हणतात की,"त्यांच्या पत्नीने त्यांना या काळात खूप साथ दिलीय."

पडद्यामागची भूमिका

त्या स्वत: ला प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवण्यात धन्यता मानतात. तसंच त्या सध्या संकटाच्या वेळी देशातील नागरिकांना मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सोशल नेटवर्क्सची शक्ती मजबूत करत आहेत.

या वैशिष्ट्यांमुळे, 2019 मध्ये, फोकस मासिकाने त्यांना 100 सर्वांत प्रभावशाली युक्रेनियन लोकांमध्ये समाविष्ट केलं होतं. त्याचवेळी, त्या वोग मासिकाच्या स्थानिक आवृत्तीच्या मुखपृष्ठावर सुद्धा दिसल्या होत्या. या दरम्यान, 2019 मध्ये त्यांनी प्रथम महिला असताना त्यांच्या उद्दिष्टांबद्दल सांगितलं होतं.

सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर आपल्या जीवनात काय बदल झाले हेही त्यांनी सांगितले होतं.

त्यां सांगतात, "मी असं म्हणू शकत नाही की प्रचार करणं किंवा पत्रकारांशी संवाद करणं खूप तणावपूर्ण आहे. परंतु मी पडद्यामागं राहणं पसंत करते. माझे पती नेहमीच पुढे असतात आणि मला त्यांच्या सावलीच्या मागे आरामदायक वाटतं."

"मी पक्षाचा आत्मा नाही, मला विनोद सांगायला आवडत नाही. ते माझ्या स्वभावातही नाही. पण प्रचाराच्या बाजूने मला माझी स्वतःची कारणं सापडली. यापैकी एक प्रसंग म्हणजे महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधणं होय. "

या सगळ्या प्रसंगादरम्यान, त्यांनी घरगुती हिंसाचार, मुलांचं पोषण आणि पॅरालिम्पिकसाठी समर्थन यांसारख्या मुद्द्यांवर काम करण्याच ठरवलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)