पाकिस्तान महिला क्रिकेट कॅप्टनच्या बाळाची भारतीय महिला संघाला भूरळ, व्हीडिओ व्हायरल

फोटो स्रोत, @THEREALPCB
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय महिला विश्वचषकासाठीच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानला तब्बल 107 धावांच्या फरकाने पराभूत केलं.
आजवर महिला क्रिकेट वर्ल्डच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान पाकिस्तानचे एकूण 11 सामने खेळवले गेले आणि या अकरा ही सामन्यांत भारताने विजय मिळवला.
रविवारीही भारताने सामना जिंकला. मात्र या विजयाची जितकी चर्चा झाली नाही तितकी जास्त चर्चा झाली भारत आणि पाकिस्तानी खेळाडूंच्या एकमेकांप्रती असलेल्या आदराची आणि प्रेमाची.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तर भारत आणि पाकिस्तानच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात सामना संपल्यानंतर पाकिस्तानची कर्णधार बिस्मिल्लाह मारूफने आपली लेक फातिमाला कडेवर घेतलं आहे आणि भारतीय संघातील महिला खेळाडू बिस्मिल्लाहच्या मुलीसोबत खेळताना आणि मस्ती करताना दिसतं आहेत.

फोटो स्रोत, Twitter
हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.
आता या व्हिडिओवर भारत आणि पाकिस्तान मधून चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यात पत्रकार मुजीब माशेल लिहितात, "हा व्हिडिओ पाहून तुमचं हृदय एका सुंदर अंदाजात विरघळेल."
तेच एक भारतीय युजर लिहितो 'प्रेम पसरवा, द्वेष नाही.' तेच साद नावाचा दुसरा युजर लिहितो, "इंटरनेटवरील ही आजवरची सर्वात छान गोष्ट आहे. मैदानाबाहेर ही क्रिकेट सुंदर असू शकतं असा हा प्रसंग आहे."
त्याचवेळी आणखीन एका युजरने लिहिले की, "महिला क्रिकेट विश्वचषकातील हे सर्वात सुंदर दृश्य आहे."
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने ही यासंदर्भातील एक फोटो ट्विट केला आहे.

फोटो स्रोत, PCB
पाकिस्तानी कॅप्टन मारूफची आई सुद्धा या टूर्नामेंटला आली होती.
पाकिस्तान महिला संघाची कर्णधार बिस्मिल्लाह मारूफची मुलगी अवघ्या 6 महिन्यांची आहे. वर्ल्डकपसाठी ती तिच्या मुलीला घेऊन न्यूझीलंडमध्ये दाखल झाली.
या टूर्नामेंटमध्ये मारूफ आणि तिची मुलगी फातिमा आणि त्यांच्यासोबत मारुफची आई सुद्धा आली होती. ही कदाचित पहिलीच वेळ असेल जेव्हा पाकिस्तानी महिला खेळाडूला काळजी घेण्यासाठी कोणाला तरी सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
खरं तर, मे 2021 मध्ये पहिल्यांदाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पॅरेंटल सपोर्ट पॉलिसी लागू केली होती. या पॉलिसी अंतर्गत महिला क्रिकेटपटूला एक वर्षाच्या प्रसूती रजेची सुविधा देण्यात आली आहे. या धोरणांतर्गत पहिली लाभार्थी सध्याची कॅप्टन बिस्मिल्लाह मारूफ आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये मारूफने वर्ल्डकपसाठी आपण खेळणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर तिला तिच्यासोबत सपोर्ट स्टाफ ठेवण्याची परवानगी देण्यात आली.

फोटो स्रोत, TWITTER/@MAROOF_BISMAH
वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर निघण्यापूर्वी मारूफ आणि तिच्या आईने बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी अब्दुल रशीद शकूर यांच्याशी संवाद साधला होता.
या संवादात बिस्मिल्लाह मारूफच्या आई बीबीसीला सांगतात की, "फातिमाच्या जन्मानंतर मी अधिक सक्रिय झाले आहे. माझी इतर नातवंड देशाबाहेर आहेत. फातिमाच्या रूपानं मला पहिल्यांदाच आपल्या नातवंडाचं संगोपन करता आलं. हा खूप सुखद अनुभव आहे."
बिस्मिल्लाह आणि फातिमा यापैकी कोणाला सांभाळणं जास्त कठीण आहे असं विचारल्यावर बिस्मिल्लाह खळखळून हसली. मात्र तिच्या आईने सांगितलं, "बिस्मिल्लाहला सांभाळणं जरा कठीण होतं."
त्याचवेळी बिस्मिल्लाह मारूफ सांगते, "मुलगी फातिमाच्या जन्मानंतर तिचं आयुष्य बदललं आहे. माझं सर्व लक्ष तिच्याकडेच असतं. माझ्याकडे आता स्वत:साठी वेळ नाही. काम वाढली आहेत. पण माझ्या आईमुळे मी पुन्हा मैदानावर उतरू शकले. मला माहित आहे क्रिकेट आणि माझी कारकीर्द सध्या महत्वपूर्ण आहे."
बिस्मिल्लाह मारूफची क्रिकेट कारकीर्द
मारूफने डिसेंबर 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. मारूफने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 109 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2617 धावा केल्या आहेत. यात 14 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील तिची सर्वोच्च धावसंख्या 99 आहे.
महिला क्रिकेटमध्ये शतक न मारता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही तिच्या नावावर आहे. तिने 44 विकेट्सही घेतल्या आहेत.
त्याच वेळी टी-20 क्रिकेटच्या 108 सामन्यांमध्ये तिने 11 अर्धशतकांसह 2225 धावा काढल्या आहेत. तिने टी-20 क्रिकेटमध्ये 36 विकेट घेतल्या आहेत.
तिने टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तान कडून सर्वाधिक धावा केल्या आहेत.
बिस्मिल्लाह मारूफ 2019 मध्ये पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कॅप्टन बनली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








