You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशियाची गॅस पुरवठा बंद करण्याची धमकी, कच्च तेल 300 डॉलरवर जाण्याची भीती
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पाश्चात्य देशांनी अतिशय कडक निर्बंध लादले आहेत. तथापि, त्यात रशियाचे सर्वांत महत्त्वाचे उद्योग तसंच वायू आणि कच्च्या तेलाचा पूर्णपणे समावेश नाही.
युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाची अर्थव्यवस्था, बँकिंग व्यवस्था आणि चलन प्रचंड दबावात आहे.
रशियाचे म्हणणं आहे की त्यांच्या तेल निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली तर कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. त्याच वेळी, युरोप गॅस, कोळसा आणि तेलासाठी रशियावरील आपलं अवलंबित्व कमी करण्यासाठी वेगळा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.
युरोपियन युनियन सध्या त्यांच्या गरजेच्या निम्मा गॅस, कोळसा आणि सुमारे एक तृतियांश तेल रशियाकडून आयात करतं.
रशियावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी युरोपियन युनियनचे नेते या गुरुवारी आणि शुक्रवारी भेटणार असल्याचं सांगितल्या जातंय.
एका निवेदनात, युरोपियन युनियनच्या नेत्यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा थेट उल्लेख केला नाही, परंतू त्यांनी असं म्हटलं आहे की "युरोपियन इतिहासात नवीन इतिहासाचा काळ घडत आहे."
या बैठकीत 2030 पर्यंत विकास आणि गुंतवणुकीचं नवीन मॉडेल विकसित करण्यावर तसंच उर्जेचा पुरवठा आणि मार्गांमध्ये विविधता आणण्यावर भर देण्यात येणार आहे.
रशियाची धमकी
पाश्चात्य देशांच्या निर्बंध आणि इशाऱ्यांनंतर, रशियाने धमकी दिलीय की रशियन तेलावर बंदी घातल्यास त्याची किंमत प्रति बॅरल 300 डॉलरपर्यंत पोहोचू शकते आणि जर्मनीला जाणारी मुख्य गॅस पाइपलाइन बंद होऊ शकते.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने म्हटलं आहे की ते आणि त्यांचे युरोपियन मित्र रशियाकडून तेल आयात करण्यावर निर्बंध लादण्याचा विचार करत आहेत. जगभरात कच्च्या तेलाच्या किमती 2008 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. सोमवारी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचली आहे.
रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी म्हटलंय की, "रशियन तेल नाकारल्यास जागतिक बाजारपेठेवर घातक परिणाम होतील."
ते म्हणतात की कच्च्या तेलाची किंमत दुप्पट होऊन प्रति बॅरल 300 डॉलरपर्यंत पोहोचू शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनच्या नेत्यांशी चर्चा करून या बंदीसाठी पाठिंबा मागितलाय.
मात्र, अमेरिकेला कुणाचा पाठिंबा मिळाला नाही तर अमेरिका स्वतः हा निर्णय घेऊ शकते, असंही मानलं जातंय. परंतु युरोपमधील बहुतांश देश रशियन ऊर्जा स्त्रोतांवर अवलंबून आहेत. यासोबतच अमेरिका आपल्या गरजेच्या तीन टक्क्यांहून अधिक तेल रशियाकडून आयात करते.
रशियातून पाईपलाइनद्वारे गॅस जर्मनीपर्यंत पोहोचतो. गेल्या महिन्यात, जर्मनीनं त्यांच्या दुसऱ्या नॉर्ड स्ट्रीम या गॅस पाइपलाइनचं काम थांबवलं आहे.
रशियन नेते नोवाक म्हणाले, "आम्हालाही असाच निर्णय घेण्याचा अधिकार आहे, नॉर्ड स्ट्रीम-1 गॅस पाइपलाइनमधून गॅस थांबवू शकतो."
रशिया किती तेल आणि वायूची निर्यात करतो?
अमेरिका आणि सौदी अरेबियानंतर रशिया हा जगातील तिसरा सर्वांत मोठा तेल उत्पादक देश आहे. जगातील 8 ते10 टक्के तेलाचा पुरवठा एकट्या रशियाकडून होतो.
रशिया दरवर्षी 4 ते 5 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची आणि 8,500 अब्ज घनफूट नैसर्गिक वायूची निर्यात करतो.
यातील बहुतांश निर्यात युरोपच्या भागात जाते. रशिया 40 टक्के गॅस आणि 30 टक्के तेल युरोपियन युनियनला निर्यात करतो, हा पुरवठा खंडित झाल्यास त्याला पर्याय शोधणं सोपं नाही.
जागतिक ऊर्जा बाजारपेठेत रशियाच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे, अमेरिका आणि युरोपियन युनियन अजूनही रशियाच्या तेल आणि वायू उद्योगावर पूर्णपणे बंदी घालण्यास असमर्थ आहेत.
हे लक्षात घेता, सोमवारी, जर्मन चॅन्सेलर ओलाफ शुल्त्झ यांनी रशियाची तेल आणि वायूवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादण्याची कल्पना नाकारलीय. ते म्हणाले की युरोपनं रशियन ऊर्जा निर्बंधांमधून "जाणूनबुजून सूट" दिली आहे, कारण यावेळी ऊर्जा पुरवठा "इतर कोणत्याही मार्गाने" करता येणार नाही.
युरोपमधील देशांना तेलापेक्षा जास्त गॅसची आवश्यकता असते आणि युरोपियन युनियन 61% वायू आयात करते, त्यापैकी 40% रशियामधून येतो.
जर रशियाने युरोपला गॅस पुरवठा करण्यास नकार दिला, तर युरोपला गॅस संकटाचा सामना करावा लागू शकतो, अशा परिस्थितीत गॅस मिळविण्यासाठी इतर मार्ग शोधावे लागतील.
ब्रोगेल थिंक-टँकच्या अंदाजानुसार, जर रशियाने युरोपला गॅस पुरवठा करणं थांबवलं, तर युरोपियन युनियन देशांना त्यांच्या आधीच साठा केलेल्या गॅसवर अवलंबून राहावं लागेल, जे सध्या दशकातील सर्वांत खालच्या पातळीवर आहे.
एप्रिलमध्ये तापमान वाढल्यानंतर युरोपीय देश हा वायू साठवण्यास सुरुवात करतात जेणेकरून ते हिवाळ्यात वापरता येईल. याचा अर्थ त्यांना गॅससाठी वेगळा स्रोत शोधावा लागेल.
या स्थितीत हे देश उत्तर आफ्रिका आणि अझरबैजानसारख्या देशांतून द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) आयात करू शकतात.
मोठ्या प्रमाणात गॅसची मागणी वाढली तर युरोपीयन गॅस क्षेत्रावर दबाव वाढेल आणि आधीच वाढलेल्या गॅसच्या किमती आणखी वाढतील.
रशियन तेलाला पर्याय काय असेल?
रशियाच्या तेलावरील संभाव्य निर्बंधांमुळे त्याच्या इतर पर्यायांवर दबाव वाढेल.
तेलाच्या अखंडित पुरवठ्यासाठी अमेरिका या आठवड्यात कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्यासाठी सौदी अरेबियावर दबाव आणू शकते. यासह, इराणच्या अणुकरारावरील घडोमोडी पुढे जाऊ शकतात जेणेकरून त्याच्या तेल निर्यातीवरील निर्बंध हटवले जातील आणि तेलाचा पुरवठा अबाधित राहील.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)